मागील दोन महिन्यांपासून माझ्या आयुष्यात टप्प्या-टप्प्याने घडलेल्या दोन घटनांनी मला प्रचंड अस्वस्थ केलेय. मामा आणि नंतर चुलत भाऊ या दोघांच्या अकाली निधनानंतर संसारिक जबाबदारीतून माझ्या मनात मृत्यचे भय वाढले होते. महिनाभरापूर्वी मामांच्या निधनानंतर मृत्यू म्हणजे काय? तो लवकर येणार असं प्रत्येकाला का वाटतं? असे अनेक प्रश्न मला सतावत होते. त्यावेळी ओशोंच्या मदतीने जीवनासारखाच मृत्यूही सुंदर! असतो,या निष्कर्षापर्यंत पोहचलो. मृत्यूची सुंदरता आणि कुरूपता फक्त आपल्या दृष्टीकोनात सामावलेली असते,हे सत्य उमगले. त्यामुळे माझ्यातील मृत्यूचे भय कधीच संपलेय, असचं मला वाटत होते. परंतु नुकतेच काकांच्या मुलाचे अकाली निधन झाल्यानंतर पुन्हा ‘मृत्यू आणि भय’ हे समोर येऊन ठेपले. अर्थात यावेळी या दोघांनी पुन्हा इकदा कौटुंबिक जबाबदारीचे रूप धारण केलेले होते. त्यामुळे मृत्यू,मोह आणि प्रेम यांची व्याख्या जीवनाशी जुळवताना मनाची खूप घालमेल व्हायला लागली. मी मृत्यूला घाबरतोय की, जबाबदारीच्या बेड्या पायात प्रेमाचं रूप घेऊन अडकताय हेच समजत नव्हते. संसारिक जबाबदाऱ्या आणि त्यातून येणारे भय, हे माझ्या मृत्यूच्या उत्सवात धोंड्याचं काम करतील असं मन कायमच भ्रमित करत होतं. मृत्यूचे भय की, संसारिक जबाबदारींची अपुर्णावस्था नेमके काय कारण असावे माझ्या अस्वस्थतेचे?, असे अनेक प्रश्न मला म्हणून सतावत होते. म्हणून यानिमित्ताने माझ्या भयाचे कारण आणि अस्वस्थेचं रहस्य शोधण्याचा माझा प्रवास पुन्हा एकदा सुरु झालाय.
आपण जगतोय किंवा मरतोय, एके दिवशी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. या प्रक्रियेपासून लांब जाण्याचा किंवा पळण्याचा प्रयत्न केल्यावरच मृत्यूविषयी भय निर्माण होते. अर्थात ही एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्यामुळे मृत्यूपासून भयभीत होण्याची गरज काय ? जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे जन्मापासूनच मृत्युचीही सुरुवात होते, हे सत्य जेवढ्या लवकर स्वीकारू तेवढेच आपल्यासाठी बरे आहे. जन्माचे पहिले पाऊल हे मृत्युच्याच दिशेने आहे. जन्माचे पहिले पाऊल टाकतांना काही जाणवले नाही तर मग मृत्यूचे शेवटचे पाऊल टाकण्यात भीती बाळगण्याची गरज काय? मृत्यू अटळ आहे, फक्त त्याच्या भयातून मुक्त होणे गरजेचे आहे. मृत्यूपासून सुटका होणे शक्य नाही. परंतु मृत्यू सहज,सुंदर आणि उत्सवपूर्ण झाला पाहिजे. सुटलेला बाण जसा परत येत नाही,तसंच जन्मानंतर मृत्यूची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुन्हा जन्म मिळणे शक्य नाही. मनुष्याच्या जीवनात फक्त मृत्यूच निश्चित असतो, बाकी सर्व गोष्टी अनिश्चित आहेत. जे निश्चित आहे,ज्याला टाळता येणे शक्य नाही, त्याचे भय बाळगण्यात काय अर्थ?.
प्रत्येक मनुष्य मृत्यूपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो. तेथूनच खरी अर्थाने भयाची पहिली पायरी सुरु होते. माझी स्थिती थोडी वेगळी आहे.कारण मृत्यूचे भय नाही तर त्यानंतरचे जीवन माझ्या चिंतेचे कारण होते. त्यामुळे मृत्युचे भय निर्माण करणारी सर्व कारणं शोधण्यासाठी प्रत्येक मनुष्याप्रमाणे मीदेखील उत्सुक आहे. परंतु साक्षीभाव अभावी आपल्याला सत्याचा स्पर्श होत नाही आणि यातूनच गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे सर्वात आधी मृत्यूकडे निर्भीड,तटस्थ आणि भयमुक्त होऊन पाहण्याचा निर्णय घेतला पाहिजे. माझ्यानंतरही जीवन हे चालतच राहणार आहे. मी असल्या-नसल्याने माझ्यावर प्रेम करण्याऱ्या व्यक्तींचा क्षणीक शोक वगळता, या जगात वेगळे असे काय परिवर्तन घडणार आहे, काही नाही ! मग मी का अस्वस्थ आहे? मला नेमकी कसली भीती आहे, हे भय का संपत नाहीय? याचा शोध घेतण्याचे ठरवलंय.
