प्रसिद्ध चित्रपट निर्माते,दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणावर बनविलेली ‘राम के नाम’ (in the name of god) ही डॉक्युमेंटरी भारतीय इतिहासाच्या दृष्ट्तीने खूप महत्वपूर्ण आहे. ही एक अशी कलाकृती आहे, ज्यात तुम्ही ९० च्या दशकात राम मंदिराच्या नावावर आपल्या देशात काय झाले? कुणी केले? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुणा-कुणाचा राजकीय,आर्थिक फायदा झाला? हे आपल्या लक्षात येते. एवढेच नव्हे तर त्याकाळातील पिढीतील तरुणाईला देखील धर्माच्या नावावर भडकवले गेले होते.त्यानंतर एक अख्खी पिढी बर्बाद झाली होती आणि आज पुन्हा एकदा राम मंदिराच्याच नावावर एका नवीन पिढीचे भवितव्य अंधारमय करण्याचा राजकारण्यांचा डाव आहे. ही डॉक्युमेंटरी रामभक्त, सहिष्णू असलेल्या प्रत्येक हिंदू व्यक्तिंने तसचं प्रत्येक मुस्लीम बांधवांनी देखील किमान एकदा बघावी आणि त्यानंतरच कुठलाही विचार करावा.
साधारण पाचशे वर्ष जुना बाबरी मस्जिद-राम जन्मभूमी वाद १९९२ नंतर पुन्हा देशात वातावरण तणावग्रस्त स्थिती निर्माण करतोय. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशिदीवर पडणारा प्रत्येक हातोड्यातून निर्माण होणारा ध्वनीने देशाची सामाजिक सलोखा आणि राजकीय परिभाषाच बदलवून टाकली. उरात धडकी भरविणारा हा ध्वनी आज देखील आपल्याला राजकारण्यांच्या भाषणातून ऐकू येतो. म्हणून तर १९९२ मध्ये नेमके काय घडले होते. हे सत्य जाणून घेण्यासाठी ‘राम के नाम’ एक महान वृत्तचित्र आहे,असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
राम मंदिरासाठी भाजपचे नेते एल.के. अडवाणी यांनी काढलेल्या रथ यात्रेवर आधारित आहे. संपूर्ण डॉक्युमेंटरी राम मंदिरासाठी निघालेल्या रथ यात्रेच्या अवतीभवतीच फिरते. मुंबईत राम मंदिरासाठी निघालेल्या रथ यात्रेत सामील होण्यासाठी आवाहन करत फिरत असलेल्या वाहनांच्यासोबत अयोध्येकडे रवाना होत असलेले कारसेवक दिसतात. यावेळी ‘श्रीराम फास्ट फूड’ दुकानाचे अगदी छोटेसे दृश्य आणि एका तरुण उद्योजकाची छोटीशी मुलाखत खूप-काही सांगून जाते. त्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्युमेंटरीला सुरुवात होते. सुरुवातीला राम मंदिराचा थोडक्यात इतिहास सांगितला जातो. त्यात बाबरी मशीदचे निर्माण सन १५२८ झाले आणि त्याच्या ५० वर्षानंतर तुलसीदास यांनी रामचरितमानस लिहित श्रीराम कथा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवले. त्यानंतर १९ व्या शतकापर्यंत संपूर्ण अयोध्या नगरी मंदिरांनी भरून गेली. विशेष म्हणजे यातील अनेक मंदिरांनी प्रभू राम यांचा जन्म याच ठिकाणी झाल्याचा दावा केला.
इंग्रजांनी भारतात पाय रोवल्यावर त्यांना कायमच हिंदू-मुस्लीम एकतेतून आपली सत्ता जाण्याचा धोका होता. म्हणूनच त्यांनी पद्धतशीरपणे सतत बाबरी मशीदीच्या ठिकाणी राम जन्मभूमी असल्याची अफवा पसरवत राहिले. तरी देखील हिंदू आणि मुस्लीम या विवादीत स्थळाबाबत बऱ्यापैकी शांतता राखून होते. त्यानुसार हिंदू मशिदीच्या प्रांगणात तर मुस्लीम मशिदीत नमाज अदा करत होते. परंतु या अलिखित समजोत्याचा अंत २३ डिसेंबर १९४९ मध्ये झाला. काही कट्टरतावादी हिंदू बांधवांनी मशिदीत घुसत प्रभू राम यांच्या मुर्त्या ठेवल्या. अयोध्येचे तत्कालीन जिल्हाधिकारी के.के. नायर यांनी शहरात दंगा होण्याची भीती व्यक्त करत मशिदीतून मुर्त्या हटविण्यास नकार दिला. त्यानंतर काही वर्षांनी नायर यांनी भारतीय संघमध्ये प्रवेश केला आणि खासदार देखील होतात.
न्यायालयीन प्रक्रियेत मशीद-मंदिर गेल्यानंतर याठिकाणी भगवान श्रीराम प्रकटल्याचा दावा देखील काही दिवस करण्यात आला होता. परंतु याची वास्तविकता वेगळीच होती. ज्या महंत रामसेवकदास शास्त्री यांनी मुर्त्या मशिदीत ठेवल्या होत्या. त्यांचे म्हणणे होते की, तत्कालीन जिल्हाधिकारी के.के. नायर हे त्यांचे वरिष्ठ मार्गदर्शक होते. तर दुसरीकडे बाबरी मशिदीचे प्रमुख मौलवी हाजी अब्दुल गफ्फार यांच्या मुलग सांगतो की, मुर्त्या ठेवल्याचे माहित पडल्यावर घटनास्थळी गेल्यावर जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले की, आजच्या दिवस तुम्ही दुसरीकडे नमाज अदा करा, एक-दोन दिवसात मी यावर मार्ग काढतो. परंतु आजतागायत यावर निर्णय होऊ शकला नाही.
