जितनी बुरी कही जाती है उतनी बुरी नहीं है दुनिया
बच्चों के स्कूल में शायद तुम से मिली नहीं है दुनिया
चार घरों के एक मोहल्ले के बाहर भी है आबादी
जैसी तुम्हें दिखाई दी है सब की वही नहीं है दुनिया
घर में ही मत उसे सजाओ इधर उधर भी ले के जाओ
यूँ लगता है जैसे तुम से अब तक खुली नहीं है दुनिया
भाग रही है गेंद के पीछे जाग रही है चाँद के नीचे
शोर भरे काले नारों से अब तक डरी नहीं है दुनिया
द्वेषाने भरलेल्या या जगाचे एक सुखद वास्तव प्रसिद्ध शायर निदा फ़ाज़ली या गजलच्या माध्यमातून आपल्याला समजावतात. असं म्हणतात की, बालपण परमेश्वराचं दुसरं रूप असते. परंतु आपल्या भारतीय समाजात फक्त जातीवरून अनेक बालकांचे भविष्य अंधारमय होत असते. फासे पारधी, डोंबारी कोल्हाटी, लमाण, नंदिवाले, मरिआईवाले, गोंधळी, वासुदेव, बेरड-रामोशी, सुतार, भाट-सिकलगरी, घिसाडी यासारख्या असंख्य भटक्या विमुक्त तसेच पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य भटक्या विमुक्त तसेच पुर्वा-श्रमीच्या अस्पृश्य गणल्या गेलेल्या जाती आणि वनवासी अनुसुचित जमातीतले असंख्य घटक शिक्षणापासून आजही वंचित आहेत. परंतु पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ही उपेक्षितांचं बालपण जपणारी निवासी आश्रमशाळा आज उभी असल्यामुळे या जातीतील अनेक मुलं-मुली आपल्या भविष्याचा वेध घेताय. या सर्व गोष्टीचे श्रेय जाते, गिरीश प्रभुणे नावाच्या एक ध्येयवेड्या माणसाला. या माणसाने अवघं आयुष्य या पोरांच्या भवितव्यासाठी वाहून घेतलय. अनेक मान-अपमान पचवलेत,परंतु प्रभुणे सर ध्येयापासून कधीही विचलित झाले नाहीत.
पुण्यातील चिंचवडमधील गावडे जलतरण तलावाजवळ ,क्रांतिवीर चापेकर विद्यालय परिसरात पांढरीचा मळा चिंचवडगांव या ठिकाणी गुरुकुलम शाळा सुरु आहे. वंचित घटकातील मुलांसाठी असणारा एक निवासी शैक्षणिक प्रकल्प म्हणून देखील या निवासी शाळेकडे बघता येईल. याठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच मुलांच्या अंगभूत कला-कौशल्याला वाव देण्यासाठी त्यांना अभियांत्रिकी (वेल्डिंग,प्लांबिंग ,बांधकाम,सुतारकाम ) धातुकाम ,मूर्तीकाम ,बांबूकाम ,संगणक ,संगीत , कृषि-गो-विज्ञान ,भाषाविज्ञान ,सामाजविज्ञान ,मैत्र ,आयुर्वेद ,शिक्षणशास्त्र असे अनेक विषय शिकवले जातात.भिन्न भाषा वेष, जाती-पंथ असले तरी याठिकाणी सर्वांना आपले भविष्य सावरण्याची संधी उपलब्ध आहे.
आपल्या देशातील समरसतेचा खंडित झालेला प्रवाह पुन्हा सुरु करण्याची खरी धडपड याठिकाणी सुरु आहे. आज फासे पारधी, डोंबारी कोल्हाटी, लमाण, नंदिवाले, मरिआईवाले, गोंधळी, वासुदेव, बेरड-रामोशी, सुतार, भाट-सिकलगरी, घिसाडी यासारख्या असंख्य घटक शिक्षणापासून वंचित आहेत. समाजाच्या मूळ प्रवाहात न आल्यामुळे या जातींबद्दल मोठा गैरसमज आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. परंतु समाजाचा मोठा दुर्बल घटक मूळ प्रवाहात येण्यापासून वंचित राहू नये, म्हणून गिरीश प्रभुणे सरांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकदिनी , ९ जुन २००६ ला ‘पुनरुत्थान समरसता गुरूकुलम’ ची स्थापना केली.
सुरुवातीच्या काळात प्रचंड अडथळ्यांची शर्यत पार करून प्रभुणे सरांनी आज एक प्रत्येकाला भावेल अशी शाळेची इमारत उभी केली आहे. सुरूवातीला फक्त मुलांच्या रहाण्या खाण्यापिण्याची सोय होते म्हणून पालक मुलांना शाळेत पाठवायचे. परंतु आपल्या मुलांमधील घडू लागलेला बदल पालकांना सुखावू लागल्यानंतर पालक मुलांना शिक्षण आणि संस्कारासाठी शाळेत पाठवू लागले. म्हणूनच की काय सुरुवातीला अवघ्या २५ विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळेत आज ३५० च्या वर विद्यार्थी राहतात. येथील एक विद्यार्थी आज इंजिनिअरीगचा डिप्लोमा करतोय. यावरून लक्षात येईल की, प्रभुणे सरांची तपश्चर्यच्या वृक्षाला आता फळ येऊ लागली आहेत.
