समाजातील प्रत्येक घटकाला शांत आयुष्य हवे असते. परंतु ज्यावेळी सुसंस्कृत समाजात विघातक प्रवृत्तीची काही माणसे हैदोस घालतात. त्यावेळी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ठेचण्यासाठी पोलीस हा महत्त्वाचा घटक ठरतो. पोलीसासाठी कधीच कुठला सण किंवा कुठलाही उत्सव नसतो. सदैव हातात काठी हातात घेऊन समाजाच्या शांततेसाठी तो नेहमी कटिबद्ध असतो. तरी देखील पोलीसदलाविषयी समाजात कायमच नकारात्मक भावना राहिली आहे, हे कटू सत्य देखील आपल्याला मान्यच करावे लागेल. आज २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर ‘पोलीस हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो. आपल्या जळगाव जिल्ह्यातील ९ पोलीस कर्मचाऱ्यांनी देशाच्या विविध भागात सेवा बजावीत असतांना बलिदान दिले असल्याचे फार कमी लोकांना माहित असेल. परंतु या सर्व शहीद पोलिस कर्मचाऱ्यांच्या शौर्याच्या खालील कहाण्या वाचून आपला पोलीस दलाबद्दलचा आदर अधिकच वाढेल याची मला खात्री आहे.
१ ऑक्टोबर १९१७ ते ३१ सप्टेबर २०१८ या कालावधीत संपूर्ण भारतात एकूण ४२१ पोलीस अधिकारी, कर्मचारी, जवान कर्तव्य बजावताना शहीद झाले. सन १९५९ ते आजपर्यंत जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले निमलष्करी दलातील १ जवान तसेच पोलीस दलातील ८ अधिकारी, कर्मचारी यांनी प्राणाची आहुती दिली आहे. कुणी आपल्या सहकाऱ्याला वाचवितांना, कुणी नदीत बुडणाऱ्या नागरिकांना,तर कुणी दहशतवादी आणि दरोडेखोरांच्या हल्ल्यात बळी ठरले आहेत. अनेकांनी दंग्यात सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करतांना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. विशेष म्हणजे शहीद झालेले बघुतांश पोलीस जवान हे अवघ्या विशीतील तरुण होते. सीमेवरचा सैनिकाप्रमाणे माझा पोलीसदादा देखील देशासाठी जीव द्यायला तयार असतो, हे या निमित्ताने आपल्या पुन्हा एकदा लक्षात येईल. मित्रांनो एक सांगतो…आपल्या जिल्ह्यातील या शूरवीर आणि शहिदांच्या शौर्याची कहाण्या वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.
शहीद पोलीस उपनिरीक्षक सिताराम पुनाजी चौधरी
शहिद वीरपूत्र पोउनि सिताराम पुनाजी चौधरी हे (मांगी, ता. रावेर) येथील रहिवाशी होते. त्यांची नेमणूक तुमसर पो.स्टे. जि. भंडारा येथे होती. १ मे १९७३, रोजी दुपारी १२ वाजता स्वतंत्र विदर्भासाठी तुमसर पोलीस स्टेशनच्या परिसरात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. सदर आंदोलनाच्यावेळी कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता. सदर गोळीबारामध्ये तीन इसम ठार झाले होते. त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याने त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सिताराम पुनाजी चौधरी (५७) यांना दगडाने ठेचून ठार मारण्यात आले होते. अशाप्रकारे शहीद पोउनि/ सिताराम पुनाजी चौधरी (४५) यांनी जमाव नियंत्रित करून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्य बजावतांना आपल्या प्राणाची आहुती दिली होती.
