धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे साधारण १९ जुलै २०१० रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास एका महिलेच्या घरात शेतीविषयी बोलणी सुरु होती. परंतु गावातील काही टारगट पोरांनी दोघांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांची विवस्त्र धिंड काढली. एवढेच नव्हे तर या घटनेचे फोटाे देखील काढले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी न्यायालयाने तब्बल ८ वर्षानंतर १९ आरोपींना एक वर्ष कारावास व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.यानिमित्ताने नैतिकतेच्या नावाखाली माणूसकी नागडी करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
नांदेडचे प्रकरण उजेडात आणणारा पत्रकार म्हणून मी अनेक अडचणींना सामोरा गेलोय. वडिलांची प्रकृती अतिगंभीर असतांना माझ्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा, काही जणांकडून करण्यात आलेला कथित निषेध अशा विविध कारणांनी ते दोन-तीन महिने माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होते. परंतु एक ‘बिहारी’ प्रथा महाराष्ट्र सारख्या सुसंकृत राज्यात रूजण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एका पिडीत महिलेला माझ्या बातमीमुळे न्याय मिळाला,याचा आज खरा आनंद आहे. ज्या बातमीमुळे सगळं बरं वाईट घडलं, त्या बातमीचे कात्रण आणि मजकूर आपल्या वाचनासाठी ब्लॉगवर देतोय.
पत्रकारितेतील माझा सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे या क्षेत्रातील फार काही छक्के-पंजे माहित नव्हते. धरणगाव तालुक्यातील नांदेड गावी एका पुरुषासह महिलेला गावाच्या चौकात नग्न करून काही लोकांनी संस्कृती आणि चारित्र्याच्या नावाखाली बेदम मारहाण करून फोटो काढले होते. परंतु कोणीही बातमी छापायची हिंमत करीत नव्हते. बातमी छापली नाही तर एवढे गंभीर प्रकरण सहज दाबले जाईल याची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे फोटो माझ्याकडे आल्यापासून प्रचंड अस्वस्थ होतो. पिडीतेला न्याय मिळाला पाहिजे, अशी ‘बिहारी’ प्रथा माझ्या महाराष्ट्रात रुजता कामा नये,या गोष्टी मला स्वस्थ बसू देत नव्हत्या. बातमी छापल्या नंतर काय होईल…ते होईल…बघून घेऊ म्हणत अखेर हिंमत करत बातमी लिहिली. खरं म्हणजे माझ्या सोबत आणखी एका पत्रकाराने देखील बातमी पाठविली होती. परंतु त्यांची बातमी लागली नाही. दुसरीकडे गावकरीचे संपादक धो.ज.गुरव यांनी बातमी मेन लीड केली.
गावकरीत बातमी छापून आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी गल्लीपासून तर थेट दिल्ली पर्यंत प्रचंड खळबळ उडाली. सकाळी ६ वाजेपासून माझा फोन खणखणायला सुरुवात झाली. पोलीस-पत्रकार प्रत्येकाला माझ्याकडून घटना जाणून घ्यायची होती,तथ्य जाणून घ्यायचे होते. अनेक न्यूज चॅनेलचे पत्रकार मित्रांनी माझ्याकडून माहिती घेतली. इलेक्ट्राॅनिक, प्रिंट मीडियातील सर्व पत्रकार मित्रांना बातमीसाठी आवश्यक असणारे इनपुट मी दिले. परंतु एकाही पत्रकार मित्राने घटना उघडकीस आणणारा पत्रकार म्हणून माझा बाईट किंवा प्रतिक्रिया घेतली नाही. माझ्या बातमीमुळे जिल्हा पोलीस दलाची यंत्रणा चांगलीच हादरली होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी तेव्हा मला मनोमन दुश्मन मानायला सुरुवात केली होती. एका बिनडोक अधिकाऱ्याने त्याला झालेल्या प्रशासकीय त्रासाचा बदला म्हणून नंतर एका खोट्या गुन्ह्यात माझे नाव देखील अडकवले. मी पण त्या अधिकाऱ्याला जिल्ह्यात शेवटपर्यंत गांजलो हा भाग वेगळा. बातमी छापल्याबाबत तसेच फोटो कुठून मिळविला याबाबत खोटा जबाब द्यावा म्हणून त्याने माझ्यावर दबावही टाकला. परंतु पोलिसाचा पोरगा असल्यामुळे काय उत्तर द्यायचं तेव्हा देखील चांगल्या प्रकारे माहित होते.
