अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने भाजपासोबत काडीमोड घेतली.खरं म्हणजे त्यात काहीही आश्चर्य वाटून घेण्यासारखे नाही.कारण या प्रेमी जोडप्याचा ‘ब्रेकअप’ हा फार काळ टिकत नाही,तसा आता पर्यंतचा इतिहास आहे.शिवसेनेला फुटीचा धोका तसेच भाजपातील अंतर्गत वाद आणि नोटबंदी नंतर राज्याच्या जनतेत निर्माण झालेला संताप लक्षात घेता दोन्हींना सध्या फारकत घेणे परवडणारे नाही.कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा यांच्यात कधी नव्हे ते एवढे टोकाचे वाकयुद्ध रंगले होते.अगदी युती तुटेल असेच चित्र होते.यामुळे ती निवडणूक फक्त सेना-भाजपाच एकमेकांच्या विरोधात लढत आहे,असेच चित्र रंगवले गेले.अर्थात हे सर्व शिवसेना-भाजपच्या नेतृत्वाच्या अपेक्षे प्रमाणेच घडत होते.आता देखील तीच स्थिती आहे.त्यामुळे नेहमी प्रमाणे या निवडणुकांनंतर देखील समविचारी पक्षांसोबत घेत राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र येत असल्याची घोषणा दोघं पक्षाचे नेते करतील.म्हणूच कालपासून सुरु असलेला प्रकार म्हणजे निव्वळ ‘बेकार का ड्रामा है ‘! असाच म्हणावा लागेल कारण त्यातून शेवटी काहीच निघणार नाही.
शिवसेना-भाजपा युतीचा इतिहास तसा पूर्वीपासूनच रुसवा-फुगवा असाच राहिला आहे.तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना,अशीच दोघं पक्षांची अवस्था आहे.बऱ्याचदा तर ‘तुम रुठी रहो,मै मनता रहू’अशीच गंमत चालायची पण त्यावेळी स्व.प्रमोद महाजन व कालांतरानंतर स्व.गोपीनाथ मुंडे हे मातोश्रीवर जात शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेंची समजूत काढत त्यांचा राग शांत करत होते.परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.बाळासाहेबांच्या तुलनेत भाजपा नेते उद्धव ठाकरेंना सुरुवातीपासूनच कमी लेखत आले आहेत.आधी भाजपाचा केंद्रातील कोणताही नेता महाराष्ट्रात आला तर मातोश्रीवर भेट दिल्याशिवाय परत जात नव्हता.आता मात्र राज्यातील नेते देखील मातोश्रीवर लवकर पाय ठेवत नाही.अशा अनेक कारणांमुळे उद्धव कुठेतरी दुखवले जात होते.नाईलाजाने बाळासाहेब गेल्यानंतर पक्ष सांभाळून ठेवण्यासाठी त्यांनी सर्व अपमान गुमान गिळला.परंतु शिवसेनेचा प्राण समजली जाणारी मुंबई महापालिका ज्यावेळी भाजपा हातातून घेवू पहात असल्याचे जाणवले त्यावेळी मात्र उद्धव ठाकरेंचा संयम सुटला आणि त्यांच्या मनातील अनेक वर्षापासूनची धग-धग त्यांनी गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये बाहेर काढली.अर्थात शिवसेनेचा हाथ धरून मुंबईसह राज्यात वाढलेली भाजपा आता डोळे वटारायला लागली होती.त्यामुळे कडवा शिवसैनिकही कमालीचा अस्वस्थ होता.त्यात सत्ता आल्यांनतर देखील पाहिजे तसा वाटा न मिळाल्यामुळे अधिकची भर पडली.राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार, अशी घोषणा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना-भाजपची युती तुटल्याची घोषणा केली.ते ज्या पोट तीडकीने बोलत होते,त्याच्यातून त्यांचा राग आणि संताप जाणवत होता.
दुसरीकडे भाजपा ही युती झाल्यापासून लहान भावाच्या रुपात राज्यात शिवसेनेसोबत वावरली,भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून कधीही बाळासाहेबांच्या आदेशाची अवमानना झाली नाही.त्याउलट शिवसेना नेते नेहमी भाजपला हिणवत असत.नुकत्याच झालेल्या विधानसभेत अधिक जागा मिळत भाजपा मोठा भाऊ झाला. त्यामुळे त्यांनी आपण काही कमी-अधिक बोललो तर शिवसेनेने सहन करावे,कारण कधीकाळी आम्ही देखील सहन केले आहे,असा भाजपचा तर्क स्वाभाविक असाच आहे.परंतु शिवसेना आपल्या सुरुवातीच्या काळासारखा तोऱ्यात उभा आहे.तर भाजपला त्यांनी शिवसेनेला एकेकाळी दिलेल्या मोठया भावाचा मान अपेक्षित ठेवून आहे.बाळासाहेबानंतर शिवसेनेला अनेक झटके बसले.लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तर शिवसेनेची स्थिती फारच गंभीर होती.परंतु मोदी लाटेने शिवसेनेत पुन्हा एकदा नवा जोश भरला हे सर्वांनी पाहिले आहे.त्यामुळे भाजपचे थोडे जास्तीचे भारी भरणे देखील स्वाभाविक असेच आहे.
