जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    खाजा नाईक : एक उपेक्षीत भिल्ल क्रांतिकारी !

    admin by admin
    August 12, 2017
    in Uncategorized
    7
    खाजा नाईक : एक उपेक्षीत भिल्ल क्रांतिकारी !


    khaja-naik11
    एप्रिल 1858 चा दिवस…तत्कालीन खान्देशातील शिरपूर जवळील अंबापाणी नावाचे जंगल, ब्रिटीश सरकारचे अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज सैनिक, चहुबाजूने घातलेला घेराव अशा कठीण परिस्थितीत ब्रिटीश सैन्याला दिवसभर झुंजवत त्यांचे अधिकारी व सैनिक ठार मारत, भिल्ल समाजातील महिला-पुरुषांनी लढा दिला. या लढाईचे नेतृत्व करणार्या खाजा नाईक यांच्यावर कालांतराने चवताळलेल्या ब्रिटीशांनी दोन हजारांचे बक्षीस ठेवले.1860 मध्ये विश्‍वासघाताने पाठीत गोळ्या घालून या क्रांतीवीराची हत्या करण्यात आली व धरणगावच्या मुख्य प्रवेश रस्त्यावरील झाडाला त्यांचे शिर तब्बल सात दिवस लटकविण्यात आले. खान्देशातील भिल्ल समाजाच्या हा क्रांतीकारी वीर तसेच अंबापाणी लढाईत भिल्ल समाजातील महिला-पुरुषांनी दाखवलेले शौर्य इतिहासकारांनी तसे उपेक्षीतच ठेवले. आज शहीद झालेल्या या भिल्ल क्रांतीकारकाचा स्मृतीदिवस.त्यानिमित्ताने खाजा नाईक यांच्या शौर्याचा घेतलेला हा आढावा.

    कोण होते खाज्या नाईक

    खाजा नाईक यांचे मुळनाव काजेंसिंग नाईक. ब्रिटीश अधिकार्यांच्या उच्चारामुळे काजीसिंग झाले. कालांतराने अपभ्रंश होत त्यांचे नाव खाजा नाईक झाले.वास्तविक त्यांच्या नाईक आडनावाबद्दल देखील संभ्रम आहे.ब्रिटीश पोलीस दलात सुरक्षा अधिकारी होते.त्यांचे पद हे नाईक दर्जाचे होते.त्यावरून देखील त्यांचे नाव नाईक पुकारले जात असावे.त्यांचा जन्म नेमका कोणत्या वर्षी व कुठे झाला याबाबत कुठेही स्पष्ट नोंद नाही. मात्र ते सांगवी-पळासणेर भागातील एका पाड्यावर रहायचे अशी अख्यायिका आहे.त्यांचे वडील गुमानसिंग नाईक हे ब्रिटीश सैन्यात सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर मुंबई, आग्रा रस्त्यावरील शिरपूर-सेंधवा घाटाची संरक्षणाची जबाबदारी होती.या घाटातून इंग्रजांनी गोळा केलेला महसूल तसेच दिल्ली,आग्रा येथील अनेक व्यापार्‍यांचा खजिना मुंबई येथे नेण्यात येत होता.साधारण 1818 ते 1831 अशी 13 वर्षे त्यांनी सेवा बजावली. त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत ब्रिटीश सरकारने गुमानसिंगाची जबाबदारी त्यांचा मुलगा काजेंसिंग (खाजा) वर सोपवली. 1831 ते 1851 खाजा नाईक यांनी देखील आपल्या वडीलाप्रमाणे प्रामाणिकपणे आपली नोकरी केली.या दरम्यान सेंधवा घाटात चोरी करतांना सापडलेल्या एका गुन्हेगारास त्यांच्याकडून बेदम मारहाण झाल्यामुळे तो मेला. त्यानंतर ब्रिटीश सरकारने खाजा नाईक यांच्यावर थेट खुनाचा खटला चालवत, त्यांना 10 वर्षाची शिक्षा सुनावली.

