बौद्ध धर्म हा खरंतर शांतताप्रिय धर्म आहे.त्यामुळे धम्माचा खरा अनुयायी कधीही हिंसक होत नाही. मग श्रीलंकेत असं काय घडलंय की बौद्ध आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये संघर्ष उसळतोय? संचारबंदी, जमावबंदी आणि आणीबाणी लागू करावी…हिंसाचार एवढा टोकाला का गेलाय? असे अनेक प्रश्न सध्या अवघ्या जगाला पडताय. मात्र ही दंगल एका दिवसात उसळलेली नाही. त्यामागे अनेक वर्षात धार्मिक,सांस्कृतिक मतभेद आणि वर्चस्वाची तयार झालेली भली मोठी असहिष्णुतेची दरी आहे.
अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारा धम्म म्हणून बौद्ध धर्माची ओळख आहे. बौद्ध धर्माचे अनुयायी शांतताप्रिय व अहिंसक मानले जातात. त्यामुळेच बौद्ध धर्मीय देश असलेल्या श्रीलंकेत उसळलेली हिंसा अवघ्या जगात चर्चेचा विषय ठरतेय. विशेष म्हणजे काही ठिकाणी हिंसक जमावाचे नेतृत्व चक्क बौद्ध भिख्खू करताय ही बाब तर प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. वास्तविक बौद्ध धर्मात आक्रमक विचार सरणीला अत्यंत हानिकारक मानले जाते. अशा विचारांपासून मानवी मनाला मुक्ती मिळविण्यासाठीचे अनेक उपाय धम्मात सांगण्यात आलेले आहेत. ध्यानाच्या माध्यमातून वाईट विचारांवर विजय मिळवून करुणा अधिक समृद्ध केली जाऊ शकते,या गोष्टीवर म्हणून आजही अनेकांचा विश्वास आहे.
कोणत्याही देशातील हिंसाचारांची कारणे तपासली तर बहुसंख्यकांची महत्वाकांक्षा अल्पसंख्यकांचे धार्मिक अस्तित्व आणि सामाजिक वर्चस्व मान्य करण्यास सहसा तयार होत नाही,हे प्रमुख कारण आपल्या निदर्शनास येईल. व्यक्तिगत भांडणात देखील मग धर्म स्वाभिमान जागा होत असतो. असचं काहीसे श्रीलंकेत घडले. आठवडाभरापूर्वी एका ट्रॅफिक सिग्नलवर झालेल्या भांडणानंतर काही मुस्लिमांनी एका बौद्ध तरुणाला मारहाण केली. तेव्हापासूनच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून दोघं बाजूने हिंसा सुरु आहे. कोणत्याही देशातील प्रमुख धर्म (लोकसंख्या अधिक असलेला) हा राजसत्तेसोबत आपली विचारसरणी राष्ट्रीय संस्कृती म्हणून विकसित करून घेत असतो. त्यानंतर त्या धर्माचे ठेकेदार सत्तेत असलेल्यांकडून आपल्या अपेक्षा कायमच पूर्ण करून घेत असतात. शांतेतेत विचार केला तर अगदी आपण राहत असलेल्या गल्ली-बोळात देखील असेच काहीसे घडत असते.
श्रीलंकेची एकूण लोकसंख्या साधारण दोन करोड़च्या जवळपास आहे. यातील ७० टक्के नागरिक हे बौद्ध आणि साधारण ९ टक्के हे मुसलमान आहेत. तमिळ विद्रोहिंच्या पराभवानंतर २००९ पासून श्रीलंकेतील मुस्लिम समुदाय एकप्रकारे राजकीय आश्रयापासून वंचित आहे. श्रीलंकेत २०१२ पासून जातीय तणावाची परिस्थिती अधिक कठीण बनली आहे. कट्टरवादी सिंहली बौद्ध समुदायाची ‘बोडू बाला सेना’ ही संघटना तणावाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आहे. बोडू बाला सेनेने मागील काही वर्षापासून मुस्लीम समुदायाच्या विरुद्ध विविध कारणं सांगत धर्माच्या नावावर हिंसा वाढवली आहे. विशेष म्हणजे या संघटनेला छुपा राजाश्रय प्राप्त असल्याचे देखील म्हटले जाते.
श्रीलंकेतील बौद्ध समुदायासाठी मुस्लीम परंपरेनुसार मांसाहार किंवा पाळीव पशूंना मारणे हा एक प्रमुख वादाचा मुद्दा आहे. यासह मुस्लिमांची वाढती लोकसंख्या बहुसंख्य असलेल्या सिंहली बौद्ध धर्माच्या अनुयायीना चिंताग्रस्त करतेय. सिंहली बौद्ध धर्मातील काही कट्टरपंथी अल्पसंख्याक मुस्लीम आपल्यासाठी धोकादायक असल्याचे मानतात. या कट्टरपंथींच्या विचारधारेनुसार बिगर बौद्ध आणि मुस्लिम हे आपल्यावर उलटू शकतात तसेच आपल्या विरोधात हिंसा देखील करू शकतात. श्रीलंकेत मुस्लिम समाजाला व्यवसायात चांगले यश मिळाले कारण त्यांना पूर्वेकडील देशांतून मदत मिळते असा आरोप आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून मुस्लिमांचे यश आपल्या अस्तित्त्वासाठी धोकेदायक असल्याचेही सिंहली बौद्धांना वाटते.
