जळगाव दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने नुकतेच तांबापुरातील शेख असलम शेख उर्फ पेंटर याला बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड वापरत असल्याप्रकरणी अटक करण्यात आली. शेख असलमवर २००१ मध्ये गुजरातमधील आठवा लाईन पोलीस ठाण्यात ‘अनलॉफुल ऍक्टीव्हीटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट’ नुसार गुन्हा दाखल असल्यामुळे या प्रकरणाला ‘सिमी’चा रंग लागला. मात्र या प्रकरणी खुद्द पोलीस प्रशासनानेच ही कारवाई ‘सिमी’शी संबंधीत नसल्याचे सांगितल्याने या प्रकरणातील गुंता वाढला आहे. यातून कोणताही आरोप सिध्द न झालेल्या व्यक्ती व त्याच्या कुटुंबियाला नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे.
शेख असलम हा नाशिक येथील सचिन एस. दोंदे या व्यक्तीच्या नावावर ८९८३८०७००८ या क्रमांकाचे सिमकार्ड वापरत होता. सिमकार्ड घेतांना रहिवास पुरावा सचिन दोंदे यांचा आहे तर फोटो मात्र शेख असलम याचा मुलगा मोहसिन अहेमद शेख याचा आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरूध्द जळगावच्या औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हा फसवणुकीचा (कलम ४२०) असून यात अन्य दुसरे कोणतेही कलम नाही. मात्र शेख अस्लम याला अटक केल्यानंतर जणू काही ‘सिमी’च्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली.
मुळातच शेख असलम याच्यावर २००१ मध्ये गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यात त्याच्यावर ‘सिमी’शी संबंधीत बैठकीत भाग घेतल्याचा आरोप लावण्यात आला होता. यात त्याच्यासह सुमारे १२५ जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने त्याच्यावर कोणतेही दोषारोप सिध्द झालेले नाहीत. त्यामुळे ती बैठक सिमीची होती की अन्य कुठल्या संघटनेची याबाबत अजुन स्पष्टता नाही. दरम्यान गुजरात पोलीसांकडून अद्याप त्या गुन्ह्यासंदर्भातले कागदपत्र एमआयडीसी पोलीसांना प्राप्त झालेले नाहीत. एमआयडीसी पोलीसांनी हा फक्त ४२०चा गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे.यामुळे तूर्ततरी यात सिमी प्रकरणाचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट आहे. त्याचप्रकारे एटीसीने देखील ही नियमित कारवाई असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत केलेल्या चौकशीत त्या मोबाईल क्रमांकावरून कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तिशी शेख असलम याने संपर्क साधला असल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे बनावट सिमकार्डचे हे प्रकरण थेट सिमीपर्यंत कसे पोहोचले? याबाबत पोलीस प्रशासनातील अधिकारीदेखील आश्चर्य व्यक्त करीत आहे. या सर्व प्रकरणामुळे शेख असलम आणि त्याच्या कुटुंबियांना मात्र नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
यासाठी केली कारवाई
एका सर्वेक्षणानुसार ३० टक्के सिमकार्ड हे बनावट व्यक्तींच्या नावावर वापरले जात असल्याचे समोर आले आहे. हे प्रकरणही त्यातीलच असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.शेख असलम याला अटक केल्यानंतर अशा प्रकारच्या लोकांवर वॉच असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक या कारवाईमुळे अनेक संशयीत सावध झाले असतील. या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय सुरक्षततेशी संबंध असल्याचे निदर्शनास आले असते तर अशा प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड वापरणारे संबंधित प्रकरणातील सर्व संशयीतांवर यंत्रणांनी एकाचवेळी कारवाई करत त्यांना पळ काढण्यापासून रोखले असते. बनावट सिमकार्डच्या आधारे मोठ्या प्रमाणात महिलांना दिला जाणारा त्रास, वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कुठलेही गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुसर्याच्या नावावरील सिमकार्ड वापरण्याचे काम गुन्हेगार करतात. त्यांच्यावर पायबंध बसावा तसेच पोलीस प्रशासन सतर्क आहे व अशा प्रकारच्या सर्व लोकांवर नजर असल्याचा संदेश जनतेत जावा यासाठी ही कारवाई करण्यात आली होती.
वाहेदे इस्लामी संघटनेवर बंदी नाही
वाहेदे इस्लामी या संघटनेच्या इस्तेमाला काही तरूणांसोबत शेख असलम हा राजस्थान येथे गेल्यामुळेच एटीसी त्याच्यावर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले. वाहेदे इस्लामी ही संघटना मुळ पाकिस्तानी असली तरी या संघटनेवर अद्याप भारत सरकारने कुठलीही बंदी घातलेली नाही. या संघटनेवर देशविरोधी कारवाईत सहभागी असल्याचे अद्यापपर्यंत कुठलीही घटना समोर आलेली नाही.
शेख असलमवर बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासोबत सिमी प्रकरणाचा कुठलाही संबंध अद्याप समोर आलेला नाही.
– पो.नि. सुनिल कुर्हाडे,
एमआयडीसी पोलीस स्टेशन.
बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड वापरत असल्याप्रकरणी एटीसीने फिर्याद दिली. ही नियमित कारवाई होती.
-समाधान पाटील, सपोनि एटीसी, जळगाव