खरं म्हणजे नांदेडमध्ये घटना घडल्यानंतर धरणगावच्या पोलीस निरीक्षकाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे सोडून उलट जमावाच्या दबावाला झुकला होता. त्या अधिकाऱ्याने जर थोडीही संवेदनशीलता जपत महिलेची व त्या पुरुषाची विवस्त्र धिंड काढणाऱ्याविरुद्ध लागलीच गुन्हा दाखल केला असता,तर कदाचित मला बातमी छापायची गरज पडली नसती. परंतु विनाकरण त्रास नको किंवा इतर ‘अर्थ’पूर्ण कारण लक्षात घेता त्या पोलीस अधिकाऱ्याने प्रकरण दडपून टाकण्यातच धन्यता मानली असावी. माझ्या एका बातमीमुळे अनेक जणांवर गुन्हा दाखल झाला. एक अख्खं गाव दुश्मन झाल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती. दोषींचे नातेवाईक-मित्र मंडळी तेव्हा क्षणो क्षणी माझ्याबाबत तपास काढायची, त्यामुळे अनेक दिवस तणावात काढली. कुठे जाता-येता मनात अनाहूत भीती कायम पाठलाग करायची. नांदेडच्या बातमीमुळे तणाव-त्रास आणि मनस्ताप मी आणि माझ्या परिवाराने सहन केला,परंतु टीव्ही चॅनेल आणि इतर पेपरमध्ये कथित समाजसेवक किंवा इतर पत्रकार स्वतःची फुशारकी मारण्यात मग्न होते. कुणीही साधी माझी विचारपूस करत नव्हते. तुला कोण आणि कसा त्रास देतय. तुझ्यावर कोणते मानसिक दडपण आहे. पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात कसे अडकवले, कोणीही काहीही विचारात नव्हते. जो-तो आपापली काॅलर टाईट करत होता. दुसरीकडे विविध न्यूज चॅनेलवर या बातमीचे अतिरंजित प्रसारण तसेच चर्चा घडवून आणल्या जात होत्या. या बातमीच्या आधारावर तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी सरकार चांगलेच घेरले होते.राष्ट्रीय महिला आयोग, ह्युमन राईट अशा विविध संस्थांनी देखील नांदेडच्या घटनेची दखल घेतली होती.
एकेदिवशी बस स्थानकाजवळ उभा असतांना धरणगाव येथे कार्यरत असलेला राठोड नामक पीएसआय आला आणि मला म्हटला की, वाघमारे तुम्हाला एक नोटीस द्यायचीय. मी म्हटले कसली नोटीस? तुमच्या बातम्यांमुळे कायदा-सुव्यस्थेची स्थिती निर्माण होते,दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या बातमीमुळे भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. मी तर आवाक् च झालो. तेवढ्यात माझे मित्र तथा देशदूतचे वृत्तसंपादक भरत चौधरी त्याठिकाणी आले आणि मला विचारले काय झाले? काय म्हणताय साहेब ? मी म्हटले काही-नाही हे साहेब मला नोटीस द्यायचं म्हणताय. हे ऐकताच भरत चौधरी खूप चिडले. तेथून त्यांनी मला सोबत घेत थेट पोलीस स्थानक गाठत साहेबांना चांगलीच खरी-खोटी सुनावली. हिंमत असेल तर नोटीस देऊनच बघा…तुम्ही अनेक दिवसापासून वाघमारेंवर दडपण टाकण्याचा प्रयत्न करताय,आम्ही दुर्लक्ष करतोय. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही काहीही मनमानी कराल. नोटीस देणे म्हणजे, हे तर अतीच झाले. त्यावर पोलीस अधिकारी व सर्व कर्मचारी चांगलेच नरमले. या कठीण काळात मला धरणगावातील स्थानिक पत्रकारांनी फार साथ दिली. त्यात शरदकुमार बन्सी, प्रा.बी.एन.चौधरी यांचा प्रामुख्याने समावेश होता.
