अमेरिकेत समलिंगींसाठी असलेल्या एका क्लबमध्ये घुसून ‘इसिस’ या क्रूर दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तरुणाने ५० जणांना ठार मारले. ही घटना ऐकल्यानंतर खरे म्हणजे खूप अस्वस्थ झालो.एका माणसाच्या जीवापेक्षा आपली व्यक्तिगत धार्मिक तत्त्व कशी मोठी असू शकतात? असा प्रश्न यानिमित्ताने मला पडला. ओमर मतीनने फक्त समलिंगी संबंधांबद्दल असलेल्या घृणेतून हे हत्याकांड केल्याचे समोर आल्यानंतर तो धार्मिक कट्टरवाद्यांच्या पूर्ण प्रभावाखाली होता, हे सिद्ध होते. कारण इस्लाममध्ये समलिंगी संबंध हराम (गैरकृत्य) ठरविण्यात आले आहे.असे संबंध कुणी करताना आढळून आल्यास त्यांना ठार करण्याची आज्ञा असल्याचे कट्टरतावादी सांगतात.या कट्टर मानसिकतेतूनच ओमरने हे हत्याकांड घडविले असावे.
निसर्गाने ज्यावेळी स्त्री-पुरुष अशा विभिन्न अंगांनी मानवी शरीर तयार केले त्यावेळी त्यांच्या भौतिक व शारिरीक गरजा देखील ठरवून दिल्या. अन्न, वस्त्र व निवार्याप्रमाणे मानवी शरीरासाठी सेक्स हे देखील तेवढेच आवश्यक आहे. मानवी शरीरासाठी शरीरसंबंध अन्नाप्रमाणेच अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष संबंधाप्रमाणेच समलैंगिक संबंध देखील संपूर्ण जग उशिरा का असेना आता सहजतेने स्विकारत आहे.शेवटी तृतीयपंथी गटात मोडणार्यांना देखील सर्वसामान्यांप्रमाणेच भावना असतात.समाजाने आता हे हळूहळू स्विकारायला सुरू केले आहे.कधीकाळी अत्यंत खाजगी आणि गोपनीय ठेवावा, अशी सेक्ससंबंधी धारणा होती.परंतु प्रसिद्ध विचारवंत रजनीश उर्फ ओशो यांनी ‘संभोगातून समाधी’कडे हे तत्त्व जगाला दिले आणि सेक्सबद्दलची व्याख्याच जगात बदलली.अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतात ऑरलॅण्डो शहरात एका ‘गे-नाईट क्लब’वर ओमर मतीन याने अंदाधुंद गोळीबार करून तब्बल ५० समलिंगी महिला-पुरुषांना ठार मारले. हल्ला करण्यापूर्वी त्याने आपात्कालीन नंबरवर फोन करून आपण ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले होते. इस्लाम धर्माच्या बाबतीत इसीसची असलेली कट्टरवाद्याची भूमिका अवघ्या जगाला ज्ञात आहे. इस्लामिक मान्यतेनुसार समलिंगी संबंध हराम असून ही जमात जगातून संपली पाहिजे,असे सांगितले आहे.धार्मिक मान्यतेनुसार समलिंगी संबंध म्हणजे एक प्रकारचा मानसिक आजार आहे. ‘कौमे लूत’च्या काळापासून हा आजार या जगात आहे.कुराणमधील मान्यतेनुसार एकेकाळी ही जमात पूर्णपणे नष्ट करण्यात आली होती आणि पुढील मानव पिढीला सक्त शब्दात सुचित करण्यात आले होते की, अशा अनैतिक कृतीपासून लांब राहावे. अन्यथा, त्यांना देखील अशाच परिणामाला सामोरे जावे लागेल.कुराणमध्ये समलिंगी संबंध ठेवणार्यांसाठी काही विशिष्ट शिक्षा सांगण्यात आल्या आहे.त्यात समलिंगी व्यक्तींच्या अंगावर भिंत पाडून ठार करणे किंवा त्यांना उंच जागेवरून खाली फेकणे, दगड मारणे, कोडे मारणे आदी प्रकारे मृत्यूदंडाच्या शिक्षा सांगण्यात आल्या आहेत. अशा लोकांना अपमानित करून मारहाण करावी,एवढेच नव्हे तर समलैंगिक संबंध करताना कोणही आढळून आल्यास त्यांना ठार मारावे, अशी देखील काही कट्टरतावादी आज्ञा देतात.इस्लाममधील मान्यतेनुसार पुरुष किंवा स्त्री यांच्यातील समलैंगिक संबंधाला अनैसर्गिक म्हटले आहे. या पृथ्वीतलावरील पशु-पक्षी देखील आपल्या लैंगिक विभिन्नतेनुसार शरीरसंबंध करीत नाही.परंतु मनुष्य त्यापेक्षाही खालच्या स्तरावर जातो त्यामुळे असे संबंध हराम आहे. समलैंगिक संबंध अनेक आजारांना निमंत्रण देतात. तसेच अशा प्रकारे समलैंगिक संबंध ठेवणे हे माणसाला भ्रष्ट करीत असतात आणि भविष्यात त्याची सुधारण्याची शक्यता कमी असते. अशा माणसातील सर्व चांगले गुण नष्ट होतात. काही कट्टरतावाद्यांचे म्हणणे आहे की, कोणत्याही मुसलमानाने इस्लामने वर्जीत केलेल्या गोष्टींच्या चिकित्सेच्या भानगडीत पडू नये. त्याने अल्लाहवर दृढ विश्वास ठेवत निशिद्ध करण्यात आलेल्या गोष्टी या मानवी हिताच्याच आहेत, हे जाणले पाहिजे.परंतु आता लोक कट्टरतावाद्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्यामुळेच आज जगातील अनेक इस्लामी राष्ट्रांनी आता शरीरसंबंधांना मान्यता देण्यास सुरुवात केली आहे.
