महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारी घटना जळगाव येथील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडली आहे. तीन दलित समाजातील मुलांना नागड्या अवस्थेत बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियात देखील टाकण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागल्यामुळे ‘वरती’ मोठे खलबते झालेत आणि पहिल्यांदा प्रशासनाकडून आरोपींची जात सांगण्यात आली. भविष्यात अशा घटनांमध्ये सारख्या आडनावामुळे आमच्या जाती बाबत गैरसमज होऊ नये म्हणून आरोपींंची जात-पोटजात सांगावी, असा आग्रह प्रत्येक समुदायाकडून धरला जाईल. आगामी काळात यामुळे प्रशासनावर दबाव वाढेल. त्यामुळे गुन्हेगाराची जात सांगण्याचे खरे प्रयोजन काय होते? हे सरकारला स्पष्ट करावेच लागणार आहे.
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटनेत ईश्वर बळवंत जोशी हे मुख्य आरोपी आहेत, नियमान्वे त्याचे नाव जाहीर होणार मग जोशी हे नाव वाचून सगळीकडे ब्राम्हणविरोधास बळ मिळणार हे महाराष्ट्रातील वातावरणावरून नव्याने सांगायला नको. हा मुद्दा प्रशासनाच्याही लागलीच लक्षात आला असावा. त्यामुळे बातम्यांमध्ये आरोपींची जात येण्याची पद्धतशीरपणे सोय करण्यात आल्याचा आरोप होतोय. आता आरोप स्वाभाविक की, अस्वाभाविक हा ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टीकोन आहे. परंतु पत्रकारितेच्या इतक्या वर्षाच्या अनुभवात मी पहिल्यांदा बातमीत आरोपींची जात वाचली, हे देखील तेवढेच सत्य आहे.
केवळ एका विशिष्ट जातीबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून प्रशासानानेच ‘वरती’ खलबते करून एक प्रेसनोट रिलीज केली. त्यात आरोपींच्या जातींचा उल्लेख केला. काही पत्रकारांनी तोच कित्ता पुढे गिरवला. वाकडीमध्ये गुरुवारी रात्री आरोपीच्या घराजवळ थोडावेळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे एका प्रबळ जातीला वाचवण्यासाठी एका दुसऱ्या दुर्बळ जातीस अडचणीत आणले गेल्याचे वास्तव आतातरी प्रशासनाच्या ध्यानी आले की नाही, हे देव जाणे. दुसरीकडे काही जणांनी तर आरोपींचे जातप्रमाणपत्र सोशल मिडीयावर कालच व्हायरल केले होते. यावरून जात पुराण लोकं किती गांभीर्याने घेतात, हे लक्षात येते.
आजच्या घडीला प्रशासन तर आरोपीची जात सांगून मोकळे झालेय. परंतु भविष्यात पिडीत आणि आरोपींच्या जातीत राज्यात तेढ निर्माण झाली तर त्याला दोषी कोण? याचे उत्तर सरकारला द्यावेच लागणार आहे. थोडक्यात दलित-ब्राम्हण संघर्ष टाळण्यासाठी अन्य दोन जातींमध्ये तेढ निर्माण झाला तरी चालेल या भूमिकेतून हा चावटपणा तर झाला नाही ना? हा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे सध्याच्या सरकारने गुन्हेगाराच्या जाती विशेषण प्रसारित करण्याबाबतची भूमिका स्पष्ट करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
थोडक्यात ही घटना जातीय द्वेषभावनेतून झाली नसल्याचे एक वेळ मान्य केले, तरी चिमुकल्या पोरांना झालेल्या मारहाणीचे समर्थन कुणीच करू शकत नाही. चिमुकल्या पोरांना अदीम मानवांप्रमाणे अंगावरील गुप्तांग लपविण्यासांठी वृक्षाच्या पत्त्यांचा आधार घ्यावा लागतो, लाख गयावया करून देखील उघड्या कोवळ्या अंगावर चाबुका प्रमाणे पट्ट्यांचे फटके सहन करावे लागतात. हे निश्चितच तालिबानी कृत्य आहे. या गुन्ह्याबद्दल दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.
