इस्लाम धर्मातील अनुयायांसाठी शरीयतचा कायदा हा इस्लाममधील रूढी-परंपरा आणि नियमांच्या रुपात एकप्रकारे कायद्याची भूमिका निभावत असतो.संपूर्ण मुस्लीम धर्मीय बांधव आजही याच शरियत कायद्यालाच अनुसरून आपले सामजिक जीवन जगत आहेत. जगातील जवळपास सर्वच जाती-धर्मामध्ये राहण्यासाठी काही नियम आणि परंपरा आहेत. त्यानुसारच शरियत देखील मुस्लीम धर्मात राहण्याचे मार्गदर्शन करतो त्याआधारेच संपूर्ण जगात इस्लाम धर्माचे अनुयायी संघठीत आहेत.
सातव्या शतकात सौदी अरबच्या मदिना शहरात इस्लामची स्थापना झाल्याबरोबर त्याचा प्रचार आणि प्रसार प्रचंड गतीने परिसरात व्हायला सुरुवात झाली. सर्वात आधी अरबमधील कबीलाई समाजावर कुराणचा प्रभाव पडला व त्यानुसार त्यांचे सामाजिक जीवनात बदल झाले. यावेळी कबीलाई समाजाने आपल्या जुन्या रूढी व परंपरांचा त्याग केला. यानुसार कुराणमध्ये लिखित व अलिखित नियमांना शरियतचा कायदा म्हटले जावू लागले. मनुष्याच्या सामाजिक आणि व्यावहारिक समस्या सोडविण्याचे विश्वसनीय आधारस्तंभ म्हणून मुस्लीम बांधव एकप्रकारे शरियतकडे बघू लागले. शरियत इस्लाम धर्मातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक पद्धतीनुसार जीवन जगण्याची व्याख्या करतो. या सर्व मुद्यांवर एका मुस्लीम व्यक्तीने जीवन कसे जगावे याबाबत शरियत मार्गदर्शन करते. त्यामुळेच शरियत कायद्याचा मुस्लीम बांधवांच्या कौटुंबिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे.
मान्यतेनुसार मोहम्मद पैगंबर साहेब हयात असतांना कुराणमध्ये लिखित कायदे तत्कालीन समाजातील समस्याच्या समाधानासाठी होते. परंतु कालानुरूप यात बदल देखील होत गेले असल्याचे बोलले जाते. अनेक मुस्लीम धार्मिक संस्थानी स्थानिक न्यायिक व्यवस्थेत शरियतला त्यांच्या पद्धतीने लागू करून घेतले. इस्लामिक कायद्याच्या चार प्रमुख संस्था आहेत. त्यात हनफिय्या, मलिकिय्या, शफिय्या और हनबलिय्याचा समावेश होतो. या संस्था आपापल्या पद्धतीने कुराणमधील आयत आणि मुस्लीम समाजातील नियमांचे व्याख्या करतात. या सर्व संस्था वेगवेगळ्या दशकात विकसित झाल्या आहेत. त्यानुसार जगातील वेगवेगळ्या मुस्लिम देशांनी आपापल्या पद्धतीने या संस्थांचे कायदे स्वीकारले असल्याची देखील मान्यता आहे.
भारतीय संविधानानुसार देशातील सर्व जातीच्या धर्माच्या लोकांसाठी समान कायदे आहेत. फक्त मुस्लीम बांधवाच्या पारिवारिक विशेष करून लग्न, तलाक (घटस्फोट), मुले तसेच पति-पत्नी, आई-वडील यांच्याशी संबंधीत वाद विवादांवर शरीयतच्या कायद्यानुसार समाधान शोधले जाते. यात भारतीय दंड संविधान कायदा हस्तक्षेप करू शकत नाही.
भारतात शरीयत संबंधित नियम आणि कायदे संचालित करण्यासाठी १९३७ मध्ये ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ची स्थापना इंग्रजांनी केली. याचा प्रमुख उद्देश मुस्लिमांच्या सर्व समस्याचे निराकरण इस्लामिक कायद्यानुसार करणे हा होता. त्यानुसार १९३७ पासूनच मुस्लिम बांधवांचे लग्न, तलाक संपत्ती आणि पारिवारिक विवादांचे निकाल याच ऍक्टनुसार होत आहेत. या ऍक्टनुसार व्यक्तिगत वादविवादात सरकार हस्तक्षेप नाही करू शकत नव्हते. शरियत मुस्लीम समाजाच्या रूढी, प्रथा, परंपरा, रीतीरिवाज आणि परमेश्वराने उतरविलेली जीवन पद्धती असून अपरिवर्तनीय असल्याची भावना मुस्लीम बांधवांमध्ये आहे. त्यामुळेच जेव्हा केव्हाही शरियत कायदा रद्द किंवा बदलाची भाषा होते. त्यावेळी ‘इस्लाम खतरे में’अशी भूमिका बहुतांश मुस्लीम बांधव घेतांना दिसतात. शिक्षणाचा अभाव लक्षात घेता त्यांच्या मनातील ही भीती स्वाभाविक असल्याचे जाणवते. शरियतचे पालन करण्याची आज्ञा कुराणमध्ये दिली असल्याची देखील श्रद्धा आहे. शरियत शब्दाचा अर्थ कायदा असा होतो. या कायद्यानुसार चोरी केली तर त्याचे हात कापण्याची, वाईट नजरेने बघितले तर डोळे फोडण्याची अशा हिंसक तरतूदी असल्याची मान्यता आहे. वास्तविक बघता इस्लामी कट्टरता जोपासणार्या तालिबानींनी खर्या अर्थाने या कायद्याचा सोयीने अर्थ काढत अतिरेक केला. इस्लाम धर्म एक ईश्वर तत्वावर उभा असलेला धर्म आहे. अल्लाह आणि कुराणवर श्रध्दा ठेवणारा आणि महंमद पैंगबर हे शेवटचे सर्वश्रेष्ठ पैंगंबर असल्याचे मान्य करणारा प्रत्येक मनुष्य मुसलमान म्हटला जातो.
