पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत कायमच कॉंग्रेस पर्यायी गांधी घराण्यावर प्रचंड टीका आणि आरोप केलेय. परंतु प्रतापगढ येथे स्व.राजीव गांधी हे ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणून मेले,अशा खालच्या पातळीची टीका करून मोदी यांनी राजकीय मर्यादा ओलांडल्या आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांनी यावर संयमित भाषेत उत्तर दिलेय. थोडक्यात सांगायचे झाले तर हा संस्कारांचा भाग आहे. जो परिवार आपल्या कुटुंब प्रमुखाच्या मारेकऱ्यांना माफ करू शकतात. ते सोनिया, राहुल आणि प्रियांका पंतप्रधान मोदी यांनाही माफ करतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. राजीव गांधी यांची हत्या शेतीचा बांध किंवा कौटुंबिक कलहातून झालेली नाहीय. राजीव हे शहीद आहेत. त्यांनी देशासाठी बलिदान दिलेय. त्यांचा असा अवमान? थूं…आहे अशा राजकारणावर !
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या राजकीय सुसंकृतपणामुळे आपल्या भारताने भाजपचे पहिले पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना पहिले आहे. राजीव यांच्या मृत्यूनंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी मी आज फक्त राजीव यांच्यामुळे जिवंत असल्याचे सांगत श्रद्धांजली वाहिली होती. म्हणूनच राजीवजी आणि अटलजी या दोघांना सुसंकृत राजकारणी म्हणून आपला देश ओळखतो. परंतू विद्यमान मोदी यांचा उल्लेख इतिहासात एक गर्विष्ठ आणि बेलगाम वकृत्वाचा धनी म्हणूनच केला जाईल. ज्या व्यक्तीने देशासाठी बलिदान दिले, त्यांचा अपमानासाठी मोदीजी इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही ! नैतिक पातळीवर हार झालेला व्यक्तीचं, असं अभद्र बोलू शकतो.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी सोनियांना एक दिवशी सांगत होते की, पक्षाची इच्छा आहे की, मी पंतप्रधानपद स्वीकारावे. त्यावर सोनियांनी तत्काळ अजिबात नाही, असे सांगितले. ते तुला पण मारून टाकतील…हे सोनियांचे शब्द होते. त्यावर राजीव यांचे उत्तर होते, माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मी तसाही मारला जाणार आहे. त्यानंतर सात वर्षांनी 21 मे 1991 च्या रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये राजीव गांधी यांची बॉम्बस्फोटात हत्या झाली. घटनास्थळापासून काही अंतरावर असणाऱ्या लोकांच्या अंगावर रक्त आणि मासाचे तुकडे चिपकलेले होते. यावरून अंदाज केला जाऊ शकतो की,राजीव गांधी यांच्या शरीराचे काय हाल झाले असतील? याचा अंदाज आपण करू शकतात.
राजीव यांच्या हत्येची बातमी जेव्हा दिल्लीतील 10, जनपथवर पोहचली. त्यावेळी सोनिया गांधी याचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. सोनियांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या ज्यांनी ज्यांनी ऐकल्या त्यांचा अश्रूचा बांध देखील त्यावेळी फुटला होता. सोनिया काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या, त्या राजीव…राजीव करत नुसत्या रडत होत्या. त्यावेळी अवघ्या १६ वर्षाची प्रियांका आपल्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न करीत होती. तेवढ्यात अचानक सोनियांना अस्थमाचा अॅटक आला आणि त्या बेशुद्ध झाल्यात. प्रियांका धावपळ करत रडत रडतच आपल्या आईचं औषध शोधत होती. पण तिला ते औषध सापडतचं नव्हते. प्रियांका आपल्या आईजवळ बसून तिला सांभाळण्याचा प्रयत्न करीत होती. प्रियांका,राहुल आणि सोनिया यांनी काय गमावलाय, हे फक्त तेच सांगू शकतील. ज्या वयात खऱ्या अर्थाने पोरांना आपल्या वडिलांची सर्वात जास्त गरज असते,त्याच अल्पवयीन वयात प्रियांका आणि राहुलने आपले पितृछत्र गमावले होते.
सिंगापूर येथे आयआयएममध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सांगितले होते की, माझे वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर आम्हाला मोठा धक्का बसला होता. आम्ही खपू तणावात होतो. परंतु कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर आमचा विश्वास नसल्याने मी आणि प्रियांकाने वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलेय. वडील आणि आजीने घेतलेल्या देशहिताच्या भूमिकांमुळे त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, याची आमच्या कुटुंबाला कल्पना होती, असेही राहुल यांनी यावेळी सांगितले होते. एवढेच नव्हे तर, वडील मृत्यूला सामोरे जात आहेत. हे आम्हाला माहित होते. आमची आजी इंदिरा गांधीही मृत्यूला सामोरे जात आहेत, हे सुद्धा आम्हाला माहित होते, असे सांगतानाच मी मरणाला सामोरे जात आहे, असे इंदिरा गांधी यांनी घरात सांगितले होते. अगदी वडिलांनीही तेच सांगितले होते, अशी भावनिक आठवणही राहुल यांनी यावेळी सांगितली होती.
दुसरीकडे आपल्या वडिलांचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत आणि त्यांच्या हत्येभोवतीचे गूढ अजूनही उकलले नाही, अशी खंत देखील राहुल गांधी यांनी एकदा व्यक्त केली होती. अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे राजीव यांची हत्या झाली, असे सोनिया गांधींनी न्यायमूर्ती एम. सी. जैन आयोगासमोरच्या साक्षीत म्हटले होते. नंतर काही वर्षांनी, या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या नलिनीला ठोठावलेली फाशीची शिक्षा मागे घ्यावी, अशी इच्छा सोनियांनी व्यक्त केली. दुसरीकडे त्यांची कन्या प्रियांका गांधी यांनी नलिनीची व्यक्तिश: जाऊन भेट घेतली होती. या भेटीत प्रियांकाने या भेटीत नलिनीला म्हटले की, ‘तुमने ऐसा क्यों किया? मेरे पिता एक अच्छे आदमी थे. तुम्हें जो भी चाहिए था, बात करके सुलझा सकती थीं’,असे म्हणत प्रियांका धायमोकलून रडू लागली. नलिनीनेच आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केलाय.
राजीव गांधी यांच्या हत्येच्या ५ वर्षे आधीच अमेरिकेतील सीआयएने एक अहवाल तयार केला होता. ‘इंडिया आफ्टर राजीव’ नावाने तयार केलेल्या २३ पानी अहवालात १९८९ पूर्वी कट्टरपंथीयांकडून त्यांची हत्या किंवा राजकारणातून त्यांना अचानक ‘गायब’ करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. आजच्या घडीला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येस २८ वर्षे पूर्ण होताय. त्यांच्या हत्येतील आरोपींना अटक होऊन शिक्षाही ठोठावण्यात आली असली तरी अनेकांना अजूनही या हत्येचे खरे सूत्रधार तिसरेच कुणी असल्याचा दाट संशय आहे. ज्येष्ठ पत्रकार फराझ अहमद यांनी यासंबंधी साधार पुस्तकच लिहिले आहे. थोडक्यात ज्या राजीव गांधी यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत अवघ्या जगाने बघितला. ज्या राजीव यांनी आपल्या आईप्रमाणे देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या वरच खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे, हे मोदींना शोभत नाही. आपल्या देशाच्या इतिहासात या वक्तव्याची काळ्या अक्षरात नोंद होईल एवढे निश्चित !