नशिबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेंचा
आलं डोयाले पानी
खानदेशातील महान कवियत्री बहीणाबाई चौधरी यांनी ‘वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी’ या कवितेतून जीवनाची वाट किती बिकट असते,यावर सुंदर आणि समर्पक शब्दात भाष्य केलेलं आहे. त्याच बहिणाबाईंचे माहेर असलेल्या असोदा गावात मंगळवारी एका तरुणाने नौकरी मिळत नाही,म्हणून आत्महत्या केलीय. आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने उच्च शिक्षण घ्यायला पोट कापून पैसा पुरवला. परंतु मिळत नसलेल्या नौकरी अभावी माय-बापाचा संघर्ष उतरत्या वयात देखील संपत नाहीय, या नैराश्यातून बी.ई झालेल्या हितेंद्र महाजन या अवघ्या २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु माझ्या मते ही आत्महत्या नव्हे तर हितेंद्रचा आपल्या सिस्टमने केलेला ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’च आहे. मुळात माझ्या मते इंजिनिअरिंग कॉलेज बेरोजगार तरुण निर्माण करण्याचा एक मोठा कारखाना झालाय. सरकार नौकरी देऊ शकत नसेल, तर एवढे इंजिनिअर का तयार करतेय?
अभियांत्रिकी सारखे उच्च शिक्षण घेऊन देखील नौकरी मिळत नसेल, तर ही गंभीर बाब आहे. हिंतेंद्रला आपल्या आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची पूर्ण जाण असेल म्हणूनच तो, नौकरी अभावी कमालीचा अस्वस्थ झाला असेल आणि त्यातून त्याने टोकाची भूमिका घेतली असेल. आपल्या मार्केटमध्ये अभियांत्रिकीचा रोजगार नसेल तर शासन अभियांत्रिकी महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणात परवानग्या का देतेय? गरिबाने पोट कापून आपल्या पोरांना महागडे शिक्षण द्यायचे आणि दुसरीकडे सरकराने रोजगार निर्माण करण्यासाठी कुठेलेही प्रयत्न करायचे नाहीत. एकीकडे कॉलेज उघडायला परवानगी द्यायची आणि पोरांनी नौकरी मागितली तर हात वर करायचे. ‘जशी मागणी, तसे उत्पादन’ या धोरणाचा तर कुठे थांगपत्ताच नाहीय. अशीच काहीशी गत काही वर्षापूर्वी बी.एड कॉलेजेसच्या संदर्भात झाली होती.
राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी अभियांत्रिकीसारख्या महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी मान्यता दिल्या जाताय. ही एकप्रकारे पालकांची लुट आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत सुरु असेलला एक खेळ आहे. त्यामुळे हितेंद्रच्या मृत्यूस आपले सिस्टमच जबाबदार आहे. तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशाच्या तुलनेत दरवर्षी रोजगार निर्माण करू शकत नाही, तर इतके कॉलेज उघडण्याचा काय फायदा? परंतु यात आपली देखील चूक आहे. कारण एकीकडे देशातील तरुण नौकरीसाठी आत्महत्या करताय आणि आपण राजकीय वादात अडकून पडलोय. त्यामुळे आपण आताच जर व्यवस्था सुधारली नाही, तर भविष्यात आपल्या घरात देखील एखादं हितेंद्र आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे सावध होण्याची हीच वेळ आहे,अन्यथा हितेंद्र सारख्या अनेक तरुणांचे भवितव्य धोक्याच्या वळणार आहे.
निवडणुकीच्या वेळी प्रत्येक उमेदवार आपल्या मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करणार म्हणून गळा बसेपर्यंत प्रचार करतात. मुळात हाच प्रचार सर्वच राजकीय पक्ष देखील राज्यभर,देशभर करत फिरत असतात. विशेष करून विरोधी पक्ष आणि त्यांचे उमेदवार तर असा आव आणतात की, ते निवडून आले म्हणजे नवीन उद्योग आणि सरकारी नौकऱ्या मिळाल्या म्हणूनच समजा. जळगावच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येक गावात गल्लो,गल्ली तरुण नौकरीसाठी परेशान आहेत. परंतु नौकरीपेक्षा आपल्या समाजाला राजकीय चर्चा फार जास्त महत्वपूर्ण वाटते. राहुल गांधी की नरेंद्र मोदी, २०१९ मध्ये कोण निवडून येणार? आपल्या मुलांच्या नौकरीपेक्षा ही चर्चा अधिक महत्वपूर्ण होत चाललीय. मोदी निवडून आले आणि राहुल जिंकले तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? या उलट सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांवर असा दबाव निर्माण करा की, रोजगार निर्माण नाही केला, तर लोकं आपल्याला पुढील वेळेस मत मागायला दाराची पायरीसुद्धा चढू देणार नाहीत.