कट्टरवाद्यांकडून अनेक वेळेला समलिंगी संबंध ठेवणार्या व्यक्तींना ठार मारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत त्यात प्रामुख्याने बांगला देशातील पहिले समलिंगी मासिकाचे संपादक शुल्हाज मुन्नान यांच्या एका सहकार्याची एप्रिल २०१६ मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची अनेक राष्ट्रांनी निंदा केली होती. वास्तविक पाहता आजच्या घडीला जगातील अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये समलिंगी संबंधांना मान्यता किंवा कमी-अधिक प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यात तुर्की, फलीस्तीन (विशिष्ट भाग), माली, जॉर्डन, इंडोनेशिया, अलबेनिया, बहरैन या प्रमुख देशांचा समावेश होता.१८५८ मध्ये तुर्कीमध्ये समान शरीरसंबंधांना मान्यता देण्यात आली. परंतु याठिकाणी अद्यापही मोठ्या प्रमाणात समलैंगिक लोकांना भेदभावाला सामोरे जावे लागते. माली हे समलिंगी संबंधांना कायदेशीर संरक्षण देणारा आफ्रिकी देशांमधील एक राष्ट्र आहे. परंतु या देशात देखील या लोकांना मोठ्या अपमानास्पद व्यवहारांना सामोरे जावे लागते. समलैंगिक व्यक्तींच्या कायदेशीर अधिकाराच्या बाबतीत जॉर्डन या देशाच्या संविधानात मोठ्या प्रमाणात तरतुदी आहे. १९५१ मध्ये या देशात शारिरीक संबंधांच्या बाबतीत नवीन कायदे करण्यात आले. त्यात विशेष करून समलैंगिक लोकांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे करण्यात आले होते. इंडोनेशियामध्ये १९४५ च्या कायद्यानुसार कोणत्याही प्रकारच्या शारिरीक संबंधांना बंदी नाही. या देशात समलैंगिक व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणारी आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था कार्यरत आहे, ज्या ठिकाणी समलैंगिक लोक नेहमी आपल्या हक्कांसाठी आंदोलन करीत असतात. अलबेनियासारख्या छोट्या राष्ट्रात देखील समलैंगिक आणि लिंग परिवर्तीत लोकांसाठी विशेष कायदे आहेत. बहरैन या खाडी देशात समान सेक्स संबंधाला १९७६ मध्ये मान्यता देण्यात आली. परंतु या देशात आजही ‘क्रॉस ड्रेसिंग’ म्हणजेच मुलाने मुलीचे कपडे घालण्यावर प्रतिबंध आहे.
समलिंगी संबंध नव्हे तर त्याबद्दलची संकुचित मानसिकता ठेवणारेच मानसिक रोगी आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मला जेवढा इस्लाम समजलेला आहे त्यानुसार ज्या जगात जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा अल्लाहाचा बंदा आहे. त्यामुळे त्याची शारिरीक अक्षमता हे त्याच्या व्देषाचे कारण ठरू शकत नाही. त्यामुळे अमेरिकेतील समलिंगी नाईट क्लबवर हल्ला करणारा ओमर मतीन हा मानसिक रुग्ण होता हे मी ठामपणे सांगतो.इस्लाममध्ये समलिंगी संबंध हराम आहे परंतु, याच इस्लाममध्ये निष्पाप लोकांना मारणे देखील मोठे पाप मानले जाते.याचा पण तितकाच विचार कट्टरवाद्यांनी केला पाहिजे.


