प्रतिबंधीत संघटना ‘सिमी’चा स्लीपरसेल अद्यापही कार्यरत असल्याचे आपल्याला खरे वाटणार नाही. मात्र प्रत्यक्षात ही बाब खरी आहे. यातच मुंबई येथील लोकल साखळी स्फोटांमधील जळगावकर आसीफला फाशीची शिक्षा झाल्यामुळे गुप्तचर यंत्रणांचे लक्ष जळगाववर केंद्रीत झाले आहे.
मुंबईतील ११ जुलै २००६ ला लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई विशेष सत्र न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवत ५ आरोपींना फाशी तर अन्य दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये जळगावचा आसिफ शेख याचा समावेश आहे.आसिफला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचे आवाहन करणारी पत्रके वाटण्यात आल्याची धक्कादायक माहिती सुत्रांकडून मिळाली.आजच्या घडीला सिमीचे जाळे उध्वस्त झाल्याचे फक्त वरवरचे चित्र आहे.अर्थात याला कागदोपत्री पुरावा नसला तरी, क्राईम रिपोर्टिंग करीत असताना अशा गोष्टी सहज कळत असतात.आजही वेगवेगळ्या संस्थांच्या नावाखाली ’सिमी’चा स्लीपर सेल शहरात कार्यरत आहे.’सिमी’चे उत्तर महाराष्ट्राचे हेड क्वार्टर असल्यामुळे सुरुवाती पासून जळगाववर सर्व यंत्रणा लक्ष ठेवून होत्या.आसिफला शिक्षा झाल्यानंतर पुन्हा एकदा स्थानिक पोलिसांसह देशातील सर्व गुप्तचर यंत्रणानी जळगाववर करडी नजर केली आहे.
काय आहे सिमी ?
’सिमी’ची स्थापना २५ अप्रैल १९७७ मध्ये उत्तर प्रदेशातील अलिगड मध्ये ’सिमी’ अर्थात स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाची स्थापना मोहम्मद सिद्दीकी ने केली होती.या संघटनेची स्थापना मुळात जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थ्यांसाठी १९५६मध्ये स्थापीत इस्लामी छात्र संघटन (एसआयओ)ला पुर्नजिवीत करण्यासाठी बनविले गेले होते.धार्मिक शिक्षणाच्या नावावर सिमी संघटनेत तरूणांना ओढल्यानंतर आधी त्यांचे ‘ब्रेन वॉश’ केले जायचे.पाटण्याचा हिसाब रजा त्यांना हिजबुल मुजाहीद्दीन या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अशरफ बेगच्या ताब्यात द्यायचा. त्यानंतर तरूणांना सर्वप्रकारची शस्त्रात्रे चालवण्यापासून तर स्फोटके पेरण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले जायचे. खर्या अर्थाने हिजबुलच्या सान्निध्यात आल्यानंतरच तरूणांच्या अतिरेकी कारवाया सुरू होत होत्या.२००२ में भारत सरकारने या संघटनेवर बंदी आणली होती.
जळगावशी ’सिमी’चे नाते
२००१मध्ये काश्मीर खोर्यात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या गोळीबारात जळगावचे तीन तरूण ठार झाले आणि देशातील सर्व गुप्तचर यंत्रणांच्या नजरा जळगाववर खिळल्या. साधारण ९०च्या दशकापर्यंत जळगावात ‘सिमी’चे अस्तित्व नव्हते. शहरातील एका भागात धार्मिक शिक्षणाच्या नावावर तरूणांना एकत्र करण्यात आले. त्यावेळी शकील नामक व्यक्ती सिमी संघटनेचा प्रमुख होता. त्याने संघटनेचे जाळे हळूहळू विणायला सुरूवात केली. ऑगस्ट २००० मध्ये दिल्ली येथे सिमीच्या देशपातळीवरील इस्तेमासाठी जळगावातील आठ तरूणांची निवड शकीलच्या शिफारशीवरून झाली. दिल्लीमध्ये महिन्याभराच्या या कॅम्पमध्ये पटणाचा सैय्यद शहा हिसब रजा याने तरूणांचे ‘ब्रेन वॉश’ करायला सुरूवात केली. या कॅम्पमधील संवेदनशील आणि भावनिक विद्यार्थ्यांवर काही लोक विशेष लक्ष ठेवून होते. हिसब रजाने जळगावतील आठ तरूणांपैकी सहा तरूणांची निवड केली. दिल्लीहून हे तरूण जळगावला परत आल्यानंतर साधारण महिन्याभरानंतर त्यांना पाटण्याला बोलाविण्यात आले. पाटण्याहून सर्वजण काश्मिर खोर्याकडे रवाना झाले. काश्मिरला पोहोचल्यानंतर रिजवान नामक तरूण आजारी पडल्यामुळे त्याला परत जळगावला पाठविण्यात आले. काश्मिर खोर्यात उर्वरित पाच तरूणांची भेट हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या अशरफ मुनीर बेग या अतिरेक्याबरोबर करून देण्यात आली. काही दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये यातील दोन तरूणांना कठीण ट्रेनींग आणि वातावरण मानवले नाही. त्यामुळे त्यांनादेखील परत पाठविण्यात आले. २००१ मध्ये काश्मिर खोर्यात झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत तीन तरूण ठार झाले. त्यावेळी त्या तरूणांच्या आई-वडिलांनी स्थानिक तरूणांना जाब विचारायला सुरूवात केल्यामुळे हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या वकार हा जळगावला आला व त्याने ठार झालेल्या कुटुंबियांची भेट घेत याबाबत जास्त वाच्यता न करण्याबाबत दम भरला.