    खाजा नाईक यांचा दरारा

    खाजा नाईक यांना खुनाच्या आरोपाखाली कारागृहात टाकल्यानंतर मुंबई, आग्रा रोडवरील भिल्ल समाजातील तरुणांचे हल्ले वाढले. याच दरम्यान खान्देशात देखील भिल्ल समाजाच्या विविध टोळ्यांनी इंग्रजांना जेरीस आणले. ब्रिटीश अधिकार्यांच्या लक्षात आले की, खाजा नाईक यांना सोडल्यास या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळविता येईल. म्हणून त्यांनी चांगल्या वर्तणूकीचा दाखला देत, खाजा नाईक यांना पाच वर्ष आधीच सोडले व पुन्हा ब्रिटीश सैन्यात येण्यास सांगितले.परंतु जेलमध्ये कॅ.बर्चसह इतर अधिकार्‍यांकडून झालेल्या अन्यायाच्या भावनेतून खाजा नाईक यांनी इंग्रजाविरुध्दच्या लढ्याची मशाल हातात घेत, भिल्ल समाजातील तरुणाची एक सशस्त्र सेना तयार केली. कालांतराने त्यांना भिमा नाईक, महादेव नाईक, दौलत नाईक, काळूबाबा, आनंदा नाईक, रमल्या नाईक यांच्यासह महत्वाचे साथीदार मिळाले. त्यांनी ब्रिटीश सैन्यातील अधिकारी व ब्रिटीश सरकारला मदत करणाऱ्या सावकारांच्या घरी दरोडे घालण्यास सुरुवात केली. त्रस्त झालेल्या ब्रिटीश सरकारने यामुळे त्यांच्यावर 2 हजाराचे बक्षीस ठेवले.आपली स्वतःची एक सशस्त्र सेना तयार केल्यानंतर खाजा नाईक यांनी अनेक ठिकाणी दरोडे टाकले. 1 नोव्हेबर 1857 रोजी सुलतानपुर तालुक्यातील गावावर हल्ला केल्यानंतर भीमा नाईकच्या नेतृत्वाखाली याच दरम्यान ब्रिटीश अधिकारी कॅ.कॅनडी यांच्यावर मोठा हल्ला चढविला व त्याला पराभूत केले. या नंतर खाजा नाईक यांनी सेंधवा घाटावर कब्जा मिळवीत ब्रिटीशऐवजी स्वतः कर वसुल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अनेक छोटे मोठे इंग्रज अधिकार्यांवरील हल्यांमुळे ब्रिटीश सरकार जेरीस आले.त्यांचा दरारा दिवसेंदिवस वाढत होता.त्यामुळेच खाजा नाईकांच्या भितीपोटी इंग्रज अधिकार्‍यांना मुंबई-आग्रारोड असुरक्षीत वाटू लागला. परिणामी त्यांनी आपली वाहतूक मध्यप्रदेशमार्गे महाराष्ट्रातून वळविली.

    ‘त्या’ लुटीने ब्रिटीश सरकार हादरले

    स्थानिक जिल्हाधिकार्‍यांकडून ब्रिटीश सरकारला खाजा नाईक यांच्या नेतृत्वात उठाव करणार्‍या अनेक भिल्ल समाजाच्या तरुणांच्या बातम्या पोहचल्या. त्यांच्याविरुध्द कारवाईची योजना ब्रिटीश सरकार आखत असतांनाच 17 नोव्हेंबर 1857 साली खाजा नाईक यांनी आपला मित्र भीमा नाईकसह तीनशे भिल्ल तरुणांना सोबत घेत जाभंळी चौकात ब्रिटीशांचा खजिना लुटला.या खजिन्याच्या संरक्षणासाठी सशस्त्र ब्रिटीशांचे 200 तर 300 भिल्ल सैनिक नियुक्त होते. या लुटीच्या वेळी त्यांना भीतीपोटी कोणीही विरोध अथवा प्रतिकार केला नाही.खजान्यात तत्कालीन चांदीची चलनातील नाणी होती. एवढ्या मोठ्या रक्कमेचा खजाना अगदी सहजरित्या लुटून नेल्यामुळे ब्रिटीश सरकार प्रचंड हादरले. यानंतर खाजा नाईक यांनी ब्रिटीश पोस्ट ऑफीसदेखील लुटले. एवढेच नाही तर ब्रिटीशांच्या दळणवळणावर, संपर्कावर मोठा परिणाम व्हावा म्हणून टेलीग्राफच्या तारा तोडल्या. यामुळे ब्रिटीश सरकारचा जणू या भागातील दबदबा व अस्तित्वच संपुष्टात आल्यासारखे झाले होते. या खजान्यातून लुटलेल्या पैशातून त्यांनी आपल्या सेनेसाठी शस्त्रे खरेदी केलीत. यानंतर आणखी एकदा सेंधवा घाटात चार लाखाचा खजिना देखील लुटण्यात आला.

