महाराष्ट्राला कोणी कितीही पुरोगामी म्हटले तरी आपल्या या राज्यात जातीचे स्वत:चे असे वेगळे राजकारण असल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच तर येथील कोणत्याही निवडणुकीची चर्चा अथवा विश्लेषण जातीवर येऊनच थांबते. जळगाव जिल्ह्यातील राजकारण देखील या गोष्टीला अपवाद नाहीय. जातीच्या राजकारणावर जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ संपूर्ण अवलंबून आहे. येथे जातीय गणित आणि मत विभाजनाच्या तंत्रावरच निवडणूक जिंकली जाते. मग विकासाचा मुद्दा कायमच गौण ठरतो. सर्वच पक्ष जातीय समीकरण लक्षात घेऊनच उमेदवार घोषित करतात. आगामी लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र कायम राहण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकी फार थोडा वेळ शिल्लक असल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये मोर्चे बांधणीला प्रारंभ झाला असून जातीय समीकरणांची नव्याने चर्चा होऊ लागली आहे. मात्र जिल्ह्यातील आजवरचा राजकीय इतिहास पाहता जातीय राजकारणाला विधानसभा निवडणुकीत खूप मर्यादा असल्या तरी, लोकसभा निवडणुकीत मात्र, जातीचीच गोळाबेरीज प्रभावी ठरल्याचा आजतागायत दिसून आलेय. एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात यशस्वी ठरलेली जातीची गणितं विधानसभेत मात्र, सपशेल फेल ठरताय.
येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडायला सुरुवात होणार आहे. यामुळे संपूर्ण भारताप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात देखील राजकीय समीकरणांसोबत सर्वप्रथम जातीच्या गणिताची आकडेमोड करण्यात राजकीय पक्ष व उमेदवार मग्न आहेत. कोणत्याही मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सर्वप्रथम आपापल्या मतदार संघात आपल्या जातीची किती मतं आणि त्यानुसार आपल्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे,असे ठोकताळे आपापल्या पक्षाकडे सादर करत असतात. परंतु नगरपालिका क्षेत्रात देखील कुणीही अचूक जातीनिहाय आकडेवारी मिळविणे अशक्य असतांना २० -२५ लाख लोकसंख्या असलेल्या लोकसभा मतदार संघातून आपापल्या जातीची आकडेवारी उमेदवार कशी मिळवतात,हे तर देवच जाणे. परंतु जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाचा इतिहास तपासला असता,या मतदार संघात विशिष्ट जातीचेच उमेदवार सतत निवडून येताय, हे देखील तेवढेच खरे आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघ
आताचा जळगाव व पूर्वीचा एरंडोल लोकसभा मतदार संघात एक अपवाद वगळता निवडून आलेला प्रत्येक खासदार हा मराठा समाजाचा राहिला आहे. या मतदार संघाच्या इतिहासात १९७७-८० साली निवडून आलेले राजपूत-पाटील समाजाचे सोनुसिंह पाटील वगळता आता पर्यंत कोणत्याही पक्षाकडून निवडून आलेला खासदार हा मराठा समाजाच राहिला आहे. म्हणून हा मतदार संघ मराठा बहुल मतदार संघ म्हणून गणला जातो. या मतदार संघातील जळगाव शहर विधानसभा मतदार संघ वगळता बहुतांश मतदार संघ देखील मराठा बहुल आहेत. परंतु विधानसभेत सात्यत्याने निवडून जाणारे बहुतांश मातब्बर आमदार बघितले तर,ते आपापल्या मतदारसंघात अल्पसंख्याक गटात मोडले जातात,ही एक आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे. कारण ज्या लोकसभा मतदार संघात जातीचे कार्ड प्रभावी आहे, त्याच मतदार संघातील विधानसभा क्षेत्रात मात्र,जातीचे गणित सपशेल चुकतेय. जळगाव लोकसभा मतदार संघात एकून ६ विधानसभा मतदारसंघ असून त्यात जळगाव शहर,जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव,अमळनेर,एरंडोल-पारोळा,चाळीसगावचा समावेश आहे. आजच्या घडीला एरंडोल-पारोळा व चाळीसगाव वगळता इतर सर्व मतदार संघात अल्पसंख्याक समुदायातील आमदार आहेत. यातील चाळीसगावचे आरक्षण उठल्यामुळे दहा वर्षापासून येथे मराठा समाजाचा उमेदवार निवडून येतोय. तत्पूर्वी येथे अनुसूचित जातीत मोडणाऱ्या विशिष्ट जातीचाच उमेदवार निवडून येत होता,हे देखील विशेष! तर पूर्वीचा जळगाव ग्रामीण व आताचा जळगाव शहर मतदार संघात सुरेशदादा जैन यांनी कित्येक वर्ष सत्ता गाजवली. परंतु गेल्या निवडणुकीत त्यांना या मतदार संघात बहुसंख्य असलेल्या लेवा पाटीदार समाजाचे उमेदवार राजूमामा भोळे यांनी पराभूत केलेय.
