
रावेर लोकसभा मतदार संघात भाजप,राष्ट्रवादी, कॉंग्रेससह छोट्या-मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमधील पक्षीय बलाबल पाहता या लोकसभा मतदार संघात काट्याची लढाई होण्याची शक्यता कमीच आहे. कारण बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था,सहकार क्षेत्रात भाजप पर्यायी माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचेच वर्चस्व आहे. काही पक्ष शहरी, तर काही ग्रामीण भागात वर्चस्व राखत असतात. प्रत्येक वर्गातील किवा स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील पक्षीय बलाबल मोठ्या प्रमाणात लोकसभेतील यशापयश ठरवीत असते. रावेर मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता शहरी व ग्रामीण भागात देखील भाजपचीच पकड आहे. दुसरीकडे शिवसेना देखील यावेळी लोकसभेसाठी उमेदवार देणार असल्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होईल.परंतु रावेर लोकसभा मतदार संघ हा अनेक पंचवार्षिक पासून भाजप पर्यायी एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अगदी आ.खडसे यांनी पक्षांतर केले तरी त्यांचा उमेदवारच या मतदार संघात विजयाचा सर्वात मोठा दावेदार असेल, ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही.
पालिकांत भाजपचेच पारडे जड
रावेर लोकसभा मतदारसंघात ९ नगरपालिका तर ४ नगरपंचायती आहेत. त्यातील भुसावळ,जामनेर,सावदा फैजपूर या चार पालिका भाजपकडे तर शिवसेनेच्या ताब्यात यावल ही अवघी एक पालिका आहे. तर मुक्ताईनगर,वरणगाव,शेंदुर्णी आणि बोदवड नगरपंचायती देखील भापाच्या ताब्यात आहेत. दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील समाविष्ट मलकापूर विधानसभा मतदार संघातील मलकापूर पालिकेत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आहे.तर नांदुरा पालिकेत स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आहे. परंतु काही दिवसांपूर्वी येथील नगराध्यक्षांनी भाजपात प्रवेश केला असल्यामुळे ते तूर्त भाजपचेच मानले जात आहे. एकंदरीत भाजपकडे पालिका आणि नगर पंचायत मिळून आठ लोकनियुक्त नगराध्यक्ष तर सात उपनगराध्यक्ष आहेत. दुसरीकडे चोपडा,रावेर या ठिकाणी स्थानिक आघाडींचे नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष आहेत. तर फैजपूर पालिकेत कॉंग्रेसचा उपनगराध्यक्ष आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण २९४ नगरसेवक असून त्यातील भाजपकडे ११२,राष्ट्रवादीकडे २३,शिवसेनेकडे १९ तर कॉंग्रेसकडे ३२ नगरसेवक आहेत. यातील रावेर येथील दारा मोहमंद हे अपक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडणून आले तरी,ते कॉंग्रेसचे मानले जातात. तर चोपडा येथे देखील कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रणित आघाडीचेच नगराध्यक्ष मानले जातात. याच प्रकारे यावल पालिकेत शिवसेनेच्या नगराध्यक्ष असल्या तरी त्याठिकाणी ११ अपक्ष नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेला अवघा एक नगरसेवक आहे. तर कॉंग्रेसकडे या पालिकेत ८ नगरसेवक आहेत. कॉंग्रेसचे सर्वाधिक १६ नगरसेवक मलकापूर पालिकेत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघात स्थानिक आघाडींचे एकूण ५६ तर अपक्ष आणि छोट्या पक्षांकडे ५२ नगरसेवक आहेत.
२०१४ मधील पालिकांमधील स्थिती
२०१४ मध्ये राष्ट्रवादीकडे दोन, काँग्रेसकडे तीन अशा आघाडीच्या ताब्यात पाच नगरपालिका होत्य. यातील फैजपूर आणि भुसावळ राष्ट्रवादीकडे, तर रावेर, जामनेर, चोपडा येथे काँग्रेसचे नगराध्यक्ष होते. भाजपकडे पक्षाचा अधिकृत एकही नगराध्यक्ष नसला तरी सावदा आणि यावल पालिकांत भाजपचे कार्यकर्ते असलेले नगराध्यक्ष होते, तर नांदुरा नगरपरिषदेत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नगराध्यक्ष होते. उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसकडे दोन, भाजपकडे दोन, अपक्ष एक, सर्वपक्षीयचा एक उमेदवार होत.
