या देशातील करंट्या मानसिकतेने पुन्हा एका तरुणाचा निष्ठुर बळी घेतलाय. दिल्लीतील खयाला भागात राहणाऱ्या अंकित सक्सेनाचा आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून धारदार सुऱ्याने गळा चिरून झालेल्या हत्येने देश हादरून गेलाय. ज्या भारतीय समाजात प्रेमाविरुद्ध शेकडो तर्क आहेत,त्या समाजाला अंकितच्या हत्येचे कोणतेही दु:ख नाही. आता फक्त राजकीय फायदा कसा उचलता येईल याचीच संधी सर्वजण शोधताय. जगाच्या इतिहासाला ‘प्रेम आणि द्वेषा’चा अध्याय नवीन नाही. तारुण्याला फक्त प्रेमाची भाषा कळते. इतिहास उघडून बघितला तर लक्षात येईल की, निष्ठुर समाजाने भाषा,उच-नीच,पैसा, जात-धर्माच्या कितीही भिंती उभ्यारल्या तरी आजतागायत प्रेमाला संपवू शकले नाहीत. जाती-धर्माच्या नावाखाली किती बळी घेणार तुम्ही…तुमच्या तलवारी बोथट होतील परंतु प्रेम मरणार नाही, हे कितीदा सिद्ध करावे लागेल. प्रेम बहरते…प्रेम बहरले…प्रेम बहरणार अन् बहरतच राहणार. प्रेम करणाऱ्यांचे फक्त नाव बदलेल मात्र प्रेम तेच राहील, प्रेम अमर राहील, अंकित प्रमाणे !
अनेक जण आपली प्रतिमा जपण्यासाठी आंतरधर्मीय प्रेम-लग्न अशा मुद्द्यावर लिहायचे टाळतात किंवा अनेकांच्या लेखण्या धार्मिक विकृतीतून कागदं काळे करायला लागतात. काही जण मुलाची किंवा मुलीचा धर्म पाहून लिहायचं की नाही ते ठरवत असतात. खरं म्हणजे आजच्या निर्लज्ज समाजासमोर लिहिणे म्हणजे हजेरी लावण्याच्या पलीकडे फार काही जास्त नसतं. कारण काही बिनडोक लिहिणाऱ्याला पटकन कोणत्यातरी विचारसरणीला बांधून मोकळे व्हायला डूक धरून बसलेलेच असतात. हा धोका मलाही माहित आहेच. ‘प्रेम आणि द्वेषाची’ ची लढाई चंद्र-मंगळावर पोहोचण्याच्या युगातही सुरु आहे. म्हणून स्वतःला म्हटले की, एक सामान्य भारतीय म्हणून मी आज व्यक्त नाही झालो तर कदाचित उद्या स्वतःला आरशात बघतांना लाज वाटेल. म्हणून म्हटलं हरामखोरा लिही…तू काहीतरी लिही!
अंकितचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या शेहजादी नामक मुलीसोबत मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. शेहजादीच्या आईवडिलांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी अंकितची हत्या केली. कहाणी तशी नेहमीच्या पठडीतली, प्रत्येक गावात,गल्लीत आपल्याला असं निष्पाप प्रेम हमखास बघायला मिळतं. फरक एवढाच असतो की, प्रत्येक प्रेम पूर्णत्वाला जाणारच याची अपेक्षा फार कमीजण ठेवून असतात. कारण आजही आपल्या देशात बंडाशिवाय प्रेम शक्यच नसतं. आजच्या आधुनिक युगातही आपल्या प्रेमाची दुनिया सजवण्यासाठी जोडप्यांना पळ काढावा लागतोय आणि त्याचं मागे नातेवाईक,समाज जात आणि धर्माच्या तलवारी घेऊन पळताय. अंकित आणि शेहजादी हे जोडपे पण अशाच धार्मिक विकृतीचा सामना करीत होते. दोघांचं प्रेम हे जाती-धर्माच्या पलीकडचं होतं. अंकितचा खून आपल्याच आई-वडिलांनी केला, हे माहित पडल्यावर आज शेहजादीच्या मनाची काय अवस्था असेल याचा नुसता विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो. पण धर्माच्या ठेकेदारांना खरं प्रेम कधी दिसलयं ना कधी दिसणार. त्यांना फक्त दिसते आपली बेगडी प्रतिष्ठा. या बेगड्या प्रतिष्ठेसाठी आपण पशु बनत एका हाडामासाच्या अल्ल्हड तारुण्यात असलेल्या पोराचं रक्त सांडतोय याचे सुद्धा भान त्यांना राहत नाही.
