काही जणांना माझे मत जास्त खोलातले किवा अतिरंजित वाटण्याची शक्यता आहे.परंतु काही गोष्टींचे संदर्भ तपासून पहिले तर त्यातील गांभीर्य तात्काळ लक्षात येईल. दिल्लीची निवडणूक भाजपने जिंकली असती तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची रणनीती यशस्वी झाली असा संदेश जात दोघांच्या लोकप्रियतेमध्ये पक्षात प्रचंड वाढ झाली होत कॉंग्रेस प्रमाणे भाजप देखील व्यक्तीवलयांकित पक्ष बनण्याची भीती निर्माण झाली असती. त्याच प्रकारे भाजपचे ‘थिंक टँक’ म्हणून असलेला संघ परिवार देखील या दोघांच्या तुलनेत दुय्यमी स्थानी जाण्यची धोका वाढला असता आणि हेच संघातील चाणक्यांनी वेळीच ओळखले. म्हणूनच संघाचे स्वयंसेवकांनी स्वतः मतदान काढल्यानंतर देखील भारताच्या इतिहासात एखाद्या राज्यात कोणत्या पक्षाला एवढी मिळालेली मते विचार करायला आणि तसेच शंका निर्माण करायला लावणारी आहेत.
दिल्लीच्या निकालानंतर आता सर्वात जास्त प्रश्नचिन्ह उभे राहिले ते मोदी आणि शहा यांच्या जोडीवर. संघात एक शिस्तबद्ध पद्धती आहे.त्यात छोट्या मधल्या कार्यकर्त्यापासून तर थेट नेत्यापर्यंत सर्वाची काळजी घेतली जाते.प्रत्येकाला आपल्या जागेवर योग्य न्याय आणि मान मिळेल याकडे बारकाईने लक्ष दिले जाते.अगदी गल्लीतला स्वयंसेवक वयात आल्याबरोबर त्याच्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत शोधून त्याला रोजगार दिला जातो. यासाठी खाजगी पतसंस्थापासून तर शाळा किवा इतर सहकारी संस्थेत त्याची नोकरी लावल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच ज्यावेळी अचानक नरेंद्र मोदी यांच्या आग्रहास्तव अमित शहा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली हीच गोष्ट संघ परिवाराला तेव्हा रुचली नव्हती. पक्षात अनेक ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते असतांना शहा यांचे राज्यातून थेट राष्ट्रीय राजकारणात पाठविले गेल्यामुळे भाजपातील शिस्तीला म्हणा किवा कामाच्या पद्धतीलाच छेद गेला. एकाच राज्यातून पंतप्रधान व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हा दुर्मिळ योग भाजपातच नव्हे तर देशाच्या राजकारणात पहिल्यांदा पहिला गेला. नरेंद्र मोदी यांची खेळी त्यावेळी संघाला लक्षात आली नसेल असे नाही, परंतु आतातायीपणे निर्णय घेईल तो संघ परिवार कसला…दोघाच्या मर्जी प्रमाणे मागील ९ महिन्यापासून देशात सरकार व पक्ष चालत आहे. परंतु खर्या प्रसूती कळा या ज्यावेळी हर्षवर्धन सारख्या वरिष्ट आणि मुख्यमंत्रीपदावर हक्क असलेल्या व्यक्तीला डावलून किरण बेदी यांना मैदानात उतरविले गेल्या नंतर सुरु झाल्या. त्याच वेळी संघानेही ओळखून घेतले की, आता पाणी डोक्यावरून वहायला लागले आहे. अर्थात परवानगी मागितल्या नंतर संघाने नुसता मान हलवून दिलेला होकार मोदी व शहासाठी धोक्याची घंटा होती.परंतु त्यांनी ओळखले नाही हे त्यांचे दुर्भाग्य…अर्थात आपल्या खेळी सहज समोरच्याच्या लक्षात येतील इतपत संघपरिवार कच्चा खिलाडी देखील नाही. मुळात मोदी-शहा जोडीच्या हेकेखोर वागण्ाुकीने भाजपचे कॉंग्रेसीकरण होण्याच्या दिशेने सुरु असलेल्या वाटचालीमुळे देखील संघ परिवार मोठ्या प्रमाणात अस्वस्थ होता. इतिहासातील सर्वात मोठा पराभव पदरी पडून देखील कॉंग्रेसचे नेते असो की,कार्यकर्ते हे अजूनहि गांधी परिवाराच्या पलीकडे विचार करत नाहीय.असाच काहीसा प्रकार भाजपात देखील पहावयास मिळायला सुरुवात झाली होती. मोदी लाट आणि अमित शहा यांचे नियोजनावर भाजपतील कार्यकर्ता विसंबून राहायला लागला होता. भाजपच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा होती.बूथ लेव्हलवर एका-एका मताचे नियोजन करणारा कार्यकर्ता नेत्याच्या वलयावर विसंबून राहू लागला होता.
