रामचंद तो पण पाकिस्तानात! ऐकूनच थोड अवघडल्यासारखे होत आहे ना…पण खर आहे ! बोल आणि खुदा के लिए या चित्रपटानंतर बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी सिनेमा पहिला. भन्नाट…अफलातून असाच. मानवी जीवनाच्या मुल्यांचा पदोपदी होणार र्हास आपल्याला चित्रपट पाहताना व्यथित करत राहतो. हा एका सत्य घटनेवर आधारित आहे ‘रामचंद पाकिस्तानी’! दिग्दर्शक मेहरीन जब्बार यांनी यानिमित्ताने एका संवेदनशील कलाकृतीला जन्म घातला आहे.चित्रपट बनविताना दिग्दर्शक जब्बार यांनी कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन ठेवलेला नाही.त्यामुळे काही ठिकाणी चित्रपट भरकटल्यासारखा होतो,गती देखील मंदावते परंतु एक सत्य कहाणी जशीच्या तशी मांडण्यात ते यशस्वी झाले आहेत आणि जब्बार यांच्या याच प्रामाणिकपणाचे कौतुक झाले पाहिजे.
भारतीय संसदवरील हल्ल्यानंतर सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना चित्रपटाला सुरुवात होते.पाकिस्तानातील सीमेलगत असलेले एक छोटे गाव. शेती करून आपला उदरनिर्वाह करणारा दलित कुटुंबातील शंकर (रशीद फारुकी) आणि त्याची पत्नी चंपा (नंदिता दास ) यांचा लहान मुलगा रामचंद (सईद फजल हुसेन) असे तीन जणांचे हे कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणीत असून देखील आनंदात जीवन जगणारे. एक दिवस रामचंद आईवर राग धरत चुकीने सीमा ओलांडत भारताच्या हद्दीत शिरतो त्याचे वडील देखील त्याच्या मागोमाग भारतात शिरतात आणि सुरु होते खरी कहाणी. भारतीय सैन्याच्या ताब्यात सापडल्या नंतर शंकर आणि रामचंदवर कोणताही गुन्हा दाखल न होता त्यांना सरळ तुरुंगात डांबले जाते. तुरुंगात त्यांच्यासारखे कित्येक लोक कित्येक वर्षापासून त्या जेलमध्ये अडकलेले असतात. कोणताही गुन्हा नसताना फक्त एका चुकीमुळे त्यांचे आयुष्य बदलून जाते. आयुष्याची अनेक वर्षे ते या तुरुंगात घालवतात.तिकडे नवरा आणि मुलगा हे परत येतील अशी अशा ठेवून एक-एक दिवस त्यांची वाट पाहत घालवणारी चंपा कालांतराने जीवनाच्या वाटेत जगण्यासाठी आधाराची आस धरत आयुष्यात नवे रंग भरण्याचा प्रयत्न करते यानिमित्ताने तिला आपल्या जीवनात पुन्हा सुख शोधायचे असते मात्र,तिची जात याठिकाणी आडवी येते.दुसरीकडे तुरुंगात रामचंद मोठा होत असतो. तारुण्याच्या अवघ्या पहिल्या पायरीवर पाय ठेवत असतांनाच तुरुंगातील महिला पोलीस असलेली कमला (मारिया वास्ती)कडे रामचंद हळू-हळू आकर्षित होत असतो. एक दिवस कमला आपल्या खऱ्या प्रेमाखातर नोकरी सोडून देते. रामचंदची प्रेमकहाणी बहरण्या आधीच संपते. त्याच दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या समझोत्यातून रामचंदला पाकिस्तानात परत पाठविण्याच्या सूचना येतात.आपल्या वडिलांना सोडून परत जातांना रामचंद प्रेक्षकांना देखील रडवतो.माझी चुकी नसताना मला आई पासून लांब केले आणि आता वडिलांपासून वेगळे करता आहेत त्याचे हे संवाद अक्षरक्षा हृदय पिळून काढतात.रामचंद घरी पोहोचतो काही दिवसांनी त्याचे वडील देखील घरी येतात.
हा चित्रपट पाहत असताना त्या कैद्यांची आठवण होते.जे अनेक वर्षापासून अशा प्रकारे तुरुंगात आयुष्य घालवत आहेत. चुकीने सीमा ओलांडण्याची एवढी मोठी शिक्षा; हे बघून कुठलाही संवेदनशील माणूस हादरतो. केवढा हा मानवी हक्कांचा र्हास. काही जण यामुळे मानसिक संतुलन देखील गमावून बसतात. तुरुंगातील काही गोष्टी अशा असतात की माणूस एकवेळी मरण पत्करायला देखील तयार होतो. दोन्ही देशात अशा प्रकारे अटकेत असलेल्या कैद्यांच्या भावना या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. पाकिस्तानने भारतीय पकडून ठेवले म्हणून आम्ही पाकिस्तानी पकडू ही दोन्ही देशाच्या प्रशासनात असलेली विकृती आपल्याला याठिकाणी दिसते. बिचारे मच्छीमार किवा रामचंद सारखे चुकीने सीमा ओलांडलेल्या लोक हे दोन्ही देशात आहेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्व चौकशी प्रक्रिया पूर्ण करत अशा लोकांना तत्काळ सोडले गेले पाहिजे. शंकरच्या भूमिकेत रशीद फारुकी यांनी कमाल अदाकारी केली आहे.त्यांच्यातला हतबल बाप आणि पती अनेक दृश्यात आपल्या डोळ्यातून पाणी आणतो. रामचंद देखील अनेक ठिकाणी आपले मन जिंकतो. खर सांगायचे झाले तर,सईद फजल हुसेन या बाल कलाकाराने अवार्ड विनिंग काम केले आहे. नंदिता दास आपली छाप सोडण्यात यशस्वी होते. दिग्दर्शक मेहरीन जब्बार यांची मेहनत चित्रपट साफ दिसते. वेगळे चित्रपट पाहण्याची आपल्याला आवड असेल तर ‘रामचंद पाकिस्तानी’ एकदा बघाच…!