नांदेडच्या घटनेला काही दिवस झाल्यानंतर एकेदिवशी नगरपालिकेत शिवसेनेचा मोठा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सुरेशदादा जैन, चिमणराव पाटील,गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ आदी मंडळी उपस्थित होती. साधारण सायंकाळी ६ वाजेपासून तर ८ वाजेपर्यंत नगरपालिकेत हा कार्यक्रम चालला. तत्पूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या एका मोठ्या वादविवाद प्रकरणी श्री.भोईटे यांना धरणगाव पोलीस स्थानकात आणण्यात आले होते. नगरपालिकेतील कार्यक्रम संपल्यानंतर सुरेशदादा जैन यांनी थेट पोलीस स्थानक गाठले. त्याठिकाणी सुरेशदादांनी श्री.भोईटे यांची समजूत काढली. त्यानंतर पत्रकारांशी पोलीस स्थानकाच्या वरच्या मजल्यावर अनौपचारिक गप्पा सुरु केल्या. आम्ही सर्व पत्रकार त्याठिकाणी उपस्थित होतो. त्याचवेळी विभागीय पोलीस अधिकारी (आता मला नेमके नाव आठवत नाही)यांनी मला खाली बोलावून घेतले आणि वाघमारे तुमच्या घराकडे काही वाद सुरु आहेत का? असे विचारले. मी म्हटले…सर माहित नाही,मी तर केव्हापासून वर बसलोय… एसडीपीओ साहेब म्हटले जरा तपास करून घ्या, काय झालेय. मी हो म्हटले आणि परत पोलीस स्थानकाच्या वरच्या मजल्यावर गेलो. कारण सुरेशदादा यांची बातमी माझ्यासाठी महत्वाची होती,त्यामुळे त्याच्या बोलण्यातील एकही मुद्दा सुटायला नको,असे मला वाटत होते.
दहा-पंधरा मिनिटांनी आम्ही खाली उतरलो तर दंगलीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून माझे नाव गोवण्यात आले होते. विभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली. म्हटलं साहेब तुम्हीच मला तुमच्या गल्लीत काय झाल्याचे विचारतात आणि दुसरीकडे आरोपींमध्ये माझे नाव गोवतात. त्यावर एसडीपीओ साहेब म्हणाले…नाही आज आपली भेटच झाली नाही. एवढा मोठा अधिकारी धडधडीत खोटं बोलतोय म्हटल्यावर काय वाद घालणार. मी म्हटले ठीक आहे साहेब…मी आता काय करू सांगा…घरी जाऊ की तुम्ही मला अटक करताय? त्यावर ते म्हटले तुम्ही आता घरी जा, सकाळी तुम्हाला बोलावतो. या षडयंत्रामागे शेवगण नामक तत्कालीन पोलीस निरीक्षक होता.
गावकरीचे संपादक धो.ज.गुरव साहेब, आवृत्ती प्रमुख सतीश अग्रवाल आणि माझे मित्र स्व. हेमंत पाटील यांना लागलीच माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची माहिती दिली. गुरव साहेबांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक यांना भेटत सर्व हकीगत सांगितली. जर आमचा पत्रकार दोषी असेल तर जरूर कारवाई करा, परंतु व्ययक्तीक द्वेषापोटी त्रास दिला जात असेल तर चुकीचे आहे. त्यावर तत्कालीन अपर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. चौकशी केल्यानंतर मी घटनास्थळी नव्हे तर पोलीस स्थानकातच होतो, हे सिद्ध झाले. त्यानंतर वरिष्ठांनी शेवगणची चांगलीच खरडपट्टी काढली आणि काही दिवसात बदली केली.
गावकरी परिवार आणि स्थानिक पत्रकार मित्रांनी कठीण काळात खूप मोठा आधार दिल्यामुळे लवकर स्वतःला सावरू शकलो. माझ्या वडिलांचे बायपास झाल्यामुळे त्यांची प्रकृती त्याकाळात खूप खालावलेली होती. त्यातच माझ्यावरील खोटा गुन्हा त्यांच्यासाठी खूपच वेदनादाई ठरला होता. असो… या प्रकरणात १९ जणांना शिक्षा झाल्याचे कळाले. एक संघर्ष पूर्णत्वास गेलाय,पिडीत पुरुषासह त्या महिलेला अखेर न्याय मिळालाय, लेखणीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली !
============================
दैनिक गावकरीत २४ जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झालेली बातमी
नैतिकतेच्या नावाखाली नांदेडात माणूसकी झाली नागडी!
धरणगाव : विजय वाघमारे
भारतीय संस्कृतीत ‘स्त्री’ला ‘आदिशक्ती’ म्हणून पुजण्यात येते. देवापेक्षाही मोठे स्थान देण्यात येणार्या या सुसंस्कृत देशात माणुसकीला काळीमा फासणारी व अंगावर शहारे आणणारी घटना २० जुलै रोजी घडली. नैतिक व अनैतिकतेचा न्यायनिवाडा करणार्यांनी ‘त्या’ दलित महिलेस विवस्त्र अवस्थेत चौकात बांधून ठेवत माणूकीचे वस्त्रहरण केल्याचे प्रकरण उजेडात येत आहे.
अनैतिक संबंधाचा बोभाटा करत धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील प्रकरण सध्या परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. पती घरी नसतांना येथील महिला व एका पशुवैद्यकीय डॉक्टरास ग्रामस्थांनी २० जुलै रोजी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला. अन् या प्रकरणावर पडदा पडला.
मात्र पोलीस ठाण्यात हे प्रकरण जाण्यापूर्वी नांदेड गावी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान झालेल ‘बिहारी’ थरार दडपण्याचा पुरेपुर प्रयत्न झाला. पती घरी नसतांना सदर महिलेच्या घरात तो पशुवैद्यकीय अधिकारी शिरल्याचे परिसरातील काहींनी पाहीले. यानंतर घरात वेगळाच प्रकार सुरू असल्याचे कारण पुढे करत मोठा जमाव घरात घुसला. अनैतिक कृत्य सुरू असल्याचा आरोप करत सदर महिला व त्या ‘डॉक्टरला’ विवस्त्र अवस्थेत जमावाने घराबाहेर ओढले. भर वस्तीत दोघंाना दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले. मोठी कर्तबगारी केल्याच्या आवेशातील जमावाच्या कृत्याने येथे माणुसकी नागडी झाली.
ज्यांना लैंगिक ज्ञान नाही, अशा अल्पवयीनांना स्त्री देहाचे दर्शन घडले. या पुढाकारात कायद्याचे रक्षण करणारा पोलीस पाटीलही जमावात होत हे विशेष. पोलीस पाटलाने ठरवेल असते तर नांदेडात ‘बिहार अवतरला’ नसता. नैतिकतेचा ढोल पिटणार्यांनी अनैतिक कृत्यांना आळा बसण्यासाठी जरूर प्रयत्न करावे, मात्र या थरापर्यंत जाणे हा कुठला न्याय? असा सवाल गावातील सुज्ञ नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.
भरवस्तीत माणूसकीच्या वस्त्रहरणाचा तमाशा सुरू असतांना एकही जण त्या महिलेच्या अंगावर कापड टाकण्यासाठी पुढे आले नाही, ही माणुसकीला लाजविणारी बाब आहे. देहविक्रीचा व्यवसाय करणार्या वारांगनांही अशी वागणूक दिली जात नाही. अनैतिक कृत्याविरुध्द कारवाई करण्यात आली. मात्र या महिलेला विवस्त्र अवस्थेत गावात बांधून ठेवणार्यांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास पुढे जावून ही ‘बिहारी’ प्रथा सर्वत्र पसरल्याशिवाय राहणार नाही.
विजु भाऊ ग्रेट
मित्रा,सलाम तुमच्या पत्रकारितेला।
सद् रक्षणाय आणि खल निग्रनाय याचा अर्थपूर्ण विसर पोलीस प्रशासनाला झाला म्हणून तुम्हाला त्रास झाला।
पण आज मात्र तुम्ही आनंदी असाल कारण न्याय झाला।
आपल्या परिवाराचे आणि मित्रपरिवरचे खरच आभार।
पुढील विक्रमी पत्रकारितेस शुभेच्छा।
डॉ नितु पाटील
पत्रकारती निर्भीड असावी आणि आपल्या निर्भीडतेचा परीचय वरील प्रसंग वरून येतो आपण केलेल्या कामाची पावती उशीरा मिळाली पण त्यामूळे येका महिलेला न्याय मिळाला हा आनंद…..
अभीनंदन सर…..
Great Work Viju Bhau ……