जब आती है रुत पे जवानी
तब बनती है प्रेम कहानी…..!
प्रेम कहानी में
एक लड़का होता है
एक लड़की होती है
कभी दोनो हँसते हैं, कभी दोनो रोते हैं… !
अशा आशयाची अनेक फिल्मी गाणी आपण सर्वानी ऐकली आहेत.किंबहुना प्रत्येक प्रेम कहाणीत एक-मुलगा एक मुलगी हे ठरलेले पात्र असते.मात्र केरळमध्ये एक जगावेगळी भन्नाट प्रेम कहाणी समोर आली आहे.समाजाच्या बुरसट विचार सरणीला फाटा देत सुकन्या आणि आरव हे भारतातील लग्न करणारे पाहिले ट्रान्सजेंडर (लिंग परिवर्तीत) जोडपे ठरणार आहे. यातील सुकन्या आधी मुलगा तर आरव ही मुलगी होती.
सुकन्या आणि आरवचा संघर्ष जन्मापासुनच सुरु झालेला होता.कारण पुरूषाच्या शरीरामध्ये एक महिलेच्या भावना, तर महिलेच्या शरीरामध्ये एक पुरूष होता.लिंगबदलासाठी तीन वर्षांपूर्वी दोघे मुंबईत आले आणि ‘आंखो ही आंखो मे इशारा हो गया,बैठे बैठे जिने का सहारा हो गया !’ भेटीचे रूपांतर प्रेमात कधी प्रेमात झाले हे दोघांनाही कळले नाही.समदु:खी असल्यामुळे सुकन्या आणि आरवला एकमेकाला समजून घेण्यात जास्त अडचणी आल्या नाहीत.खरं बघायला गेले तर दोघंही एकमेकाचा आधारच होते.
आरव अप्पुकुटनचा जन्म केरळमधल्या मध्यम वर्गीय कुटुंबात मुलगी म्हणून झाला.त्याचे नाव बिंदू ठेवण्यात आले होते.त्याचे वडील मेकॅनीक होते तर आई टेलरींगचे काम करायची.वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत त्याने शरीररुपी मुलगी म्हणूनच जीवन जगले.बिंदूला लहानपणापासूनच पुरूषी कामाची आवड होती.थोडक्यात तो इतर मुलींसारखा नव्हताच.लहानपनापासूनच त्याला दुसऱ्या मुलींमधील आणि स्वतःमधील फरक दिसू लागला होता.पण, कुणाजवळही त्याला मन मोकळे करता येत नव्हते.वयाच्या बाराव्या वर्षी मात्र बिंदुला राहवले गेले नाही आणि त्याने आपल्या आई जवळ मन मोकळे केले.आईने त्याला ओळखीच्या एका डॉक्टरकडे नेले.परंतु काही गोष्टी स्पष्ट होण्यासाठी डॉक्टरांनी काही काळ जाऊ द्यावा लागेल, असे सांगितले.परंतु निसर्ग आपल्या गतीने आपले काम करतच असतो,तो कुणासाठी थांबत नाही.बिंदूचे वय जसं वाढत गेले तसे त्याला मुलींसोबत राहणे आवडेनासे झाले.दरम्यान,महाविद्यालयीन जीवनात बिंदूच्या आयुष्याला आईच्या निधना नंतर कलाटणी मिळाली.वडिलांनी त्याला आणि लहान बहिणीला वाऱ्यावर सोडत दुसरे लग्न केले.त्यामुळे लहान बहिणीची जबाबदारी बिंदूवर आली होती.शिक्षण सोडून बिंदू काम करायला लागला.मुंबईत हाॅटेल मॅनजमेंटचा कोर्स केला आणि तो आॅल इंडिया इंटरनॅशनल टूर्सवर जाऊ लागला. मोठ्या मेहनती नंतर त्याला 1993 साली मुंबईत पर्यटन क्षेत्रात नोकरी मिळाली. जवळ-जवळ आठ वर्ष नोकरी करत बिंदूने आपल्या बहिणीचा सांभाळ केला.पुढे दुबईला वर्षभर नोकरी केल्यानंतर मुंबईला येऊन बिंदूने आपल्या लहान बहिणीचे लग्न लावून दिले.परंतु बिंदूच्या जीवनात पुन्हा एकदा नाट्यमय कलाटणी मिळाली.एके दिवशी खेळत असताना त्याचा पाय मोडला आणि त्याला सहा महिने घरीच पडून रहावे लागले.भयंकर म्हणजे या अपघातानंतर त्याला 5 वर्ष कुबडयांचा आधार घ्यावा लागला.या काळात त्याला एका मैत्रिणीची खूप मदत झाली.तो प्रेमातही पडला.परंतु लवकरच त्याचा प्रेमभंग झाला.त्यामुळे त्याने स्वतःच्या शरीराशी सुरु असलेला संघर्षाला पूर्ण विराम द्यायचे ठरवले आणि मुंबईला येऊन लिंग परिवर्तन करायचे ठरवले.
