मंगळवारी भारतीय सेंट्रल रेल्वे भुसावळ कार्मिक विभागाची वेबसाईट अलकायदाने हॅक करत काही पाने नष्ट करुन भारतीय मुस्लिमांना आवाहन करणारा एक संदेश लिहिल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, रेल्वेची हॅक झालेली वेब साईट जळगाव शहरातीलच मेहरूण भागातील डायमंड वेबस् (लक्ष्मीनगर, मेहरूण) या कंपनीने बनविलेली आहे. कंपनीचे संचालक तबरेज खान हे आज भुसावळ येथे रेल्वेच्या अधिकार्यांसोबत बैठकीत व्यस्त होते.तर दुसरीकडे पोलिसांसह विविध यंत्रणांनी या सायबर हल्ल्याची ‘मोस्ट कॉन्फीडेन्शीयल’ चौकशीला सुरूवात केली.
भारतातील मुस्लिमांनी मुस्कट दाबीतून बाहेर येवून जागतीक पातळीवर जिहाद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करणार्या मौलाना आसिम उमल उर्फ सानुल हक याने स्वतःचा उल्लेख भारतीय उपखंडातील अलकायदाचा दक्षिण आशिया शाखेचा प्रमुख असा केलेला आहे. मध्यपूर्वसह जगात अन्यत्र जिहाद्दीना जो संघर्ष करावा लागत आहे. त्या संघर्षात सहभागी होण्यासाठी भारतातील १७२ दशलक्ष मुस्लिम उठून उभे का राहत नाही. असा प्रश्नही त्याने विचारलेला आहे. जागतीक पातळीवर जिहाद्दच्या हलचालीपासून भारतीय मुस्लिम अलिप्त का आहेत, जग भरातील मुस्लिमामध्ये जागरुकता येत असतांना भारतीय मुस्लिम त्यांच्या साचलेपणाच्या मानसिकतेतून बाहेर कधी येणार आहेत, भारतातील बहुसंख्य लोकसंख्या हिंदुची असली तरी जगातील मुस्लिम लोकसंख्येच्या तुलनेत एक तृतीयांश मुस्लिम भारतात राहतात, अलकायदासह इसलामी स्टेट ऑफ इराक या दोघांनाही भारतातून आपल्याला समर्थन मिळावे म्हणून संघर्ष करावा लागतो आहे असेही या संदेशात हॅकर्सने लिहलेले आहे. रेल्वेच्या कर्मचार्यांसाठी वापरली जाणारी भारतीय रेल्वेची वेबसाईड हॅक करुन पहिल्यादांच भारतातील भारत सरकारच्या एखाद्या वेबसाईडवर हल्ला चढवला गेला आहे. अल कायदाने भारतातील सरकारी वेबसाईड हॅक करुन सरकारच्या वेब डिरेक्टरीत हस्तक्षेप करण्याची आपली क्षमता दाखवून दिली आहे. अलकायदाच्या दक्षिण आशिया विभागाचा प्रमुख मौलाना आसिम उमर याने या हॅक केलेल्या वेबसाईटवर जिहाद मधील सहभागाचे आवाहन भारतीय मुस्लिमांना केले आहे.
सेंट्रल रेल्वेने केली वेबसाईट बंद
सेंट्रल रेल्वेच्या कार्मिक विभागाची वेबसाईट अलकायदाकडून हॅक झाल्याचे समोर आल्याबरोबर अवघ्या काही तासात सेंट्रल रेल्वेच्या मुंबई कार्यालयाने ही साईट बंद केली. हॅक केलेले पेजेस रिकव्हर करण्यासाठी तज्ज्ञांची टिम लागलीच कामाला लावण्यात आली.
हल्ल्याचा उद्देश…
भारतीय उपखंडात अलकायदा व इसिस सारख्या दहशतवादी संघटनांना अजूनही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मुस्लिम बांधवाकडून मिळत नाही. तो मिळावा म्हणून हा प्रकार केला गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अलकायदाची ही कार्यपध्दती ओसामा बिन लादेन देखील अवलंबत होता. या दहशतवादी संघटनांनी भारतीय उपखंडातील मुस्लिम समुदायातील मध्यमवर्गीय व शिक्षीत तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे जोरदार प्रयत्न केल्याचे अनेक प्रकरणातुन समोर आले आहे. वेबसाईट हॅक करून आपली तांत्रिक सक्षमता व भारतातील संघटनेचे अस्तित्व दाखविण्याचा उद्देश अलकायद्याचा या निमित्ताने असू शकतो.
