मित्र…या एका शब्दातच विस्तृत विद्यापीठाची क्षमता आहे. साधारण लहानपणा पासून प्रत्येक माणसाला मैत्री नावाचं सुंदर व्यसन जडतेच. प्रत्येक व्यक्ती त्यामुळे चार टाळक्यांमध्येच वावरत असतो. कदाचित एकट्यात जिव घुसमटायची भीती प्रत्येकाला वाटतं असावी. मित्रांचा गोतावळा हा प्रत्येक व्यक्तीचा जगण्याचा मूळ आधार असतो. अशा जिवलग मित्रांमुळेच प्रत्येकाच्या जीवनाला आकार देखील मिळतो. नाद,नाद असतो का रे मैत्रीचा? असे मला जर कुणी विचारले…तर माझे उत्तर हो असेल, एवढेच नव्हे हा नाद कधी-कधी भलताच खुळा देखील असतो. असाच मैत्रीचा खुळा नाद जोपासणारा ‘धरणगाव नाईट ग्रुप’ नावाचा अवलिया दोस्तांचा एक गोतावळा आहे. आपल्याला वाटेल की, अवलिया म्हणजे जरा हटके माणसं असतील. परंतु तसं काही नाहीय, तुमच्या माझ्या सारखीच मनाने निखळ,प्रेमळ माणसं आहेत.दिवसभर जबाबदारीच्या ओझ्याखाली जगणारा प्रत्येकजण ‘नाईट ग्रुप’च्या माध्यमातून स्वतःसाठी वेळ काढतो आणि काही तासांसाठी का असेना जीवनातले सर्व दु:ख विसरतो. त्यामुळे या ग्रुपमधील प्रत्येक सभासद माझ्या मते आनंदयात्री ठरतो.
मित्रांचा ग्रुप म्हटला की,साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर कॉलेजचा कट्टा येतो. कॉलेजमध्ये दिवसाकुठे तरी एकत्र जमलेले मित्र धमाल मस्ती, असं प्रथमदर्शी वाटणे देखील स्वाभाविक आहे. त्यामुळे या मित्रांचा कट्टा दिवसा कुठे तरी बहरत असेल असा साधारण आपण अंदाज बांधला असेल. तर तुमचा अंदाज साफ चुकीचा आहे. कारण मित्रांचा हा गुलदस्ता रात्रीच बहरतो, रात्री म्हणजे तो देखील १० वाजेनंतरच… या ग्रुपमध्ये सर्वात लहान वयाचा सभासद वीस वर्षाचा तर सर्वात मोठे वयाचे सभासद हे सत्तरी पार केलेले आहेत. त्यामुळे आपण अंदाज बांधू शकतात की, या ग्रुपमध्ये तारुण्याच्या अल्हडपणा पासून तर जीवनाच्या साराची प्रगल्भता देखील असेल. ‘धरणगाव नाईट ग्रुप’चे अनेक वैशिष्ट आहेत. तुम्ही एकदा का या ग्रुपचे सदस्य झालेत की, तुम्ही दिवसभर कुठेही रहा मात्र, रात्री प्रत्येक सभासदाला हजेरी लावणे बंधनकारकच आहे. दोन-तीन दिवस दांडी मारली तर तुमची खैर नाही, मध्यरात्री तुमच्याकडे हे मित्र कधी हल्लाबोल करतील याचा नेम नाही. रात्री दहानंतर सुरु होणारी मैफिल साधारण पहाटे ५ वाजेपर्यंत चालते. किमान तीन वाजेच्या अधी तर सुटका नाहीच. चहावर चहा आणि बिडीकाडीवर ‘माताचा जगराता’ चालवा तशी मैफील रंगत जाते.
या ग्रुपचे अध्यक्ष चुडामण पाटील काका हे आहेत. मित्रांची मैफिल कोट बाजारावरील यांच्याच पान टपरीजवळ जमते. विशेष म्हणजे चुडामण काकांनी वयाची सत्तरी केव्हाच पार केलेली असली तरी त्यांचा उत्साह एखादं तरुण पोराला देखील लाजवणारा आहे. कोण आला किंवा कोण किती दिवसापासून आला नाही? याचा सर्व लेखाजोखा चुडामण काकांकडे असतो. त्यामुळे कुणीही अमुक-ढमुक दिवशी आलो होतो,अशी खोटी सबब सांगून आपल्या दांड्या लपवू शकत नाही. या ग्रुपमध्ये प्रत्येक जाती-धर्माचा माणूस असून सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते सभासद आहेत. या ग्रुपमध्ये सोन्या-चांदीचा मोठ्या व्यापाऱ्यापासून तर हातावर पोट भरणारा माणूस देखील सभासद आहे. या ग्रुपमध्ये सभासद होण्यासाठी कुठलेही नियम नाहीत, मात्र ‘जागरण’ हा मुख्य निकष पक्का आहे. आणि हो…एकदा ग्रुपचे सदस्य झाले तर मात्र बाहेर देखील पडता येत नाही. रोज रात्री किमान बारा ते एक वाजेपर्यंत थांबणे बंधनकारकच आहे. तीन-चार दिवसापेक्षा जास्त गैरहजेरीला कुठलीही सबब लागू नाही. तरी देखील तुम्ही दांडी मारली,तर मात्र सर्व मित्र मध्यरात्री तुमच्या घरी येतील. बरं एखादं दुसरा व्यक्ती मध्यरात्री घरी आला तर समजू शकतो.परंतु पन्नास साठ लोकांची टोळीच घरी आली तर आपल्या घरच्यांसोबत संपूर्ण गल्ली जागी होते. त्यामुळे सदस्य गपचूप हजेरी लावण्यातच धन्यता मानतात. या ग्रुपचे काही सदस्य हे साधारण आपल्या ड्युटीवरुन पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास जळगावहून धरणगावात पोहचतात,ते देखील आठवड्यातून चार-पाच दिवस कोट बाजारावर ग्रुपमध्ये हजेरी मारायला येतात. यावरून आपण अंदाज बांधू शकतात की, नियम म्हणजे नियम आणि चुकीला याठिकाणी माफी नाहीच.