विरोधात असतांना प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचा नेता रोजगार मिळवून देण्याची भाषा करतो. सत्ता मिळाल्यानंतर मात्र, आपल्या तरुणांची माथी भडकवण्यासाठी विविध भावनिक राजकीय मुद्दे पुढे करून पद्धतशीर विषयांतर करतो, हे सत्य आतापर्यंत आपण बघत आलेलो आहोत.दगाबाजीचा हा निकष प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना लागू होतो. तुम्ही-आपण नौकरी, बेरोजगारीची समस्येबाबत प्रश्न विचारू नये, म्हणून हिंदू-मुस्लीम, गो माता, हिंदुत्व, पाकिस्तान वैगैरे वैगरे मुद्दे पद्धतशीरपणे आपल्यासमोर सतत पेटले ठेवले जातात. कधी काळी अभियांत्रिकीचे शिक्षण म्हणजे गडगंज पगाराच्या नौकरीची हमखास हमी, असे गणित होते. परंतु आज अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे बेरोजगार तरुण तयार करण्याचा मोठा कारखाना झालाय.त्यामुळे इंजिनिअरिंगपेक्षा आता आयटीआय झालेल्या तरुणांना अधिक मागणी आहे.
देशाची सत्ता मिळाल्यास दरवर्षी २ करोड रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी देण्यात आले होते. निवडून आल्यानंतर विविध योजनांमधून दहा लाख तरुणांना उद्योगासाठी कर्ज दिल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु मित्रांनो, फक्त आपल्या आजुबाजूला बघा आणि सांगा…तुमच्या कोणत्या मित्राला, नातेवाईकाला सरकारी नौकरी लागली? कुणाला उद्योगासाठी कर्ज मिळाले? ज्यावेळी नौकरीचा विषय येतो,त्यावेळी काही निर्लज्ज राजकारणी तर तरुणांना वडापाव विकायचा सल्ला देतात. हाच सल्ला ऐकण्यासाठी लोकांनी निवडून दिले होते का? हाच सल्ला तुमच्या पोरांना द्या, मग कळेल?
एकीकडे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत नाहीय. सर्वसामान्य व्यक्तीची दैनदिन आवकमध्ये वृद्धीच्या ऐवजी दिवसेंदिवस कमालीची घसरण होतेय आणि दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी प्रतिदिन ३०० कोटी रुपयांनी वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ३ लाख ७१ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत गेल्या सात वर्षांपासून प्रथम स्थानी विराजमान आहेत. एका वर्षात त्यांच्या कंपनीच्या समभागांच्या भावात ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मल्ल्या, चौकसी, मोदी सारखे उद्योजक देशाचे लाखो करोड रुपये घेऊन विदेशात आनंदी जीवन जगताय. मल्ल्या, चौकसी, मोदी सारख्या भामट्यांना विविध बँका हजारो करोडचे कर्ज देतात आणि दुसरीकडे बँकवाले पाच-पन्नास हजाराचे कर्ज फेडले नाही, म्हणून सर्वसामान्य व्यक्ती आणि शेतकऱ्याच्या दाराशी ढोल-ताशे वाजवून त्याची इज्जत घेताय. थकीत कर्जाची रक्कम बघितली तर मल्ल्या, चौकशी, मोदी यांच्या घराबाहेर फुल्ल आवाजात ‘डीजे’च लावला पाहिजे.
नौकरीच्या समस्येवर देखील आजचा तरुण संतप्त होत नाहीय. बेरोजगारीबाबत राजकारण्यांना प्रश्न विचारला जात नाहीय. हाताला काम मिळावे, सरकारी नौकरीची जाहिरात निघावी म्हणून आंदोलने होत नसतील तर, आताच्या राजकारण्यांसाठी हा ‘हनीमून पिरीयड’ आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण कोणत्याही काळातील तरुणाई सत्ताकेंद्र हलवून सोडण्यास सक्षम असते. परंतु आजच्या घडीला किरकोळ आंदोलन वगळता, नौकरीसाठी देशपातळीवर कुणीही आंदोलन करतांना दिसून येत नाहीय. आजच्या घडीला प्रत्येक कथित नेता जाती,धर्माच्या नावावर लाखोचे मोर्चे काढतो. परंतु हीच मंडळी बेरोजगार तरुणांनासाठी मोर्चे का काढत नाही? सरकारला बेरोजगारीबाबत जाब का विचारत नाही? असे प्रश्न विचारले तर यांच्या पार्श्वभागाला मिरच्या लागतात. आमच्या जातीच्या, धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे,असा भावनिक मुद्दा काढत ते पळ काढतात.
