महापालिका व जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची तारीख अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर ही सर्वात मोठी आणि मिनी मंत्रालयाची निवडणूक मानली जाते.सध्या सत्तेत असलेले शिवसेना-भाजपात कोण पहिले ‘आय लव यु’ म्हणेल यावरून रुसवा-फुगवा असल्याचे महाराष्ट्राला दाखविले जात आहे.मात्र,या दोघांनी स्वबळावर लढण्याची तयारी आधीपासूनच केली आहे.फक्त समोरच्याला आपण काय भारी झुलवतोय अशी खोटी फुशारकी दोघांना वाटत आहे.त्यामुळे त्यांचा ‘आय लव यु’वाला प्यार निकालापर्यंत तूर्त ब्रेक घेईल.
शिवसेना भाजपा युतीचा राज्यातील संसार बहरत नाही तोच नजर लागल्या सारखी स्थिती आहे.पण ज्याप्रकारे कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेत अगदी युती तुटते की काय, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली तशीच किंबहुना त्यापेक्षा अधिक खराब परिस्थिती सध्या निर्माण झाली किंवा करण्यात आली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.गतवेळासारखे दोघं पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर मतदारदेखील त्यांच्या भांडणात रस घेवू लागले आहे.म्हणूनच मग हे खरे भांडण आहे की, रणनिती आहे, अशी शंका येते. सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी तर शिवसेना-भाजपमध्ये युती झाल्यास निवडणूक अटीतटीची होणार असे चित्र होते.परंतु केंद्र व राज्यातील सत्तेमुळे शिवसेना-भाजपामध्ये इच्छुकांची संख्या जास्त राहणार त्यामुळे बंडखोरीचा देखील आपल्यालाच सर्वाधिक सामना करावा लागेल,हे सेना-भाजपचे नेते ओळखून होते.तसेच काही ठिकाणी या दोन्ही पक्षांमध्ये अनेक स्थानिक बड्या नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे त्यांची स्थिती मजबूत झालेली आहे.तसे सेना-भाजपला गृहीत होते त्यामुळेच निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच दोघ पक्षांनी स्वबळाची तयारी करून ठेवलेली होती.परंतु युती तोडण्याचे पातक दोघांपैकी कोणीही घेण्यासाठी तयार नव्हते.कारण मुंबईतील हिंदुत्ववादी मते फुटण्याचा धोका तसेच सत्तेची मस्ती डोक्यात गेल्याची प्रतिमा तयार केली जाण्याची भीती.त्यामुळे तू पहिले ‘आय लव यु’ बोल असा हट्ट दोघांकडून धरला जाणे अपेक्षित होते.परंतु सुरुवातीला दोघांपैकी कोणीच ‘आय लव यु’ बोलणार नाही हे देखील तेवढेच खरे आहे.फक्त कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा टशन निर्माण करून आणि आपल्या जागा कशा वाढवता येतील सध्या हाच कार्यक्रम सुरु आहे.निवडणुकीनंतर मात्र हे चित्र पलटेल आणि ‘आय लव यु’ सोडा पण आधी कोण चुंबन घेते याची जणू स्पर्धाच लागेल.
फडणवीस जोमात…!
पालिका निवडणुकीत मिळालेले यश हे सध्या तरी मुख्यमंत्र्यांच्या पारड्यात पडले असल्याचे चित्र आहे.परंतु त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यासाठी या निवडणुका त्यांच्यासाठी फार महत्वपूर्ण आहेत.महाराष्ट्राचे मिनी मंत्रालय म्हटल्या जाणाऱ्या जि.पं.निवडणूक तसेच राज्यासाठी सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणुकीत शहरी भागातील मतदारांचा कौल मिळाला तर फडणवीसांच्या नेतृत्वाला झळाळी येईल व त्यांची खुर्ची अधिक मजबूत होईल.त्याचबरोबर त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणखीच मागे पडतील.मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले पंकजा मुंडें आणि रावसाहेब दानवेंचा आपापल्या जिल्ह्यात झालेला पराभव हा त्यांना विचार करायला लावणारा आहे.तर दुसरीकडे पालिका निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियातून केलेले कौतुक फडणवीसांचे मनोबल वाढविणारे असले तरी नोटबंदीच्या उत्तरार्धात शेतकरी व सर्व सामन्यांना झालेला त्रासाचा राग लोकांच्या मनातून काढावा लागेल.तसेच ग्रामीण भागात मराठा मोर्चाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.तूर्त पालिका निवडणुकीच्या निकालामुळे फडणवीस जोमात आहे,हे देखील तेवढेच खरे !
