श्रीलंकेत ईस्टर संडे साजरा होत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज मध्यरात्रीपासून श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी केली आहे. परंतु श्रीलंकेतील धार्मिक अस्थिरतेला आणि दहशतवादी हल्ल्यांना काही कट्टरपंथी संघटनांच जबाबदार आहेत,हे वास्तव नाकारून चालणार नाही. मग ती सिंहली बौद्ध समुदायाची ‘बोडु बला सेना’ असो किंवा मुस्लीमांची एनटीजी (नॅशनल तौहीद जमात) नावाची कडवट संघटना असो. रविवारी झालेल्या श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटामागे स्थानिक एनटीजी (नॅशनल तौहीद जमात) ही कट्टरपंथी संघटना असल्याचे आता उघड झाले आहे. श्रीलंकेतील गौतम बुद्धांच्या मुर्त्या तोडल्यावर ही संघटना जागतिक स्थरावर कुप्रसिद्ध झाली होती. मुळात या संघटनेपेक्षा तिची विचारधारा श्रीलंकेसाठीच नव्हे तर, अवघ्या जगासाठी धोकेदायक ठरू पाहतेय. त्यामुळे एनटीजी आणि तिच्या वहाबी विचारधारेबाबत थोडक्यात आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय.
एनटीजी कट्टरपंथी इस्लामिक संगठन
एनटीजी (नॅशनल तौहीद जमात) ही श्रीलंकेतील कट्टरपंथी संघटना आहे. या संघटनेला ‘तौहीद-ए-जमात’ या नावाने देखील ओळखले जाते. या संघटनेवर श्रीलंकेत वहाबी विचारधारेचा प्रभाव वाढविण्याचा आरोप असून या संघटनेचा सर्वाधिक प्रभाव श्रीलंकेतील पूर्व प्रांतात अधिक बघावयास मिळतो. ही संघटना श्रीलंकेतील अनेक भागात महिलांसाठी बुरखा आणि मशिदी निर्माणसह शरिया कायदा लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. श्रीलंकेत २०१३ मध्ये या संघटनेचे नाव सर्वप्रथम समोर आले होते. गुप्तचर यंत्रणांनी या संघटनेचे इसीससोबत संबंध असल्याचे सांगितल्यानंतर श्रीलंकेच्या तत्कालीन रक्षामंत्र्यांनी एनटीजीबाबत चिंता व्यक्त केली होती.
२०१४ मध्ये श्रीलंकेतील बुद्धमुर्त्या तोडल्यानंतर एनटीजी जगात कुप्रसिद्ध झाली होती. श्रीलंकेत अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोठी निदर्शने करण्यात आली होती.त्यावेळी या संघटनेचा सचिव अब्दुल राजिक याने श्रीलंकेतील बौद्ध धर्मीयांबद्दल टोकाचे आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, या संघटनेवर 2016 मध्ये श्रीलंकेतील अनेक भागात हिंसाचार भडकावल्याचा आरोप होता. दरम्यान, भारतातील तामिळनाडूत देखील नॅशनल तौहीद जमात सक्रीय असल्याचा संशय आहे. तामिळनाडूत २०१७ मध्ये पहिल्यांदा या संघटनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संघटनेवर जबरदस्तीने भारतात ख्रिश्चन समुदातील लोकांना तर श्रीलंकेत जबरदस्ती इस्लाम स्वीकारायला लावल्याचा आरोप होता.
काय आहे वहाबी विचारधारेचा इतिहास
सऊदी अरबमधील नज्द नामक शहरात या विचारधारेचे प्रमुख केंद्र आहे. नज्द शहरातील बानू तमीम जनजातीचे अब्दुल वहाब नज्दी याने वहाबी पंथाची सुरुवात केली होती. भारतात 1927 मध्ये सर्वप्रथम हरियाणातील मेवात क्षेत्रातील लोकं वहाबी विचारधारेसोबत जुळले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपुर जिल्ह्यात देवबंदमध्ये याचे मुख्यालय स्थापन करण्यात आले. म्हणूनच भारतातील वहाबी विचारधारेच्या लोकांना देवबंदी म्हणून ओळखले जाते. भारतात देवबंदी या वहाबी जमातला तबलीगी नावाने देखील ओळखले जातात. वहाबी विचारधारेचा कट्टरता आणि जिहादमध्ये विश्वास आहे.