जळगाव लोकसभा मतदार संघातील पारोळा या एकमेव विधानसभा मतदारसंघातून आजवर मराठा समाजाच आमदार निवडून येतोय. परंतु अन्य विधानसभा क्षेत्रात मात्र, सर्व जातीच्या उमेदवारांना राजकीय यश मिळाले आहे. आताचा जळगाव ग्रामीण आणि पूर्वीचा एरंडोल-धरणगाव विधानसभा मतदारसंघात सातत्याने अल्पसंख्याक आमदार निवडून येतोय. त्यात पारूताई वाघ, महेंद्रसिंग पाटील, हरीभाऊ महाजन, तर विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. गुलाबराव पाटील यांनी तर तब्बल तीन वेळेस या ठिकाणी विजय संपादन करत मंत्रिपद देखील मिळविले आहे. परंतु २००९ मध्ये गुलाबराव देवकर यांनी विजय मिळवीत या मतदार संघात पकड बनविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र,देवकर यांना यश मिळाले नाही. या ठिकाणी २०१४ मध्ये पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांनी विजय मिळवीत सोशल इंजिनियरिंगचा फंडा यशस्वी करून दाखविला होता. पाचोरा विधानसभा मतदार संघात कधीकाळी स्व. के.एम. बापू पाटील आणि स्व. ओंकारआप्पा वाघ यांच्याकडेच आलटून-पालटून सत्ता अबाधित होती. परंतु या मतदारसंघात राजपूत-पाटील समाजाचे आर.ओ. पाटील यांनी तब्बल दहा वर्षे आपले वर्चस्व राखले. त्यानंतर दिलीप वाघ यांनी २००९ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा आपल्या परिवाराच्या ताब्यात घेतला. परंतु २०१४ मध्ये पुन्हा एकदा हा मतदारसंघ अल्पसंख्याक घटकाचे प्रतिनिधी असणारे आर.ओ. पाटील यांचे पुतणे किशोरअप्पा पाटील यांच्याकडे गेला. एकंदरीत काही वर्षापासून या मतदार संघात वाघ व पाटील परिवारात रस्सीखेच सुरु आहे. पारोळा-एरंडोल आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघात देखील मराठा समूहाचे राजकीय प्राबल्य आहे. परंतु गतनिवडणुकीत अमळनेरातून निवडून येत शिरीष चौधरी यांनी पहिल्यांदा या मतदार संघाची परंपरा खंडित केली. एकंदरीत जळगाव लोकसभा मतदार संघात लोकसभेला जातीचे गणित प्रभावी ठरते तर दुसरीकडे या मतदार संघात समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदार संघात मात्र, जातीचे गणित फारसे महत्व राखत नसल्याचेच चित्र आहे.