    तरुणांमध्ये लोकप्रियता वाढली

    ब्रिटीश सरकारचा दबदबा सर्वत्र असतांना त्यांच्या सैन्याविरुध्द बंड पुकारण्याची ताकद त्यावेळी कोणामध्येही नव्हती. परंतु खाजा नाईक यांनी हिम्मत दाखवित तरुणांना एकत्र केले. एवढेच नव्हेतर लुटलेला पैसा ते गरीबांमध्ये वाटत असत. गरीब लोकांवर अन्याय करणार्‍या ब्रिटीश अधिकार्‍यांवर ते तुटून पडत. सावकार, व्यापारी यांच्याकडील लुटलेले खजिने दान करीत. अशा अनेक कारणामुळे खाजा नाईक अल्पावधीत तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत अनेक तरुण ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड पुकारू लागले होते.अल्पावधीत खान्देशातील ब्रिटीश सरकारच्या कारभाराविरुद्ध त्रस्त असलेल्या तरुणांचे नेतृत्व म्हणून खाजा नाईक यांना जनमान्यता मिळाली.

    ऐतिहासिक अंबापाणीची लढाई

    मध्यप्रदेशातील शिरपूरजवळील अंबापाणी जंगलात खाजा नाईक हे आपल्या सहकार्‍यांसह असल्याची माहिती ब्रिटीश सरकारला मिळाली. त्यांनी अत्याधुनिक शस्त्रासह एक पलटण त्याठिकाणी रवाना केली. 11 एप्रिल 1958 रोजी ब्रिटीश सैन्याने या परिसरातील हल्ला चढविला. भिल्ल समाजातील महिला व पुरुष यांनी एकत्र येत ब्रिटीश सैन्याविरुध्द लढाईस सुरुवात केली. तिरकमान, गोफण, तलवार यासारख्या पारंपरिक हत्यारांच्या सहाय्याने ब्रिटीश सैन्याला संपूर्ण दिवसभर झुंज देण्यात आली. भिल्लांच्या या सैन्याने काही ब्रिटीश अधिकारी व सैनिकांना ठार मारले. या लढाईत 65 भिल्ल सैनिक मारले गेले. सायंकाळच्या सुमारास खाजा नाईक व भिमा नाईक हे दोघं सहकारी ब्रिटीश सैन्याने घेरलेल्या कड्यातून निसटले. या लढाईत ब्रिटीश सैन्याने क्रौर्याची सिमा गाठत ‘ड्रम ट्रायल’ खटला चालवून तब्बल 60 भिल्ल बांधवांना गोळ्या घालून ठार मारले. कुठल्याही आधुनिक शस्त्रांशिवाय भिल्ल बांधवांनी निधड्या छातीने ब्रिटीश सैन्याशी दिलेला हा लढा इतिहासात अजरामर झाला.या लढाईत तरुणांच्या बरोबरीने साधारण 400 महिलादेखील ब्रिटीश सैन्याविरुद्ध लढल्या.भिल्ल समाजातील महिलांनी दाखविलेले शौर्याचे असे उदाहरण जगातील कोणत्याही देशाच्या इतिहासात बघावयास मिळत नाही.

    विश्‍वासघाताने घेतला बळी

    11 एप्रिल 1858 ला झालेल्या अंबापाण्याच्या लढाईनंतर खाजा नाईक व भीमा नाईक हे दोघेजण जंगलात फरार झाले. 1860 पर्यंत या दोघांनी जंगलामध्येच राहत इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले. शेवटी नोकरीतील बढतीची अमिष व दोन हजारांच्या बक्षीसाच्या लालसेपोटी कधीकाळी खाजा नाईक यांच्या सैन्यात एकेकाळी सेवक म्हणून असलेल्या रोहिद्दिन मकरानी याने खाजा नाईक यांना ठार मारण्याचा कट रचला.खाजा नाईक जंगलात गोई नदीच्या काठावर सकाळच्या सुमारास अंघोळ करीत असतांना मकरानी हा त्यांच्याजवळ गोड बोलून पोहचला व खाजा नाईक यांचे लक्ष दुसरीकडे वळताच त्यांच्या पाठीत गोळ्या घातल्या. ब्रिटीश अधिकार्यांना दाखविण्यासाठी कमरानी यांने खाज्या नाईक यांचे शिर तलवारीने कलम केले.धरणगाव येथे खाजा नाईक यांचा मुलगा दौलत नाईक याने वडीलाचे शिर ओळखत ब्रिटीश अधिकार्‍यांसमोर मकरानीला शिव्या घातल्या.यानंतर मकरानीला नौकरीत बढती मिळून दोन हजाराचे बक्षीस देण्यात आले.