दरम्यान, चकमकीत ठार झालेल्या एका तरूणाच्या खिशातून जळगावचा लॅण्डलाईन नंबर समोर आला. गुप्तचर यंत्रणांनी त्या लॅण्डलाईन नंबरला ट्रॅक केले असता हिजबुल मुजाहिदीनचे प्रमुख म्होरके दोन तरूणांसोबत सतत बोलत असल्याचे निष्पन्न झाले. लॅण्डलाईन नंबर शेख चॉंद नामक व्यक्तीच्या नावावर होता. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता त्याने इकबाल व सिद्दकी या दोन तरूणांची नावे सांगितली. तत्पुर्वी मे २००० मध्ये त्यांनी नागपुर येथील बडकस चौक व झेंडा चौकातील विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय व आरएसएसच्या मुख्य कार्यालयाला उडविण्यासाठी बॉम्ब ठेवले होते. खालीद नामक तरूणाने त्यासाठी दिल्लीहून स्फोटके जळगावात आणली. त्यानंतर नागपूरमध्ये साधारण तीन दिवस ‘रेकी’ करत स्फोटके पेरण्यात आली. सुदैवाने या हल्ल्यात मोठे नुकसान झाले नाही.
असिफच्या परिवाराला जळगावमधून आर्थिक मदत ?
साखळी बॉम्बस्फोटातील मधील प्रमुख आरोपी आसिफला नुकतीच न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्याच्याशी संपर्कात असलेले व सध्या शिक्षा भोगून परत जळगावमध्ये राहत असलेल्या परवेज व शकीलवर स्थानिक पोलीसांसह देशभरातील सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहे. फरार असलेल्या शेख शफी या त्यांच्या साथीदाराची शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. इकडे आसिफच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे.त्याला फक्त एक भाऊ आणि आई-वडील आहेत.त्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याला मदत करावी यासाठी जळगावात काही तरूणांनी पत्रक वाटण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे.संबंधीत कुटुंबाला मदतही करण्यात आल्याची माहिती समजल्यामुळे स्थानिक पोलीस,सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे.
२००० मध्ये जळगावात झाला झोनल कॅम्प
साधारण २००० मध्ये शहरातील एका प्रसिध्द शाळेत सिमीचा झोनल कॅम्प २२ ते २४ ऑक्टोबरदरम्यान झाला होता.यात एकूण ८०० लोकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात ५०० पुरूष तर ३०० महिलांचा सहभाग होता. या कॅम्पनंतर सिमी संघटनेचे जाळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पसरले होते.या कॅम्पसाठी एका प्रतिष्ठित नेत्याने ७० हजार रूपयाची मदत केली होती.त्याच प्रकारे एका बड्या उद्योग समूहात नौकरी करणारया नेत्याने देखील मदत भरीव मदतीचा हात दिला होता.शहरातील हे दोघे विख्यात नेते काही काळ यंत्रणेच्या रडावरदेखील आले होते. परंतु सबळ पुरावे नसल्यामुळे त्यावेळी त्यांची अटक टळली होती.
जळगाव सिमीचे हेडक्वॉर्टर
जळगाव शहर त्यावेळी उत्तर महाराष्ट्राचे सब झोनल हेडक्वॉर्टर होते.सिमी संघटनेचा जळगावातील पहिला अध्यक्ष शकील हा सिमी संघटनेच्या सान्निध्यात कसा आला? हे अद्याप कोडेच आहे.मात्र शहरात त्याने सिमीचे जाळे विणले त्याचा साथीदार रिजवानच्या घरातून त्यावेळी काही आक्षेपार्य वस्तूंसह स्फोटकेही मिळाली होती.आज हे दोघेजण शहरात रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात.
good