फेसबुकवरील मित्र डॉक्टर अभिराम दिक्षीत यांनी काही दिवसापूर्वी एका अफगानी चित्रपटाची लिंक शेअर केली होती. चित्रपटाचा चाहता असल्यामुळे युटूबवरून लागलीच तो चित्रपट डाऊनलोड करून घेतला. खरं म्हणजे मोठ्या देशातील चित्रपटाचा दर्जाच हा उच्च प्रतिचा असतो. हा गेैरसमज यानिमित्ताने पूर्णपणे पुन्हा खोडून निघाला.या आधीही ‘बोल’ आणि ‘खुदा के लीए’ हे जबरदस्त पाकिस्तानी चित्रपट बघितले आहेत.असं म्हणतात चित्रपट समाजाचा आरसा असतो.जे सभोवताली घडते तेच चित्रपटातून कमीधिक प्रमाणात आपल्या समोर मांडण्यात येते.या चित्रपटातून देखील तालिबान्यांकडून अफगाणिस्तानात महिलांवर होणारे अत्याचार दाखविण्यात आले आहेत.
ओसामा नावाचा हा चित्रपट बघितला आणि फार अस्वस्थ झालो. धर्मावर आधारितच कायदा पाहिजे म्हणून रस्त्यावर मोर्चे काढणार्यांनी हा चित्रपट एकदा जरूर बघावा आणि मग ठरवावे त्यांना कोणता कायदा पाहिजे. तालीबान्यांची सत्ता असणार्या अफगणिस्तानमध्ये महिलांवर कशाप्रकारे अत्याचार केले जातात हे बघितल्यानंतर समान नागरीक कायद्याला विरोध करणार्यांना आपल्या देशातही असाच तालिबानींचा रानटी कायदा पाहिजे आहे का? असा स्पष्ट सवाल मला यानिमित्ताने विचारावासा वाटतो.महिलांना फक्त पुरुषी वासना शमविण्याचे यंत्र समजणारे तालिबानी देखील धर्मावर आधारित कायदा राबिण्याचा आव आणतात.म्हणून त्याठिकाणी सर्व आलबेल आहे का ? नाही ना… मग का म्हणून स्त्रियांना त्यांचा मुलभूत अधिकार देणाऱ्या समान नागरिक कायद्याला आपण विरोध करत आहोत.आपल्या देशातही तालिबानींचा असाच रानटी कायदा पाहिजे आहे का? असा स्पष्ट सवाल मला यानिमित्ताने काहींना विचारावासा वाटतो.धर्माचा कायदा जीवन जगण्याची कला असते. त्याप्रमाणेच माणसाने कसे जगावे हे आपल्या देशाचे संविधान सांगते.त्यामुळे गैरसमजूतीतून समान नागरी कायद्याला विरोध करणे चुकीचे आहे.
ओसामा (२००३) चित्रपटाचे कथानक सुरु होते वैद्यकिय क्षेत्रात उच्च शिक्षित महिलेचा पती आणि भाऊ काबूलच्या युध्दात मारले गेल्यानंतर…तिची जगण्यासाठीची धडपड आणि सभोवतालच्या परिस्थितीमुळे एकुलत्या मुलीला मुलाच्या रूपात जीवन जगायला लावणारी हतबल आई, आणि त्यानंतर त्या मुलीची स्वःअस्त्विाची दाखविलेली लढाई कुठल्याही संवेदनशील माणसाला हादरविल्याशिवाय राहत नाही.ओसामा नावाची साधारण दहा ते बारा वर्षाची अल्हळ मुलगी आपल्या आईसह हालाखीचे जीवन अफगणिस्तानात जगत असते. अफगणिस्तानात सध्या तालिबान्यांची हुकूमत आहे. या तालिबान्यांना महिला कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर एकटी नको आहे. एवढेच नव्हे तरं केसापासून तर पायाच्या नखापर्यंत तिच्या शरीराचा एकही उघडा भाग त्यांच्या शिक्षेस पात्र ठरतो. एका रूग्णालयात ओसामाची आई डॉक्टर असते. परंतु रुग्णालय इस्लाम विरोधी असल्याचे सांगत तालिबानी बंद पाडतात. म्हातारी सासू आणि अवघ्या काही वर्षात तारूण्याच्या प्रवेशद्वारावर उभी असलेली मुलीची जबाबदारी तिच्यावर असते. हाताचे काम गेल्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. एकटे घराबाहेर निघणे आता ओसामाच्या आईला शक्य नसते. शेवटी मातृत्वाचा गळा घोटत एक दिवशी ती ओसामाच्या केसांची वेणी कापून तिला मुलाचे रूप देते.