लायनची कहाणी तशी नेहमीच्या पठडीतील हिंदी सिनेमांसारखीच,आई-भाऊ-बहिण आणि अचानक ‘बिछडना’ सर्व नेहमीच्या बॉलीवूड सिनेमा प्रमाणे.परंतु ‘मिलना’ मात्र हटके असेच आहे.असं म्हणतात की,रक्ताच्या नात्याची ओढ शेवटपर्यंत मानवी मनात घर करून असते.नात्याची तुटलेली नाळ माणसाला अस्वस्थ करून सोडत असते.नेमके हेच या सिनेमात दाखविलेले आहे.कहाणी फिल्मी असली तरी खरी आहे.२५ वर्षापासून कुटुंबापासून दूर जाऊन देखील,त्यांच्या आठवणी विसरू न शकणाऱ्या तरुणाचा ही कहाणी आहे.हा सिनेमा बघत असतांना तो कधी आपल्या काळजाचा ताबा घेतो ते आपल्याला सुद्धा कळत नाही.लायन पाहताना कुठलाही संवेदनशील व्यक्ती भावनिक झाल्याशिवाय राहत नाही.सिनेमाची कहाणी, त्याची मांडणी,लोकेशन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संवाद आपल्याला हलवून सोडतात.’लाँग वे होम’ या पुस्तकावरून हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे.
चित्रपटाची कहाणी 1980च्या दशकात भारतातील खंडवा (मध्य प्रदेश) शहरात सुरु होते.शेरू आणि त्याचा मोठा भाऊ गुड्डू हे कोळसा उचलण्याचे काम करतात. या कोळशाविक्रीवरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह सूर आहे.परंतु एकदिवशी एका क्षुल्लक चुकीमुळे शेरू आपल्या भावापासून थेट हजारो मैल दूर कोलकत्ता शहरात जाऊन पोहोचतो.आपण कुठे आहोत,आता कुणाला काय सांगायचे हेच शेरूला कळत नाही.कोलकत्ता रेल्वे स्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचा आशेने हाथ धरत ‘मुझे घर जाना है’ एवढेच तो सांगत असतो.खरं म्हणजे शेरूची व्यकीरेखा ज्या पद्धतीने मांडली गेली आहे.त्यावरून लक्षात येते की,सिनेमाचा लेखक किती प्रतिभाशाली आहे.ऑस्ट्रेलियन लेखक ल्युक डेव्हिस यांनी शेरूच्या स्वभावापासून तर सिनेमातील प्रत्येक पात्राची बारकाईने मांडणी केली आहे.सिनेमात शेरूसोबत येणारे प्रत्येक पात्र आपल्या लक्षात राहते.अगदी अवघ्या काही मिनिटासाठी समोर आलेला नवाजोद्दिन सिद्दिकी आणि दीप्ती नवल यांच्या भूमिकाही आपल्या लक्षात राहतात.शेरूचे आपली आई आणि भाऊसोबत असलेले भावनांचे धागे ज्या प्रकारे गुंफले आहेत त्याची मांडणी खरचं अफलातून अशीच म्हणावी लागेल.काही दृष्य एवढ्या ताकदीचे आहेत की,तुमचे डोळे तुमच्या सोबत कधी दगा करतात हे तुम्हाला देखील कळत नाही.शेरूचा आपल्या कुटुंबियांचा शोधाचा प्रवास पाहणे खऱंच रंजक आहे.
