आजच्या घडीला जगातील कोणताही धार्मिक गुरु सर्वसामान्य व्यक्तीला आपला अनुयायी बनविण्यास प्रचंड उत्सुक असतो. त्यांच्या मते प्रत्येकाने एक विशिष्ट अनुशासन पाळत जीवन जगले पाहिजे. आपल्या सगळ्या गोष्टी अगदी नैतिक पातळीपासून तर भौतिक सुखापर्यंतची जीवन शैली एक विशिष्ट पद्धतीतच राखली पाहिजे. थोडक्यात त्यांनी आखून दिलेल्या चौकटी नामक सुंदर कारागृहात तुम्हाला ते बंदिस्त करू इच्छितात. असचं काहीसं केल्याने आपण परमेश्वराच्या समकक्ष होऊ,असे त्यांना वाटते. दुसरीकडे मात्र, भगवान बुद्ध स्वतंत्रतेचा पुरस्कार करून ‘अत्त दिप भवं’ व्हा म्हणत फक्त मार्गदाता बनतात. त्यानुसार आपल्याला स्वत:च पुढाकार घ्यायचाय, स्वयंप्रकाशित व्हायचंय आणि स्वत:चा विकास स्वत:च करायचा आहे. थोडक्यात कुणी दुसरा तुम्हाला हे सगळं करण्यासाठी मदत करेल हा गैरसमज डोक्यातून आताच काढून टाका.
बुद्धांच्या मते जगातील कोणताही व्यक्ती स्वतंत्रते शिवाय आपल्यातील परम रहस्याला जाणून घेऊच शकत नाही. धार्मिक बेडीत बांधलेला व्यक्ती कधीही मुक्तपणे आकाशापलीकडील यात्रेला जाऊ शकत नाही. जगातील सर्वच धर्म अनुयायीला अशा साखळ दंडात बांधून ठेवत त्याच्यावर एकप्रकारे अंकुश ठेवून आहेत. तसेच अनुयायींना आपल्या वास्तविक स्वरुपात जगण्याची परवानगीच देत नाहीत. उलट अशा गोष्टींना व्यक्तित्वाचे मुखवटे देत धर्म त्याला धार्मिक शिक्षणाचे नाव देऊन टाकते. आपल्या सहज स्वभावा व्यतिरिक काही तरी वेगळे केल्यामुळे आपल्या सत्याच्या प्रवासाला अंतिम श्वासा पर्यंत कधीही सुरुवात होत नाही. भगवान गौतम बुद्ध कोणतीही धार्मिक शिक्षा देत नाही. बुद्धांच्या मते तुम्ही कुणीही असाल, फक्त सहज रहा. जीवनात सहज राहणे हाच तुमचा धर्म आहे.
शरीर त्यागण्याआधी बुद्ध म्हटले होते की, जर मी पुन्हा परतलो, तर तुमचा मैत्रेय अर्थात मित्र म्हणूनच येईल. कदाचित याच सहजभावमुळे बुद्धांना समजून घेण्यात आजही अनेकांची अडचण होते. कारण आजच्या घडीला फक्त मौन बसने किंवा परिपूर्ण होणे, हे कुठलेही मुल्य राखत नाही. आजच्या धर्म गुरुंनी यासाठी तुम्हाला वेगळे काहीतरी करावे लागेल,अशी मानसिकता बनवून टाकलीय. त्यानुसार तुम्हाला प्रार्थना करावी लागेल. मंत्रजाप करावा लागेल. तुम्हाला कुठल्या तरी मंदिर,मशीद,चर्च,विहारात जात माणसानेच बनविलेल्या परमेश्वराची पूजा करावी लागेल. तरच आणि तरच तुम्हाला मोक्ष मिळेल आणि अंतिम सत्याला जाणून घेता येईल.
ओशो म्हणतात…गौतम बुद्धांना समजून घ्या. बुद्धांच्या विचारांना आपल्या प्रज्ञेद्वारा आत्मसात करा. त्या विचारांना अगदी आपले बनून जाऊ द्या. बुद्धांचे विचार ज्या क्षणाला तुमचे होऊन जातात. तेव्हापासूनच ते तुम्हाला रुपांतरीत करायला लागतात. तोपर्यंत ते विचार फक्त बुद्धांचे विचार असतात. तुमच्यात आणि त्यांच्यात पंचवीसशे वर्षाचे अंतर असते. तुम्ही बुद्धांचे विचार पाठांतरीत करू शकतात, ते सुंदर देखील आहे. परंतू हे विचार तुम्हाला तुमच्या अंतरंगातील रहस्याला जाणून घेण्यात मदत करणार नाहीत. त्यासाठी तुम्हालाच मार्ग शोधावा लागेल. म्हणून बुद्ध मोक्ष नाही देत, परंतु त्याचा मार्ग जरूर दाखवितात.