शरियत कायदा म्हणजे इस्लाम धर्माची परंपरेने चालत आलेल्या रूढी, प्रथा आणि परंपरा हा कायदा अपरिवर्तनीय असल्याची मानसिकता देशातील बहुतांश मुस्लिम बांधवांमध्ये आहे. तालिबानीदेखील शरियतचे समर्थन करतात. त्यामुळे अफगणिस्तान आणि पाकिस्तानात त्यांनी शरियतचा हवाला देत अनेक फतवे काढले. त्यानुसार प्रत्येक पुरूषाला दिवसातून पाच वेळा नमाज पढणे बंधनकारक करण्यात आले. त्याचप्रकारे दाढी ठेवणे, घरात कुठलेही हत्यार असल्यास मशिदमध्ये जमा करण्याचे बंधन, कुराण व्यतिरीक्त घरात दुसरे कुठलेही पुस्तक न ठेवण्याची सक्ती, महिलांनी कायम बुरख्यात राहणे, पुरूषांशिवाय महिलांनी घराबाहेर निघू नये, रमजानच्या महिन्यात घरात चुल पेटवू नये, लग्नात संगीत वाजवू नये यासारख्या असंख्य गोष्टींचा समावेश आहे. शरियतचा दाखला देत महिलांवर अत्याचार करणे हे इस्लामविरोधी असल्याचे माहित असून देखील तालिबानी महिलांवर अत्याचार करत राहिले आजही अनेक देशांमध्ये तालिबानी हे दुष्कृत्य करतात. पाकिस्तानच्या स्वात प्रांतात मुस्लीम शरियत कायदा २००६ मध्ये लागू करण्यात आला. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी यासंदर्भातल्या वादग्रस्त करारावर सही केली होती. या घटनेची जगात मोठी चर्चा होत अनेक देशांनी चिंता व्यक्त केली होती. भारत देशात सर्व जाती-धर्माचे लोकं राहतात.आज काही धर्म वगळता सर्वांना समान कायदा आहे. परंतु १९३७ मध्ये इंग्रजांनी ‘शरियत ऍप्लीकेशन ऍक्ट’ मंजुर करून घेतला. अर्थात मुस्लिम इतरांपेक्षा वेगळे आहे ही भावना कायमस्वरूपी त्यांच्या मनात रूजावी आणि त्यातून हिंदु-मुस्लिम वाद टिकून राहावा हा त्यामागचा इंग्रजांचा हेतू होता. या माध्यमातून त्यांनी भारतात अधिक काळ राज्य करण्याचे आपले मनसुबे यशस्वी करून घेतले होते.
हिंदू धर्मातील कथित धर्म रक्षकांनी चातुरवर्ण व्यवस्था शेकडो वर्ष आपल्या पद्धतीने देशात राबवून घेतली. या वर्ण व्यवस्थेचा हवाला देत दलित, बहुजन आणि महिलांवर असंख्य अत्याचार करण्यात आले. ज्या पद्धतीने शरियतमध्ये कुराणच्या विरुद्ध वागणार्यांना हिंसक आणि अमानवीय शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यासारख्या काही तरतुदी मनुस्मृती देखील होत्या. मनुस्मृतीनुसार स्त्रियांना यज्ञ कार्य किंवा दैनिक अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही. यज्ञ कार्य करणार्या किंवा वेद मंत्र बोलणार्या स्त्रियांनी केलेले सर्व यज्ञ कार्य अशुभ असते, देवांना ते स्वीकार्य नसते. शिकायचा, शिकवायचा, वेद-मंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही. प्राचीन काळी मनुस्मृतीमुळे समाजात स्त्री आणि शूद्र यांना कायम दुय्यम मानले गेले. वेद-मंत्र ऐकणार्या दलित व्यक्तीच्या कानात उकळते तेल ओतावे, यासारख्या अनेक हिंसक शिक्षेच्या आणि त्यांच्या मानवी जीवनाच्या उपेक्षा करणार्या तरतुदी होत्या. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षानंतर हळू-हळू का असेना हिंदू धर्मातील बहुतांश लोकांनी बदल स्वीकारला. आज मनुस्मृती नावाला उरली आहे. डॉ.आंबेडकरांच्या लढ्याने हिंदू धर्माची चिकित्सा व्हायला सुरुवात झाली आणि देशाला नवी दिशा मिळाली. याच पद्धतीने मुस्लीम धर्मातील सुधारणावादी नेते हमीद दलवाई यांनीदेखील मुस्लीम धर्माची चिकित्सा करायला सुरुवात केली. परंतु दुर्दैवाने त्यांचा वारसा मुस्लीम धर्मात अन्य कुणीही पुढे नेवू शकला नाही. त्यामुळे आज इस्लामवर डाग तालिबानींसारख्या कट्टरवाद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.