पंचायत समिती सभापती
रावेर लोकसभा मतदारसंघात नऊ पंचायत समित्या असून, त्यातील रावेर,यावल,भुसावळ,जामनेर,मुक्ताईनगर,बोदवड,चोपडा व मलकापूर या एकूण आठ पंचायत समितींवर भाजपचा झेंडा आहे. याठिकाणी भाजपचे सभापती विराजमान असून उपसभापती सहा आहेत.तर चोपडा येथे शिवसेनेचा एक उपसभापती आहे. दुसरीकडे नांदुरा पंचायत समिती कॉंग्रेसच्या ताब्यात असून या ठिकाणी भाजपचा उपसभापती आहे. रावेर मतदारसंघात एकूण ८० पंचायत समितीच्या गणांमध्ये भाजपकडे सर्वाधिक ४७ जागा आहेत.तर राष्ट्रवादीकडे १४,कॉंग्रेसकडे ९,शिवसेनेकडे ८ जागा तर २ जागा अपक्षांकडे आहेत. दरम्यान, २०१४ मध्ये या मतदार संघात ८२ पंचायत समिती गण होते. त्यापैकी ३९ सदस्य आघाडीकडे (राष्ट्रवादीचे २०, काँग्रेसचे १९), ४१ महायुतीकडे (भाजपचे ३८, शिवसेनेचे ३), १ सदस्य अपक्ष होता.
जिल्हा परिषदेतही भाजपच वरचढ
रावेर लोकसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे ४० गट आहेत. त्यापैकी सर्वाधिक २५ जिल्हा परिषद सदस्य भाजपकडे आहेत. जळगाव जिल्हापरिषदच्या एकूण ६७ सदस्यांपैकी तब्बल २२ जिल्हा परिषद सदस्य रावेर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीकडे ६,कॉंग्रेसकडे ६ तर शिवसेनेकडे ३ सदस्य आहेत. विशेष म्हणजे जळगाव लोकसभा मतदार संघाप्रमाणे या मतदार संघात देखील जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे आहे. बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मलकापूर तालुक्याकडे आहे. चोपडा येथे भाजप ३ राष्ट्रवादी १, काँग्रेस १, शिवसेना १, यावलमध्ये भाजप ३, काँग्रेस २, रावेरमध्ये भाजप ४, राष्ट्रवादी १,कॉंग्रेस १ मुक्ताईनगरमध्ये भाजपचे ४, बोदवडमध्ये भाजप २, जामनेरमध्ये भाजप ५, राष्ट्रवादी २, भुसावळमध्ये राष्ट्रवादी १, भाजप १,शिवसेना १, मलकापुरात भाजप २, राष्ट्रवादी १, तर नांदुरा येथे काँग्रेसचे २, भाजप १ तर शिवसेनेचा १ सदस्य आहे.
दरम्यान, २०१४ मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे ४१ गट होते. त्यापैकी महायुतीचे २० तर आघाडीचे २१ जिल्हापरिषद सदस्य होते. चोपडा येथे राष्ट्रवादी ३, काँग्रेस १, शिवसेना २, यावलमध्ये भाजप १, काँग्रेस ४, रावेरमध्ये राष्ट्रवादी १, भाजप ४, काँग्रेस १, मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी १, भाजपचे २, शिवसेना १, बोदवडमध्ये राष्ट्रवादी १, भाजप १, जामनेरमध्ये भाजप ६, काँग्रेस १, भुसावळमध्ये राष्ट्रवादी ३, भाजप १, मलकापुरात राष्ट्रवादी १, भाजप १, काँग्रेसचा १, तर नांदुरा येथे काँग्रेसचे ३, शिवसेनेचा १ सदस्य होता.
विधानसभेत भाजपचाच बोलबाला
रावेर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहापैकी तब्बल पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.त्यात मुक्ताईनगर-बोदवडमधून माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जामनेरमधून जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मलकापूर- नांदुरा येथून चैनसुख संचेती,रावेर-यावमधून हरिभाऊ जावळे तर भुसावळमधून माजी पालकमंत्री संजय सावकारे यांचा समावेश आहे. शिवसेनेकडे प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) हे एकमेव आमदार आहेत. या मतदारसंघात रक्षाताई खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. दरम्यान,२०१४ मध्ये या मतदार संघात महायुतीचे तीन आमदार होते. तर शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. तर आघाडीचे याठिकाणी तीन आमदार होते. गतवेळी या मतदारसंघात हरिभाऊ जावळे भाजपचे खासदार होते.
