‘सिमी : दी फर्स्ट कनव्हीक्शन इन इंडिया’ या एका पुस्तकामुळे माझ्या आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या.आपल्या-परक्यांची पारख झाली.पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर मन मोकळे करणे अपेक्षित होते.परंतु माझी मनस्थिती नव्हती,खरं म्हणजे आज देखील मला ओढून-ताणून लिहिल्यागतच वाटतेय.या एका पुस्तकाने मला मोठी सामाजिक प्रतिष्ठा मिळाली,स्वतःला लेखक म्हणून सिद्ध केले वगैरे…वगैरे, सर्व ठीक…सर्व कबूल…परंतु मनस्ताप देखील तेवढा सहन केलाय आणि अजूनही करतोय.अनेक जवळचे,लांबचे विनानाकारण द्वेष करायला लागलेत.मी कुठे चुकलो,या व्यक्तीशी माझा काहीच सबंध नाही,याला कधी दुखवले नाही, मग तरी हा असा का वागतोय.काही जणांपासून वाढलेले अंतर, या गोष्टी मला अस्वस्थ करणाऱ्या ठरताय.काहींची वागणूक तर शब्दाद देखील मांडता येणार नाही.परंतु या अनुभावाचं ओझं आयुष्यभर वागवायचं हे मात्र निश्चित !
कटू अनुभवासोबत काही चांगले अनुभव देखील आलेत.पुणे,मुंबई,मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून आलेले फोन आणि त्यातून झालेली मैत्री जमेच्या बाजू ठरल्या.या पुस्तकाच्या ४००० कॉपी प्रकाशकांनी छापल्या होत्या.माझ्याकडील १९०० पैकी अवघ्या ५००-६०० कॉपी शिल्लक आहेत.पुस्तक विक्रीचा आणि माझा काहीच संबंध नाही.परंतु जिल्ह्याचा विषय म्हणून प्रकाशकांकडून हक्काने काही पुस्तक मागून घेतली होती.अनेकांनी आम्ही इतके घेणार,तितके घेणार असा तोंडचोपडेपणा केला,नंतर मात्र गायब.अशा वागणाऱ्यांमध्ये बालपणीचे आणि काही ‘ग्लास फ्रेंड्स’चा देखील समावेश होता. परंतु अनेपक्षित मित्रांनी पुस्तक विक्रीसाठी खूप मदत केली,हे देखील तेवढेच खरे. या संबंधी मी कधीही कुणाला विचारले नाही किंवा फोनही केला नाही.कारण पुस्तक प्रकाशनानंतर महिन्याभरात हजारो प्रती खपल्या आणि उर्वरित ‘मायुथ टू मायुथ’ पब्लिसिटी जसं जशी होतेय,तसं तशी जाताय.मुळात प्रकाशकाने आणि लेखक म्हणून मी या पुस्तकाकडे उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून बघितलेच नाही.प्रकाशक समीर दरेकर हा माणूस राष्ट्रभक्तीला वाहून घेतलेले व्यक्तीमत्व आहे.समीरजी यांनी त्यांची ओळख कुणालाच न सांगण्याची विनंती मला केली होती.त्यानुसार मी कुणालाही त्यांची ओळख सांगितली नाही.परंतु पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘साईमत’च्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर समीरजी त्यांचे जावई असल्याचे सांगितले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पुस्तकासंबंधी संशोधन आणि इतर प्रक्रियेत मला मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली होती.त्यामुळेच नवीन विषयाची ८० टक्के माहिती मिळून देखील पुस्तक लिखाण हाती घ्यायची परवानगी माझा खिसा अजूनही मला देत नाहीय. हात थोडा मोकळा झाल्यावर ‘सिमी’च्या दुसऱ्या आवृत्तीचे काम हाती घ्यायचा सध्या विचार करतोय.दुसऱ्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ नंतर सुरक्षा यंत्रणा जळगावमधील ‘सिमी स्लीपर सेल’वर का लक्ष ठेऊन होत्या,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध सिमी प्रकरणातील कोणत्या आरोपीने का खटला दाखल केला होता.या सारख्या खळबळजनक माहितीसह अनेक धक्कादायक गोष्टी मांडणार आहे.यातील एक माहिती तर जळगाव जिल्ह्याला विचार करायला भाग पाडणारी असेल.आयुष्यातील आर्थिक मंदी कमी झाल्यावर पुन्हा एकदा बोरू घासायची इच्छा आहेच. सिमीच्या पुस्तकावरील अनुभवावर खूप लिहिण्यासारखे आहे.आयुष्यात कधी तरी उघडपणे मन मोकळे केल्याशिवाय मलाही चैन पडणार नाही,बघू या,याचा योग कधी जुळून येतोय….तूर्त एवढेच !