मराठा मोर्चाचे वलय स्वतःच्या अवतीभवती गुंफून घेतल्यामुळे पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जवळून ओबीसी,दलित आणि मुस्लीम समाजाची हक्काची व्होट बँक दुरावली.परिणामी नोटबंदीसारखा मुद्दा प्रचारात राष्ट्रवादीला कॅश करून घेता आला नाही.पालिका निवडणुकीत झालेल्या निकालाची पुनरुवृत्ती टाळायची असेल तर जिल्हा परिषदआधी राष्ट्रवादीला आपल्या रणनीतीत मोठे फेरबदल करत ओबीसी आणि दलित,मुस्लिम नेतृत्व पुन्हा एकदा पुढे करावे लागेल.अन्यथा जि.प-पं.स.,निवडणुकीत देखील पालिका निवडणुकीसारखे ‘अमंगल’ घडेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
मराठा मोर्चांनी धास्तावलेल्या दलीत, ओबीसी आणि मराठा व इतर जातींनी केलेल्या मतदानाचा प्रभाव या निकालांवर स्पष्टपणे जाणवला हे सत्य राष्ट्रवादीने लवकर स्वीकारले तर आगामी निवडणुका त्यांना काहीशा सुलभ होतील.अर्थात ज्यांना पराभवाचा फटका बसतो ते,असे पराभव कधीच मान्य करीत नाही,हा राजकारणातील अलिखित नियम आहे.दुसरीकडे,मराठवाडय़ात राष्ट्रवादीला मिळालेले यश, हे मराठा मोर्चाचेच फळ आहे हे सत्य देखील नाकारून चालणार नाही.राष्ट्रवादी हे यश-अपयश उघडपणे मान्य करणार नाही.परंतु नुकत्याच झालेल्या चिंतन बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार व नेत्यांनी पराभवाचे कारणांमध्ये कमी अधिक प्रमाणात दलित-मुस्लीम आणि ओबोसी समाजाची नाराजी असल्याचे मान्य केले.राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शरद पवार यांनी छगन भुजबळ,आर.आर.पाटील,लक्ष्मणराव ढोबळे,रामदास आठवले,तारिक अन्वर,अख्तर हसन रिझवी, यांच्यासारखे नेतृत्व पुढे केले होते.परिणामी पहिली निवडणूक लढवीत असतांना देखील राष्ट्रवादी सत्तेत आली.मोठया साहेबांनी सर्व घटकांना न्याय दिल्यामुळेच सलग दुसऱ्या पंचवार्षिकला देखील राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळविले होते.एवढेच नव्हे तर,मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीची आंदोलने देखील त्यांनी योग्य प्रकारे हाताळली.शरद पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास देऊन संवेदनशील परिस्थितीवर मात केली.आतापेक्षा कितीतरी पटीने त्यावेळेची परिस्थिती गंभीर होती.परंतु मराठा व दलित समाजात त्यांनी समन्वय घालण्याची भूमिका यशस्वीरित्या पार पाडली.परंतु मागील काही वर्षापासून राष्ट्रवादीचे फासे फिरल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.आज मास लीडर असलेले अनेक दिग्गज नेते पक्षातून बाहेर गेले किंवा ते आज साईड ट्रॅकला आहेत.अरुणभाई गुजराथी,प्रफुल्ल पटेल,ईश्वरबाबूजी जैन यांच्या सारखे आर्थिक पिलर आज घरी बसून आहेत.त्यामुळेच उत्तर महाराष्ट्र,भंडाऱ्यासह राज्यात आर्थिक कुमक अभावी राष्ट्रवादीला पालिका निवडणुकीत मोठा फटका बसला.त्याआधी विविध भ्रष्टाचाराचे आरोपांनी त्रस्त असतांनाच विधानसभेत आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे कॉंग्रेससह राष्ट्रवादीला देखील नुकसान झाले.या पराभवाचे चिंतन सुरु असतानांच मराठा मोर्चाचे वादळ निर्माण झाले.