जळगाव-एम.आय. डी. सी. पोलीस स्थानक, वेळ सायंकाळी ७ वाजेची. एक ४५ ते ५० वर्षीय माणसाला सात वर्षीय बालीकेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली एक बाई ओढत-ताणत पोलीस स्थानकात आणते आणि सुरु होते एक कहाणी….आजच्या विदारक सामाजिक परिस्थितीवर नेमके बोट ठेवणारी! ही कहाणी तशी चित्रपटाला साजेशीच. तिच्यात चढ-उतारासोबत भावना, प्रेम, नात्यांची बंध, थोडाफार सस्पेन्स, रडणे, संतापणे, हाणामारी आणि चित्रपटातील कहाणीप्रमाणे शेवटी सर्व ‘ऑल इज वेल’
कहाणी अशी की, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका कॉलनीत एक ट्युशन क्लास. काल सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सर्व मुलं-मुली आल्या, पण मॅडम आपल्या मुलांना गॅदरींगच्या डान्स प्रॅक्टीससाठी बाहेर घेवून गेली होती. मॅडमच्या पतीदेवाने मुलांना एक-दोन गणितं शिकवत ट्युशन सोडली. पण एका मुलीला थांबवून ठेवले आणि तिच्या बरोबर नको तो प्रकार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्या मुलीची आई आणि ती चिमुकली स्वत:देखील करीत होती. यामुळे पोलीस स्थानकाच्या परिसरातील वातावरण चांगलेच तापले. साडेसात वाजेपर्यंत थोडसं वातावरण निवळलं. पोलीसांनी नेहमीप्रमाणे तुमचा आपसात समझोता होत असेल तर बघा नाहीतर गुन्हा दाखल करण्यास आम्ही तयार असल्याची भुमीका घेतली. मॅडम तासभरापासून रडून-रडून त्या मुलीच्या आईच्या विनवण्या करत सांगत होती, ‘ताई तुमचा काही तरी गैरसमज होतोय माझा नवरा असा व्यक्ती नाही हो! तुम्ही परिसरात कोणालाही विचारा’, पण समोरची बाई जराही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आठ वाजेला एक ६० ते ७० वर्षीय म्हतारा डोळ्यात पाणी अन् दोघं हात जोडत त्या बाईच्या पायावर डोकं ठेवत ‘ताई माझा जावई असा नाही हो, तरी मी तुमच्या पाया पडतो, त्यांच्या वतीने माफी मागतो’ पण बाईवर काहीही परिणाम न होता माझे पती आल्यानंतर तेच निर्णय घेतील असे म्हणाल्या. साडेआठ वाजेपर्यंत ही कहाणी अशीच ‘इमोशनल ट्रॅक’वर सुरु होती. त्यानंतर त्या चिमुकलीचा मामा येतो आणि शिव्यांची लाखोली वाहत त्या माणसाला मारहाण करण्याचा प्रयत्न करतो. पण पोलीस स्टेशन असल्यामुळे तो काही करु शकला नाही. वातावरण थोडसं गंभीर होतं. नऊ वाजेच्या सुमारास आठ-दहा महीला व आठ-दहा ट्युशनमधील मुलं-मुली येतात आणि त्या माणसाची बाजू घेत म्हणतात ‘हे भाऊ असे नाहीत’, मुलंही सांगतात ‘आम्ही इतक्या दिवसापासून ट्युशनला येतो. आम्हाला माहीत आहे काका असे नाहीत’ त्यावर त्या चिमुकलीच्या आईचे उत्तर ‘माझ्या मुलीच्या जागेवर तुमची मुलगी राहीली असती तर? आणि एवढी लहान मुलगी खोट कशी बोलू शकते?’ असे सांगून निरूत्तर करते.
साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या चिमुकलीचे वडील येतात तेही मुलीच्या मामासारखेच शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. दहा वाजेला एक जण मध्यस्थी करीत ‘समझोता एक्सप्रेस’ चालवण्याचा प्रयत्न करतो. थोडावेळ रुळावर धावणारी ही एक्सप्रेस अचानक ट्रॅक सोडते आणि शेवटी पोलीसदादा त्या चिमुकलीकडून हकीकत जाणून घेत कागदावर तीची तक्रार लिहायला सुरुवात करतात. पावणे अकराच्या सुमारास मध्यस्थी करणारी व्यक्ती दोघांकडील माणसांना पोलीस स्टेशनबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली नेतो आणि तेथे शेवटी ‘मनीप्लॅट’च्या जवळ उभे राहून त्यांना समजोत्याचा मार्ग सापडतो. अखेर अकरा वाजेच्या सुमारास काही अनुत्तरीत प्रश्न सोडल्याच्या समाधानात सर्व मंडळी घराकडे रवाना झाली. आता सात वर्षाची चिमुकली कुणाच्या सांगण्यावरुन असा आरोप करेल हे म्हणणे चुकीचे होईल. आई-वडील आणि मामाचा संतापही त्यांच्या जागेवर योग्यच. त्यांच्या जागेवर कुणीही राहीले असते तरी त्यांची हीच भुमीका राहीली असती, पण ती मॅडम तिच्या परिसरातील राहणार्या इतर महिला ज्या आत्मविश्वासाने त्या माणसाची बाजू घेत त्याच्या चारीत्र्यसंपन्नतेचे दाखले देत होते तेही दुर्लक्षीत करण्यासारखं नव्हतं. ट्युशनमधील इतर चिमुकली बालकं पोलीसांसमोर असा प्रकार घडलाच नाही असे ज्या पध्दतीने आणि हिंमतीने सांगत होते ते पाहून त्यांना कोणी शिकवून आणले आहे असे म्हणणे धाडसाचेच झाले असते.
पण या कहाणीत शरमेचं पाणी कुणाचं झालं? त्या चिमुकलीचं, तिच्या आई-वडीलाचं का शांतपणे बसणारा तो आरोप झालेला माणूस की डोळ्यातून सतत तीन तास नवर्याच्या चिंतेने अश्रू ढाळणारी ती मॅडम? या प्रश्नांची उत्तरे मात्र कुणालाही देता येणार नाही. अशाप्रकारे तीन तास चित्रपटाच्या साजेशी कहाणी संपते आणि सर्वात मोठा प्रश्न विचार करायला भाग पाडून जातो की, समझोता कोणता लाभ देवून झाला आणि समझोता लाभ देवूनच झाला असेल तर हा प्रकार खरा की खोटा?