उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा आयफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीतील अधिकारी विवेक तिवारी याची फक्त गाडी थांबविली नाही, म्हणून गोळ्या झाडून हत्या केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या ‘लाईव्ह एनकाउंटर’ची फॅशन सुरु आहे. काही स्थानिक माध्यमांच्या पत्रकारांना सोबत घेत, कुणाचा तरी एनकाउंटर करायचा आणि दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या चॅनेल आणि दैनिकांमध्ये आपली शेखी मिरवून घ्यायची. अशाच एका एनकाउंटरवरून उत्तर प्रदेशात मोठा गदारोळ झाला होता. काहीशी फुशारकी मारण्यासाठी किंवा स्व:तला दबंग पोलीस सिद्ध करण्यासाठी विवेकाचा बळी घेतला गेलाय, याबाबत मला तरी कुठलीही शंका नाहीय.
विवेकची फेसबुक वाॅलची लिंक
https://www.facebook.com/vivek.tiwari.311493
विवेक तिवारीचे फेसबुक अकाऊंट चेक केल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आले. विवेकचे वय जवळपास माझ्या एवढेच आहे. विवेकला दोन मुली आहेत आणि मुलींच्या विविध फोटोंनीच त्याची फेसबुक वाॅल भरलेली आहे. विवेकचे आपल्या पत्नी आणि पोरींसोबतचे फोटो आपण देखील बघा,अशी आपल्याला विनंती आहे. एक कुटुंबाचा प्रमुख, एका विवाहितेचा पती, दोन मुलींचा बाप फक्त आणि फक्त उत्तर प्रदेश पोलिसांच्या हिरोबाजीमुळे जीवाशी गेलाय. दोन दिवस प्रकरण माध्यमांमध्ये राहील, त्यानंतर सर्व शांत होईल. पण त्या दोन चिमुकल्या पोरींना घेऊन विवेकची पत्नी संपूर्ण आयुष्य कसं जगेल? पुरुषप्रधान संस्कृतीत जगतांना पावलोपावली आपल्या मुलींच्या भवितव्यांची चिंता तिला आतून खात राहील. कसं करेल पोरींचे पालनपोषण, शिक्षण आणि लग्न ? खाजगी नौकरी असल्यामुळे विवेकच्या पत्नीला पैसे किती मिळतील? किंवा मिळतीलच का? याबाबत माझ्या मनात शंका आहे.
पोलिस या प्रकरणाला आत्मरक्षण सांगून दाबण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला प्रत्यक्षदर्शी समोर आली आहे. ती घटनेच्या वेळी त्याच कारमध्ये विवेकसोबत होती. परंतु त्या महिलेला पोलिसांनी नजरकैद करून माध्यमांशी बोलण्यास सक्त बंदी घातली आहे. विवेकची पत्नी शुक्रवारी रात्री त्याच्या संपर्कात होती. थोड्याच वेळात घरी पोहचतोय, सांगणारा तिचा पती या जगातून कायमचा निघून गेलाय.तिच्या दुःखाची खोली जगातील कोणताच व्यक्ती समजू शकणार नाही. ती बिचारी तर विवेक फोन उचलेल या आशेने आजही त्याचा नंबर पुन्हा-पुन्हा लावत असेल. दोन्ही मुली पप्पा परत येतील म्हणून दरवाज्याकडे एकटक बघत असतील. आपल्या मुलींना असं शिक्षण देऊ, त्यांचे मोठ्या लग्न धुमधडाक्यात करू…विवेकने आपल्या पत्नीसोबत बघितलेली स्वप्न आता भंगलीयेत. विवेकच्या पत्नीचा संघर्ष आज आणि आतापासून सुरु झालाय. पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी तीच्या खांद्यावर येऊन पडली आहे.
मम्मी…पप्पा कुठे गेले? पप्पा कधी येतील या प्रश्नांची उत्तरं शंभर वेळेसही दिले तरी मुलींचे समाधान होणार नाही. कधी तरी मम्मी सांगेल की, पप्पा दिवाळीला येताय आणि आपल्याला फिरवायला घेऊन जाणार आहेत, या उत्तराच्या अपेक्षेने दोन्ही मुली आपल्या मम्मीला प्रश्न विचारातच राहतील. वाढदिवस, शाळेतील पालक दिनाला विवेकची कमी त्याची पत्नी आणि पोरींना किती टोकाची जाणवेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाहीत. मित्र, नातेवाईकमधील सर्व मुलं आपल्या आई-वडिलांसोबत सुटीत फिरायला जातील, रविवारी चित्रपट बघतील, फक्त विवेकच्या मुलींच्या नशिबातून अशा आनंदाचे क्षण कायमचे निघून गेलेयत. सायंकाळी घरी येतांना पप्पा आईसक्रीम आणतील, आम्हाला कुशीत घेऊन झोपतील, विवेकच्या दोन्ही मुलीं या सुखाला देखील कायमच्या मुकल्या आहेत. कायदा आपलं काम करेल परंतु विवेकची पत्नी आणि दोन्ही मुली उत्तर प्रदेश पोलिसांना कधीही माफ करणार नाहीत..कधीही माफ करणार नाहीत !