उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचे फायरब्रांड नेते आणि कट्टर हिंदुत्ववादी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज त्यांचा शपथविधी मोठया उत्साहात मुहूर्तावर पार पडला.परंतु योगींचा स्वभाव बघता ते कधी ‘हटयोगी’बनतील याचा नेम नाही.राममंदिर किंवा अन्य मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले किंवा भूमिका घेतली तर मात्र भाजपची भविष्यात डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपने उत्तर प्रदेशमध्ये सुरुवातीपासूनच हिंदुत्वाचे कार्ड चालविले होते.म्हणूनच भाजपकडून विधानसभेसाठी एकही मुस्लीम उमेदवार देण्यात आला नव्हता.भाजपच्या विजयाची अनेक कारणे आहेत.त्यात प्रामुख्याने राम मंदिर आणि हिंदुत्व या दोन गोष्टींचा समावेश आहे.तशात अत्यंत आक्रमक आणि आपल्या कट्टर हिंदुत्ववादी वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले योगी आदित्यनाथ आता पुर्ण बहूमत असलेल्या बड्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.त्यामुळे त्यांना राम मंदिराच्या बाबतीत कुठलीही सबब देवून चालणार नाही.अशा भक्कम स्थितीत त्यांच्या कार्यकाळात जर राम मंदिर नाही झाले तर पुन्हा कधी होणार नाही,याची जाणीव भाजपच्या वरिष्ठांना आहे.त्यामुळेच २०१९ लोकसभेची तयारी म्हणून योगींना मुख्यमंत्रीपद दिल्याची चर्चा आहे.फक्त आता आदित्यनाथ यांनी वादग्रस्त विधाने करू नये, त्यामुळे राज्यात अराजकता निर्माण होऊ शकते. आता वादग्रस्त विधाने करून कामे होणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत विकासाची दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहेत.भाजपच्या केंद्रातील नेत्यानांही आदित्यनाथ यांना तुम्ही देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहात याची जाणीव करून देत वादग्रस्त विधाने करून राज्यातील वातावरण दूषित होणार नाही याची काळजी घेण्याचा सक्त सूचना देण्याची गरज आहे.त्यांनी आता केवळ विकासाचीच भाषा बोलली पाहिजे,कारण मुस्लीम महिला मतदार भाजपला मतदान करतील ही अशक्य वाटणारी गोष्ट पंतप्रधान मोदींनी शक्य करून दाखविली आहे.आपल्या कडव्या आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे योगी आदित्यनाथ सातत्याने चर्चेत राहिले आहेत. 2005 मध्ये ख्रिश्चनांना ‘शुद्धिकरण’ करून हिंदू धर्मात प्रवेश देण्याच्या त्यांच्या कृतीमुळे योगी आदित्यनाथ देशभर चर्चेत आले. ‘जे योगाला विरोध करतात, त्यांनी देशातून चालते व्हावे,’बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान याची तुलना पाकिस्तानी दहशतवादी हफिज सईदशी करणे अशा अनेक मुद्द्यांमुळे योगी आदित्यनाथ देशभरात हिंदुत्ववाद्यांमध्ये लोकप्रिय तर समाजवादी आणि पुरोगाम्यांमध्ये तेवढेच नापसंत केले जातात.
योगी आदित्यनाथांची वादग्रस्त व्यक्तव्ये
१) जून 2016: अयोध्येतील विवादित इमारत पडण्यापासून कुणी थांबवू शकले नाही तर,राम मंदिर बांधण्यापासून कोण थांबवेल.
२) ऑक्टोबर 2016: मूर्ति विसर्जन पासून होणारे प्रदूषण दिसते.परंतु बकरीईदच्या दिवशी हजारो निष्पाप पशु कापले जातात,त्यांचे रक्त गंगामध्ये मिळते,हे प्रदूषण नाही का?
३) जून 2015: “जे लोक योगला विरोध करतात त्यांना भारत सोडून जायला हवे आणि ज लोक सूर्य नमस्कारला मानत नाही त्यांनी समुद्रात डुबून जायला हवे.
४)ऑगस्ट 2015: “मुस्लिमांची लोकसंख्या गतीने वाढणे हे धोक्याचे चिन्ह आहे.हा एक चिंतेचा विषय असून याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने बघत मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
५ ) फेब्रुवारी 2015: “परवानगी भेटली तर देशातील सर्व मस्जिदिंमध्ये गौरी-गणेशची मूर्ति स्थापित करेल.आर्यावर्त ने आर्य बनविले,हिंदुस्तानमध्ये आम्ही हिंदू बनवू.संपूर्ण जगात भगवा झंडा फडकवू. मक्केत ग़ैर मुस्लिम नाही जावू शकत,वैटिकनमध्ये ग़ैर ईसाई नाही जावू शकत.मात्र आमच्याकडे कुणीपण येवू शकते.