राज्यातील सरकार अस्थिर होण्याची शक्यता कमीच
भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांच्या ‘थिंक टॅक’मधील नेत्यांना केंद्रात व राज्यात एकमेकासोबत संसार करण्याची इच्छा आहे.तर संघ परिवाराला देखील सेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाने भाजपला सोडू नये असेच वाटते.काल उद्धव ठाकरे म्हणाले,’ गेली 25 वर्ष शिवसेना युतीत सडली. पण आता ही फरफट होणार नाही. तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही’,असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले.उद्धव यांच्या भाषणातील काही मुद्दे बारीक लक्ष देवून ऐकले तर लक्षात येते की,त्यांना कुठे तरी पक्षफुटीची भीती आहे.सत्तेतून बाहेर राहून अधिकचा अपमान आणि पक्ष कमकुवत होण्याचा धोका लक्षात घेता उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता कमीच वाटते.शिवसेनेला एका तपानंतर राज्यात सत्ता मिळाली आहे.कितीही मोठा पक्ष अधिक काळ सत्तेबाहेर हे नेहमी धोक्याचेच असते.सत्तेबाहेर राहण्याचा निर्णय कदाचित हा आत्मघातकी देखील ठरला असता.त्यातुलनेत उद्धव सत्तेत राहून पक्ष अधिक मजबूत करून भाजपला डिवचण्यांची एकही संधी सोडणार नाही.कारण दुश्मनला सरळ ठार मारण्याच्या धमकी देण्यापेक्षा नुसतं हत्यार दाखवून काम होत असेल तर स्वतःच्या हातून उगाच गुन्हा घडवून आणायचा नसतो.दुसरीकडे भाजपला देखील सध्या शिवसेनेला सोडणे धोक्याचेच आहे.नोटबंदी तसेच मराठा मोर्चानंतर भाजपात देखील भीतीचे वातावरण आहे.तसेच अंतर्गत मतभेदामुळे देखील भाजपा त्रस्त आहे.मेट्रोसिटी व ग्रामिक भागात नोटबंदी व मराठा मोर्चाचा फटका अधिक बसण्याची भीती त्यांना आहे.तसेच राष्ट्रवादीवर किती विश्वास ठेवायचा हा देखील एक मोठा प्रश्न आहे.कारण शरद पवार जे सांगतात नेमके त्याच्या उलटे करतात.त्यामुळे त्यांच्या हाकेला किती प्रतिसाद द्यायचा याचा देखील विचार भाजपा करत असेल.त्यामुळे राष्ट्रवादीच्या भरोशावर सरकार स्थिर सरकार विनाकारण अस्थिर करण्याचा धोकादायक डाव भाजपा कदापी खेळणार नाही.कारण स्व.बाळासाहेब नेहमी म्हणायचे, शरद पवार म्हणजे तेल लावलेला पेहलवान आहे.कुणाच्या हातात सापडणार नाही.त्यामुळे शिवसेना किंवा भाजपा हे पवारांना गृहीत धरून राजकीय डावपेच निश्चितच खेळणार नाही.कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका तसेच विधानसभेप्रमाणे शिवसेना-भाजपा एकमेकांच्या अंगावर धावून जातील मात्र एकमेकांचे कपडे फाटतील एवढी मारामारी करणार नाहीत.कारण कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा यांच्यात कधी नव्हे ते एवढे टोकाचे वाकयुद्ध रंगले होते.अगदी युती तुटेल असेच चित्र होते.यामुळे ही निवडणूक फक्त सेना-भाजपाच एकमेकांच्या विरोधात लढत असेच चित्र रंगवले गेले.अर्थात हे सर्व शिवसेना-भाजपच्या नेतृत्वाच्या अपेक्षे प्रमाणेच घडत होते.एरवी दोंघांचे भांडण तिसर्याचा लाभ ,असे आपण म्हणतो; परंतु या लढाईत दोघांचे भांडण अन् फायदापण दोघांचाच झाला.संभ्रमात पडल्यामुळे मनोमन भाजपचा निष्ठावान असलेला मतदार भाजपसाठी , तर शिवसेनेशी निष्ठावान असलेला मतदार अस्वस्थ होत पक्का झाला ! आणि त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या.त्यामुळे यावेळेसही तीच चाल खेळली जात आहे.त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी फार टेंशन घेण्याची गरज नाही.कारण सध्या सुरु असलेला वाद म्हणजे दूसरं काही नसून बेकार का ड्रामा है!
एकदम बरोबर विजय भाऊ लोकांचे लक्ष इतर प्रश्नाकडून durlaxit करून हिरो बनून सर्व मिडिया मध्ये यांचाच विषय चालतो व मूळ उद्देश सफल झाला की मग युती करून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असे अनेक वेळा झाले मूर्ख बनविण्याचा उद्योग आहे