आज अनेक जाती आरक्षण मागताय. मुळात भरमसाठ नौकऱ्या उपलब्ध असल्या तर आरक्षणाची गरज कुणालाच नाहीय. परंतु सरकार रोजगार निर्माण करत नाहीय, त्यामुळे प्रत्येक जातीला आज आरक्षण पाहिजेय. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे आरक्षण आहे, त्यांना आपल्यात कुणी तरी भागीदार होईल, याची भीती सतावतेय. आरक्षणासाठी निघणारे मोर्चे आणि होणाऱ्या आंदोलनांवर प्रभावी उपाय म्हणजे मुबलक रोजगार उपलब्ध करणे. परंतु राजकारण्यांही आपले राजकारण जिवंत ठेवायचे आहे. त्यामुळे अशी आंदोलने अधिक काळ टिकावीत, अशी त्यांची मनस्वी इच्छा असते. परंतु वाढती बेरोजगारी ही समाजासाठी आणि त्याहून अधिक सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची असते.
सर्वसाधारणपणे भारतीय श्रम मंत्रालयकडून ज्याठिकाणी १० पेक्षा अधिक लोकं काम करतात. तेथीलच माहिती संकलित केली जाते. परंतु समाजातील एक मोठा घटक अशा ठिकाणी काम करतो ज्या ठिकाणी दहापेक्षा कमी माणसं काम करतात. अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण केले जाते का? या प्रश्नांचे उत्तर नाही, असे आहे. मुळात अशाच ठिकाणी काम करणाऱ्यांची संख्या मोजल्यास बेरोजगारीचे खरे चित्र आपल्या समोर येईल. ‘थर्ड पार्टी सर्विस प्रोव्हाईडर’च्या नावाखाली तरुणांना तात्पुरत्या स्वरुपात नौकरी देत तटपुंजा पगार दिला जातो. त्यामुळे कायमस्वरूपी नौकऱ्या दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. एवढेच नव्हे, तर अशा ठिकाणी काम करणाऱ्यांना वैद्यकीय किंवा अन्य सुविधा दिल्या जात नाहीय. हातात नाममात्र पगार द्यायचा आणि कामगारांप्रती आपली जबाबदारी कायदेशीर झटकायची भूमिका सध्या लहान-मोठ्या उद्योजकांकडून अवलंबली जात आहे.
जळगाव एमआयडीसीत दररोज शेकडो तरुण आणि महिला आपला जीव मुठीत घेऊन सकाळी कामावर येतात. अनेक कंपन्यांमध्ये मजदुरांच्या सुरक्षतेची योग्य ती काळजी घेतली जात नाही. म्हणून तर अधून-मधून कर्मचारी दुर्घटनेत मेल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. जळगाव जिल्ह्यात भुसावळ जंक्शन, मॅन पाॅवर, विदर्भ, मराठवाड्याला जोडणारे महामार्ग अशा अनेक सुविधा लक्षात घेता नवीन उद्योग जिल्ह्यात सहज येऊ शकत होते. मात्र, राजकीय मंडळीच्या उदासीनतेमुळे बेरोजगारांच्या तुलनेत जळगावातील रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. आता हे प्रयत्न मुद्दाम न केले जाण्याचीही अनेक कारणे आहेत. प्रस्थापित उद्योग समूहाकडील लेबर इतरत्र वळू नये, यासाठी देखील काही राजकारणी संबंधित उद्योगसमूहांकडे आपली निष्ठा गहाण ठेवतात.
मित्रांनो आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलीय. तुमच्याकडे अनेक जण मत मागायला येतील. परंतु या वेळेस राजकीय उमेदवारांना विचारा की, तुम्ही सत्तेत असतांना जळगाव जिल्ह्यात किती रोजगार निर्माण केला? विरोधी पक्षाच्या उमेदवाराला विचारा की, तुम्ही आणि तुमच्या पक्षाने बेराजगार तरुणांसाठी किती आंदोलने केलीत? या निवडणुकीत तुमच्या दारात येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला हे प्रश्न विचाराच. मला विश्वास आहे, मतदान करतांना तुमचे बोट योग्य उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबेल आणि कदाचित हितेंद्र सारख्या इतर कुण्या तरुणाला आत्महत्या करावी लागणार नाही. आपण जर आता डोळे उघडले नाही, तर भविष्यात आपल्या घरातही हितेंद्र प्रमाणे कुणीतरी नैराश्येचे गर्तेत सापडण्याची भीती आहेच.