६ ) ऑगस्ट 2014: लव जेहाद’ संबंधी योगींचा एक व्हीडीओ समोर आला होता.त्यात योगी आपल्या समर्थकांना सांगताना दिसत होते की,ते एक हिंदू मुलीचा धर्म परिवर्तन करतील तर आपण 100 मुस्लिम मुलींचे धर्म परिवर्तन करू.मात्र नंतर योगी यांनी या व्हीडीओबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.
योगी आणि वाद
उत्तर प्रदेशच्या निवडणूकीची धामधूम सुरु झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांचे समर्थक त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रचार करीत होते.त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना काही दिवस प्रचारापासून बाजूला ठेवले होते.परंतु काही दिवसातच नरेंद्र मोदी और अमित शाह नंतर योगी आदित्यनाथ स्टार प्रचारक म्हणून समोर आले होते.परंतु याच दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या हिन्दू युवा वाहिनीने ६ जागेंवर भाजपच्या उमेदवारांविरूढ उमेदवार घोषित केले होते.याआधीच्या विधानसभेच्या वेळीदेखील त्यांनी तब्बल १०० जागेंवर आपल्या समर्थकांची उमेदवारी जाहीर केली होती.यामुळे त्यांचे भाजपासोबतचे मतभेद नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्यावरील गुन्हे
योगी आदित्यनाथ यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्यात हत्येचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे.लोकसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार योगी आदित्यनाथ यांच्यावर गोरखपुर आणि महाराजगंजमध्येच तब्बल १२ ते १३ गुन्हे दाखल आहेत.
योगी यांच्याविरुद्ध सर्वाधिक गुन्हे धार्मिक आणि जातीयवादशी निगडीत आहेत.त्यांच्याविरुद्ध धर्म, जाती,जन्मस्थळ,निवास, भाषा आदि आधाराव वेगवेगळ्या समुदायात मतभेद निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा बिगडविण्याचा आरोप आहे.त्याच्याविरुद्ध भादवि कलम 153 अ नुसार दोन गुन्हे आहेत.याच्या व्यतिरिक्त योगी यांच्याविरुद्ध धार्मिक स्थळांना अपमानित करण्याचा भादवि कलम 295 नुसार दोन गुन्हे आहेत.योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध शेतीयुक्त जमिनीला विस्फोटक पदार्थांचा वापर करून नुकसान केल्याचा देखील आरोप आहे.एवढेच नव्हे त्यांच्या विरुद्ध धमकी देणे तसेच हत्येचा प्रयत्न केल्याचा देखील खटला सुरु आहे.
योगी आदित्यनाथ यांच्यावर भादवि कलम 147 नुसार दंगे संबंधी 3 आरोप आहेत.त्याच प्रमाणे त्यांच्याविरुद्ध भादवि कलम 297 नुसार कब्रस्थानमध्ये जबरदस्तीने घुसल्याचे दोन गुन्हे आहेत.मुद्दाम शांतीभंग केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे.योगी आदित्यनाथ यांना गोरखपुर दंग्यांच्या दरम्यान अटक करण्यात आली होती.दंग्यांमध्ये एक तरुणाच्या मृत्यू नंतर प्रशासनाच्या परवानगी शिवाय योगी यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात श्रद्धान्जली सभा घेतली होती.त्यावेळी त्यांच्यासह सहकाऱ्यांवर भादवि कलम 151A, 146, 147, 279, 506 नुसार गुन्हे दाखल करत अटक करण्यात आले होते.याच दरम्यान,त्यांची संघटना हिन्दू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोरखपुर गोदान एक्सप्रेसच्या काही डब्ब्यांना आग लावली होती.यानंतर योगी हे ११ दिवस जेलमध्ये होते.लोकसभेच्या अधिवेशनाच्या काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्यावर विविध आरोप लावले होते.यासंबंधी माहिती देतांना त्यांना सभागृहात रडू कोसळले होते.
योगी आदित्यनाथ यांचा स्थायी स्वभाव हा कट्टर हिंदुत्ववादी आक्रमक नेत्याचा आहे.त्यामुळे ते किती दिवस संयम ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.योगी आज मुख्यमंत्री झाले आहेत.त्यामुळे त्यांच्या एक वादग्रस्त व्यक्तव्याने आता थेट दिल्ली हादरेल.याची काळजी त्यांनी स्वतः आणि भाजपा श्रेष्ठींनी घेणे गरजेचे आहे.अन्यथा हा ‘हटयोगी’ भाजपची भविष्यात डोकेदुखी वाढवणार हे निश्चित आहे.