आपल्या जातीबद्दल गैरसमज नको म्हणून, भविष्यात आडनावावरून कातडी वाचवण्यासाठी प्रत्येक समुदाय आता आरोपीच्या जातीच्या खुलाशासह बातमी छापण्याचा आग्रह धरेल. त्यामुळे माध्यमांची खरी गोची भविष्यात होणार आहे. आगामी काळात प्रत्येक सत्ताधारी आपल्या जातीची कातडी वाचवण्यासाठी प्रशासनाचा असाच दुरुपयोग करणार नाही, हे कुणीही आज छातीठोकपणे सांगू शकत नाही. परंतु वाकडीच्या निमित्ताने बातम्यांमध्ये आरोपींची जात छापण्याचा एक चुकीचा पायंडा पडला हे निश्चित !
जसं दहशतवाद्याला धर्म नसतो, त्याचपद्धतीने गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. गुन्हेगाराला जात नसते. सध्या महाराष्ट्रात जातीच्या नावाखाली प्रत्येक समुदाय एकत्र येतोय. प्रत्येक जातीच्या माणसात त्याच्या जातीवर अन्य समुदायाकडून अन्याय होतोय,अशी भावना प्रबळ होतेय. अशा स्थितीत वाकडी प्रकरणात गुन्हेगाराला जातीचे विशेषण लावण्यात आले. गुन्ह्गारांंची जात ठळक सांगण्यापेक्षा त्याला कठोर शासन करण्यासाठी सरकार काय करतेय,हे सांगणे गरजेचे होते. कारण कुठल्याही गुन्ह्यात दोष जातीचा किंवा धर्माचा नसतो, अशा घटनांमध्ये फक्त वृत्ती दोषी असते.
आरोपींची जात छापली म्हणून अनेक जण मिडियावर तोंडसुख घेतील. परंतु या क्षेत्रात काम करणाऱ्यांना किती स्वतंत्रता आहे, हे मी चांगले जाणून आहे. मालकांच्या धोरणांप्रमाणे पत्रकाराला लिहावे लागते आणि मालकांचे धोरण हे सरकार ठरवीत असते. पत्रकार आज अशा कठीण काळातून संक्रमण करतोय की सोशल मिडीयावर लिखाण करतांना देखील तो भेदरलेला असतो. परंतु या मजबुरीवर माध्यमांनी आपली बुद्धी गहाण ठेवलीय असं, म्हणायला घ्यायला काही जण तरी तयारच असतात.
वाकडी येथील घटनेवर सर्वच राजकीय पक्षांकडून टीका होऊ लागल्यामुळे राज्यातील यंत्रणा हादरली. त्यामुळे तक्रार मागे घेण्यासाठी पीडितांवर दबाब टाकला जाईल हे सर्वाना अपेक्षित होते. त्यानुसार पिडीत मुलांची फिर्यादी आईने तक्रार नसल्याचे पोलिसांना काल सायंकाळी लिहून दिल्याचे कळते. तशा बाईट चॅनेलवाल्यांना देखील दिल्या आहेत म्हणे. खरचं किती टोकाचा दबाव आला असेल,त्या मातेवर! पोरांना मारहाण होत असल्याचा व्हीडीओ बघून देखील, ती माय तक्रार नसल्याचे सांगतेय.
‘मुलं म्हणजे देवा घरची फुलं’ ही गोष्ट आजचा समाज विसरलाय. पोरं म्हटली म्हणजे शंभरदा सांगून देखील चूक करणाच, म्हणून त्यांना अशा निर्दयी पद्धतीने शिक्षा नाही देता येत. थोडक्यात आजच्या घडीला लोकांच्या मनात प्रेम नव्हे तर असहिष्णुतेने घर केलेय. महाराष्ट्र संताची भूमी म्हणून ओळखली जाते. ज्या संतानी अवघ्या जगाला प्रेमाचा संदेश दिला,त्याच संतांच्या भूमीवर आज द्वेष नामक सैतान निधड्या छातीने हैदोस घालतोय. हा द्वेष पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मुखावर गुटख्याची पिचकारी मारल्यागत आहे. परंतु पिचकारी गुटख्याची असली तरी महाराष्ट्राचे पुरोगामित्व रक्ताने माखल्यागत दिसतेय.
प्रशासनाची प्रेसनोट