शहिद पोलिस शिपाई श्रीराम तुकाराम पाटील
शहिद वीरपूत्र पोलिस शिपाई श्रीराम तुकाराम पाटील यांनी वयाच्या अवघ्या २१ वर्षी पोलीस दलासाठी प्राणांची आहुती दिली आहे. स्व. पाटील हे सांगवी पोस्ट. नगरदेवळा, ता. पाचोरा येथील मूळ रहिवासी होते. त्यांची नेमणूक सीमा सुरक्षा बल, अमृतसर, पंजाब येथे होती. २५ नोव्हेंबर १९८७ रोजी ६ .३० वाजता पोलीस शिपाई श्रीराम तुकाराम पाटील हे पेट्रोलिंग पार्टी व वाहनासह पंजाब येथील अमृतसर मुख्यालयातून गस्तीसाठी रवाना झाले. सदर पार्टी रात्री ८.३० वाजेच्या सुमारात एका गावाजवळ पोहचल्यावर ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या जहालमतवाद्यांनी गस्तीच्या जिप्सीवर जवळून गोळीबार केला. गस्ती वाहनाने तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता जहालमतवादी यांनी वाहनावर गोळीबार केला. त्यात पोशिपाई श्रीराम पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने अमृतसरच्या सामान्य रुग्णालय येथे दाखल केेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अशाप्रकारे शहिद पोशिपाई श्रीराम पाटील (वय २१) यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
शहिद पोशिपाई अनिलसिंग मगनसिंग बयस
शहिद वीरपूत्र पोशिपाई अनिलसिंग मगनसिंग बयस हे हिंगोणे, ता. एरंडोल येथील रहिवाशी होते. त्यांची नेमणूक जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस स्थानक येथे होती. दि. ६ ऑक्टोबर १९९८ रोजी रात्री रात्री १०.३० वाजता पोशिपाई अनिलसिंग मगनसिंग बयस व पोलीस शिपाई रवींद्र पाटील हे रात्रगस्त करीत असताना फैजपूर – भुसावळ रस्त्यावर काही संशयित इसम आढळून आले. संशयित इसमांना हटकले असता त्यांनी ऊस कामगार असल्याचे सांगितले. त्याचवेळी पोशिपाई बयस यांना आजूबाजूस ४-५ इसम लपलेले होते. याबाबत गस्तीवरील दोन्ही शिपाई यांचा संशय बळावल्याने आणि त्यांना संशयित इसम दरोडेखोर असल्याचे लक्षात आले. त्यांनी संशयितांना विचारपूस केली असता त्यांनी हुज्जत घालून त्यांच्याजवळ असलेले तीक्ष्ण हत्याराने पोलिस शिपाई बयस व पोलीस शिपाई रवींद्र पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये श्री. पाटील हे जागेवरच बेशुध्द झाले. तर बयस हे जखमी अवस्थेत मोटारसायकल चालू करण्याचा प्रयत्न करीत असताना दरोडेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्त्याराने पुन्हा वार केला. परंतु त्या जखमी अवस्थेही बयस यांनी जखमी पाटील यांना जवळील आकाश हॉटेल येथे आणले आणि तेथे बेशुध्द पडले. हॉटेल मालकांनी फैजपूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधून सर्व घटना कळविली. दोघं जखमी पोलिसांना त्वरीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरीता आणण्यात आले. उपचारा दरम्यान पोलीस शिपाई बयस यांचे दि. ७ ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले. अशाप्रकारे गस्तीवर असताना दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतरही जखमी सहकाऱ्याचे प्राण वाचवून पोलीस शिपाई अनिलसिंग मगनसिंग बयस (३७) यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
शहिद पोलीस शिपाई अर्जुन राघो नेरकर
शहिद वीरपूत्र पोशि/ अर्जुन राघो नेरकर हे जळगाव मधील शिव कॉलनी येथील रहिवाशी होते. त्यांची नेमणूक भुसावळ शहर पो.स्टे. जि. जळगाव येथे होती. भारताच्या दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर दि. ३० ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या शिख अंगरक्षकाकडून हल्ला करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमिवर देशभरात शिख समुदायाविरुध्द दंगल घडविण्यात येत होत्या. त्या अनुषंगाने भुसावळ शहर स्थानकाच्या हद्दीत पोलिस शिपाई अर्जुन राघो नेरकर यांना भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त कामी ड्युटीस नेमण्यात आले होते. दि. १ नोव्हेंबर १९८४ रोजी पोलीस शिपाई नेरकर हे नगरपालिकेच्या दवाखाण्यात कायदा व सुव्यवस्था कर्तव्य बजावित असताना तेथे अचानक जमाव गोळा