माझ्या मते कोणत्याच व्यक्तीला मृत्यूचे भय नसते. मृत्यू कसा होणार? त्याचा येण्याचा प्रकार म्हणजे अपघात, नैसर्गिक वैगैरे…वैगैरे या गोष्टीतून मृत्यूसमयी शरिराला होणारी पिडा, यासारखे विचार आपल्या मनात मृत्यूविषयी पहिली भीती निर्माण करतात. त्याचपद्धतीने एखादं नातेवाईक,मित्र,गल्लीतला व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी लोकांच्या, नातेवाईकांच्या प्रतिक्रिया तसेच मृत्यूवेळी त्याला झालेली पिडा. यावरूनच आपण आपल्या मृत्यूसमयीच्या पीडेचा किंवा लोकांच्या प्रतिक्रियेचा अंदाज बांधत असतो. तसचं दुसऱ्याच्या मृत्यूसमयी होणाऱ्या गोष्टी आपण आपल्या मृत्यूच्या वेळी घडतील असं गृहीत धरतो. कुणाच्याही मृत्यूनंतर त्याच्या आप्तेवाईक,परिवार,मित्र हे आपल्या पश्चात कसं जीवन जगतील? त्यांच्या संसारिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर होती,त्या आपण पूर्ण केल्या की नाही? अपूर्ण असेल तर त्याचं कसं होईल? किंवा संसारिक जबाबदाऱ्या पूर्ण न करताच मृत्यू आला तर लोकं काय म्हणतील? ही चिंता प्रत्येक मनुष्याला कायम मृत्यूपासून भयभीत ठेवत असते. दुसरीकडे आपण ज्यांच्या चिंतेतून मृत्यूकडे भय म्हणून बघतो, ती आपली माणसं काही दिवसानंतर जीवन परत जगायला सुरुवात करतील. जीवनातील प्रत्येक सुखं आणि दु:ख आपल्याशिवाय भोगतील. त्यावेळी आपण नसू,जीवनाबद्दलचा हाच मोह आपल्याला मृत्यूविषयी कायम चिंताग्रस्त ठेवत असावा,असं मला वाटतं.
आपल्या संसारिक जबाबदाऱ्या उदा: मुलांचे लग्न,शिक्षण,घर किंवा आपल्यानंतरचे उर्वरित आयुष्य आपल्या पत्नीला कुठल्याही आर्थिक किंवा सामाजिक संकटात पाडेल. या गोष्टींची सोय आपण आधीच केली तर मृत्यूचे भय हे मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. अर्थात त्यामागे आपण गेल्यानंतर जगासह आपल्यावर अवलंबून असलेल्यांनीही आपल्याला चांगले म्हणावे,आपली आठवण कायम काढावी, हा मानवी प्रवृत्तीचा स्वार्थ असतोच.
आपण जर जीवन खऱ्या अर्थाने जगू इच्छितो तर जीवनात सकारात्मक उत्सुकता असणं गरजेचे आहे. जीवनाप्रती उत्सुकताच आपण जीवन जगण्याप्रती किती सकारात्मक आहोत हे दर्शवित असते. ज्यावेळी आपण या पद्धतीपेक्षा वेगळ्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.त्याचवेळी आपण जीवनाच्या खोलाईत जात भ्रमित होण्याची भीती असते. त्यामुळे मृत्यूचे भय संपवण्यासाठी सर्वातआधी त्याच्याकडे तटस्थ आणि निर्भीडपणे बघणे गरजेचे आहे. त्यातूनच आपल्याला आपल्यावरील जबादारींचे ओझे कळेल आणि यातूनच मृत्यूसमयी संसारिक मोहाचा भय आपला मृत्यूचा उत्सव कमी करू शकणार नाही. आपल्या जन्माप्रमाणेच मृत्यूचा देखील उत्सव होतोय हा आनंद आपल्यासाठी स्वर्गाची अनुभूती देणारा ठरेल. त्यावेळी मृत्यु म्हणजे आपण पुन्हा एका नवीन जन्माच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल याची जाणीव आपल्याला होईल. म्हणून जन्माचे पहिले पाऊल हे उत्सवातच पडले पाहिजे बरोबर ना ?
Excellent content.