आजपासून बरोबर १४ वर्षापूर्वी म्हणजेच २६ नोव्हेंबर २००५ रोजी पहाटे ५:२० मिनिटाच्या सुमारास सोहराबुद्दीन शेख नामक कथित दहशतवाद्याला ठार मारल्याचे गुजरात पोलिसं एका पत्रकार परिषदेत जाहीर करतात. पण तो दहशतवादी होता, याचा कोणताही पुरावा यावेळी देत नाहीत. दुसरीकडे मात्र, सीआयडी आणि सीबीआय चौकशीत सोहराबुद्दीन राजकारणी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांच्या इशारावरून खंडणी वसुलीचे काम करायचा. तसेच सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी ही सोहराबुद्दीनच्या हत्येची प्रमुख साक्षीदार होती. त्यामुळे तिला देखील पोलिसांनी ठार मारल्याचे सीबीआयने म्हणते. एवढेच नव्हे, तर सोहराबुद्दीनचा साथीदार आजम खानने भर कोर्टात सांगतो की, गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांची हत्येची सुपारी सोहराबुद्दीनला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा निकटवर्तीय पोलीस अधिकारी डी.जी.वंजारा यांनी दिली होती. तर सोहराबुद्दीन प्रकरणात जेलमध्ये असतांना वंजाराने आपल्या राजीनामा पत्रात जर या चकमकी बनावट असतील, आम्ही दोषी असू तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा सरकारची जागा देखील जेलमध्ये आहे. कारण आम्ही सरकारची नीती आणि आदेशाचे पालन केल्याचे म्हणतो.
सोहराबुद्दीन शेख बनावट प्रकरणात २१० पैकी तब्बल ९२ साक्षीदार फितूर होतात. निकाल देतांना मी असहाय’ आहे, सरकारी पक्षाने खूप प्रयत्न केले. पण आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, हे न्यायमूर्तींचे वाक्य अनेक गोष्टी सांगून जातात. हरेन पांड्या यांनी गुजरात दंगलीसंदर्भात चौकशी समितीसमोर अनेक गोप्यास्फोट करणारे जबाब नोंदवलेले होते. यामुळे सोहराबुद्दीनने पांड्या यांची सुपारी घेतली होती, हा आजम खानचा जबाब महत्वपूर्ण ठरतो. धक्कादायक म्हणजे पांड्या यांच्या खुनाचा एकमेव साक्षीदार अनिल यादरमने हल्लेखोराचे केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी तयार केलेले रेखाचित्र हे सोहराबुद्दीन गॅगमधील शार्पशुटर तुलसी प्रजापती याच्याशी मिळते जुळते होते. विशेष म्हणजे मला देखील बनावट चकमकीत ठार मारतील, असं कोर्टात ओरडून सांगणारा तुलसी प्रजापती खरचं एका चकमकीत ठार मारला जातो. यानंतर सोहराबुद्दीन खटल्याची सुनवाई करणारे न्यामूर्ती बी. एच. लोया यांचा मृत्यू संशयास्पद होता,असा आरोप नातेवाईक करतात. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणांचे निकाल लागलेले आहेत. परंतू न्यायालयाच्या निकालानंतर देखील या सर्व हत्याकांडाचं रक्तरंजित धुकं कायम आहे.
गुजरात पोलिसांच्या कहाणीनुसार २६ नोव्हेंबर २००५ रोजी पहाटे ५:२० मिनिटाच्या सुमारास सोहराबुद्दिन नामक दहशतवाद्याला अहमदाबाद जवळील विशाल सर्कल हाय-वेवर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सोहराबुद्दिन गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डी.जी.वंजारा यांनी यावेळी सोहराबुद्दीनला लष्कर ए तय्यबा आणि आयएसआयकडून पाठबळ होते. तसेच तो नरेंद्र मोदी आणि इतर भाजपच्या नेत्यांना ठार मारण्यासाठी आला होता. या घटनेला आज १४ वर्ष पूर्ण झालीत. कोर्टात खटला उभा राहिल्यानंतर तब्बल ९२ साक्षीदार फितूर झालेत. त्यामुळे सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. शर्मा यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात तीन लोकांना प्राण गमवावे लागले, त्याचे दु:ख आहे. ‘मी असहाय’ आहे, सरकारी पक्षाने खूप प्रयत्न केले. पण आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, न्यायमूर्तींचे हे वाक्य अनेक गोष्टी सांगून जातात.
कधीकाळी सोहराबुद्दीनचा सहकारी असलेला आजम खान भर कोर्टात सांगतो की, हरेन पांड्या यांना ठार मारण्याची सुपारी डी.जी.वंजारा यांनी सोहराबुद्दीनला दिली होती, असं तुलसी प्रजापतीने मला सांगितले होते. बरं सोहराबुद्दीन,आजम खान आणि तुलसी प्रजापती हे एकाच टोळीचे सदस्य होते. त्यामुळे आजम खानच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. त्याच पद्धतीने ज्या पटेल बंधूंच्या तक्रारीनंतर सोहराबुद्दीनवर गुजरातमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्या पटेल बंधूंनी केलेले स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांना दोघांवर अमित शहा यांचे नाव घ्यायचे नाही, यासाठी कसा दबाव आणला गेला, हे देखील सर्वांनी बघितलंय. तर मला देखील पोलीस ठार मारतील, असं कोर्टात सांगून देखील ज्याची चकमकीत हत्या होते. त्या तुलसी प्रजापतीच्या आईकडून वकील पत्रावर सही घेण्यासाठी कशा पद्धतीने सौदा सुरु होता. याबाबत प्रकाश जावडेकर यांच्यासह दोघांचे केलेले ‘वकालतनामा’ स्टिंग ऑपरेशन देखील जगा समोर आलेय.
