आमच्या धरणगावला तसं वाईट राजकारणाने पूर्ण पोखरून काढलेय. सट्टा, पत्ता आणि दारूच्या धंद्याने एक वेगळी उंची गाठलीय. कारण धरणगावात दोन नंबरच्या धंदा करणाऱ्या राजकारण्यांना सामाजिक प्रतिष्ठा आहे. परंतु स्वच्छ आणि प्रामाणिक राजकारणाचा आव आणणारे अवैध धंद्यांच्या बाबतीत मात्र कायमच मुग गिळून गप्प असतात. काही जण रस्त्यावर एवढी छाती काढून चालतात की, आजुबाजूने येणाऱ्या-जाणाऱ्याला रस्ता देखील मिळत नाही, असे कथित दादा देखील दोन नंबरवाल्यांविरूढ बोलायची हिंमत करत नाही. अशा भयग्रस्त वातावरणात एक पोरगी हजार-दोन हजार लोकांमध्ये उभी राहत. आपल्या हातात माईक घेऊन माझ्या गावात गल्लो-गल्ली अवैध धंदे असल्याचे सांगते. त्यावेळी मात्र, ‘खूब बोली मर्दानी ! म्हटल्या शिवाय राहवत नाही.
‘या देवी सर्वभूतेषु, शक्ति रुपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शान्ति रुपेण संस्थिता’ या गीतातून स्फुरण घेत ‘मर्दानी’ वाईट प्रवृत्तीविरुद्ध लढते, असे अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ या चित्रपटात दाखविण्यात आले होते. परंतु रिअल लाइफमध्ये असं फार क्वचित घडत असते. असचं काहीसं चित्र शुक्रवारी धरणगाव महाविद्यालयात बघावयास मिळाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे या विद्यार्थिनीशी संवाद साधत होत्या. त्यावेळी एक विद्यार्थिनीने हातात माईक घेऊन बोलायला लागली. ताई…आमच्या गावात प्रत्येक पानटपरीवर दारू मिळते. प्रत्येक टपरीवर सट्ट्याची पाटी लागलेली असते. राजकारण्यांचेच हे धंदे असल्यामुळे वाईट परिस्थिती आहे. तुम्ही यासाठी काही करू शकणार का?
विद्यार्थिनीच्या या प्रश्नावर सुप्रियाताईंनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना विचारले की, अप्पा विरोधक म्हणून आपल्या पक्षाने याविरुद्ध काय आवाज उठविला ते सांगा? त्यावर देवकरअप्पांनी सांगितले की, तब्बल तीन वेळेस पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले, मोर्चा काढला. परंतु राजकीय दबावाखाली पोलीस प्रशासन कारवाई करीत नाही. सुप्रियाताईंनी तेथूनच पोलीस अधीक्षकांना फोन लावून माहिती दिली. तसचं संबंधित विद्यार्थिनीला आसवस्थ केले की, तीला यापुढे दोन नंबरच्या धंद्यावाल्यांमुळे धरणीतून कॉलेजला येतांना, अवैध धंद्याच्या झुंडीला पार करून यावे लागणार नाही.
मुळात धरणगावात अवैध धंद्यांनी कहर केलाय. राजकारणी मंडळींचेच धंदे किंवा पाठींबा असल्यामुळे गल्लो-गल्ली किळसवाने वातावरण झालेय. अशी भयंकर परिस्थिती असतांना देखील कुणीही बोलायला तयार नाही. राजकारणी मंडळींचे धंदे असल्यामुळे कुणी बोलत नाही आणि आंदोलनही करत नाही. कुणी राजकारण्यांने आंदोलन केलं तर तोडपाणी करण्यात तो देखील धन्यता मानतो. लक्षात घ्या…एक विद्यार्थिनी ज्यावेळी बोलतेय, याचाच अर्थ आता हाताबाहेर परिस्थिती जातेय. आपली मुलं बोलायला लागली तरी आपण गप्प आहोत. लक्षात ठेवा, इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
मुळात धरणगावात दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाल्यामुळे आजच्या तरुणाई समोरचे आदर्श बदलेयत. तहसील, पोलीस स्थानकात अशाच दोन नंबरच्या राजकारण्यांना प्रतिष्ठा मिळते. विविध शासकीय मिटिंगांमध्ये पहिल्या रांगेपासून तर थेट व्यासपीठावर दोन नंबरवाल्यांचा वावर असतो. त्यामुळे गावातील डॉक्टर, वकील, उद्द्योजक किंवा सर्वसामान्य नागरिक अशा बैठकींपासून अलिप्तच राहतो. काही महिन्यांपासून गावातील अनेक जणांचे मला फोन येताय. भाऊ…आम्ही दोन नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांचे भाषण ऐकण्यासाठी किंवा त्याच्यासोबत मांडीला मांडी लावून बसण्यासाठी शासकीय बैठकींना जायचे का? अशा लोकांना जोपर्यंत अशा बैठकींमधून हद्दपार केले जात नाही, तोपर्यंत सुशिक्षित राजकारणी किंवा नागरीक अशा ठिकाणी कसे जातील? तुम्ही यावर लिहा, अगदी आमच्या नावाने लिहा. धरणगावात शंकरवार साहेब असतांना दोन नंबरचे धंदे करणाऱ्या चांगल्या राजकारण्यांची पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला देखील फिरण्याची हिंमत नव्हती. मित्रहो…खरं म्हणजे लिहिण्याच्या पलीकडे माझ्या हातात काही नाहीय.
मी अनेकदा चुकीच्या गोष्टींविरुद्ध लिहित असतो.यापुढे देखील लिहिणार. परंतु आता सर्वसामान्य धरणगावकर एकत्र आला पाहिजे, अन्यथा भविष्य खराब आहे. तेव्हा व्यक्त व्हा…अन्यथा पुढची पिढी आपल्याा मौनाचा जाब आपल्याला विचारल्या शिवाय राहणार नाही. तूर्त सुप्रियाताईंच्या दौऱ्याचे एक चांगले फलित काय तर, किमान एक विद्यार्थिनीने अवैध धंद्याविरुद्ध बोलायची हिंमत केली. ज्या धंद्याविरूढ भले भले मर्द बोलत नाही, त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी धाड-धाड बोलून जाते. त्या वेळी आपसूकच तोंडातून निघते की…खूब बोली मर्दानी… खूब बोली…!