२००९ व २०१४ मधील स्थिती
रावेर लोकसभा मतदार संघात अनेक वर्षापासून भाजपचाच उमेदवार निवडून येत आहे. २००९मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ जावळे यांना ३,२८,८४३ मते मिळाली होती.तर राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड.रवींद्रभैय्या पाटील यांना ३,००,६२५ मते मिळाली होती. २८ हजार २०मतांनी हरिभाऊ यांनी हा विजय संपादन केला होता. परंतु २०१४ मध्ये रक्षाताई खडसे यांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी मनीष जैन यांचा तब्बल ३ लाख १८ हजार ६८ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत रक्षाताई यांना ६ लाख ५ हजार ४५२ मते मिळाली होती.तर मनीष जैन यांना अवघी २ लाख ८७ हजार ३८४ मते मिळाली होती.
२००९ मध्ये राष्ट्रवादीची थोडी ताकत कमी पडली अन्यथा हा मतदार संघ भाजपच्या ताब्यातून जातो की, काय अशी स्थिती निर्माण झाली होती. २००९ मध्ये बहुजन समाजवादी पक्ष(बसपा)चे उमेदवार सुरेश चिंधू पाटील यांनी तब्बल ३३ हजार ३२५मतं तर भारिप बहुजन महासंघाचे तेली शेख इस्माईल यांनी ११ हजार ४९६ मते मिळविली होती. त्याच बरोबर अपक्ष सुजाता तदवी (६,२६७), अपक्ष संजय खांडेलकर (५,६९२) अपक्ष विवेक पाटील (५,६७९) अपक्ष ज्ञानेश्वर वाणी यांना (४,५१२) मते मिळवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक मते समविचारी पक्ष म्हटल्या जाणाऱ्या बसपाने घेतली.
बसपाने मिळविलेली मते ही राष्ट्रवादीच्या हक्काची मते होती. कदाचित बसपाचा उमेदवार नसता तर याठिकाणी राष्ट्रावादीचे अॅड.रवींद्रभैय्या पाटील यांचा विजय निश्चीत होता. कारण या निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी २८,२१८ मतांनी विजय मिळविला होता. तर दुसरीकडे बसपाच्या उमेदवाराने ३३ हजारापेक्षा अधिक मते मिळविली होती. २०१४ मध्ये मात्र, हरिभाऊ जावळे यांचे तिकीट ऐनवेळी जाहीर झाल्यानंतरअचानक कापण्यात आले होते आणि रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात लई होती. मोदी लाट आणि निखील खडसे यांच्या निधनानंतर रक्षाताई यांच्याबद्दल असलेली सहानभूतीमुळे त्यांनी रेकॉर्ड ब्रेक मते मिळवीत विजय संपादन केला. परंतु या निवडणुकीत देखील बहुजन समाजवादी पक्ष(बसपा) ने तब्बल २९ हजार ७५२ मते मिळविली. याचाच अर्थ या मतदार संघात बसपा आपला एक फिक्स वोटबँक तयार करून आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मनीष ईश्वरलाल जैन यांच्या नावाशी साम्य असलेले मनीष सतीश जैन या उमेदवाराने तब्बल १४ हजार ५९९ मते मिळविली होती. तर ‘आप’ चे राजीव शर्मा यांनी ३ हजार ७५६ तर अपक्ष उमेदवार मोहन चव्हाण यांनी ८ हजार ७९७ मते मिळविली होती. तर कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांनी २१ हजार ३३२ मते मिळविली होती.
भाजपचे बलस्थान आणि कमकूवत बाजू
जळगाव जिल्हा भाजप सध्या एकनाथराव खडसे आणि गिरीष महाजन यांच्यातील शीतयुद्धामुळे ढवळून निघाली आहे. आजच्या घडीला भाजपची हीच सर्वात कमकूवत बाजू आहे. विशेष म्हणजे या दोघं नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदार संघातच येतात. परंतु जामनेर वगळता ना.महाजन यांना अजूनही इतर मतदार संघात खडसे यांच्या प्रमाणे पकड बनविता आलेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघ हा अद्यापही खडसे यांचा बालेकिल्लाच मानला जातो. परंतु या मतदार संघातील रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात ना.महाजन यांचे कट्टरसमर्थक अनिल चौधरी हे तयारी करताय. त्यामुळे याचा फटका विधानसभा व लोकसभा या दोन्ही निवडणुकीत भाजपलाच बसण्याची अधिक भीती आहे. दुसरीकडे मागील निवडणुकीत ऐनवेळी हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापले गेल्यामुळे त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. गतवेळी निवडून आले असते तर श्री.जावळे हे केंद्रातील मंत्रीपदाचे दावेदार राहिले असते. कदाचित २०२० मध्ये उभे राहून मंत्रीपदाची इच्छा पूर्ण करण्याची त्यांचा मानस असू शकते. त्यामुळे तिकिटासाठी भाजपमध्ये स्पर्धा निर्माण होऊ शकते. दुसरीकडे आ. खडसे यांचे भाजपातील वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या स्नुषा रक्षाताई खडसे यांचे तिकीट कापले गेल्यास गुणवंतराव सरोदे यांचे चिरंजीव अतुल सरोदे, आमदार हरिभाऊ जावळे यांचे नाव समोर येऊ शकते. परंतु खडसे यांचा पाठींबा असल्याशिवाय या मतदार संघात भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला विजय मिळविणे पाहिजे तेवढे सोपे नाही,हे देखील तेवढेच खरे आहे.
