झपाटल्यागत अवघ्या काही तासात राणा अय्युब लिखित गुजरात फाईल्स हे पुस्तक वाचून काढले. अनेक दिवसानंतर कुठल्या पुस्तकात एवढा रमलो असेल. पहिल्या पानापासून सुरु होणारा थरार शेवटच्या पानापर्यंत कायम राहतो. अवघ्या पंचविशीतील राणा अय्युब ही तरुणी मैथली त्यागीचे रूप धारण करत अंडर कव्हर रिपोर्टर म्हणून गुजरातमधील टॉपच्या अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचेही स्टिंग ऑपरेशन करते. पुस्तक छापून आपल्यावरही देशात कुठलीच पाहिजे तशी खळबळ उडत नाही. टीव्हीवर पाहिजे तशा बातम्या झळकत नाही. सगळं ‘ऑल इज वेल’ असल्यागत चालत राहते. पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते की, जी माणसं आज आपल्या देशाला आज तत्वज्ञान शिकवताय. त्यांनी भूतकाळात कोणती आणि किती नीच पापं करून ठेवलीय. हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला पण त्यांची किळस आल्याशिवाय राहणार नाही.
या स्टिंगमध्ये पोलीस अधिकारी गुजरात दंगल, हरेन पांड्या,सोहराबुद्दीन, कौसर बी, इशारत जहां यांच्या खुनाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करतात. तर याच प्रकरणांमुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या देशभक्त,प्रामाणिकता आणि नैतिकतेचा बेगडी बुरखा याठिकाणी टराटरा फाटतो. पुस्तक वाचत असतांना अमित शहा सारखा माणूस आपल्या देशाचा गृहमंत्री आहे,याची आपल्याला लाज वाटायला लागते. गुजरात दंगलीनंतर मोदी यांनी कशा पद्धतीने भाजपातील आपल्या नापसंत लोकांना दंगीलीच्या गुन्हात अडकवले. हे तर फारच भयंकर आहे. बरं हे खुद्द भाजपचेच नेते सांगतातय. एवढेच नव्हे तर,काही राजकीय षड्यंत्रांची माहिती आपल्याला अशा पद्धतीने मिळते की, आपण सुन्न होऊन जातो.
पुस्तक वाचतांना मैथिली त्यागी आपल्या डोळ्यासमोर जणू उभी असल्याचाच भास होतो. अनेक प्रसंग तर अशी आहेत की, जणू आपल्या डोळ्यासमोर चित्रपटच सुरु असल्यागत वाटते. असं म्हणतात पोलिसाला समोरच्या व्यक्तीच्या चालण्या-बोलण्यातून अंदाज येतो की, तो किती खरं आणि किती खोटं बोलतोय. पण याठिकाणी मैथिली गुजरातच्या गृहसचिवा पासून तर एटीएस प्रमुख,आयपीएस अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करते. एवढेच नव्हे तर, त्यांच्याकडून हव्या त्या गोष्टी पद्धतशीरपणे काढून घेते. राणा उर्फ मैथिली बद्दल आणखी एक गोष्ट सांगतो. फक्त तिने समोर आणलेल्या पुराव्यांमुळेच अमित शहा यांना जेलमध्ये जावे लागले होते.
गुजरातमधील धार्मिक द्वेषासोबत जातीयवाद देखील किती टोकाचा आहे. याची जाणीव देखील पुस्तक वाचत असतांना वेळोवेळी आपल्याला होते. राज्यातील आयजी रेंजच्या अधिकाऱ्याला फक्त दलित असल्यामुळे घर मिळत नाही, यावरून आपल्या लक्षात येईल की, उत्तर प्रदेश,बिहारपेक्षा गुजरातमध्ये जातीयता काही कमी नाहीय. पोलीस अधिकाऱ्यांचा मोदी-शहा यांनी कसा उपयोग करून घेतला?, नंतर त्यांना वाऱ्यावर कसे सोडले? हे वाचत असतांना तर जणू एखादं गुन्हेगारी टोळीची कथा वाचत असल्यागत जाणवते. या पुस्तकात इतके गंभीर खुलासे आहेत की, शहा यांच्यासोबत अनेक जण हे आज जेलमध्ये जाऊ शकतात. राणा अय्युबने कॉल रेकॉर्डिंगपासून तर व्हीडीओ फुटेज सगळं गोळा केलेय. पण आजच्या घडीला सर्व दुर्लक्षित आहे. कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पण यामुळे इतिहास बदलता येत नाहीय, ही साधी गोष्ट सत्ताधाऱ्यांना कळत नाहीय.
पत्रकारिता म्हणजे काय? याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘गुजरात फाईल्स’ हे पुस्तक आहे. पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येक विध्यार्थ्याने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. मी तर त्यापुढे जाऊन सांगेल की, पत्रकारिता विभागात हे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजे. खास करून ज्या मुलींना पत्रकारिता म्हणजे मुलाखत घेणे, डेक्सवर पत्रकं एडीट करणे, एवढंच काम असल्यागत वाटते. त्यांनी तर जरूर हे पुस्तक वाचले पाहिजे. एवढेच नव्हे तर, क्राईम रिपोर्टिंग फक्त फक्त पुरुषांनाच जमू शकते,असे ज्यांना-ज्यांना वाटते. त्यांच्यासाठी देखील हे पुस्तक चपराकच आहे.
राणा ते मैथलीचा प्रवास अंगावर काटे आणतो. एक तरुणी आपला भूतकाळ लपवून गुजरात सारख्या राज्यात जाऊन स्टिंग ऑपरेशन करते. खरचं राणा अय्युब यांच्या जिद्दीला सलाम आहे. बरं या पुस्तकात अनेक अधिकारी, राजकारणी नरेंद्र मोदी ,अमित शहा यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप करताय. पण याविरुद्ध कुणीही एक शब्द बोलायला तयार नाहीय. तुम्ही सोशल मिडीयावर एक शब्द मोदी-शहा यांच्याबद्दल लिहिले तर हजारो ट्रोल करणारे तुमच्या मागे लागतात. पत्रकाराने काही बातमी छापली तर खटले दाखल होतात. पण राणा अय्युबवर अजूनही कुणी चकार शब्द काढत नाहीय. ना मानहानीचा खटला, ना कोणता अधिकारी ,राजकारणी असं म्हटला की, मी असं बोललोच नाहीय. कारण आता प्रत्येकाला कळून चुकलेय की,एक नव्हे एकाच वेळेस आपले सहा कॅमेऱ्यांच्या मदतीने स्टिंग झालेय