तालिबान्यांच्या नजरेपासून मुलगी वाचेल आणि दोन वेळेच्या जेवणाचीही सोय होईल, या आशेने मयत पतीच्या मित्राला विनवण्या करून ओसामाला कामावर ठेवण्याची विनंती करते.येथूनच ओसामाची स्व:अस्तित्वाची लढाई सुरु होते.तालिबानी वेळ झाली म्हणजे नमाज पठणासाठी सर्वाना सक्तीने मशिदीत नेतात.मुलगी असूनही ओसामा माशिदित जाते.परंतु नमाज पठण करतांना तिची होणारी घालमेल मात्र विचार करायला भाग पाडते.काही दिवस व्यवस्थित जातात. मात्र एकेदिवशी तालिबानी शहरातील सर्व लहान मुलांना जबरदस्तीने सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी उचलून नेतात. ओसामाचे हावभाव तिच्यासोबत असणारे मुलं ओळखून घेतात. त्याठिकाणी सर्वच जण तिला मुलगी असल्याबाबत हिनवायला सुरुवात करतात. याची कुणभूण प्रशिक्षण देणार्या तालिबानीच्या आकांना लागते. तालिबानी दहशतवादी ओसामाला बांधून एका विहीरीत लटकवतात. काही तास विहीरीत वेदनेने तडफडणार्या ओसामाला बाहेर काढले जाते. बाहेर काढल्यावर तिच्या गुप्तागांतून होणार्या रक्तस्त्रावावरून शेवटी तिचे स्त्रीत्व सिध्द होते. यानंतर तिला तालिबानी त्यांच्या कारागृहात इतर महिलांसोबत ठेवतात.काही दिवसांनी तिला एका म्हातारड्या मुल्लाहच्या हाती विकले जाते. मुल्लाच्या घरात आधीच अनेक महिला आणि मुली कित्येक वर्षापासून लैंगिक अत्याचार सहन करत असतात. शेवटी मुल्लाह आपली वासना शमवतोच आणि ओसामा आपली स्वःअस्त्विाची लढाई हरते आणि तिला आपले स्त्रीत्व मान्य करावेच लागते.
चित्रपटातील अनेक दृष्ये अस्वस्थ करतात. चित्रपटाची सुरुवातच आपण वेगळे धाटणीचा चित्रपट बघत आहोत याची जाणीव करून देणारा आहे.विधवा महिलांच्या हाताला काम पाहिजे म्हणून निघालेला मोर्चा त्याठिकाणी तालिबान्याकडून त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि जबरीने त्यांना बंदीस्त करून घेवून जातानांचे दृष्य अंगावर काटा आणतात.आईने केस कापल्यानंतर ते वाढतील या आशेने ओसामा आपल्या कापलेली वेणी झाडाच्या कुंडीत लावून सलाईनने थेंब-थेंब पाणी सोडते तेव्हा आपल्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहत नाही.चित्रपटाचा शेवट सुन्न करणारा आहे.ओसामाचा मित्र एसपांन्डी मोजक्याच दृष्यात आपली छाप सोडतो. अभिनेत्रीने मारीना गोलबहरीने ओसामाचे पात्र नुसतेच निभविले नाही तर जगले आहे.तिच्या एकूण अभिनयातून हे स्पष्ट जाणवते. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्दीक बरमाकला दिग्दर्शनाच्या बाबतीत १०० पैकी १०० गुण दिले पाहिजेत.या चित्रपटाला अमेरिकेच्या फॉरेन लॅग्वजेमध्ये गोल्डन ग्लोब अवार्डसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपट अफगाणी(पारसी) भाषेत असल्यामुळे समजायला थोडा वेळ लागतो.परंतु इंग्रजी सबटायटल व काही हिंदी शब्दांमुळे आपण लागलीच समरस होवून जातो.वेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहण्याचे शोंकीन असाल तर एकदा नव्हे,अनेकदा बघण्यासारखा हा चित्रपट आहे.
ओसामा (२००३) चित्रपटाची लिंक