रावेर लोकसभा मतदार संघ
पुर्वीच्या बुलढाणा, मध्यंतरीच्या जळगाव आणि सध्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे महत्व राखून आहे. अवघ्या महाराष्ट्रातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव खासदार याच मतदार संघातून कित्येक वर्षापासून निवडून जातोय. त्यात शिवराम रंगो राणे, वाय.एस. महाजन, वाय.एम. बोरोले, गुणवंतराव सरोदे, डॉ. उल्हास पाटील, वाय.जी. महाजन आणि हरीभाऊ जावळे,रक्षाताई खडसे यांचा समावेश आहे. त्यामुळे हा मतदार संघ लेवा पाटीदार समुदायाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात निर्णायक असणाऱ्या मराठा समाजाला याठिकाणी अद्याप एकदाही यश मिळालेले नाही. रावेर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात रावेर-यावल, मुक्ताईनगर-बोदवड,भुसावळ,चोपडा, मलकापूर- नांदुरा, जामनेरचा समावेश आहे. या मतदार संघातील चोपडा,जामनेर वगळता जवळपास सर्वच विधानसभा मतदार संघात लेवा पाटीदार समुदाय निर्णायक अवस्थेत आहे. विशेष म्हणजे त्यातील जवळपास सर्वच मतदार संघात मराठा समाज देखील मोठी ताकत राखून आहे. त्यामुळेच या लोकसभा मतदार संघात लेवा विरुद्ध मराठा उमेदवार अशीच लढत कायम बघावयास मिळते.
रावेर लोकसभा मतदार संघातील सहापैकी दोन मतदार संघ राखीव आहेत. चोपडा आदिवासी बहुल मतदार संघ आहे. परंतु हा मतदार संघ खुला असेपर्यंत एक पंचवार्षिक वगळता कित्येक वर्ष अरुणभाई गुजराथी यांनी येथे सत्ता गाजवलीय. आता देखील आदिवासी पावरा समाजाच्या तुलनेत कमी मतदार संख्या असलेल्या कोळी समाजाचे प्रा.चंद्रकांत सोनवणे हे निवडून आलेले आहे. तर भुसावळ या मतदार संघात मागील पंधरा वर्ष वगळता हा मतदार संघ तब्बल तीस वर्षे लेवा पाटीदार समाजाच्या उमेदवारांकडे राखून होता. परंतु या मतदार संघात अत्यल्प असलेल्या तेली समुदायाचे संतोष चौधरी यांनी विजय मिळवीत इतिहास घडविला. एवढेच नावे तर, या मतदारसंघाने मुस्लीम समुदायाचे हाजी यासीम बागवान यांना देखील एकदा संधी दिली होती. मागील दहा वर्षापासून हा मतदार संघ राखीव झाल्यानंतर देखील अनुसूचित जातीतील बहुसंख्य असलेल्या जातीच्या उमेदवाराचा अत्यल्प चर्मकार समुदायातील संजय सावकारे यांनी सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत पराभव करत विजय मिळविलेला आहे. त्याच पद्धतीने मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघात लेवा समुदाय अल्पसंख्याक असतानाही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मागील तीस वर्षापासून या मतदार संघावर आपली पकड घट्ट राखून आहेत. खडसे यांच्या प्रमाणेच जामनेर विधानसभा मतदार संघात राज्याचे विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे देखील आपल्या मतदार संघातील अल्पसंख्याक समुदायातून येतात. तरी देखील ना.महाजन यांनी आपल्या मतदार संघात भक्कम पकड बनविली आहे. त्याच पद्धतीने मालकापूर-नांदुरामधून देखील अत्यल्प जैन-मारवाडी समुदायाचे चैनसुख संचेती हे सतत निवडून येताय. रावेर लोकसभा मतदार संघातील रावेर-यावल या एकमेव मतदार संघात मागील कित्येक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये बहुसंख्य असलेला लेवा पाटीदार समुदायाच्या उमेदवार निवडून येतोय. परंतु कधीकाळी स्व.रमाबाई देशपांडे यांनी देखील या मतदारसंघातून विजय संपादन केल्याचा इतिहास आहे. एकंदरीत रावेर लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रात जळगाव लोकसभा मतदार संघाप्रमाणे बहुसंख्य असलेला समाज सत्तेबाहेरच आहे.