यावेळी कॉंग्रेस,शिवसेनेसह भाजपा देखील सुरक्षित अंतर ठेवून मोर्चात सहभागी झाली.अर्थात ओबीसी,दलित आणि मुस्लीम समुदाय कुणी कितीही नाही म्हणत असले तरी,धास्तावलाच होता,हे या पक्षांनी ओळखले होते.दुसरीकडे मात्र ज्या-ज्या जिल्ह्यात मोर्चा निघत होते.त्याठिकाणी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अंगात आणून मोर्चाचे नियोजन करत होते.मराठा समाज सध्या सत्तेबाहेर असल्यामुळे अस्वस्थ आहे.सत्तेत नसलेल्या मराठा नेत्यांची या मोर्चांना फूस असल्याच्या आरोपांवर काहींनी तर स्वतःहून खुलासे द्यायला सुरुवात केली.त्यामुळे कळत-नकळत मराठा मोर्च्याचे दायित्व राष्ट्रवादीच्या माथी आले.यानंतर मराठयांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगली आणि आता सत्तेबाहेर असल्याने ते अस्वस्थ आहेत.मुख्यमंत्री बदलासाठी सर्व दबाव आणला जात आहे,असे नवनवीन आरोप राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षरित्या होवू लागले.वास्तविक या आरोपांवर भाजपातील एकही मराठा नेता उघड भाष्य करत नव्हता आणि दुसरीकडे कॉंग्रेस-शिवसेनेतील मराठा नेते देखील संयम ठेवून होते.त्यामुळे राष्ट्रवादीवर मराठा मोर्चाचे आयोजक असल्याचा शिक्का मारण्यात विरोधक यशस्वी झाले.पालिका निवडणुकीत अंडर करंट हा मुद्दा खूप संवेदनशील ठरला.मराठा मूक मोर्चाना आपलेसे करण्यासाठी काही जणांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात जी वादग्रस्त विधाने केली ती ही राष्ट्रवादी काँग्रेसला भोवली व दलित मतदार राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावला.अर्थात अशा पद्धतीचे पराभवाचे कारण कोणताही पक्ष उघडपणे मान्य करणार नाही.कुणी मान्य करो अथवा ना करो, झालेल्या पालिका निवडणुकीत मराठा मोर्चाचा इफेक्ट जाणवलाच.परंतु हा इफेक्ट सत्ताधारांच्या परड्याचे वजन वाढविणारा ठरला.आज राज्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना सपाटून मार खावा लागला हे सत्य नाकारून चालणार नाही.राष्ट्रवादीचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची अनुउपस्थिती देखील राष्ट्रवादीला चांगलीच जाणवली.तर ढोबळे,आठवलेंसारखे दलित नेते दूर गेल्याचा फटका देखील सहन करावा लागला.त्याच प्रकारे मुस्लीम समाजात मान्यता असलेला एकही चेहरा प्रचारात समोर आणण्यात आला नाही.पर्यायी राष्ट्रवादीची दलित,ओबीसी आणि मुस्लीम वोटबँक भाजप-रिपाइ,शिवसेना,कॉंग्रेस व एमआयएमकडे वळली.या निकालाने राष्ट्रवादी आज पूर्ण परेशान झालेली आहे.अर्थात यावर उपाय देखील त्यांनाच शोधावा लागणार आहे.कारण किती दिवस पवार साहेबांचे बोट धरून ही मंडळी चालणार आहे.सत्तेत जन्मलेल्या या पक्षांच्या नेत्यांना आता यापुढे राजकारण अवघड होवू शकते.मोदींचे उदाहरण त्यांच्या समोर आहे.संपूर्ण देशात मोदी लाट असतांना तामिळनाडूत मात्र भाजपला सपाटून मार खावा लागला होता.दिल्ली,बिहार याठिकाणी विधानसभेत देखील मोदींचा करिष्मा काम करू शकला नव्हता.त्यामुळे साहेबांच्या पुण्याईवर अवलंबून न रहाता त्यांच्यासारखे सर्वसमावेशक घटकांचे राजकारण करावे लागेल तरच राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ येवू शकतात.