सध्या कर्नाटकात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. अगदी खालच्या-वरच्या पातळीवर प्रचार शेअर मार्केटसारखा खाली-वर होतोय. नरेंद्र मोदी – राहूल गांधी एकमेकावर टीका करण्याची एकही संधी आणि मुद्दे सोडत नाहीय. अगदी ५६ इंच, १० मिनिट, बिना कागदाचे भाषण वैगैरे…वैगैरे मस्त जोमात सुरु आहे त्यांचे. परंतु या सर्व बंडलबाजीत उत्तर प्रदेश,राजस्थान आणि उत्तराखंडसह इतर सहा राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या पाठीवर मायेची फुंकर घालायला कुणालाही वेळ नाहीय. देशातील सहा राज्य आज नैसर्गिक आपत्तीचा सामना करताय आणि भाजपा-कॉंग्रेस आपापली उपलब्धतता जनतेला सांगताय. गावाला आग लागलीय आणि म्हणे बागों में बहार है ! च्यामारी…काय बोलावे यावर तेच उमजत नाही.
निवडणूक जिंकणारा पंतप्रधान आणि निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचे रान करणारा विरोधीपक्षाचा अध्यक्ष अशीच मी दोघांची आजच्या घडीला व्याख्या करेल. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मला सर्वात जास्त राग येतोय. यांचा प्रदेश नैसर्गिक आपत्तीच्या प्रलयाने झुंझतोय आणि हा गडी कर्नाटकात प्रचार करत फिरत होता. उत्तर प्रदेश-राजस्थानमध्ये आतापर्यंत साधारण १५० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत. तर शेकडो लोकं गंभीर जखमी आहेत. हवामान खात्याने ७ मे पर्यंत पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप होण्याची भीती व्यक्त केलीय. त्यामुळे योगी यांना कर्नाटकाची निवडणूक महत्वाची वाटूच कशी शकते?
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योगी यांनी आज राज्यात थांबून आपल्या जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांचे आपत्तीव्यस्थापनबाबत अधिकाऱ्यांना फक्त फोनवरून सूचना देणे एवढेच कर्तव्य नसते, हे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे. टीका झाल्यानंतर आता योगी कर्नाटक दौरा सोडून राज्यात परतलेय म्हणे…दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी हे दोघेही लोकसभेत उत्तर प्रदेशमधूनच निवडून जातात,तरी देखील याठिकाणी दोघांपैकी एकाही जणाने पाहणी केली नाही, हे देखील विशेषच म्हणावे लागेल.
आपल्या देशातील माणसं जनावरांप्रमाणे मरताय आणि आपल्या राजकारण्यांना निवडणूक महत्वाची वाटतेय. आजच्या घडीला समजा कर्नाटक ऐवजी उत्तर प्रदेश,राजस्थान किंवा इतर राज्यांमध्ये निवडणूक राहिली असती तर याच मंडळीने गरीबांचा इतका आव आणला असता की,विचारता सोय नाही. विरोधीपक्षाने ठा…ठा बोंबा मारल्या असत्या तर सत्ताधाऱ्यांनी करोडे अरबोची पॅकेज बिस्कीटच्या पुड्या प्रमाणे वाटली असती. पण आता याठिकाणी निवडणुका नाहीत म्हणून हाडामासाची माणसं आणि जनावरांमध्ये सध्या कुणालाही फरक दिसणार नाही.
लोकशाहीत ज्यावेळी सत्ताधारी चुकतात,त्यावेळी विरोधी पक्षाने चूक लक्षात आणून द्यायची असते आणि ज्यावेळी दोघंही चुकतात. त्यावेळी पत्रकाराने आपला बोरू घासायचा असतो. परंतु मी या तिघं आघाडीवर आजच्या घडीला भारताला कमालीचा पराभूत बघतोय. माफ करा पण कितीही नाकारले तरी आज हेच वास्तव आहे.
सूचना : मित्रहो…मी कोणत्याही पक्षाची किंवा विचारधारेचे समर्थन किंवा विरोध कधीच करीत नाही. एक पत्रकार म्हणून ज्या गोष्टी खटकतात,त्या गोष्टी बेबाकपणे मांडून मोकळा होतो. कुणाला मिरच्या लागल्या तरी मला देणे-घेणे नसते. माझी बांधिलकी माझ्या वाचकाशी आहे. कारण पत्रकाराने नि:पक्ष नव्हे तर जनपक्षीय असले पाहिजे. म्हणून जनतेच्या प्रश्नांवर कायमच लिहिण्याचा माझा आग्रह असतो. कुणाला माझे लिखाण पक्षपाती वाटत असेल तर त्याने त्याचे मत त्याच्या जवळच ठेवावे. कारण माझी नैतिकता मी जपून असल्याचे माझ्या आंतरमनाला माहित आहे.