मुंबईतील एका सेक्स चेंज क्लिनिकमध्ये एके दिवशी बिंदू (आरव)ची भेट केरळच्या एका कुटुंबात ‘मुलगा’ म्हणून जन्माला आलेल्या सुकन्या कृष्णा हिच्याशी झाली आणि तो तिला पाहताच राहिला.परंतु सुकन्याची कहाणी त्याच्यापेक्षा काही वेगळी नव्हती. सुकन्याला लहानपणी बाहुल्यांशी खेळायला खूप आवडायचे.बाहुलीशी खेळण्याच्या वयातच तिचे पितृछत्र हरपले.सुकन्या दिसायला मुलगा मात्र तिचे हावभाव मुलीसारखे होते.तिच्या अशा वागण्यामुळे शाळेमध्ये इतर मुलांकडून तिची कायमच सतत थट्टा-मस्करी व्हायची.सुकन्या वयात आल्यानंतर मात्र,पालकांना तिचे हावभाव लक्षात येऊ लागले.बिंदू प्रमाणे सुकन्यालाही कुटुंबीयांनी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांकडे नेले.डॉक्टरांनी तिच्या हार्मोन्स (गुणसूत्र) मध्ये असंतुलन असल्याचे सांगितले.उपचार म्हणून सुकन्याला सलग दोन वर्ष पुरूषी हार्मोन्सची इंजेक्शन्स देण्यात आली.याचा परिणाम म्हणून सुकन्याला अनेक शारीरिक पिडा सहन कराव्या लागल्या. एके दिवशी तर दहावीचा दुसरा पेपर देऊन घरी परतत असतांना ती बेशुद्ध पडली आणि तब्बल 16 तासानंतर ती शुद्धीवर आली.अनेक दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर तिने पुरूषी हार्मोन्सची इंजेक्शन्स न घेण्याचा ठाम निश्चय केला.कारण आयुष्यभर एक मुलगी म्हणून जीवन जगण्याच्या ठाम निर्णय तिने घेतला होता.परंतु आईकडून तिला कडाडून विरोध झाला.मारहाण करण्यापासून तर तांत्रिक-मांत्रिक यांची सुद्धा मदत घेण्यात आली.परंतु सुकन्या आपल्या निर्णयावर अटळ होती.शेवटी सुकन्याने तिला लिंगपरिवर्तन करू न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली.त्यानंतर मात्र आईने लिंगपरिवर्तनाची परवानगी दिली.
आज आरव आणि सुकन्या दोघांचेही लिंग परावर्तीत झाले असून आता त्यांना पाहून लोक सांगू शकत नाही की, ही कधी काळी कोण मुलगा आणि कोण मुलगी होती. दरम्यान, बिंदू (आरव)ने जेव्हा सुकन्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती फोनवर तिच्या आईशी मल्याळममध्ये बोलत होती. आरवने पुढाकार घेत सुकन्याशी बोलायला सुरुवात केली. काही तासाभराच्या गप्पानंतर दोघेही लिंगपरिवर्तीत असून त्यांचे दु:ख सारखेच असल्याची जाणीव त्यांना झाली.दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले आणि नंतर मात्र,त्यांची प्रेम कहाणी कधी फुलली हे दोघांच्याही लक्षात आले नाही. परंपरावादी कदाचित या विवाहाला निसर्गाच्या आणि धर्माच्या विरोधात म्हणतील.परंतु निसर्गानेच त्यांना अशा विभिन्न लिंगातील गुणसूत्र देत जन्माला घातले आहे,हे विसरून चालणार नाही.यात त्यांचा काहीच दोष नाही.याउलट सुकन्या आणि आरव यांनी आपले लैंगिक अस्तित्व कुणासमोरही न झुकता परावर्तीत करून घेतले,यासाठी दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.वाचायला आणि ऐकायला आपल्याला सोपे वाटते.परंतु नावाला २१ व्या शतकात असणाऱ्या भारतात अशा विषयाला समाज मान्यता मिळणे जरा अवघडच…अवघड काय अशक्यप्रायच म्हणा…आपल्या देशात आजही लग्न…जात,धर्म,गोत्र पाहून केले जाते.काही विज्ञातवादी रक्तगटही तपासून घेतात.अशा देशात ट्रान्सजेंडर अर्थात लिंग परिवर्तीत जोडप्याचा प्रेम विवाह कोणत्या काळात मान्य होईल हे आता तरी सांगता येणार नाही.
प्रेमाला जात-धर्म,पंथ भाषेच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करणारे सध्याच्या घडीला शेवटच्या घटका मोजत आहेत.प्रेम विवाहाला आपल्या सामाजिक प्रतिष्ठेशी जोडणारे माझ्या मते मानसिक विकलांग असतात.काही वर्षापूर्वी प्रेम विवाह अपवादात्मक बघायला मिळायचे.परंतु भविष्यात अरेंज मॅरेज अपवादात्मकरित्या होतील,हे सत्य आहे.कोणी कितीही नाही म्हटले तरी प्रेम विवाहाचे अस्तित्व मान्यच करावे लागणार आहे.कारण सुकन्या आणि आरव यांची जगावेगळी भन्नाट प्रेम कहाणी काही दिवसात पूर्ण होणार असून ते लवकरच विवाहबद्ध होणार आहेत.