जळगाव – वेळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास. ठिकाण पोलीस अधिक्षक कार्यालय. प्रवेशद्वाराच्या पायर्यांच्या बाजूला एक साधारण ७० वर्षीय वृध्द महिला आपल्या पारंपरीक आदीवासी पेहराव्यात बसलेली. येणार्या-जाणार्यांची गर्दी एवढी की या आजीबाईवर कुणाचे सहजरीत्या लक्ष जाणार नाही. डोळ्यांवरील शस्त्रक्रियेमुळे काळा चष्मा लागलेला. चेहर्यावर पडलेल्या सुरकुत्या. हातात कागदपत्रांनी भरलेली एक मोठी पिशवी. बाजूला पाण्याची भरलेली बाटली व काठी. येणार्या-जाणार्या प्रत्येकाला आशेच्या नजरेने पाहत कपकपत्या आवाजाने विचारत होती ‘‘भाऊ रे ! मले मोठा साहेब भेटीन का?’’ पण ऐकायला तिथं वेळ आहे कुणाला? या धकाधकीच्या जीवनात माणुसकी किती संवेदनाहीन होत चालली आहे याचा प्रत्यय या घटनेने काल आला.
कार्यालयात येणार्या-जाणार्या प्रत्येक अधिकारी व कर्मचार्याला आशेच्या नजरेने पाहत आजीबाई कपकपणार्या आवाजाने विचारत होती. पण साधी विचारपूस करण्याचीही कुणाला गरज वाटली नाही. ही ७० वर्षीय महीला जामनेर तालुक्यातील मोरगाव मांडा या गावाची राहणारी नाव घमुबाई उखर्डू चव्हाण. सहज विचारले असता शेती बळकावली गेल्याची तक्रार अन् ती आजी आपल्या पिशवीतून भराभर कागदपत्र काढून दाखवू लागली.
दांडगाईच्या जोरावर काहींनी जमिन व त्यातील पिक बळकावून तिला हाकलून लावल्याचे ती सांगत होती. तलाठी, सर्कल, तहसीलदार या सर्वांच्यादरबारात जावून देखील न्याय मिळत नसल्याने पोलीस अधिक्षक एस.जयकुमार यांच्या दरबारात दोन दिवसापासून सकाळी नऊ वाजेपासून तर सायंकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत बसून पण कुणी साधी विचारपूसही केली नाही. दिवसभर उपाशी-तापाशी राहत मोठ्या साहेबांना भेटण्याची अपेक्षा ठेवून होती. मात्र तीची तक्रार काय? अडचण काय? हे विचारण्याची कोणालाही गरज वाटली नाही. कार्यालयात जातायेता अनेकांना ही वृध्द महिला दिसली असेल पण कुणातलीही माणुसकी जागी झाली नाही. किंबहूना पोलीस अधिक्षकही बर्याचदा कार्यालयाच्या बाहेर गेले व आले असतील पण त्यांचेही या वृध्द महिलेकडे लक्ष जावू नये हे विशेष! कदाचीत या महिलेच्या तक्रारीत तथ्य नसेलही पण कार्यालयात एवढी वृध्द महीला का फिरते आहे? माणुसकीच्या नात्याने तरी कुणी विचारायला हवे होते. वय जास्त असल्यामुळे आजीबाईच्या बोलण्यात सुसुत्रता नव्हती पण तळमळ मात्र जाणवत होती. कदाचीत आज पुन्हा ही वृध्द पोलीस अधिक्षक कार्यालयात आलेली असेल. किमान हे वृत्त वाचल्यानंतर तरी मोठ्या साहेबांची किंवा इतरांची तिच्यावर नजर पडो हीच अपेक्षा!
<प्रसिद्ध दिनांक ३० जून २०१४>