‘धरणगाव नाईट ग्रुप’ मागील वर्षी धरणगावातील सांस्कृतिक ठेवा समजला जाणारा वाहन उत्सवात देखील सहभागी झाला होता. या ग्रुपने घेतलेले वाहणाच्या दिवशी अवघं धरणगाव लोटलं होतं. या ग्रुपमार्फत गावातील प्रत्येक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीचा वाढदिवस केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो. आठवड्यातून किमान सहा दिवस कोट बाजारावर वाढदिवसच साजरे होत असतात. बरं याठिकाणी होणाऱ्या थट्टा मस्करीला तर तोडच नाही. हसून-हसून माणूस लोटपोट होईस्तर याठिकाणी धमाल चालते. तर धरणगावात कोणत्याही कान्याकोपऱ्यात काहीही घडले तर या ग्रुपचे सदस्य मदतीसाठी रात्री-अपरात्री मदतीसाठी देखील उपलब्ध असतातच. त्यामुळेच अनेकांना अडचणीच्या काळात ‘धरणगाव नाईट ग्रुप’ कडून वैद्यकीय मदत देखील झाली आहे. दीपक वाघमारे,राजूशेठ ओस्तवाल, पप्पू भावे, धीरेंद्र पुर्भे, समीर भाटीया, आबा वाघ, ईश्वर सोनार, रवी महाजन,भरत चौधरी, आनंद पेहलवान,योगेश वाघ,जेष्ठ पत्रकार कडू महाजन, मंगल भाटीया,कल्पेश महाजन,श्रेयस भाटीया,शरद बन्सी,संजय चौधरी,निजामुद्दीन सर,सीताराम मराठे, ही मंडळी या ग्रुपचे पिलर असून यांच्यासह अनेक जण या ग्रुपचे सदस्य आहेत.
सुख ही दुहेरी संकल्पना आहे. सुख कशात मानायचे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. जगणे म्हणजे स्वत:ला घडविण्याची प्रक्रिया आहे आणि नेमकी हीच प्रक्रिया याठिकाणी सुरु असते. मित्रांचे प्रेम आणि आधाराच्या बळावर या ग्रुपचा प्रत्येक सदस्य स्वत:त चुकीचे बदल होऊ देत नाही. चांगुलपणा हा जगण्याचा मूळ आधार असून त्याचाच अंगीकार प्रत्येक सदस्य करण्याचा प्रयत्न याठिकाणी करत असतो. समाजाला उपयोगी पडण्याचे कार्य या ग्रुपमधील प्रत्येक सदस्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. असं म्हणतात समाजासाठी काहीतरी केल्याचा आनंद जगण्याची उमेद दुपटीने वाढवित असतो. आजच्या काळात सुख आणि आनंदाची व्याख्या बदलली आहे. प्रत्येकाने समोरच्याला आनंद वाटला व स्वतःही लुटला पाहिजे तेच खरे जीवनाचे सत्व आहे. ‘धरणगाव नाईट ग्रुप’ अशाच व्याखेत बसतो,म्हणूनच या ग्रुपला मी अवलिया मित्रांचा गोतावळा मानतो. एक छोटे उदाहरण देतो, धरणगाव भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांचा नुकताच वाढदिवस नाईट ग्रुपतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी दोन वाजंत्रीवाले कुणाचा तरी कार्यक्रम आटोपून चहा पिण्यासाठी कोट बाजारावर आले होते. त्यावेळी ग्रुपमधील काही सदस्यांनी त्यांना तत्काळ पैसे देत वाजविण्यास सांगितले, आणि मग काय धमाल झाली आपणच खालील व्हिडीओमध्ये एकदा बघाच. विशेष म्हणजे वाढदिवस भाजपच्या व्यक्तीचा आणि वाजंत्री लावून नाचताय राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, यालाच म्हणतात, खऱ्या दोस्तीची दुनियादारी…! म्हणून ‘धरणगाव नाईट ग्रुप’चे कौतुक करावे तेवढे कमी, या अवलिया दोस्तांच्या गोतावळ्याला खरचं मनापासून सलाम !
मैत्री ची व्याख्या नसते, मैत्री मध्ये रितीरिवाज बंधने नसतात. म्हणून च महान असते. आपण उत्कृष्ट शब्द चित्र उभे केले. छान आवडले
जबराट विजय भाऊ
दिल दोस्ती…
लई भारी