काय आहे वहाबी विचारधारेची मान्यता
वहाबी विचार धारा पैगंबर आणि सुफींना मानत नाही. यांच्या मान्यतेनुसार दर्ग्यावर जाने,चादर आणि प्रसाद चढविणे इस्लामच्या मूळ सिद्धांतांच्या विरुद्ध आहे. दुसरीकडे जगात दर्गा, पैगंबर आणि सुफींना मानणारा वर्ग मोठा आहे. अगदी जगातील अनेक धर्मीय लोकं आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी दर्ग्यांवर जात असतात. जैश-ए-मोहम्मद, लश्करे- तोएबा, हरकत-उल-अंसार (मुजाहिद्दीन), अल बद्र, अल जिहाद, स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) आणि महिला दहशतवादी संघटन दुख्तराने-मिल्लत सारख्या जगातील इतर १०० पेक्षाअधिक दहशतवादी संघटनांचे प्रमुख हे वहाबी विचारधारेचे आहेत.
इस्लामिक दहशतवादाचे धक्के अवघ्या जगाला मागील कित्येक वर्षापासून बसताय. परंतु पाकिस्तान,बांग्लादेश किंवा इतर इस्लामिक राष्ट्र असणाऱ्या देशात देखील दहशतवादी हल्ले होतात. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की, इथं कोण हल्ले करतोय?. येथील दर्ग्यांवरील हल्ल्यांमागे वहाबी विचारधारेशी जुळलेले लोकं असल्याचे अनेकदा समोर आले आहे. कारण या विचारधारेनुसार इस्लाममध्ये बुत अर्थात मूर्ती पूजा हराम असून इस्लामच्या मान्यतेनुसार प्रतिकं हे गैरइस्लामी आहेत. त्यानुसार दर्गा हे एक प्रतिक असल्याची त्यांची मान्यता आहे. त्यामुळे पृथ्वीतलावर खरा इस्लाम आणायचा असेल तर शरिया सक्तीने लागू केला पाहिजे आणि त्यासाठी कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणेच जीवनपद्धती असली, असा वाहिबी विचारधारेचा आग्रह आहे.
जगात ८० टक्के सुन्नी तर २० टक्के शिया मुसलमान आहेत. परंतु वहाबी विचारधारा शिया लोकांना मुस्लीम मानत नाही. वहाबी विचारधारा स्वधर्मीयांबद्दल इतकी कट्टर असेल तर इतर धर्माचे धार्मिक स्थळं त्यांच्याकडून लक्ष्य केले जाणे, हे स्वाभाविकच आहे. त्यामुळेच श्रीलंकेतील बुद्धांच्या मुर्त्या नष्ट करणे असो की, आता चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणे असो, हे एनटीजीच्या कट्टरतावादी विचारधारेचेच लक्षण आहे. मुस्लीम धर्म शांतातप्रिय म्हटला जातो. इस्लाममध्ये निष्पाप लोकांची हत्या सर्वात मोठा गुनाह आहे. त्यामुळे जागतिक मुस्लीम धर्म गुरुंनी श्रीलंकेतील हिंसाचारात लक्ष घालून मार्गदर्शन करण्याची आता वेळ आली आहे. कारण एनटीजी सारख्या कट्टरपंथी संघटनांमुळे अवघ्या जगात इस्लामची प्रतिमा खराब होतेय.
कधी काळी विद्रोही तमिळ समुदायाच्या एलटीटीई अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम ही दहशतवादी संघटना श्रीलंकेतील गृहकलहाला जबाबदार होती. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केल्यानंतर या संघटनेने अवघ्या जगात भीती पसरवली होती. त्याकाळात सिंहली बौद्ध आणि विद्रोही तमिळ असा संघर्ष होता. परंतु प्रभाकरनच्या मृत्यूनंतर ही संघटना जवळपास संपुष्टात आली. सन 2009मध्ये सेनेकडून तमिळ विद्रोहिंचा झालेल्या पराभवानंतर तर श्रीलंकेतील मुस्लिम समुदाय एकप्रकारे राजकीय क्षितीजावरून लुप्तच झालाय. त्यानंतर मागील वर्षी सिंहली बौद्ध आणि मुस्लीम समुदायातील हिंसाचारामुळे जगाचे लक्ष श्रीलंकेकडे गेले होते. परंतु आता ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे अवघ्या जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.