असं म्हणतात की, साहित्याला जात,पात अन् धर्म नसतो. ते अवघ्या विश्वासाठी असते. साहित्यामुळे अवघ्या मानव जातीला समता, बंधुता आणि स्वातंत्र्याची अनुभूती मिळालीय. परंतु आजच्या घडीला साहित्य संमेलनं जात-पात, धर्म आणि विविध संवर्गात अडकल्याचे दिसून येतेय. सर्वच साहित्य संमेलनं विशिष्ट चौकटीत बंदिस्त झाले तर मुख्य धारेच्या साहित्याचा वाचक कसा शिल्लक राहील?
विशिष्ट संमेलनात, विशिष्टच साहित्यिक… हे तर जणू जाती-धर्माचे कंपू तयार करण्यासारखेच झाले. दोन ओळी न लिहिताही साहित्यांकाच्या रांगेत बसता यावे, म्हणून काही जण संमेलनेच नव्हे, तर साहित्य संस्कृतीही जणू ‘हायजॅक’ करू पाहताय. मराठी भाषा आणि वाङ्मयम यांच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने उपकारकच ठरतात, यात शंका असण्याचं काही कारणच नाही. म्हणूनच जात,पात आणि संवर्गनिहाय संमेलनं आता खोटा गर्व बाळगणाऱ्या जात-पातीच्या विविध संघटनांच्या रांगेत जाऊन बसू नयेत,असचं राहून राहून वाटतं. काही वर्षापासून साजरी होत असलेल्या साहित्य संमेलनांमध्ये तर गुणात्मकदृष्टय़ा मोठी तफावत पडल्याचेही तीव्रतेने जाणवतेय.
आजच्या घडीला समाजातील जळत्या प्रश्नांसंदर्भात संमेलनं भूमिका घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य मराठीजनाला साहित्य संमेलनं आपली वाटतच नाहीय. भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा साहित्यिक आणि आयोजक दोघंही पळपुटेपणाची भूमिका घेतात. शब्दांचे खेळ मांडून प्रस्थापितांच्या विरोधात थेट भूमिका घेण्याचे पद्धतशीरपणे टाळले जाते. म्हणून आजची साहित्य संमेलनांची मंडपं खाली पडलेली दिसतात. मग ही मंडपं भरण्यासाठी राजकीय अतिथी बोलावले जातात. परंतु अशा गर्दीतील किती जणांना साहित्य अभिरुची असते? आणि अशी गर्दी साहित्य अभिरुचीचा पुरावा होऊ शकते का?, याबाबत विचार करण्याची नितांत गरज आहे.
सध्याची साहित्य संमेलनं म्हणजे आयोजकांसाठी हितसंबंध, खास करून राजकीय जवळीकता वाढविण्याचे साधन झालेय. त्यामुळे संमेलनं भरविण्याच्या मूळ उद्दिष्टांपासूनच अनेक संमेलनं दूर जात असल्याचेही दिसून येतेय. खरं म्हणजे सध्याच्या संमेलनांचे मूळ स्वरूप कुठेतरी भरकटल्यासारखे झालेय. हे मत केवळ माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी भाषाप्रेमीचे नाहीय. कुणात धाडस असेल तर सध्याच्या आयोजकांनी मोठे साहित्यिक किंवा अवघ्या मराठीजनांच्या मनाचा ठाव घ्यावा,शंभर टक्के खात्री देतो उत्तर हमखास मिळेल. टाईमपास म्हणून भरवल्या जाणाऱ्या संमेलनामुळे भविष्यात साहित्य संमेलनं कालबाह्य ठरल्यास आश्चर्य वाटणार नाही. मुळात आजच्या तरुणाईने साहित्य संमेलनांची खरचं गरज आहे का?, असा प्रश्न उपस्थित केल्यास कुणीही खजील होण्याचे कारण नाही.