शिवसेना सत्तेत की विरोधात?
राज्याच्या सध्या भाजपा सोबत शिवसेना देखील सत्तेत आहे.परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तुलनेत फडणवीस सरकारवर शिवसेना मोठा अंकुश ठेवून आहे.त्यामुळे शिवसेना सत्ताधारी तसेच विरोधी पक्षही असल्याचे वेळोवेळी जाणवते.त्यामुळे राज्यातील जनताही बऱ्याचदा बुचकळ्यात पडते.दुसरीकडे शिवसेना-भाजपच्या वादामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला गोड वाटत असेल.आपले काम त्यांच्याच भाऊबंदकीतला करतोय याचेच त्यांना जास्त सुख आहे.परंतु यामुळे त्यांच्यातील विरोधक मरत आहे,याची जाणीव त्यांना नाही.जो पर्यंत तुम्ही विरोधक म्हणून आपले काम दाखवीत नाही,तो पर्यंत जनता तुम्हाला सत्तेची संधी देत नाही हे काँग्रेस-राष्ट्रवादीने लक्षात घेतले पाहिजे.
महापालिकांमधील पक्षीय बलाबल
मुंबई महानगरपालिकेत एकूण २२७ सदस्य आहे.त्यात शिवसेना ८०,काँग्रेस ७६,भाजप २८,राष्ट्रवादी १४,मनसे ७,इतर २२ सदस्य आहेत.ठाणे महानगरपालिकेत एकूण ११५ सदस्य आहेत.त्यात शिवसेना ४८,राष्ट्रवादी २४,काँग्रेस १५,भाजप ५,मनसे ३,इतर २० सदस्य आहेत.पुणे महानगरपालिकेत एकूण १४४ सदस्य आहेत.त्यात राष्ट्रवादी ४९,काँग्रेस ४१,भाजप २५,शिवसेना २०,मनसे ८,अपक्ष १ नगसेवक आहे.पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत एकूण १०५ सदस्य आहेत.त्यात राष्ट्रवादी ६०,काँग्रेस १९,भाजप ९ ,शिवसेना ६,आरपीआय १,अपक्ष १० नगरसेवक आहेत.नाशिक,महानगरपालिकेत एकूण १०८ सदस्य असून त्यात शिवसेना २७,काँग्रेस २१,राष्ट्रवादी १७,भाजप १४,मनसे १२,इतर १७ नगरसेवक आहेत.नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहाची संख्या १३६ आहे.त्यात भाजप ५५,काँग्रेस ३६,राष्ट्रवादी ९,शिवसेना ८,इतर २८ नगरसेवक आहेत.उल्हासनगर महानगरपालिकेत एकूण ७६ नगरसेवक आहेत.त्यात शिवसेना १७,लोकभारती १७,राष्ट्रवादी १६,भाजप ११,काँग्रेस ६,मनसे २,इतर ७ नगरसेवक आहेत.सोलापूर महानगरपालिकेत एकूण ९८ नगरसेवक असून त्यात काँग्रेस ४०,राष्ट्रवादी १४,भाजप १३,शिवसेना ७,इतर २४ नगरसेवक आहेत.अकोला महानगरपालिकेत एकूण ७१ नगरसेवक आहेत.त्यात काँग्रेस १९,राष्ट्रवादी ११,भाजप ११,भारिप-बहुजन महासंघ १०,शिवसेना ७,इतर १३ सदस्य आहेत.अमरावती महानगरपालिकेत ८१ नगरसेवक असून त्यात काँग्रेस २१,राष्ट्रवादी १८,भाजप १५,शिवसेना ११,अपक्ष १६ नगरसेवक आहेत.जिल्हा परिषद व महापालिकांमधील पक्षीय बलाबल लक्षात घेतले तर काही ठिकाणी शिवसेना-भाजपा कमकुवत आहे.तर काही ठिकाणी त्यांना अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.त्यामुळे देखील शिवसेना-भाजपा युती करण्यासाठी इच्छुक नाही,असो…निवडणुकीत नाही मात्र निकालानंतर हे एकमेकाला ‘आय लव यु’ म्हणतीलच हे निश्चित आहे.