तमिळ आणि मुस्लीम समुदाय हे आपल्यासाठी घातक असल्याचा पक्का समज बौद्ध धर्मीयांनी करून ठेवला आहे. तर काही मुस्लीम संघटना जबरदस्तीने धर्म परिवर्तन करत असून बौद्ध मठांनानुकसान पोहोचवित असल्याचा देखील आरोप आहे. त्यामुळे स्थानिक कट्टरवादी बौद्धांनी बोडू बला सेना तयार केली. ही सेना म्हणजे सिंहली बौद्धाची राष्ट्रवादी संघटना असून ती नेहमी कोणत्या आणि कोणत्या कारणावरून मुस्लिमांविरुद्ध मोर्चा काढत मुस्लिमांच्या उद्योगधंद्यावर बहिष्कार घालण्याबाबत आग्रही असते.
श्रीलंकेतील असहिष्णुतेने स्थानिक मुसलमानांसह तमिळींच्या मनात प्रचंड भीती निर्माण केली आहे. या असहिष्णुतेमुळे उदारमतवादी बौद्ध भिख्खू देखील अस्वस्थ आहेत. धार्मिक हिंसा बुद्धांच्या विचारांचा देश म्हणून ओळख असलेल्या श्रीलंकेत होत असल्याचे दु:ख अधिक आहे. बौद्ध धम्माचा पाया शांती आणि अहिंसेंने भरलेला आहे. त्यामुळे बौद्ध भिक्षुकांना बघितल्यावर मनात कायमच शांतीचा आभास होतो. परंतु श्रीलंकेत हिंसक जमावाचे नेतृत्व करून आपल्याच धम्माच्या प्रतिमेला छेद देण्याचे काम भिख्खूकडून सुरु आहे. वास्तविक त्यांच्याकडून हिंसक जमावाला शांत करणे अपेक्षित आहे. बौद्ध धर्मात म्हटलेले आहे की, आपल्या शत्रुंवर प्रेम करा, जे तुम्हाला कष्ट देतील त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करा,अशा काही कारणांमुळेच अन्य धर्मांच्या तुलनेत अहिंसेचा सिद्धांत बौद्ध धर्मासाठी अधिक महत्वपूर्ण ठरतो. त्यामुळे आता श्रीलंकेतील वादावर जागतिक स्तरावरील बौद्ध धम्मगुरुंनी मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे जागतिक मुस्लीम गुरु यांनी देखील या विषयात लक्ष घातले पाहिजे,कारण जगातील अनेक देशात मुस्लीम धर्मीयांविषयी अविश्वास आणि असंतोष वाढतोय. त्यामुळे या धार्मिक द्वेषाचे कारण आता स्वत: मुस्लिमांनाच शोधावे लागणार आहे. कुठे तरी चुकतेय एवढे निश्चित, त्याच्याशिवाय विशिष्ट धर्माविषयीच जागतिक स्तरावर चीड निर्माण होणे शक्य नाही.
लोकसंखेच्या जोरावर धार्मिक संस्कृती लादण्याची विकृती अनके देशांमध्ये आज सुरु आहे. जगातील कमी-अधिक प्रत्येक देशात धर्म नावाचे भूत कट्टरतेची पिशाच्ची ताकत घेऊन राष्ट्रीय एकात्मताच्या छातडावर बसलेले आहे. धार्मिक कट्टरतेच्या नावाने पिडीत प्रत्येक देशात तेथील बहुसंख्य असलेल्या धर्माचे अनुयायी आपली संस्कृती सर्वोच्च आणि पवित्र असल्याचे मानतात. आमच्या धर्मात हे पाप, आम्ही बहुसंख्य असून आम्ही बेरोजगार, यासह तुमच्यामुळे आमचे धंदे बसले असे अनेक आरोप अल्पसंख्यांकांवर करीत असतात. एवढेच नाही तर व्यावसायिक अस्थिरतेतून बेगडी राष्ट्रभक्तीचा सहारा घेत समोरच्याच्या राष्ट्रनिष्ठ्तेवर संशय घ्यायचा. वेळप्रसंगी त्यांच्या धार्मिक तसेच राष्ट्रीय नागरिकत्वाचे अस्तित्वच अमान्य करायचे आणि मग त्या समुदायाविषयी मतप्रवाह तयार करायचा, असे उद्योग अनेक देशांमध्ये मोठ्या दिमाखानं आजही सुरु आहेत.
================================