होऊन जमावाने शिख समुदायाची दुकाने लुटून त्यांची जाळपोळीस सुरुवात केली. पोलिस शिपाई नेरकर यांनी आपल्या सहकार्यांसह जमावास प्रतिबंध करुन जनता व सहकारी कर्मचारी जीवितहानीचे रक्षण करुन सहकार्यांचे व जनतेचे प्राण वाचविले होते. त्यावेळी जीवितहानी रोखण्यासाठी जमावास प्रतिबंध करताना नेरकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान नेरकर यांना वीरमरण आले. अशाप्रकारे जनता व सहकारी कर्मचारी यांच्या जिवनाचे रक्षण करीत असताना पोलीस शिपाई अर्जुन राघो नेरकर (३७) यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
शहिद पोलीस शिपाई संजय संतोष पाटील
शहिद विरपूत्र पोशि संजय संतोष पाटील हे जळगाव तालुक्यातील सावखेडा बु. येथील रहिवासी होाते. त्यंाची नेमणूक राज्य राखीव पोलीस बल गट क्र.०८, गोरेगाव, मुंबई येथे होती. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८ फ कंपनीस गडचिरोली येथे नक्षलग्रस्त बंदोबस्तात कर्तव्यास नेमण्यात आले होते. प्लॉटुन नंबर १ मधील जवानांना दिनांक २२ मे २००९ पासून मेलपाडी परिसर, भामरागड हद्दीत रस्ता बांधकामाचे कामकाज सुरु असल्याने त्याठिकाणी तैनात करण्यात आले होते. दिनांक १५ जुलै २००९ रोजी १०.३० वाजेच्या सुमारास प्लीस उप निरीक्षक वाडदकर, पोलीस उपनिरीक्षक देंढे आणि पोलीस शिपाई संजय संतोष पाटीलसह प्लाटूनमधील आठ पोलिस कर्मचारी हे बीआरओ वाहनाने पामूलगौतम नदीच्या काठावर पूरात अडकलेल्या एसटी बसच्या सुटकेसाठी गेले होते. एसटी बसची पुरातून सुटका केल्यावर बीआरओ वाहनाने परत येत असतांना पुलावरील वाहत्या पुराच्या पाण्यात वाहन पडले. त्यावेळी पोउनि वाडदकर व पाच सहकाऱ्यांना पोहून किनार्यावर आणण्यास मदत करून वाहनातील शस्त्र व दारूगोळा सुरक्षित ठेवतांना संजय पाटील यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशा प्रकारे कर्तव्यवरील सहकारी अधिकारी/कर्मचारी आणि शस्त्र व दारूगोळा यांचे रक्षण करतांना संजय पाटील यांनी वयाच्या अवघ्या २३ वर्षी आपल्या प्राणाची आहुती दिली.
शहिद हेड कॉन्स्टेबल रमेश यशवंत जगताप
शहिद विरपूत्र हेकॉ रमेश यशवंत जगताप हे चाळीसगाव तालुक्यातील धामणगावचे सुपुत्र होते. त्यंाची नेमणूक भोईवाडा पोस्टे ठाणे शहर येथे होती. निजामपुरा पोलिस स्टेशन नविन इमारत बांधकामास रझा ऍकेडमी समुदायाने बंदी केल्याच्या पार्श्वभूमीवर भोईवाडा पोलिस स्टेशन नेमणुकीचे हेड कॉन्स्टेबल रमेश यशवंत जगताप यांना निजामपुरा पोलिस स्टेशन, भिवंडी येथे स्ट्रायकिंग फोर्स ड्युटीस तैनात करण्यात आले होते. दिनांक ५ जुलै २००६ रोजी फिरदोस मस्जीद आग्रारोड, भिवंडी येथे अध्यक्ष रझा ऍकेडमी व त्यांचे ७५ ते १०० सदस्य यांनी बेकायदेशिररित्या जमा झाले. त्यानंतर जाळपोळ व दंगल सुरु केली. त्यावेळी जमावास काबु करतांना जिवित व वित्त हानीचे सरंक्षण करीत असतांना पोलीस हवालदार रमेश यशवंत जगताप यांच्यासह एक पोलिस कर्मचारी यांच्यावर हल्ला केला. त्यात सदरील दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना वीरमरण आले. अशाप्रकारे जमावास काबु करतांना कर्तव्यावर पोलिस हवालदार रमेश यशवंत जगताप यांनी देखील वयाच्या २० व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती दिली.
शहिद बीएसएफ जवान शेषराव समाधान हटलकर
शहिद विरपूत्र जवान शेषराव समाधान हटलकर हे जळगाव जिल्ह्यातील वरणगाव ता.भुसावळ येथील वीरपुत्र होते. त्यंाची नेमणूक सीमा सुरक्षा बल राजूरी, जम्मू काश्मिर येथे होती. राजुरी जम्मू-काश्मिर हद्दीत बीएसएफ मधील जवान शेषराव समाधान हटलकर हे नेमणूकीस असतांना कर्तव्य बजावतांना लष्कर-ए-तोयबा आणि अफगाण नॅशनल या आंतकवादी संघटनेने दिनांक २४ डिसेंबर १९९७ रोजी पोलिस र्फोस पार्टीवर हल्ला करून अंधाधुंद फायरींग केली. त्यामध्ये बीएसएफ जवान शेषराव समाधान हटलकर यांचे जागेवरच निधन झाले. अशाप्रकारे देशाच्या सिमेवर संरक्षण करीत असतांना बीएसएफ जवान शेषराव समाधान हटलकर (वय ३७ वर्षे) यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे.