सोहराबुद्दीन, तुलसी प्रजापती हे काही साधूसंत नव्हते. परंतू त्यांचा खंडणी आणि राजकीय हत्यांसाठी वापर झालाय, हे देखील पडद्याआड दडलेलं वास्तव आहे. हरेन पांड्या यांच्या खूनाचा एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार अनिल यादरम याने पोलिसांना सांगितलेल्या वर्णनावरून तयार झालेले रेखाचित्र हे तुलसी प्रजापतीशी मिळते-जुळते आहे. म्हणजे मग आजम खान सांगतोय, ते खरं आहे का? बरं सोहराबुद्दीन जर दहशतवादी होता, तर त्याबाबतचे पुरावे कुठं आहेत? तुलसी प्रजापती आणि सिल्वेस्टर सारखे सहकारी सोहराबुद्दीन हा देशद्रोही असल्याचे माहित असूनही त्याच्यासोबत काम का करत होते? या सर्व गोष्टीत कौसर बीचा काय दोष होता? ती फक्त सोहराबुद्दीन हत्याकांडाची साक्षीदार होती म्हणून ठार मारण्यात आले का? एवढेच नव्हे तर तिच्यावर दोन दिवस बलात्कार करणे, हे कोणत्या देशभक्तीच्या व्याख्येत बसते? दुसरीकडे आजम खानला सोहराबुद्दीन प्रकरणात साक्ष देऊ नये, म्हणून कोण धमकावतय? आजम खानला गोळीमारून ठार मारण्याचा प्रयत्न कोणी आणि का केला?. आजम खानकडे सोहराबुद्दीन, तुलसी प्रजापतीसह जज लोया संशयास्पद मृत्यू संदर्भात कोणती माहिती आहे? या प्रश्नांची उत्तर समोर आल्याशिवाय हरेन पांड्या आणि सोहराबुद्दीन, तुलसी प्रजापती आणि कौसर बी हत्याकांडाचे खरे रहस्य बाहेर येऊ शकणार नाही.
एटीएसच्या कार्यालयातील पंचनामा रिपोर्टमध्ये सोहराबुद्दीनजवळून नोकिया मॉडल नंबर 1100 हा मोबाईल जप्त करण्यात आला होता. परंतू आश्चर्यजनक बाब म्हणजे एफएसएलमधील तपासणीत या मोबाईलमधील सिमकार्ड हे मध्य प्रदेशातील होते. या सिमकार्डमध्ये आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही लोकांचे नंबर सेव्ह होते. मुळात सोहराबुद्दीन जर गुजरातमध्ये मोठी दहशतवादी कारवाई करण्यासाठी आला होता. तर त्याने स्थानिक मदतीसाठी कुणाला तरी फोन केलाच असता. अगदी गुजरात पोलिसमधील पोलीस निरीक्षक अब्दुल रहमानने आपल्या जबाबात दावा केला होता की, सोहराबुद्दीनला लतीफ गँगच्या मदतीने दहशतवादी कारवाई करण्यासाठी आल्याचे म्हटले होते. दुसरीकडे सोहराबुद्दीन ज्या दुचाकीवरून प्रवास करत होता, ती चोरीची होती. तर एफएसएल रिपोर्टनुसार दुचाकीचे हॅडल लॉक होते. पंचनाम्यानंतर समजा हॅडल लॉक करण्यात आले असेल. अगदी मूळ मालक शौक सिंगकडे देखील चाबी नव्हती. मग प्रश्न असा येतो की, चाबी कुणाकडे आहे?.
एवढेच नव्हे तर, मोबाईलनुसार सोहराबुद्दीनचे लोकेशन गुजरात सर्कलमध्येही फक्त २५ नोव्हेंबरच्या रात्री २१ वाजून ४४ मिनिटाच्या जवळपास होती. त्याआधी १८ नोव्हेंबरला महाराष्ट्र, गोवा सर्कल होती. तर १९ आणि २२ नोव्हेंबरला आंध्रप्रदेश सर्कल होती आणि २३ नोव्हेंबरला सकाळी पुन्हा महाराष्ट्र, गोवा सर्कल होती. यानुसार सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नीचे हैद्राबादहून सांगली जात असतांना २३ नोव्हेंबरला पहाटे अपहरण करण्यात आले होते, या सीआयडी आणि सीबीआयच्या आरोपांची पुष्टी होते. दोघांना २३ नोव्हेंबरला बसमधून उतरवत महाराष्ट्रातून गुजरात घेऊन गेलेत. दोघांना आधी दिशा नामक फार्ममध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी सोहराबुद्दीनला एका चकमकीत मारले गेले. सीआयडी तपासात या दोघांसोबत बसमध्ये एक तिसरा माणूस प्रवास करत होता आणि तो तुलसी प्रजापती होता, अशी माहिती तपास अधिकारी व्ही.एस. सोळंखी यांना सांगलीच्या आपटे परिवाराच्या साक्षीवरून लक्षात आली होती. परंतू परवानगी मागूनही तुलसीचा जबाब उदयपूर जेलमध्ये जाऊन नोंदवण्याची परवानगी सोळंखी यांना नाकारण्यात आली. अगदी यानंतर लागलीच येत्या काही दिवसात तुलसीला देखील एका चकमकीत ठार मारले जाते. तुलसी प्रजापतीने न्यायालयात व्यक्त केलेली भीती अगदी तंतोतन खरी ठरते. तर अनेक वर्ष सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबोद्दिन खटला लढल्यानंतर अचानक वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यास नकार देतो. माझ्या भावाचे आणि वाहिनीने जे झाले ते झाले. पण मला पत्नी आणि मुलं आहेत, रुबाबोद्दिनचे हे वाक्य सर्व काही सांगून जाते.