अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर कंगना राणावतसह अनेक महिला पत्रकार आता उघडपणे आपले अनुभव सांगायला लागले आहेत. आज तर गायक कैलास खैरवर देखील लैंगिक छळाचा आरोप झालाय. थोडक्यात भारतात तब्बल वर्षभरानंतर #MeToo. ही चळवळ जोर धरायला लागली आहे. साधारण वर्षभरापूर्वी सोशल मीडियातील या चळवळीने अमेरिका, चीनमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली होती. खरं म्हणजे माझ्या मते #MeToo. ही चळवळ फक्त महिलांपुरता मर्यादित न रहाता, पुरुषांनी देखील या चळवळीला बळ दिले पाहिजे. कारण लैंगिक विकृतीला फक्त महिलाच बळी ठरतात, असं नाही तर अनेक तरुण किंवा लहान मुलं देखील कधी ना कधी अशा वाईट अनुभवाला सामोरे गेलेले असतात.
सोशल मीडियावर अनेक गोष्टी ट्रेंड होत असतात, पण 15 ऑक्टोबर, 2017 रोजी #MeToo. या हॅशटॅग ट्रेंड सुरु झाला आणि एकच भूकंप झाला. अनेक सेलिब्रेटींच्या चेहऱ्यावरील सभ्यतेचा चेहरा टराटरा फाटायला लागला होता. जगभरातल्या हजारो महिला एकमेकींना सांगत होत्या, तू एकटीच नाही आहेस, हे माझ्या सोबतही कधी तरी झाले आहे. अर्थात #MeToo. येथूनच ही चळवळ अवघ्या देशात पोहोचली. भारतात पहिल्यांदा बीबीसी या वृत्तवाहिनीने भारतीय महिला सोशल मीडियावर आपले अनुभव का सांगत नाही? हा अनेक महिलांना विचारला होता. मागच्या ऑक्टोबरमध्ये जगभरात #MeToo. चळवळ धरत असतांना भारतात मात्र या चळवळीला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना राणावत,महिला पत्रकार नताशा हेमरजानी, महिमा कुकरेजा यांनी भारतात #MeToo. चळवळीला बळ दिले आहे. परंतु अनेक भारतीय महिला या चळवळीला समर्थन देतात, परंतु आजही आपले अनुभव शेअर करायला समोर येत नाहीत. मुळात आपल्या कडील परुष प्रधान संस्कृती महिलांना बंड करण्याचे बळ देतच नाही. खास करून लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत. अनेक महिला, तरुणी आपल्या ऑफीस, प्रवासात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी लैंगिक विकृतीच्या बळी ठरलेल्या असतात. मुळात सोशल मीडियात आपण ट्रोल व्हायला नको, या भीतीपोटी सर्व गोष्टी सहन केल्या जातात. आपल्या सोबत गैरवर्तन किंवा लैंगिक शोषण झाले हे सगळं उघडपणे अवघ्या जगासमोर सोशल मिडीयावर मांडायचं, हे भारतीय महिलांना आजही भीतीदायक वाटतं. कारण सोशल मिडीयावर मित्र, नातेवाईक वैगैरे काय म्हणतील? ही भीती त्यांना कायम अस्वस्थ करत असते. तर आपल्या पाठीशी कुणी उभं राहील किंवा नाही, ही आणखी एक वेगळीच भीती मनात असते.
माझ्या मते #MeToo. ही चळवळ पर्टीक्युलर जेंडरसाठी मर्यादित राहायला नको. अनेक पुरुष, तरुण किंवा लहान मुलं देखील लैंगिक विकृतीच्या अनुभवातून गेलेले असतात. त्यामुळे पिडीत हा पिडीत आहे, त्याला विशिष्ठ लिंगाच्या व्यक्तीपुरता मर्यादित ठेऊ नका. मुळात सर्व पिडीतांना होणारे दु:ख सारखेच असते.अनेक लहान मुलांवर लैंगिक अत्याचार, हे परिचयातील लोकांकडूनच झालेले असतात. मुळात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध बोलणे जेवढं महिलांना कठीण असते, तेवढेच मुलांनाही असते. आपण व्यक्त झालो तर, लोकं आपल्यावर किती हसतील? आपल्याला हिजडा, मामू किंवा तृतीयपंथी म्हणतील ही भीती अनेकांच्या मनात असते. लहान मुलांच्या लैंगिक शोषणावर असलेली ‘हिडन शेम ऑफ पाकिस्तान’ ही डॉक्युमेंटरी तर मन, मेंदू सुन्न करून टाकते. लहान मुलांना पाकिस्तानात कशा पद्धतीने लैंगिक अत्याचाराला सामोरे जातात, हे बघणे अंगावर काटा आणणारे आहे.
परभणीत एका विवाहित तरुणाला वारंवार शारीरिक सुखाची मागणी करून महिलेने त्रस्त करून सोडले होते. यासाठी तिने त्याला बदनामीची धमकीही दिली होती, या त्रासाला कंटाळून अखेर सचिन मिटकरी या युवकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने सविस्तर लिहून ठेवले होते. ‘माझ्यासोबत संबंध ठेव, नाहीतर तुझी बदनामी करीन,’ अशी धमकी महिलेकडून वारंवार मिळाल्याने सचिनने टोकाचे पाऊल उचलले. सचिनला एका महिलेकडून शरीरसुखाची सतत मागणी करण्यात येत होती. तसेच असे न केल्यास बदनामी करण्याची धमकीही देण्यात येत होती. याच भीतीपोटी सचिन मिटकरीने गळफास लावून आत्महत्या केली. ‘तिच्या धमकीनंतर बदनामीच्या भीतीने मी माझे जीवन संपवत आहे,’ असे सचिनने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याच महिलेने 2 दिवसांपूर्वी सचिनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे हताश झालेल्या सचिनने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. सध्या देशभरात #MeToo मोहिमेच्या माध्यमातून अनेक शोषित महिला पुढे येत आपल्यावरील लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत आहे. परंतु, या घटनेवरून #Metoo चळवळ फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांदेखील असली पाहिजे. या चळवळीत कुठील्याही प्रकारे लिंक भेद असायला नको.