कॉन्ट्रॅक्ट देतांंना निष्काळजीपणा?
जगातील कुठल्याही देशाची शासकीय वेबसाईट ही हॅकींकप्रुफ म्हटली जाऊ शकत नाही. परंतु शासनाची कुठलीही वेबसाईट बनविण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यापूर्वी संबंधित कंपनीची विश्वासार्हता तसेच उच्च प्रतिची सुरक्षित साईट बनविण्याबाबतची सक्षमता तपासणे गरजेचे असते. वेबसाईट कार्यान्वित करण्यापूर्वी ती हॅकींकच्या दृष्टीने सुरक्षित आहे का? याची चाचपणी करणे गरजेचे होते. अपुर्णावस्थेत असलेली वेबसाईट कार्यान्वित करण्याची घाई का करण्यात आली? सेंट्रल रेल्वेची महत्त्वपूर्ण अशी ही साईट बनविण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यापूर्वी संबंधित कंपनीची तांत्रिक सक्षमता तपासण्यात आली का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट देतांना संबंधित अधिकार्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचे जाणवत आहे.
कोण आहे मौलाना आसिम उमर
भारतीय मुस्लिमांनी ग्लोबल जिहादमध्ये सहभागी होवून अमेरीका व त्यंाच्या सहकार्यांचा पराभव करावा. जिहाद्दच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी भारतीय मुस्लिमांच्या विस्मृतीत गेलेला जिहाद्दचा धडा त्यांना पुन्हा एकदा शिकविण्यासाठी पुन्हा शाह मुहादित देहलवी जन्माला येणार नाहीत, असे आपल्या संदेशात उत्तर प्रदेशातील रहिवाशी असलेला आणि अलकायदाचा भारतीय उपखंडाचा प्रमुख म्हणून गेल्यावर्षी नेमला गेलेला आसिम उमर यांने म्हटले आहे.आसिम उमर याचे शिक्षण संभल (यु.पी.) येथील देवबंदच्या धार्मिक इस्लामी शिक्षणासाठी प्रख्यात दार-उल-उलूम यासंस्थेत झाले आहे. १९९१ साली या संस्थेतून पदवी मिळाल्यावर तो सनावुल्ल हक या नावानेही ओळखला जायचा. अयोध्येतील वादग्रस्त वास्तु उध्दवस्त झाल्यावर तो दहशतवादी संघटनांशी जोडला गेला. दरम्यान १९९५ पासून तो भारतातुन बेपत्ता होता.
वेबसाईटसाठी तिन कंपन्यांचे टेंडर
सेंट्रल रेल्वे भुसावळ कार्मिक विभागाची वेबसाईट बनविण्यासाठी अकोला डायरी (अकोला), झाईम ऑनलाईन (भुसावळ) व डायमंड वेबस् (जळगाव) यांनी टेंडर भरले होते. सर्वात कमी रकमेचे टेंडर डायमंड वेबचे असल्यामुळे त्यांना वेबसाईट बनविण्याचे काम देण्यात आले. १८ डिसेंबर २०१५ पासून वेबसाईट बनविण्यास सुरूवात करण्यात आली. ही साईट अद्यापही अपूर्णावस्थेत आहे.
भुसावळ येथे रेल्वे अधिकार्यांसोबत या संदर्भातच बैठकीत व्यस्त आहे. वेबसाईट कशी हॅक झाली त्याची माहिती आताच देता येणार नाही, तपास सुरू आहे.
– तबरेज खान,
संचालक डायमंड वेबस्, जळगाव.
कुठलाही कॉन्ट्रॅक्ट हा सर्वात कमी दर आकारणार्या कंपनीला दिला जातो. त्यानुसारच ही वेबसाईट बनविण्याचा कॉन्ट्रॅक्ट डायमंड वेबला देण्यात आला. या घटनेसंदर्भात अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर सांगण्यात येईल.
– राजीव पाटील, जनसंपर्क अधिकारी, सेंट्रल रेल्वे, भुसावळ विभाग