मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील पराभव स्थानिक मुख्यमंत्र्यांवर थोपवण्याचा काही जण केवीलवाणा प्रयत्न करताय. परंतु याची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान मोदी यांचीच आहे. कारण या तिघं राज्यातील सरकार केंद्रातील कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात निवडून आले होते. याचाच अर्थ या तिघं राज्यातील नेतृत्वाने आपापल्या राज्यातील जनतेची मनं त्या काळात जिंकलेली होती. परंतु मागील साडेचार वर्षापासून मोदींनी त्यांच्या अवतीभवती देशातील सर्व राज्यांचा कारभार केंद्रित करून ठेवलाय. त्यामुळे जनतेने देखील मोदीं आणि त्यांच्या कार्यकाळाला डोळ्यासमोर ठेवूनच मतदान केल्याचे मान्य करावे लागेल. दुसरीकडे ३६ वर्षात जो विकास झाला नाही,तो आम्ही पाच वर्षात करून दाखविला, असं मोदी मागील काही दिवसांपासून सतत म्हणताय. जर विकास झाला होता,मग जनतेने का नाकारले? हा प्रश्न स्वाभाविकच उभा राहतो.
भारतीय राजकारणाचा केंद्रिबदू असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन महत्त्वाच्या हिंदी राज्यांतून पंतप्रधान मोदी यांना जोरदार झटका मिळालाय. ज्यावेळी तुम्ही फक्त तुमच्या ‘मन की बात’ करतात आणि देशातील जनता,शेतकरी,तरुणांचे म्हणणे ऐकून घेत नाही त्यावेळी तुम्हाला अशा अपमानकारक पराभवाला सामोरे जावेच लागते. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांवर गोळीबार, छत्तीसगढमधील आदिवासी बांधवांच्या मोर्चाला नक्सली म्हणून हिणवणे तसेच राजस्थानमध्ये महिलांचा अपमान या सर्व गोष्टींचे उत्तर मतदारांनी मतपेटीतून दिलेय. या तिन्ही राज्यात ६५ पैकी ६२ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. २०१९ च्या दृष्टीने या जागा आता धोक्यात आल्या आहेत.
कॉंग्रेसने २०१४ मध्ये जी चूक केली, तीच चूक या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गत लोकसभेच्या वेळी सर्वांनी अगदी मोदींनाच टार्गेट केले. मोदी लाट नाही, ही गोष्ट समजावून सांगण्याच्या नादात सर्वांच्या भाषणात फक्त मोदी आणि मोदीच होते. दुसरीकडे मोदी विकास आणि ‘अच्छे दिन’चे स्वप्न लोकांना दाखवीत होते. वरील तिन्ही राज्यातील प्रचारादरम्यान, मोदींनी देखील अशीच चूक करत फक्त नेहरू-गांधी घरण्यालाच टार्गेट केले. दुसरीकडे राहुल गांधी विकासाचे आश्वासन आणि मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयावर जनजागृती करत होते. मोदींच्या कडवट टीकेमुळे नेहरू-गांधी परिवाराविषयी देखील सहानभूती वाढणे स्वाभाविक होते. ज्या वेळी दहाजण एकाच व्यक्तीला झोडपतात,त्यावेळी स्वाभाविकच त्या व्यक्ती बद्दल सहानभूती निर्माण होते. मोदी आणि राहुल या दोघांच्या बाबतीत सारखेच घडलेय.
भारतीय जनतेच्या मनात नेहरू-गांधी घरण्याबद्दल नेहमीच आदर राहिलाय. अगदी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आहे तसाच. परंतु विधवा, ड्रायव्हर, पप्पू म्हणवून हिणवणे एवढेच काय तर, ज्या राहुल गांधींची आजी,वडील देशासाठी शहीद झालेत. त्याच राहुल गांधींकडे राष्ट्रभक्तीची प्रमाणपत्र मागण्या इतपत जीभ घसरली. मोदी यांनी कोलकत्त्यात गेले तर सुभाषचंद्र बोस आणि गुजरातमध्ये गेले तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर नेहरू पर्यायी कॉंग्रेसने कसा अन्याय केला याची ओरड केली, ती देखील खोटा इतिहास सांगून. पंरतु नेत्यांनी भाषण ठोकायचे आणि जनतेने ऐकायचे हा प्रकार कधीच बंद झालाय. सोशल मिडीयाच्या जमान्यात लोकं लागलीच तथ्य तुमच्या समोर ठेवतात. मुळात इतिहास सांगून तुम्ही वर्तमान झाकू नाही शकत. तुम्हाला वर्तमान काळातील गोष्टींचे उत्तरदायित्व स्वीकारावेच लागते.
नोटाबंदी , प्लास्टिक बंदी , गोहत्या बंदी , पॉर्न बंदी आदी मुद्दे लोकांना हुकुमशाही सारखे वाटले. कुठे तरी आपल्याला दाबले जातेय, अशी भावना निर्माण झाली. दुसरीकडे देशातील प्रमुख संस्थांमध्ये सुरु असलेला सावळा गोंधळ देखील लोकं उघड डोळ्यांनी बघताय. अगदी विरोधात बातम्या दाखवल्या म्हणून पत्रकारांच्या नौकऱ्या घालवण्यात इतपतची नीच दडपशाही देखील अनुभवलीय. सीबीआय,रिझर्व बँक,ईडी आदी संस्थांची विश्वासर्हता धोक्यात आणणे, फक्त निवडणुका जिंकण्यासाठी नोटबंदीसारखा बुद्धीहीन निर्णय घेणे, या गोष्टी आज ना उद्या अंगलट येणाऱ्याच होत्या. कदाचित नोटबंदीचे साईड इफेक्ट आता खऱ्या अर्थाने मोदींना जाणवायला लागले असतील. खरं म्हणजे मोदी यांच्यात आलेला गर्व आणि अतिआत्मविश्वास निर्माण होण्यास अमित शहा नामक अतिहुशार माणूस जबाबदार आहे. मोदींना या गडीला थोडं दूर ठेवलं तर २०१९ मध्ये आशा ठेवण्यास किमान जागा शिल्लक आहे, अन्यथा घोडा,मैदान जवळच आहे. असो…मोदी साहेब आणि मोटा भाईला पुढील निवडणुकांसाठी आभाळभर शुभेच्छा !