‘नेशन फर्स्ट’ अशी लग्नाची पहिली अट असू शकते का? असा प्रश्न जर कुणाला विचारला तर त्याची गोधंळल्यागत स्थिती होईल. परंतु तेजस्विनी सावंत आणि समीर दरेकर या दाम्पत्याने याच अटीवर लग्न केले आणि याचे फलित म्हणून आपण राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनी सावंत यांनी नेमबाजीत मिळविलेल्या सुवर्ण आणि रौप्य पदकाच्या निमित्ताने बघत आहोत. विशेष म्हणजे त्यांनी नम्रपणे आपले दोन्ही पदकं शहीद सैनिकांना अर्पण केले आहेत. म्हणूनच हा ‘सुवर्ण’वेध वैयक्तिक कामगिरीचा नव्हे तर राष्ट्रभक्तीचा ठरतो !
खरं म्हणजे लग्नानंतर ‘चूल आणि मुल’ हा आपल्या भारतीय समाजात आतापर्यंतचा मोठा गैरसमज होता. परंतु तेजस्विनी सावंत यांच्यासारख्या कर्तुत्ववान महिलांनी हा समज खोडून काढण्यात कायमच मोठी भूमिका निभावली आहे. लग्नानंतर आपल्या जोडीदाराकडून प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. त्यातल्या त्यात पत्नी संसारासाठी एक पाऊल मागे घेण्यासाठी कायम तयार असते, हे वास्तव नाही म्हटले तरी कुणी नाकारू शकत नाही. परंतु आपला पती,आपला जीवनसाथी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला तर एक महिला देखील जगाच्या नकाशावर आपले नाव झळकावू शकते, हे तेजस्विनी सावंत-दरेकर यांच्या रूपाने पुन्हा एकदा सिद्ध झालेय. म्हणूनच तेजस्विनींजीच्या या विजयात त्यांना एक पती आणि मित्र म्हणून भक्कम साथ देणारे माझे मित्र समीर दरेकर हे देखील अभिनंदनास पात्र ठरतात. त्यामुळेच समीरजी आणि वहिनींचे मनपूर्वक अभिनंदन ! आणि हो माझ्या मते चंद्रकांतदादा पाटील यांच्या अभिनंदनाशिवाय तर सुवर्णपदकाची जिंकल्याची मजाच अपूर्ण राहील. आपल्या माहितीस्तव सांगतो तेजस्विनी सावंत ह्या राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मानस कन्या आहेत.
तेजस्विनी सावंत यांना लग्नांनंतर देखील खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे समीररावांच्या मते तेजस्विनी फक्त खेळ नाही खेळत, ती प्रकारे राष्ट्रसेवाच करतेय. देशभक्ती या जोडप्याच्या नसा नसात भिनलेली आहे. म्हणूनच तर मोठ्या रॅली काढून हारतुरे घेण्याचे कार्यक्रमाला न जाता तेजस्विनींजी भारतात आल्याबरोबर पुण्यातील एएफएम या संस्थेत आपल्या पतीसमवेत जात पदकं भारतीय जवानांना समर्पित करणार आहेत. ही संस्था युद्धात अपंगत्व आलेल्या भारतीय सैन्यातील जवानांसाठी काम करते. एवढेच नव्हे तर जयसिंगपूर येथील ज्या पानटपरी चालकाने कठीण काळात आर्थिक मदत गोळा केली आणि ज्या कुलकर्णी काकांनी ‘तेजस्विनी पदक आणत नाही, तो पर्यंत पेढा खाणार नाही’,अशी शपथ घेतली त्यांना कोल्हापुरात आल्यावर पहिल्यांदा दोघेजण भेटणार आहेत. खरचं ना, काही माणसं किती साधी असू शकतात यावर विश्वासच बसत नाही.
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सध्या आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलय. कोल्हापूरच्या कन्या, नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर यांनी सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची लयलूट सुरूच ठेवली. त्यांनी महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये आज सुवर्णपदक पटकावले. तत्पूर्वी गुरुवारी रौप्य पदक देखील पटकावले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितून तेही संसारिक जबाबदारी सांभाळून एखादं महिलेच्या विजयाला किती महत्व असतं, हे आज लक्षात येतेय.