अर्थात या गोष्टीमुळे संघपरिवारात चलबिचल होणे स्वाभाविक होते. कारण मोदी-शहांची जोडी आता संघ परिवाराच्या सुचनांकडे दुर्लक्ष करायला लागली होती. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची युती तोडणे असो की किरण बेदी यांना पक्षात घेणे हा याचाच एक भाग आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सुषमा स्वराज, अरूण जेटली, राजनाथसिंह, व्यंकया नायडू यासारखे दिग्गज नेते मंत्रीपद असून देखील कोणाच्या नजरेत भरतील, असे काम करू शकले नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास सर्वच मंत्रालये ‘हायजॅक’ केली आहे. मग त्यांचे स्वच्छता अभियान असो की परदेश दौरे यामध्ये संबंधीत मंत्रालयाचे मंत्र्यांचा नामोल्लेख सुद्धा कुठे दिसत नाही. मागील ९ महिन्यात नरेंद्र मोदीच्या पलीकडे भाजपाचे अस्तित्व पाहिले तर अगदी शून्य दिसते. त्यामुळे या जोडीला ठिकाणावर आणण्यासाठी एखाद छोटे राज्य हातातून गेले तरी बेहत्तर परंतु संघ परिवाराला मैदानात उतरणे गरजेचे होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच दिल्ली निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून अलिप्त राहिण्याचा देखावा करणारा संघ परिवार मोदी-शहा यांच्या आवाहनाला मान देत सक्रीय झाला. मात्र संघाचे स्वयंसेवक ज्यावेळी घरातून मतदाते आपल्या सोबत मतदान केंद्रापर्यंत घेवून जातात त्यावेळी ते भाजपाचे कॉंक्रीट मतदान असते हा आतापर्यंतचा अनुभव आहे. असे असून देखील ज्यावेळी मात्र दिल्लीमध्ये स्वयंसेवक मतदान काढतात त्यावेळी मतदानाची टक्केवारी ही ‘आप’ची वाढली यातच सर्व समोर येवून जाते. मुळात स्वयंसेवकांनी फक्त औपचारीकता पूर्ण केल्यामुळे हे झाले की वरिल आदेशाचे पालन ? यावर आताच स्पष्ट बोलणे धाडसाचे होईल. परंतु ज्याप्रमाणे भाजपा व्यक्ती वलयांकीत पक्षाच्या दिशेने वाटचाल करीत होता ते बघता संघाने त्यापासून भाजपाला रोखले, असा मतप्रवाह निर्माण व्हायला जागा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळी राष्ट्रीय राजकारणात उतरले त्यावेळी भारतातल्या ‘कॉमनमॅन’ला त्यांनी साद घातली. ती लोकांच्या मनाला देखील भिडली. अर्थात त्यांनी स्वतःला चहावाला म्हणून लोकांसमोर ठेवले. ज्यावेळी रस्त्यावर कारचालक दुचाकीला धडक देतो त्यावेळी नागरिक दुचाकीस्वाराच्या बाजुने उभे राहतात. आणि जर दुचाकीने सायकलला ठोकले तर सायकल चालकाच्या बाजुने, सायकलवाल्याने पादचार्याला धडक दिली तर मग पायी चालणार्याच्या बाजुने! एकंदरीत भारतातील नागरिकांची मानसिकता ही नेहमी दुर्बल घटकाच्या बाजुने उभी राहणारी असते. त्यामुळे कॉंग्रेसच्या राहुल गांधीच्या तुलनेत नरेंद्र मोदी लोकांना जवळचे वाटले. परंतु तेच मोदी दिल्लीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पद्धतशीरपणे बराक ओबामा यांचा दौरा ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी मात्र लोकांच्या लक्षात ही गोष्ट चटकन येते. कारण लोकसभेच्या वेळी देखील मोदींनी अशीच अचूक टायमींग साधली होती. अर्थात एकच चाल पुन्हा पुन्हा यशस्वी होत नाही हे मोदी विसरले होते आणि त्यांचा दहा लाखांचा सूट लोकांच्या नजरेत भरला होता. अर्थात ‘आप’नेदेखील हुशारीने हाच मुद्दा जनतेसमोर मांडला.
तस पाहायला गेले तर दिल्लीच्या निवडणुकांचे विश्लेषण अगदी एका ओळीत देखील करता येईल ते म्हणजे ‘जैसे को तैसा मिला- कैसा मजा आया’ नरेंद्र मोदी हे मोठ्या वक्तृत्वाचे धनी थेट लोकांच्या हृदयाला हात घालण्यात त्यांचा हातखंडा लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या एवढ्या अपेक्षा उंचावल्या की त्यावर बसून ते थेट पहिल्यांदा लोकसभेत पोहचत थेट पंतप्रधान बनले. परंतु म्हणतात ना ‘शेर को सवा शेर मिलता है !’ तशीच गम्मत दिल्लीत घडली. त्यांच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे लोकांच्या मनात घर करू शकेल अशी भाषणे अरवींद केजरीवाल यांनी दिली. गावरान भाषेत सांगायचे झाले तर मोदी यांनी लोकसभेत जी फेकुगिरी केली त्यांच्याहूनही जास्त केजरीवाल यांनी फेकले आणि ते जिंकले ! (आता मोदी नऊ महिन्यात काही करू शकले नाहीत ते पुढील चार वर्षात काय करणार आणि केजरीवालही पाच वर्षात काय दिवे लागणार हे तर काळच ठरविणार आहे.) ‘आप’चा विजय होणार असे वाटत होते, तरी तो एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल याचा विश्चास निकालानंतर देखील बसत नाहीए कारण दिल्लीतील भाजपाचे संघटन आणि संघाची ताकद बघता एवढ्या कमी जागा या भाजपामधूनच कोणी रसद पुरविल्याशिवाय ‘आप’ला शक्य झाले नाही, असे मला तरी वाटते. त्यामुळे छोटे राज्य गेले तर चालते मात्र, पक्षाच्या ध्येय-धोरणांसह संघटनेपेक्षा व्यक्ती मोठा होण्याचा प्रयत्न करतो किवा बनण्याच्या दिशेने त्याची वाटचाल असते त्यावेळी असे निकाल अपेक्षित असतात. त्यामुळेच व्यक्ती वलयांकित होण्यापासून संघाने भाजपला वाचविले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
shaha jasa beraki tasa sanghpan mahaberaki