बिहारला जंगलराज म्हणणारे आपण महाराष्ट्रातील मंडळी औरंगाबाद पोलिसांच्या उपस्थितीत दंगलखोर जाळपोळ करीत असल्याचा नुकताच समोर आलेला व्हीडीओ पहिल्यानंतर काही प्रतिक्रिया नोंदवणार आहोत का? औरंगाबाद दंगलीमधील ९ मिनिटांचा हा व्हीडीओ कोणत्या भागातील आहे, हे मला माहित नाही. परंतु व्हीडीओत जे दिसतंय ते निश्चितच महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे आहे. विशेष म्हणजे याबाबत माझे लिखाण पूर्ण होते नाही,तो पर्यंत तो व्हीडीओ युट्युबवरून काढून टाकण्यात आला आहे. परंतु विविध चॅनेलवर त्या व्हीडीओच्या आधारे बातम्या दाखवून आणि छापून झाल्या आहेत.
कधीकाळी गुजरातमधील दंग्यांमध्ये देखील पोलिसांवर बघ्याची भूमिका केल्याचा आरोप लावण्यात आले होते. तोच आरोप आज औरंगाबादमध्ये देखील लावला जात आहेत. यावेळी फक्त फरक एवढाच आहे की, पुरावा म्हणून एक व्हिडीओ समोर आला आहे.
पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळेच महाराष्ट्र सतत जातीय आणि धार्मिक दंगलीत होरपळतोय. हे सत्य कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही मान्य करायला तयार नाहीत. परंतु एकदिवस भाजप पक्षश्रेष्ठी जरूर मान्य करतील. भीमा-कोरेगाव दंगल पूर्वनियोजित असल्याचे उसळलेल्या दंगलीनंतर समोर आले होते. त्याच पद्धतीने औरंगाबादमध्ये दंगलीत वापरण्यात आलेले पेट्रोल बॉम्ब, दगड, जाळपोळ करण्यासाठी वापरण्यात आलेले हजारो लिटर रॉकेलवरून हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस दलात अनेक पातळीवर खबऱ्यांचे जाळे असते. प्रत्येक पोलीस स्थानकात गुप्त वार्ता विभाग असतो. एवढेच नव्हे तर, एसआयडी, सीआयडी, एटीसी अशा विविध विंग शहरातील बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवत असतात. त्यातल्या त्यात या विंग हिंदू-मुस्लीम किंवा दलित-सवर्ण यांच्यातील छोटे-मोठे वाद फार गांभिर्याने बघत असतात. एवढेच नव्हे तर त्याचे गुप्त अहवाल आपापल्या वरिष्ठ कार्यालयात पाठवीत असतात आणि तेथून तो अहवाल थेट गृहमंत्रालयात जात असतो.
यंत्रणा एवढे बारीक लक्ष ठेवत असतांना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात दंगली उसळताय ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. एखादं अचानक उसळलेली दंगल आपण समजू शकतो. परंतु किरकोळ वादातून वातावरणात तणाव असून कुठल्यातरी दंगलीचे नियोजन सुरु आहे. याची खबर पोलिसांना मिळणार नाही, असे शक्यच नाही.
औरंगाबादमधील पोलिसांना खरचं दंगीलीचे नियोजन माहित पडले नसेल तर त्या सर्वांनी राजीनामा दिला पाहिजे. याठिकाणी अनेक नवीन होतकरू अधिकाऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे. कारण बेसिक पोलिसिंग जर जमत नसेल तर उगाच खाकीची शान घालवून पोलीस दलाची इभ्रत त्यांनी वेशीला टांगू नये. कारण माझ्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाला स्व. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे यांच्यासह अनेक वीरांचा इतिहास आहे.
आपला महाराष्ट्र की, बिहारचा जंगलराज हे ठरविण्यासाठी खालील व्हीडीओ पूर्ण बघा
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/aurangabad-violence-cops-walked-with-mob-in-aurangabad-shows-video/articleshow/64157544.cms