मिडिया विजीलने प्रसारित केलेल्या या वृत्तातील व्हिडीओ बघून प्रचंड अस्वस्थ झालोय. म्हणे…प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणसापासून पुन्हा पशु…नुसता पशु नव्हे तर हिंसक पशु होण्याचे उलटे संक्रमण, हे विकृत विचारधारेचे द्योतग आहे. अरे…मरणाऱ्याला आपण साधं पाणी पाजत नाही,कुणीही त्याला मदत करत नाहीय, एवढ्या नीच दर्ज्याच्या विचारधारेमुळे तुमच्यातला माणूस कधीच मेलाय. आता तुम्ही फक्त हैवान आहात, फक्त हैवान ! बुद्ध- महावीरांच्या देशात पुन्हा एक कासीम बोथट संवेदनांचा बळी ठरलाय.
कोणत्याही हिंसेचे समर्थन कुठल्याही परीस्थित होऊ शकत नाही. त्याच प्रकारे एका माणसाने दुसऱ्या हाडामासाच्या माणसाला मारण्यासाठी कधीच कुठलेही कारण योग्य ठरवले जाऊ शकत नाही. ज्या देशातून बुद्ध आणि महावीर यांनी अवघ्या जगाला शांतीचा संदेश दिला. त्याच देशात आज, अविवेकी लोकं झुंडशाहीच्या जोरावर धर्माची ताकद सिद्ध करू पाहताय. अशा हिंसेचे कोणताही संवेदनशील व्यक्ती समर्थन करूच शकत नाही. गो रक्षेच्या नावाखाली झुंडशाही करायची हे कुठला धर्म शिकवतोय. एक माणूस प्रचंड जखमी अवस्थेत पाणी-पाणी मागून मारतोय आणि काही जण व्हिडीओ काढताय.
उत्तर प्रदेशमधील हापूड येथील कासिमच्या या व्हिडीओमध्ये अनेक अल्पवयीन मुलं आजूबाजूला उभी असल्याची दिसताय. त्यामुळे आज आपण स्वतःला निश्चितच एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. माझ्या परिवारातील माझा मुलगा, भाचा किंवा अन्य कुणीही अशा हिंसक झुंडचा भाग बनला पाहिजे का? जर तुमचे उत्तर नकारात्मक असेल तर, त्याला पुन्हा एकदा भारतीय सहिष्णुता आणि संस्कृती समजावून सांगा. कारण राजकीय उद्देश सफल करण्यासाठी कुणी तरी त्याचा मेंदूचा ताबा घेण्याचा धोका आहे. आपला पोरगा कुणाच्या विचारधारेने संमोहित होऊन कट्टरपंथी होण्याचीही शक्यता आहे. पण एक लक्षात घ्या, कुठल्याही पद्धतीच्या कट्टरतेचा प्रवास शेवटी हा विनाशाकडेच असतो.
आपल्या देशात कुणालाही कोणताही विचार स्विकारण्याचे स्वातंत्र्य आहे. फक्त त्यांनी इतकाच विचार करणे गरजेचे आहे कि कोणतीही धार्मिक संघटना जो विचार मांडतात, तो खरच आपल्या भारतीय समाजाच्या भल्याचा आहे का ?, माझा मुलगा बुद्ध,महावीर यांच्या सहिष्णू पथावर चालणारा बनला पाहिजे की, गोडसेच्या हिंसेच्या मार्गावर गेला पाहिजे? अशा गंभीर प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने शोधण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
आपला भारत बुद्ध,महावीर आणि गांधी यांच्या नावाने जगात ओळखला जातो. काही चुकांमुळे आपण ही ओळख पुसत तर नाहीय ना? असा प्रश्न निर्माण व्हावा एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसेची विचारधारा आज देशात बघावयास मिळतेय. त्यामुळे जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे करून कुणाचे भले होणार आहे ? या निरर्थक संघर्षातून काय साध्य होणार आहे ? या गोष्टींचा विचार देखील प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
कुणी कितीही नाकारले तरी, हिंसा माणसाला विकृत बनवते,हे वैश्विक सत्य आहे. मुळात जिथे वैचारिक प्रतिवाद शक्य आहे तिथे तर हिंसेचा मागमूसही नको. शेवटी सर्वसामान्य भारतीयाला आजही त्याचा मुलगा खुनी किंवा विकृत म्हणून नव्हे, डॉक्टर,इंजिनिअर, शिपाई फार काही नाही तर हातमजुरी करणारा सज्जन व्यक्ती म्हणूनच देखील बघायला आवडतो.
व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा