काही जण मी इस्लामचा प्रचार करीत आहे,जगात एवढ्या निष्पाप लोकांची हत्या होत असतांना हा कोणत्या विषयावर लिहित आहे.या सारखे अनेक प्रकारच्या टीका,आरोप माझ्यावर करण्यापूर्वी स्पष्ट करू इच्छितो की, माझ्या मते जगातला कुठलाही धर्म चुकीच्या गोष्टी शिकवीत नाही.सध्या जगातील दहशतवादी घटना बघता इस्लाम आणि सर्वच मुस्लीम धर्मीयांबद्दल निर्माण झालेले गैरसमज यानिमित्ताने काही प्रमाणात का असेना दूर होऊ शकतील ही अपेक्षा ठेवूनच हे लिहिण्याचे ठरविले होते.
मित्रांनो काही दिवसांपूर्वी ‘इस्लाम खरा आणि खोटा’ वर लिहित असतांना नेट सर्चिंग करीत असतांना नौशाद उस्मान यांचा ब्लॉग पहिला या ठिकाणी कुरआन-सार वाचायला मिळाले. कुरआन हे खर्या अर्थाने परिपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक आहे.परमेश्वराने मानवी जीवनाला सर्वोच्च पद्धतीने परमेश्वराने आखून दिलेल्या चौकटीत नैतिकता आणि प्रेमाने कशाप्रकारे जगता येते याचा आदर्श मार्ग कुरआन सांगते. कुरआन-सार वाचत असतांना ज्यावेळी त्याच्या पहिल्याच खंडात प्रेषित येशू खिस्तांचा उल्लेख वाचून चकितच झालो.खंड ४ मध्ये प्रेषित येशू खिस्तांची कुमारीका आई मरियम (मेरी) यांची आई, मेरींचा जन्म, त्यानंतर येशू खिस्तांचा कुणीही पिता नसतांना असामान्य जन्म याविषयी विवेचन करण्यात आले असून यात मदर मेरी यांच्या चारित्र्यावर शिंतोळे उडविणार्यांना त्या चारित्र्यवान असल्याचे सांगून चोख उत्तर देण्यात आले आहे. तसेच प्रेषित येशू खिस्तांचा उल्लेख कुराणात चोविसपेक्षा जास्त ठिकाणी आढळतो. यानिमित्ताने दुसर्या धर्मातील देवतांबद्दलचा आदर देखील कुरआनमध्ये आपणास दिसून येतो.यावरून लादेन असो कि अन्य कुणी कथित मुस्लीम ठेकेदारांची ख्रिस्ती धर्माबद्दलची कट्टरता किती निरर्थक आणि इस्लाम विरोधी आहे हेच सिद्ध होते. ईश्वरी प्रेमापोटी आपल्या नातेवाईकांची, गोरगरिबांची, अनाथांची, प्रवाशांची मदत करणे आणि पददलितांच्या मूक्तीसाठी मदत करणे जास्त पुण्याईचे काम असल्याचा संदेश देखील इस्लाम देतो.पवित्र कुरआन हा ग्रंथ समस्त मानव जातीकरिता असून तो कुठल्याही एका समुदायापुरता मर्यादित नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आज आपण सर्वत्र भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे हे उघड डोळ्यांनी पाहत आहे.त्याच भ्रष्टाचाराबद्दल साधारण १४००वर्षापूर्वीच कुरआनमध्ये लिहिलेले असल्याचे पाहून माणूस थक्कच होतो. भ्रष्टाचार करून किवा अधिकार्यांना लाच देऊन एकमेकांचा माल हराम पद्धतीने बळकावण्यास तीव्र शब्दात मनाई करण्यात आली आहे. जगात आज इस्लामच्या नावाखाली दहशदवाद माजविणारे खरे इस्लामचे दुश्मन असल्याचे देखील यावेळी आपल्याला कळते. कारण कुरआननुसार अल्लाह (परमेश्वर)अतिरेक्यांना पसंत करीत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून हिंसा वाईट असली तरीही मात्र आंतक हा हिंसेपेक्षा जास्त वाईट असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे गैर इस्लामिक असल्याच्या कारणावरून आज हजारो,लाखो निर्दोष लोकांची इस्लामच्या नावाखाली हत्या करणार्या दहशतवाद्यांना कुरआनमध्ये स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, कुराण कोण्या एका समुदायाची मिरासदारी नसून तो समस्त जगतवासियांकरिता आहे. फक्त अरबी किंवा उर्दू बोलणार्यांसाठी नव्हे तर मराठी, इंग्रजी, जापानी सगळ्या भाषा बोलणार्यांंकरिता हा उपदेश आहे आणि सर्वांना त्याचा परिचय करून देण्याची जबाबदारी मुसलमानांची आहे, ती त्यांनी पार पाडायला हवी असे सांगण्यात आले आहे. मात्र,दुर्दैवाने या दहशदवाद्यांनी कोणते कुरआन वाचले आहे हे त्यांनाच माहित.
मानवाची निर्मिती, त्याला भाषेवर दिलेलं प्रभुत्त्व, धरती-आकाशातले चंद्र, ग्रह, तारे सर्व एका नियमानुसार शिस्तीने आपापल्या कक्षेत फिरत आहेत, विश्व हे संतुलित बनविण्यात आले आहे. लोकांनीही संतुलन राखावं अशी इथे अप्रत्यक्षपणे अपेक्षा कुरआनमध्ये व्यक्त केली गेली आहे.म्हणूनच मग सामाजिक संतुलन बिघडवणारे हे काफिर नाही तर कोण आहेत असा प्रश्न स्वाभाविक उपस्थित होतो.आज जगात मुस्लीम वस्त्या जवळपास सर्वच ठिकाणी वेगळे राहत असल्याचे आपल्या निदर्शनास येते,अर्थात काही तथाकथित कट्टर मुस्लीम धर्मगुरु यांनी मुसलमान हा इतरांपासून वेगळा असल्याचे सांगून इस्लामच्या नावावर त्यांच्या मनात काही चुकीच्या गोष्टी बिंबवून त्यांना इतर धर्माच्या लोकांपासून अप्रत्यक्षरित्या वेगळे राहण्यापासून किवा अंतर ठेवण्यास भाग पाडतात.परंतु सर्वसाधारण चांगल्या मनाच्या मुस्लीमेतरांशी सदाचाराने वागण्याची तसेच त्यांच्याशी बंधुभावाचे संबंध बनविण्याची कोणतीही मनाई इस्लाममध्ये करण्यात आलेली नसल्याचेदेखील आपल्याला कुरआन-सारमध्ये वाचण्यास मिळते.
संक्षिप्त कुरआन सार वाचण्यासाठी नौशाद उस्मान यांच्या ब्लॉगची लिंक
(https://naushadusman.wordpress.com/2013/05/22/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%96/)