मध्यप्रदेशातील खंडव्याच्या तुरूंगातुन २०१३ मध्ये पळून गेलेले सिमीचे अतिरेकी बुधवारी मध्यरात्री ओडिशातील राऊरकेला येथे सुरक्षा यंत्रणाच्या जाळ्यात अडकले. यातील शेख महेबुब उर्फ गुड्डू याचे नातेवाईक जळगाव जिल्ह्यात असल्यामुळे पुन्हा एकदा जळगावचे सिमी कनेक्शन समोर आले आहे. आता नागपूर बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावणारा मुळचा जळगावातील सिमीचा फरार आतंकवादी शेख मुश्ताक शेख शफी हा यंत्रणांच्या रडारवर आहे.
जळगाव जिल्हा हा एकेकाळी सिमीचे हेडक्वार्टर म्हणून ओळखला जायचा.आजही जळगाव न्यायालयात याबाबत खटला सुरु आहे.अनेक तरुण याप्रकरणात शिक्षा भोगून जिल्ह्यात राहत आहेत.ओडीशा-तेलंगणाच्या सीमेवर राऊरकेला येथे खंडवा जेलमधून फरार झालेले शेख महेबुब, अमजद खान, झाकीर हुसेन यांच्यासह शेख मेहबूबची आई नजमा अशा चौघांना तीन बंदुका,काडतुसे ,७-८ मोबाईल फोन,इंडिका कार,मोटार सायकलसह एटीएस व एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले.हे सर्वजण सप्टेबर २०१४ पासून याठिकाणी राहत होते.यातील शेख महेबुब उर्फ गुड्डू याचे नातेवाईक मुक्ताईनगर, भुसावळमध्ये मागील २० ते २५ वर्षापूर्वी स्थायीक झालेले आहेत. गुड्डूचे आजोबा, मावशी व मामा हे मुक्ताईनगरला राहतात तर आणखी एक चुलत नातेवाईक भुसावळ येथे राहतो.विशेष म्हणजे हा नातेवाईक सतत ओडिशा येथे जात असतो.आपण व्यावसायसिक कामासाठी ओडिशा येथे जा-ये करत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.दरम्यान, काही वेळ गुड्डू भुसावळ व मुक्ताईनगर येथे राहिल्याची चर्चा होती. मात्र ज्यावेळेपासून तो सिमीत सक्रिय झाला तेव्हापासूनच त्याने नातेवाईकांशी संबंध तोडले होते.मागच्या महिन्यात एटीएसच्या पथकाने मुक्ताईनगर येथे जात त्याच्या सर्व नातेवाईकांची कसून चौकशी देखील केली होती.बालपणी वगळता तो जिल्ह्यात कधी आल्याचे तूर्ततरी पुरावे नाहीत.गुड्डू खंडवा जेलमधून फरार झाल्यानंतर काही दिवसांनी त्याची आई नजमा देखील बेपत्ता झाली होती.राऊरकेलामध्ये त्याच्या दोघा साथीदारांसह त्याच्या आईला देखील ताब्यात घेण्यात आले यावरून त्याची आई हि तेव्हापासून त्याच्याच सोबत असल्याचे स्पष्ट होते.गुड्डूच्या साथीदारांनी खंडव्यामधुन फरार झाल्यानंतर अनेक देशद्रोही कृत्यांमध्ये भाग घेतला.
सर्वप्रथम त्यांनी रेल्वेत एका प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील पैसे व ओळखपत्र लुटून नेली. आंध्रप्रदेशमध्ये एप्रिल २०१४ मध्ये पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत गुड्डूचे दोन साथीदार मारले गेले.त्यांच्या खिशात ओडिशाच्या नागरिकांची ओळखपत्र निघाल्यानंतर यंत्रणांनी तपास त्या दिशेने सुरू केला. या फरार आरोपींनी फरार झाल्यानंतर ओडीशामध्ये एक बँक लुटली होती. त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी पुण्यातील फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पार्कींगमध्ये बॉम्बस्फोट केला. याच दरम्यान,गुड्डू हा बिजनौरमध्ये एकेदिवशी घरात बॉम्ब बनवित असतांना स्फोट झाल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. खंडवा जेलमधुन फरार झाल्यानंतर गुड्डू व त्याचे सहकारी दोन वेळेस पोलीसांशी भिडले.वेगवेगळ्या चकमकीत त्यांनी आंध्रा येथे एका पोलीस कर्मचार्याचा व एटीएसच्या एका जवानाची त्यांनी हत्यादेखील केली आहे.
आता मुश्ताकचा शोध
नागपूर येथील अभाविप व आरएसएसच्या कार्यालयाबाहेर बॉम्ब पेरल्यातील प्रमुख आरोपी शेख मुश्ताक शेख शफी (रा.अक्सानगर,जळगाव) हा २००३ मध्ये पोलीसांच्या तावडीतून फरार झाला होता. त्याला जळगावहून नागपूर कारागृहात नेत असतांना वर्धा जिल्ह्यातील करंजा गावातून पोलीसांना चमका देत तो फरार झाला होता.शेख मुश्ताकवर जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात २८ जुलै २००१ रोजी गुर नं. १०३/०१ भादंवि कलम १५३(अ), १२०(ब), १२१(अ), १२२, १२३, २४०, ३४ तसेच स्फोटके बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.२००३मध्ये फरार झाल्यापासून मुश्ताकचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. आतापर्यंतच्या कालावधीत त्याने कधीही परिवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आलेले नाही. मुश्ताक काही काळासाठी मध्यप्रदेश व कोलकातामध्ये राहील्याचा देखील यंत्रणांना संशय आहे.
असा आला जिल्ह्याशी संबंध
शेख महेबुब उर्फ गुड्डूचे आजोबा साधारण २० ते २५ वर्षापूर्वी मुक्ताईनगर येथे स्थायीक झालेले आहेत. उज्जैनमध्ये आजच्या घडीला त्याची एक बहिण व मावशी राहते. त्याच्या उज्जैनवाल्या मावशीने आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे त्याच्या आजोबांनी संपुर्ण परिवार सोबत घेत मुक्ताईनगर येथे स्थायीक झाले. गुड्डू मुळात लहानपणापासून लाजाळू मुलगा होता. उदरनिर्वाहसाठी तो टेलरींग व्यवसाय करायचा. मात्र मावशीच्या विवाहाचा मुद्दा व तत्कालीन अन्य काही कारणे सांगत त्याचे ब्रेन वॉश करण्यात आले. गुड्डूचे आपल्या आईशी खूप जवळचे भावनिक नाते आहे. त्यामुळे त्याची आई नजमा पती आजारी असतांनादेखील आपल्या मुलासोबत निघून गेली.एक वर्षापूर्वी गुड्डूच्या वडिलांचे निधन झाले.अंत्यसंस्काराला देखील तो आला नव्हता.