शेरू कोलकत्त्यात आल्यानंतर त्याला पहिल्याच भेटीत जगातील हीनमाणुसकीचे दर्शन होते.त्याला विकण्याच्या उद्देशाने घरी नेणाऱ्यांच्या हातून तो अवघ्या काही तासात निसटतो.त्यानंतर एका तरुणाच्या मदतीने एका अनाथ आश्रमात जातो.त्यानंतर शेरू ते सरू ब्रायरले हा प्रवास बघतांना हा सिनेमा केव्हा आपल्या मनाला त्याच्या त्याब्यात घेतो हे देखील आपल्याला कळत नाही.अनाथ आश्रमातून शेरूला थेट ऑस्ट्रेलियात दत्तक दिले जाते.आपल्या प्रेमळ स्वभावामुळे सरू अवघ्या काही दिवसात आई-वडिलांचा लाडका बनतो.काही दिवसांनी सरूचे आई-वडील पुन्हा एका गतीमंद मुलाला दत्तक घेतात.सर्व काही आनंदात सुरु आहे.सरू आता मोठा झाला असून त्याच्या जीवनात एक तरुणी देखील आली आहे.परंतु आपल्या खऱ्या आई आणि भावाची आठवणी सरूच्या मनात आजही ताज्या आहेत.सर्व काही स्पष्ट आठवत नाही,परंतु जे आठवते ते सरूला स्वस्थ बसू देत नाही.सरू आपल्या प्रेयसीला सर्व सांगतो.ती त्याला धीर देते पण सरू आपल्या बालपणाच्या शोधात हळू-हळू तिच्यापासून दुरावत असल्यामुळे ती सरूपासून दुखावते.दुसरीकडे एकेदिवशी त्याच्यासारखे ऑस्ट्रेलियात दत्तक आलेले मूलं त्याला गुगल अर्थच्या सहाय्याने आई-वडिलांचा शोध घेण्याचा सल्ला देतात.मग सरू गुगल अर्थच्या माध्यामतून कोलकातापासून तर थेट मध्यप्रदेशातील आपल्या घराचा शोध कसा घेतो हे अत्यंत कमालीचे दाखविलेले आहे.शोध घेतल्या नंतर सरु आपल्या आईला सर्व हकीगत सांगतो आणि भारतात त्याच्या खऱ्या आईचा शोध घेण्याचा मनोदय व्यक्त करतो.त्यावेळी तिच्या प्रेमात काय कमी राहिली,सरू परत येणार की नाही अशा प्रश्नांनी भावनाशील झालेली सरूची आई आपल्या अश्रूंचा बांध देखील फोडते.भारतात परत आल्यानंतर पाऊलवाटा आपोआपच सरूला आपल्या घरा पर्यंत पोहचवतात.त्यानंतर स्थानिक व्यक्तीच्या मदतीने तो घरी पोहोचतो.सरू आणि त्याच्या खऱ्या आईसोबत भेटीचे दृष्य पुन्हा एकदा आपले मन हेलावून सोडते.
बालपणीचा सरू अर्थात सनी पवार याची अदाकारी खरंच कमालीची आहे.एखादं प्रगल्भ अभिनेत्या प्रमाणे त्याने या सिनेमातील पात्राचा आलेख ताकदीने उंचावला आहे.तर तारुण्यातील सरू अर्थात ‘स्लमडॉग’फेम देव पटेलचीही तारीफ करावीच लागेल.लायनच्या निमित्ताने देव आपली दखल हॉलीवूड प्रमाणे बॉलीवूडलाही घ्यायला भाग पाडेल हे निश्चित आहे.परंतु या सिनेमाचा खरा हिरो हा बालपणीचा सरू म्हणजे सनी पवारच आहे.त्याच्या मोठया भावाची भूमिका निभावणारा अभिषेक बर्हाटे याच्या अस्तित्वाची जाणीव देखील शेवटच्या क्षणापर्यंत जाणवत राहते.या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे भारतातील रिअल लोकेशनवर झालेले चित्रीकरण.या ठिकाणी चित्रित केलेले दृष्य आपल्याला एका मिनिटासाठी देखील आपली नाळ सिनेमापासून तुटू देत नाही.सिनेमाचे दिग्दर्शक ग्रथ डावीस यांची मांडणी भन्नाट आहे.सिनेमा बघतांना आपल्याला कुठेही हा सिनेमा एका परदेशी व्यक्तीने बनविल्याचे जाणवत नाही.हिंदीतील संवाद आणि भारतातील दृष्य कमालीने चित्रीकरण करण्यात आले आहे.शेरू म्हणजे वाघ आणि वाघ म्हणजेच लायन म्हणूच या सिनेमाचे नाव लायन आहे.
ऑस्करमध्ये विविध वर्गात नामांकन मिळाल्यापासूनच खरं म्हणजे लायन बघण्याची उत्सुकता कमालीची वाढली होती.या सिनेमातील एक तथ्य माझ्या जीवनाशी निगडीत असल्यामुळे हा सिनेमा बघतांना आम्हा पती-पत्नीचे डोळे अनेक दृष्यात सोबतच पाणावले.सिनेमा भन्नाट परंतु वस्तूस्थिती तेवढी हृद्य पीळवून सोडणारी आहे.युट्युबवर सरूच्या खऱ्या आईची मुलाखत बघितली.त्यामुळे काही अंशी सरूबद्दल माझ्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे.सरू आईला मागील एका वर्षापासून भेटलेला नाही.साधारण ६ महिन्यातून एका आईसोबत फोनवर बोलतो.अगदी झोपडीवजा घरात त्याची आई आजही राहते.एक भाऊ अपंग आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे सरुची आई दुसऱ्या तीन लोकांच्या घरी धुनी-भांडी करून उदरनिर्वाह करीत आहे.सिनेमा एक प्रेषक म्हणून तुम्हाला अंतर्बाह्य हलवून टाकतो परंतु सरूची आई फातिमा बीची युट्युबवरील मुलाखत बघून हृदयाला काटे टूचतात.सिनेमात दाखवलेला आणि खऱ्या आयुष्यातला सरू यांच्यात मला शेकडो मैलाचं अंतर वाटते.
(युट्युबवरील सरूच्या खऱ्या आईची मुलाखत)