शहिद पो.कॉ. राजेंद्र बाबुलाल अवस्थी व शहिद पो.कॉ.भगवान सखाराम पाटील
शहिद विरपूत्र पोकॉ राजेंद्र बाबुलाल अवस्थाी हे जळगाव शहर येथील रहिवासी होते. त्यांची नेमणूक शनिपेठ पोस्टे येथे होती. तर शहिद विरपूत्र पोकॉ भगवान सखाराम पाटील हे हिंगोणा (ता.धरणगाव) येथील रहिवासी होते. त्यांची नेमणूक जळगाव शहर पोस्टे येथे होती. दिनांक २६ मार्च १९८४ रोजी रात्री ११ वाजता आसोदा-सुजदे मार्गावर एक पोलिस उपनिरिक्षक व पोलिस पथकासह गस्त घालीत असतांना सदर पथकामध्ये पोलिस शिपाई अवस्थी व पोलीस शिपाई पाटील यांची नेमणूक होती. गस्ती पथकास सात-आठ लोक हे लाठी, काठ्या, भाले व इतर शस्त्रासह मिळून आल्याने त्यातील तीन जणांना अटक करण्यात आली तर इतर पळून जाण्यात यशस्वी झालेत. अटकेतील आरोपीतांना जळगाव येथे घेवून जाणे आवश्यक असल्याने वाहन चालकाने वाहन वळवीत असतांना ते मागून अडकले. अटकेतील आरोपी सुजदे गावातील होते. त्यामुळे सुजदे गावातील १५०-२०० लोकांचा जमाव लाठी, काठ्या, भाले व कुर्हाडी घेवून त्यांनी वाहनातील पोलिस अधिकारी, कर्मचारी व अटकेतील आरोपी यंाचेवर हल्ला चढविला. वाहनात असलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी व आरोपीतांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी पो.कॉ राजेंद्र बाबुलाल अवस्थी हे पुढे सरसावले. त्यावेळी जमावाने त्यांच्यावर विविध घातक हत्यारांनी हल्ला केला. त्यात पोलिस शिपाई अवस्थी हे पोलिस अधिकारी, कर्मचारी व अटकेतील आरोपी यांचे जिवीनाचे रक्षण करीत असतांना जागीच गतप्राण झाले. त्यानंतर वाहनातील पोलिस अधिकारी, कर्मचारी व अटकेतील आरोपी यांचे संरक्षणासाठी व जिवितहानी रोखण्यासाठी पोलिस शिपाई भगवान सखाराम पाटील हे पुढे सरसावले. जमावाने त्यांच्यावर देखील प्राणघातक हत्याराने हल्ला केला. त्यात पोलीस शिपाई पाटील हे सुद्धा गंभीररित्या जखमी झाले होते. त्यंाना उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जे.जे.हॉस्पीटल मुंबई येथे हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरसुध्दा त्यांचे २८ मार्च १९८४ रोजी उपचारादरम्यान निधन झाले. अशा प्रकारे शहिद पो.कॉ. राजेंद्र अवस्थी (वय २१) व पोकॉ भगवान सखाराम पाटील (वय ३७ वर्षे) यांचे गस्त कर्तव्य ड्युटीदरम्यान सहकारी, अधिकारी, कर्मचारी व आरोपी यांचे जिविताचे रक्षण करीत असतांना त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे.
शहीद दिनाचा इतिहास
लदाखमधील भारताच्या सीमेवर 21 ऑक्टोबर 1959 रोजी बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी गस्त घालणाऱ्या 10 पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चीनी सैनिकांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस जवानांनी चीनी सैनिकांशी कडवी झुंज दिली. परंतु दुर्देवाने या हल्ल्यात सर्व पोलीस शहीद झाले होते. या वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी तसेच कर्तव्य आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर ‘पोलीस हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो. वर्षभरात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना या दिवशी आदरांजली अर्पण करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित मानवंदना परेडच्यावेळी शहीद झालेल्या पोलिसांची नावे वाचून दाखविली जातात.
पोलिसांच्या कार्याचा सन्मान करा….. अभ्यासपूर्ण बातमी