समीरजींसोबत माझी ओळख माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने जळगाव येथील विभाकर कुरमभट्टी सर यांच्या माध्यमातून झाली होती. समीरराव स्वत: एक प्रसिद्ध लेखक तथा सामजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच समीरजी आपल्या कामात प्रचंड व्यस्त असतात. तरी देखील व्हाटस्अपच्या माध्यातूनच आमचा संवाद दररोज सुरु असतो. पुण्यात बऱ्याचदा पुस्तकाच्या निमित्ताने समीरजी सोबत भेटीगाठी देखील झाल्या. याच काळात आम्ही चांगले मित्र देखील बनलो. एकेदिवशी दिवसभर माझ्यासोबत पुस्तकावरील मजकुराबाबत काम केल्यानंतर मुंबई विमान तळावर आपल्या पत्नीला घेण्यासाठी समीरजी यांची सुरु असलेली धावपळ खरचं मनाला भावली होती. आपल्या जीवनसाथीदाराची काळजी आणि प्रेम त्यांच्या धावपळीतून जाणवत होते.
संपूर्ण आयुष्य देश आणि आपल्या सैनिकांसाठी अर्पण करायचे, अशी लग्नातली पहिली अट पती-पत्नीने एकमेकाला टाकल्याचे कुणाच्याच ऐकण्यात नसेल. परंतु तेजस्विनी आणि समीर या अनोख्या जोडप्याने देशसेवा हेच आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याची खूणगाठ बांधलीय. या दोघांच्या डोक्यात आणि मनात चोवीस तास फक्त अन् फक्त देशप्रेमच ओसंडून वाहते. तेजस्विनी सावंत हे ब्रॅन्डनेम एका दिवसात तयार नाही झालेय. त्यासाठी टोकाचा संघर्ष आणि मेहनत त्यांनी केलीय. कोल्हापूरच्या जनता देखील या संघर्षाची साक्षीदार आहे.
तेजस्विनी सावंत-दरेकर यांच्याकडे सुरुवातीच्या काळात स्वतःची रायफल देखील नव्हती. त्यावेळी रायसिंगपूर या गावातील एका पानटपरीवाल्याने ‘तेजस्विनी सावंत देशात नेमबाजी स्पर्धेत प्रथम’ अशा मथळ्याखाली आलेली बातमीचे कात्रण आपल्या टपरीवर लावले. त्यानंतर साधारण त्यांच्याकडे जमा झालेले पाच ते सहा हजार रुपये त्यांनी तेजस्विनींजीला आणून दिले. एवढेच नव्हे तर कोल्हापूरमधील कुलकर्णी नामक व्यक्तीने तर तेजस्विनी जो पर्यंत पदक आणत नाही,तो पर्यंत पेढा खाणारच नाही, अशी प्रतिज्ञाच केली होती. हे प्रेम फक्त एखादं प्रामाणिक व्यक्ती आणि आपल्या कामाशी निष्ठा असलेल्या व्यक्तीलाच मिळू शकते. ऑस्ट्रेलियाला जातांना तेजस्विनी यांनी आपल्या सोबत शिवचारित्र नेले होते. समीरराव सांगतात,या ग्रंथातील कुठलेही पान उघडून वाचले तर नैराश्य तुमच्या आजूबाजूला देखील येऊ शकत नाही.एवढी ताकद महाराजांच्या कार्यात आहे.
खरं म्हणजे लिहिण्यासारखे भरपूर आहे. परंतु पाठबळाचा ‘सुवर्ण’वेध तेजस्विनींवहिनीनी कायमच साधावा, याच यानिमित्ताने भविष्यासाठी शुभेच्छा…! तूर्त आपल्यासाठी एक फोटो शेअर करतोय, त्यावरून आपण अंदाज बांधू शकाल की, वडील म्हणून चंद्रकांतदादा आणि एक पती-मित्र म्हणून समीरजींचा आनंद कसा ओसंडून वाहतोय. पुन्हा एकदा समीरजी आपले आणि तेजस्विनी वहिनींचे मनपूर्वक अभिनंदन !
प्रसिद्ध दिनांक
१३ एप्रिल २०१८
https://www.facebook.com/vijay.waghmare.73/posts/1963755967030253