बालपणीची मैत्री,प्रेमात बदलली.लहानचे मोठे होई पर्यंत त्यांना कुणीच जात-धर्म सांगितली नाही.एकदिवस अचानक मात्र, दोघांना धर्म समजावून सांगितला जातो. परंतु धर्माच्या ठेकेदारांना कोण सांगेल आजची पिढी प्रेमात विश्वास ठेवते, तुमच्या धार्मिक द्वेषावर नाही. सांगितले जाते की, शेहजादी आपले घर सोडून निघून गेली होती. तिला भेटण्यासाठी अंकित मेट्रो स्थानकाकडे जात असताना वाटेतच त्याला भर रस्त्यात मारण्यात आलं. दुसरीकडे शेहजादी आपल्या प्रेमाची स्वप्न रंगवत मेट्रोस्थानकावर अंकितची वाट बघत उभी होती. अंकित तर पोहचत नाही परंतु त्याच्या मृत्यूची खबर मात्र तिला मिळते. पहिल्या क्षणाला तर तिच्या मनात मेट्रोखाली उडी मारून जीव द्यावा असचं वाटले असेल. परंतु प्रेम केलय ना…एवढ्या लवकर कसा छळ संपणार. माझ्या अंकितला कुणी आणि का मारलं असेल ? हा प्रश्न मनात हुंदके देत असतांना आपल्याच जन्मदात्यांनी त्याचा गळा चिरला हे समजल्यानंतर तर शेहजादीने मनातून एक मोठी हाय काढत नि:शब्दच झाली असेल. ती आता जगेलही पण जिवंत प्रेता प्रमाणे. एक बाहुली जी…हसतांना दिसेल पण बोलणार नाही…कदाचित ती बोलेलही पण फक्त अंकित…अंकित…अंकित !
या प्रेम कहाणीत अनेकांना अंकित हिंदू तर त्याची प्रेयसी मुस्लीम असंच दिसेल. या दोघांमध्ये त्यांना लहान भाऊ,बहिण किंवा आपला मुलगा,मुलगी दिसणार नाही. आपल्या समाजात द्वेष एवढा वाढलाय की, अंकित-शेहजादीचे प्रेम कुणालाही दिसणार नाही आणि दिसलेच तर भावना व्यक्त करणार नाही. आजच्या धार्मिक द्वेषाच्या वातावरणाने सर्वांनाच कमजोर करून टाकलेय. फार कमी माणसं ज्यांना आपल्या कमजोरीच्या विरुद्ध लढणे शक्य होते.आपण आपल्या मनात द्वेषाची इतक्या भिंती उभारून ठेवल्यात की,त्याच्या आड असणारे समता,बंधुत्व आणि प्रेम आपल्याला दिसेनासे झाले आहे. द्वेषाच्या भिंती पाडता-पाडता आपण न कळत कधी धर्माचे ठेकेदार आणि मग खुनी होतो,हे आपल्याला देखील कळत नाही. प्रेमी युगलाच्या नावापुढे हिंदू-मुस्लीम किंवा दलित लावा काही फरक पडत नाही. कारण यामुळे कोणत्याही आॅनर किलिंगच्या प्रकरणात समाजाच्या मनातील हिंसा कुणीही नाकारू शकत नाही. यानिमित्ताने पुन्हा एकदा खोट्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी रक्त सांडणाऱ्यानी डोके वर काढले आहे.
आपण कोणत्या युगात राहत आहोत. एक व्यक्ती स्वत:च्या पसंतीच्या व्यक्तीशी प्रेम व लग्न करू शकत नाही. ‘सैराट’ सारखा प्रकार फक्त महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नव्हे तर देशाच्या राजधानीत सुद्धा घडतोय हे किती लाजीरवाणे आहे. आपल्या देशाची राजधानी दिल्ली,ज्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि मानसिक स्तरावर आपला भारतीय समाज किती उंचावला आहे, हे आपण जगातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दाखवीत असतो. त्याच दिल्लीत निर्भया, अंकितची हत्या शारीरिक, मानसिक आणि धार्मिक विकृतीतून हत्या होते,हे एक भारतीय म्हणून प्रत्येकासाठी शरमेची बाब आहे.
या भारतातील तरुणाईला थोडं स्वातंत्र्य द्या, आम्हाला या देशात प्रेम आणि फक्त प्रेमच बघायचंय. बस झालं जाती-धर्माच्या नावाखाली प्रेमाचा बळी घेणं. किती बळी घेणार तुम्ही…तुमच्या तलवारी बोथट होतील. परंतु प्रेम मरणार नाही,कारण अंकित हे नाव नाही तर एक विचार आहे आणि विचार कधी मरत नाही, प्रेमाचा विचार अमर असतो. खरं म्हणजे प्रेमाची भाषाच वेगळी असते. यात ज्याला तुम्ही हारलेले समजतात,खऱ्या अर्थाने तोच जिंकलेला असतो, म्हणून आजही मारेकरी नव्हे अंकितच जिंकलाय!