    धरणगावात सात दिवस झाडावर लटकविले शीर

    ब्रिटीश कालखंडात धरणगाव हे खान्देशातील पोलीसांचे मुख्यालय होते. त्यात बर्‍हाणपुर, आशिरगड, सटाणा, निमाड, निमाडमधील सेंधवा घाट,अजिंठा अशा भल्या मोठ्या परिसराचा समावेश होता.खान्देश पोलीस बटालीयनचा अधिकारी कॅ.बिर्च व त्यांचा मित्र औट्राम हे धरणगाव परिसरात खास लक्ष ठेवून होते.कारण या भागात भिल्ल तरुणाचे मोठे संघटन त्यावेळी ब्रिटीश सैन्याला वारंवार जेरीस आणत होते. भिल्ल समाजातील तरुणांचा आदर्श असलेल्या नेत्याचे शिर जर धरणगावच्या मुख्यप्रवेश रस्त्यावर लटकविले(आताचे धरणगाव रेल्वे स्थानकासमोरील भाग) यामुळे ब्रिटीश सैन्याची दहशत पुन्हा निर्माण होईल व भिल्ल समाजाच्या टोळ्या ब्रिटीश सरकारविरुद्ध उठाव करणार नाहीत, या उद्देशाने तब्बल सात दिवस निंबाच्या झाडाला खाजा नाईक यांचे कापलेले शीर लटकवून ठेवण्यात आले होते. या घटनेची अख्यायिका माहित पडल्यापासून भिल्ल समाजातील तरुण तसेच महिला मोठ्या संख्येने दरवर्षी 11 एप्रिल रोजी याठिकाणी तसेच शिरपूर जवळील अंबापाणी येथे एकत्र जमत खाज्या नाईक यांना श्रध्दांजली वाहतात.अंबापाणी हे गाव मध्यप्रदेशातील सेंधवा जवळील शिरपूरपासून 50 कि.मी अंतरावर आहे.सर्वात आधी जम्मूपाणी आणि त्यानंतर अंबापाणी हे गाव आहे.या गावापासून जवळ असलेल्या जंगलात दरवर्षी 11 एप्रिलला मोठा कार्यक्रम होत असतो.याच जंगलात प्रसिद्ध ’अंबापाणी’ची लढाई लढली गेली असल्याची आख्यायिका आहे.धरणगाव येथील जाजू परिवाराने याठिकाणी खाजा नाईक यांचे छोटे मंदिर बांधत त्यांच्या स्मृती जपल्या आहे. गेल्या चार पिढ्यांपासून जाजू परिवारातील महिला दररोज सायंकाळी या ठिकाणी दिवा लावत असतात.जाजू परिवाराच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा आज सत्कार करण्यात येणार आहे.

    खाजा नाईक यांच्या बाबतीत शासकीय नोंदी

    खाजा नाईक यांचा मृत्यू कधी झाला याबाबत इतिहासकारांमध्ये मोठे मतभेद आहेत.जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे गॅजेट तसेच धरणगाव नगरपालीकेच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरण पुस्तिकेत त्यांचा उल्लेख आहे.अमळनेर प्रताप महाविद्यालयातील प्रा.डॉ.धनंजय चौधरी यांच्याकडे देखील खाजा नाईक यांच्याशी संबंधित अनेक महत्वपूर्ण ब्रिटीशकालीन लेखी पुरावे उपलब्ध आहेत.काही इतिहास तज्ञांच्यामते खाजा नाईक यांचा मृत्यू 11 एप्रिल 1858 रोजी अंबापाणीच्या लढाईत झाला.तसेच त्यांचा मुलगा पोलादसिंग यांचा मृत्यू देखील त्याच दिवशी झाल्याचे सांगण्यात येते. परंतु तत्कालीन इस्ट खानदेशचे कलेक्टर असलेले एएनए सीमकॉक्स यांनी लिहिलेले ‘ए-मेमॉयर ऑफ दि खानदेश भिल्ल कॉप्स’ या पुस्तकात खाजा नाईक यांचे शीर कलम करून आणल्या नंतर त्यांचा मुलगा पोलादसिंग याने ते शीर ओळखले असल्याचे म्हटले आहे.या पुस्तकातील कालावधी 1825 ते 1891 दरम्यानचा असल्याचे सीमकॉक्स यांनी लिहिले आहे.मुंबईचे पुराभिलेख (एलफिस्टन कॉलेज) तसेच पुणे येथील पेशवे दप्तरातील भिल्ल समाजाच्या अनेक उठावासंबंधी ब्रिटीशकालीन अनेक दस्तऐवज उपलब्ध आहेत.त्यात खाजा नाईक यांचा संदर्भ अनेक ठिकाणी आढळतो.जानेवारी 2010मध्ये धुळे यथे झालेल्या सतराव्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला क्रांतिवीर खाजा नाईक यांचे नाव द्यावे, अशी मागणी एका ठरावाद्वारे करण्यात आली होती. तसेच सेंधवा परिसरात खाज्या नाईक यांना दरवर्षी अंबापाणी लढाईच्या स्मृतीदिनी अभिवादन केले जाते.

