जळगाव-आजच्या अत्याधुनिक युगातदेखील आपली संस्कृती व मातृसत्ताक समाजपद्धती जोपासणारा समाज म्हणून पावरा समाज आपली एक वेगळी ओळख जपून आहे.
आदिवासी लोक म्हटलं की, अंगावर वस्त्र नसलेले लोक, चेहर्यावर रंग-बिरंगी, डोक्यावर काहीतरी पिसे लावून नाचणारे लोक आपल्या समोर येतात परंतु हे आतापर्यंत पावरा समाजाचे साहित्य जपून न ठेवल्यामुळे हे विडंबन आहे. वास्तविक पाहता या समाजाचे चित्र नागरी लोकांमध्ये योग्यरित्या न मांडल्यामुळे हे सर्व विडंबन होत आहे. या समाजाला प्रगल्भ असा सांस्कृतिक वारसा आहे. या समाजात आजही मातृसत्ताक समाजपद्धती रुजून आहे. स्त्री भ्रुणहत्त्या होत नाही. मुलीला हुंडा दिला जातो. खालच्या जातीतील लोकांना वरच्या जातीत विधीवत जाता येते. असे अनेक महत्वपूर्ण चालीरिती या समाजात आहे. ज्या चालीरिती आपल्या नागरी समाजात बदलविण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले. ज्या प्रथा आजही आपल्या नागरी समाजातून पूर्णत: निघू शकल्या नाही. त्या चालीरिती हा समाज वर्षानुवर्षे जपून आहे. मुलीला हुंडा दिला जातो हे आपल्याला थोड अवघडल्यासारखे वाटेल. परंतु मुलीला नुसता हुंडा दिला जात नाही तर तिला पूर्ण स्वातंत्र्य असते की, दुसरे लग्नही करु शकते. विधवा पुनर्विवाहाला येथे मान्यता आहे. या समाजात काही महत्वपूर्ण सण आहे. ज्यात फाल्गुनोत्सव, ईदल, दिवाळीनवाई हे प्रमुख सण. फाल्गुनोत्सवानिमित्त भोंगर्या बाजार हा पंचक्रोशित प्रसिद्ध. या बाजाराबद्दल अनेक गैरसमज आपल्यामध्ये आहेत. मुली पळविल्या जातात, गुलाल लावला जातो परंतु असा कुठलाही प्रकार यात होत नाही. ज्याठिकाणी भोंगर्या बाजार भरतो त्याठिकाणी आजू-बाजूच्या परिसरातील पावरा बांधव एकत्र येतात.
वर्षभराचे अन्नधान्य, नवीन कपडे परिधान केले जातात. पारंपारिक ढोल, बासरी आदी वाजवून मनसोक्त नाचले जाते. या समाजात आणखी एक महत्वपूर्ण प्रथा म्हणजे समाजातील व्यक्तीचा मृत्यू कोठेही झाला तरी त्यांचा अंत्यविधी हा त्याच्या मुळगावीच होणार. त्यामुळे हा समाज काहिसा आपल्याच चौकटीत राहतो. हेच प्रमुख कारण आहे की, हा समाज पाहिजे त्या प्रमाणात प्रगती करु शकला नाही. या समाजात काही आजार हे प्रामुख्याने आढळतात. त्यात सिकलसेल, त्वचारोग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. परंतु सर्वसामान्य आढळणारे मधुमेह, हृदयविकार हे आजार या समाजात आढळत नाही. दर्या-खोर्यात राहून या समाजाने आपले एक वेगळे संगीत निर्माण केले असून प्रत्येक सणासाठी, लग्न, मृत्यूसाठी गाणे आहेत. हे संगीत व गाणे नष्ट होण्याच्या मार्गावर असतांना डॉ.चंद्रकांत बारेला सारखे समाजसुधारक हे साहित्य आता जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या समाजास मुळ प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना असल्या तरी त्या योग्य रितीने न राबविल्यामुळे व मुळ लाभार्थीपर्यंत न पोहचल्यामुळे आजही अनेक समस्या आहेत. ज्या अनिष्ट प्रथांनी नागरी समाजाला ग्रासलेले आहे. त्यापासून वेगळ्या व अत्याधुनिक प्रथा मागील अनेक वर्षापासून हा पावरा समाज जपून आहे. त्यामुळे हा समाज अशिक्षित असला तरी प्रथांनी मात्र सुशिक्षित आहे. पावरा समाजाच्या या मातृसत्ताक पद्धतीला खरंच सलाम आहे.
समाजाला प्रगती पथावर नेण्याचे स्वप्न- डॉ.चंद्रकांत बारेला
एमबीबीएस सारखे उच्चशिक्षण घेऊनही समाजप्रेमाने झपाटलेला हा माणूस विदेशात जाण्याची संधी सोडून आपल्या गावात, दुर्मिळ भागात समाजाला वैद्यकीय सेवा देत आहे. डॉ.बारेला हे पावरा समाजातील पहिले डॉक्टर, त्यांच्या आई या पहिल्या शिक्षिका तर त्यांच्या पत्नी या पहिल्या महिला डॉक्टर आता त्यांचे लहान बंधू एमपीएससी ची तयारी करीत पहिले सनदी अधिकारी होण्याचा प्रयत्न करीत समाजाला प्रगती पथावर नेण्याचे स्वप्न ठेऊन आहे.
<प्रसिद्ध दिनांक ५ मार्च १२ >