सुरुवातीची दोन वर्ष गुरुकुलम चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर वाड्यात सुरु होती. पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणारा, बालमजुर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला देखील या शाळेत प्रवेश मिळायचा. येथील शिक्षणपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांचे निरीक्षण करुन, त्यांच्या सवयी, क्षमता, कौशल्य ह्यांचा विचार करुन मग शिकवले जाते. एक महिना कोणत्याही पुस्तका शिवाय केवळ सामुहिक कॄतींमधून अभ्यास घेतला जातो. ह्या दरम्यान मुलची वागणूक, गुण-अवगुण, स्वच्छता, लेखन/वाचन/ संख्याज्ञान ह्यांच्यातील सफाईदार पणा पाहून मुल कोणत्या वर्गात बसेल हे ठरवले जाते. त्यांच्या कौशल्यानुसार गट पाडले जातात.
गुरुकुलात शालेय विषयांसोबतच जीवनावश्यक विषयांचेही ज्ञान दिले जाते. ह्यात प्रामुख्याने कला (चित्रकला, शिल्पकला, कागदकाम इ.), मैत्र (पुस्तकवाचन, कथाकथन, लेखन, अभिनय), संगणक, नैपुण्य (भटक्या जमातीमधल्या नैपुण्यांचा वापर करण्यासाठी नेमबाजी, रो क्लायबिंग इ. खेळ), गृहविज्ञान (लोणचे, सॉस, चिक्की इ. पदार्थ / खडू, मेणबत्त्या, अगरबत्त्या इ. बनवणे), आयुर्वेद (वनौषधींची माहिती, काढे, दंतमंजन इ. बनवणे), कॄषी आणि गोविज्ञान ( भाजीपाला, मातीचा अभ्यास, रोपवाटिका इ.) , अभियांत्रिकी (सुतार काम, वेल्डींग, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल इ.) हे विषयही शिकवले जातात.
याठिकाणी विद्यार्थ्यांना मराठी भाषे बरोबरच विज्ञान, संगणक तंत्र कौशल्य जसे शेती-भाजीपाला लागवड कंपोस्ट खत, रोपवाटिका, बांधकाम सायकल व मोटारसायकल दुरूस्ती, प्लंबीग, रंगकाम इत्यादी बरोबरच मूर्ती कला, संगीत गायन, वादन चित्रकला, लेखन, वाचन, संभाषण असे एकूण २० विभागात मार्गदर्शन दिले जाते. तसेच वन औषधी, पक्षी निरीक्षण, खगोल निरीक्षण यांचा ही आभ्यास घेतला जातो. मुले इथेच राहत असल्यामुळे हे सर्व सहज शक्य होते. यासाठी चिंचवड येथे निसर्गरम्य वातावरणात देखील तेवढेच महत्वपूर्ण ठरते. पंचकोषावर आधारित स्व-तंत्र असा अभ्यासक्रम विकसित करून ही मुले ४थीला शिष्यवृत्ती परिक्षेला बसतात. तसेच ७वी, १०वी आणि बारावीच्या परीक्षा देतीलच. याशिवाय विविध स्पर्धात्मक परिक्षात क्रीडा स्पर्धात भाग घेतात.
आपणही सहकार्य करू शकतात
रोज विशिष्ट कामासाठी २ तास अथवा वर्षातून काही दिवस अथवा आपल्या करियरच्या सुरुवातीचे एक वर्ष, निवृत्तीनंरचा वानप्रस्थीकाळ आपण याठिकाणी घालवून वनचितांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात. गुरुकुलाच्या बांधकाम, ४०० मुलांचे एकावेळचे भोजन,एका मुलाचा पदवी पर्यंतचा खर्च, एका मुलाचा एक वर्षाचा खर्च देऊन सहकार्य करू शकतात. तसेच विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहन, तसेच क्रीडा साहित्य, संगीत, चित्रकला, मातीकाम, पॉटरी, शिल्पकाम, तसेच विज्ञानाची, स्वावलंबनाची गोडी, श्रमाची गोडी लावणारे अनुभव प्रकल्प, सौर-उर्जा, पर्यावरण, वनीकरण, स्वच्छता, शालेय साहित्य. सहली तसेच विविध कार्यशाळा, उद्योग-व्यवसाय, संगणक प्रशिक्षण इत्यादीचा खर्च उचलून आपण हातभार देखील लावू शकतात किंवा कला व विज्ञान साहित्य ग्रंथ खरेदीसाठी निधी देऊ शकतात. भारताच्या या पवित्र भूमीत वंचित-शोषित बालकांचे उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणारे आणि ती साकार करण्यासाठी हे पुनरूत्थान समरसता गुरूकुलम् सुरू झाले आहे. समरसतेच्या या कार्यात आपण सर्वानी जरूर सहकार्य करावे,हीच आग्रहाची विनंती.
मदतीसाठी संपर्क
श्री.गिरीश प्रभुणे ( काका ) ९७६६३२५०८२
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम
चिंचवड (पुणे)
चेक/डीडी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या नावाने काढावा ८० जी सवलत क्र.: पी.एन.सीआयटी व्ही/टेक/८०जी ७,२०-१०-११ २९७७