    आज खान्देशातील भिल्ल बांधव येणार एकत्र

    खाजा नाईक स्मृती संस्थेच्यावतीने आज धरणगावात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी खान्देशातील साधारण 15 हजार भिल्ल बांधव एकत्र जमणार आहे. धरणीतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते रेल्वे स्थानकासमोरील खाजा नाईक यांच्या स्मृतीस्थळापर्यंत मिरवणूक निघणार आहे. यानंतर धरणगाव महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार आहे. यावेळी पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे, आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, वन व पर्यावरण समिती भारत सरकार सदस्य चैत्रामजी पवार, सामाजिक समरसता मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा.आर.एन.महाजन,समन्वय समितीचे अध्यक्ष पी.सी.आबा पाटील,शिरीष बयस, संजय महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी भिल्ल समाजातील आदर्श महिला व तरुणांचा सत्कार करण्यात येणार आहे. स्मृती संस्थेचे अध्यक्ष दुर्गादास मोरे, यशवंत कुवर, विलास महाजन, समाधान मोरे यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.

    Tags: khajya naikvijay waghmareअंबापाणी लढाईक्रांतीविर खाज्या नाईकखाज्या नाईकविजय वाघमारे
    Previous Post

    सिमकार्ड ते सिमी; जळगावातील गुन्ह्याचा अजब प्रवास !

    Next Post

    मुख्यमंत्रीपदाची शर्यत अन् खडसे अडचणीत !

    Next Post
    मुख्यमंत्रीपदाची शर्यत अन् खडसे अडचणीत !

    मुख्यमंत्रीपदाची शर्यत अन् खडसे अडचणीत !

    Comments 7

    1. nikhil chaudhari says:
      10 years ago

      Comment… खाज्या नाईक यांनी भारताला स्वातंत्र्य
      मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी
      बजावली आहे. आजच्या आदिवासी समाजाला
      काय तर संपूर्ण देशाला या क्रांतीविराबद्ल
      माहिती असायला हवी. आज पर्यंत
      कोणत्याही शैक्षणिक इतिहासाच्या पुस्तकात
      याबद्दल माहिती नाही हि एक दुःखाची
      गोष्ट आहे. आपल्याला व आपल्या समाजाला
      गर्व असलेल्या या क्रांतिवीर बद्दल समाजाला
      न्यात होण्यासाठी आपण कठोर पाऊले उचलली
      पाहिजे. विजय सरांचा मी आभारी आहे.
      कि त्यांनी हि मोलाची माहिती समाजापुढे
      मांडली.
      निक चौधरी

      Reply
    2. nikhil chaudhari says:
      10 years ago

      Comment… खाज्या नाईक यांनी भारताला स्वातंत्र्य
      मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी
      बजावली आहे. आजच्या आदिवासी समाजाला
      काय तर संपूर्ण देशाला या क्रांतीविराबद्ल
      माहिती असायला हवी. आज पर्यंत
      कोणत्याही शैक्षणिक इतिहासाच्या पुस्तकात
      याबद्दल माहिती नाही हि एक दुःखाची
      गोष्ट आहे. आपल्याला व आपल्या समाजाला
      गर्व असलेल्या या क्रांतिवीर बद्दल समाजाला
      न्यात होण्यासाठी आपण कठोर पाऊले उचलली
      पाहिजे. विजय सरांचा मी आभारी आहे.
      कि त्यांनी हि मोलाची माहिती समाजापुढे
      मांडली.
      निक चौधरी

      Reply
    3. prakah Takare says:
      8 years ago

      ekdam uttam aadhi pudhil varshi kalava shirud hun aamhi yeuch

      Reply
    4. Shamuvel Gavit says:
      8 years ago

      The Real Tiger

      Reply
    5. दिपक सुरेश नाईक says:
      7 years ago

      क्रांतिवीर खाज्या नाईक हा आमचा आदिवासी वाघ आहे ज्या ला आम्ही प्रत्येक आदिवासी हिरो म्हणतो

      Reply
    6. धम्मवेदी राजाभाऊ बनकर says:
      7 years ago

      क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांनी बांधलेला किल्ला नस्तनपुर ता. नांदगाव येथे आहे पण त्या बद्दल ची नोंद इतिहासात कुठेच नाही…

      Reply
    7. Kk says:
      7 years ago

      वीर आदिवासी योद्धा ख्वाजा नाईक यांना मानाचा जय आदिवासी

      Reply

    Leave a Reply to nikhil chaudhari Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.