या मतदार संघात लेवा समाज बहुसंख्य असल्यामुळे या मतदार संघात कायमच लेवा उमेदवार विजय मिळवीत आलेला आहे. विद्यमान खासदा रक्षाताई खडसे यांचा जनसंपर्क प्रचंड मोठा आहे.अगदी या मतदार संघातील प्रत्येक आदिवासी पाड्यावर त्यांनी भेट दिली आहे. सोशल मिडीयावर त्यांच्या समर्थकांची संख्या लाखो-करोडोच्या घरात आहे. रक्षाताई या मतदार संघातील प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे त्यांच्या जनसंपर्कात मोठी भर पडली आहे. विकास कामांमुळे देखील त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. जिल्ह्यात सलग काही वर्षापासून सैन्यभरती आणण्यासाठी रक्षाताई यांचे विशेष प्रयत्न असल्यामुळे खासकरून त्या तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. विविध प्रवाशी रेल्वे गाड्याना थांबा मिळवून दिल्यामुळे देखील सर्वसामान्य नागरिकांमध्येही त्या लोकप्रिय आहेत. तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच पालिकांमध्ये भाजपची असलेली मजबूत स्थिती या सर्व गोष्टी भाजपच्या बलस्थान आहेत.
राष्ट्रवादी व शिवसेनेचे बलस्थान आणि कमकूवत बाजू
रावेर लोकसभा मतदार संघात भाजपानंतर राष्ट्रवादीची सर्वाधिक ताकत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपनंतर राष्ट्रवादीच मोठा पक्ष आहे. या मतदार संघाची जागा राष्ट्रवादीकडेच आहे. परंतु नेत्यांमध्ये एकजूट नसल्यामुळे राष्ट्रवादी या ठिकाणी कमकूवत आहे. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील या तिघांनी मिळून एक उमेदवार दिल्यास ते भाजप समोर चांगले आव्हान उभे करू शकतात. परंतु या मतदार संघात कॉंग्रेसचे डॉ.उल्हास पाटील अनेक वर्षापासून काम करताय. त्यांनी या मतदार संघात एकदा विजय देखील मिळविलेला आहे. परंतु ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे त्यांना मर्यादा आल्या आहेत. यंदा जागा वाटपात रावेरची जागा पुन्हा कॉंग्रेसला मिळाल्यास डॉ.पाटील हे इच्छुक असतील.परंतु दोन वेळेस पराभूत झालेल्या उमेदवारास कॉंग्रेस उमेदवारी देईल का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. एकंदरीत रावेर लोकसभा मतदार संघात भाजप अर्थात खडसे यांच्या विरोधात उभा राहू शकेल असा एकही उमेदवार कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे नाहीय, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे रावेरच्या लोकसभेच्या जागेसाठी आघाडीतील दोघा काँग्रेसकडून रस्सीखेच नुसती नावालाच आहे. शिवसेनेकडून या मतदार संघात चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांचे नाव समोर आले होते. तर जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, ह. भ. प. ज्ञानेश्वर जळकेकर यांनी देखील चाचपणी सुरु केली आहे. परंतु सामाजिक गणितात शिवसेना उमेदवारांचे समीकरण कितपत बसेल याबाबत शंकाच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देखील भाजपच्या तुलनेत शिवसेनेची ताकत कमकूवत आहे. एकंदरीत शिवसैनिक ही शिवसेनेचे बलस्थान आहे. मात्र,राजकीय समीकरणात या मतदार संघात शिवसेना खूपच कमकूवत आहे.
रावेर लोकसभा मध्ये भाजपाला एकच पर्याय फक्त आणि फक्त रक्षाताई खडसे ..
King Maker’s…..Natha Bhau..
रावेर लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार.रक्षा ताई खडसे
Only boss nathabhau
नाथाभाऊ ज्याच्या मागे -तोच विजयी होईल –