राम मंदिरसाठी निघालेल्या यात्रेदरम्यान, कमरेवर छोटसं पोरगं उभी असलेल्या महिला ज्यावेळी म्हणते, ‘ हमे कुछ पता क्या शुरू हैं. हमे तो पेटभर खाणे की पडी हैं’ त्याच वेळी बाजूला रथावर उभे राहून अडवाणी ‘मंदिर वही बनेगा’ म्हणून भाषण करताय. नेमके हेच दृश्य आपल्याला भारतातील खरी परिस्थितीची जाणीव करून देतात. अडवाणी यांनी आश्वासन दिल्यानंतरही रथयात्रेदरम्यान देशभरात अनेक हिंसक घटना घडल्या. ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर दुसरीकडे अडवाणी यांचा रामरथ अयोध्येच्या दिशेने आगेकूच करत होता. या काळात अगदी कॉंग्रेसचे पदाधिकारी, सर्व जातीची हिंदू देखील मंदिर बनले पाहिजेच्या मुद्द्यावर आग्रही होते. विहिप,बजरंग दल आदी संघटना या काळात प्रचंड आक्रमक होत्या.
या डॉक्युमेंटरीमध्ये भगवान श्रीराम यांच्या जन्माशी निगडीत अनेक साधे प्रश्न आंदोलनकर्त्यांना विचारण्यात आले. मात्र त्यांची उत्तर त्यांना देता येत नाहीत, हे बघून त्याकाळात सर्वसामान्य लोकांची माथी नेमकी कशी भडकवली गेली होती.हे देखील याठिकाणी आपल्या लक्षात येते. तर दुसरीकडे दंग्यांमध्ये अनेक लोकांचे मृतदेह पाहून आपल्या अंगावर काटा उभा राहतो. तर धर्मनिरपेक्ष नागरिक रथ यात्रेचा विरोध म्हणून अनेक ठिकाणी सभा घेत होते. याच बरोबर मंडळ आयोगामुळे उच्च वर्णीयांचा तत्कालीन कॉंग्रेस सरकारविरुद्ध राग टोकाला गेला होता. अयोध्या नजीकच्या गावात लालकृष्ण अडवाणी, स्व.प्रमोद महाजन, स्व.गोपीनाथ मुंडे आणि अभिनेता शत्रूगण सिन्हा यांची एक जाहीर सभा आणि त्यातील भाषणं हे अधोरेखीत करतात की, कधी काळी अडवाणीजी हे आजच्या नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा प्रचंड लोकप्रिय होते.
अडवाणी यांच्या अटकेनंतर अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. रामजन्म भूमीतील पुजारी लालदास यांनी आपल्या सडेतोड मुलाखतीत विंहिप आणि ढोंगी राजकारणी,साधू यांच्यावर गंभीर आरोप लावलेले आहेत. राम मंदिरसाठी देश विदेशातून आलेले करोडे-अरबो रुपयांच्या घफला गेल्याचा आरोप केलाय. या नंतर इन्कमटॅक्स विभागाचे विशव बंधू नामक अधिकाऱ्याची मुलाखत तर अशा ढोंगी लोकांच्या बाबतीत आपल्या मनात प्रचंड संताप निर्माण करते. या अधिकाऱ्याने विंहिप प्रमुख अशोक सिंघल यांना नोटीस बजावत देश विदेशातून आलेल्या पैशांचे स्त्रोत आणि हिशोब विचारला होता. परंतु अवघ्या काही तासात त्यांची बदली मद्रास येथे करण्यात येते. एवढेचे नव्हे तर त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते.
या अधिकाऱ्याची मुलाखत म्हणजे कोणत्याही काळात आणि प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्याची स्थिती सारखीच असल्याचे दर्शवते.या मुलाखतीत ते माहिती देतांना सांगतात की, वास्तविक बघता रिझर्व बँकेने विश्व हिंदू परिषदची राजकीय आणि तोडफोडची भूमिका लक्षात घेता बाहेर देशातून पैसे स्वीकारण्यास नकार दिला होता. १९८९ मध्ये अशोक सिंघल यांनी दाखल केलेल्या रिटर्नमध्ये त्यांनी आपण सर्व हिशोब दिल्याचे सांगितले होते. मात्र, रिटर्न सोबत हिशोबचा एकही कागद दिलेला नव्हता. विहिंपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिलान्याससाठी झालेल्या १ कोटी ६० लाखाच्या खर्चावरून मोठा वाद झाला होता.या संघटनेतील काही पदाधिकार्यांना माहित होते की, या पैशांचा कुठलाही हिशोब नसल्यामुळे शिक्षा होणे अटळ आहे,त्यामुळेच सरकारचे समर्थन परत घेण्याची धमकी देण्यात आली असावी. विशव बंधू यांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.
या शेवटची काही मिनिटं तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. कारण १९९३मध्ये कट्टरपंथीयांसह अशोक सिंघल,विश्व हिंदू परिषदवर गंभीर आरोप करणारे पुजारी लालदास यांची हत्या झालेली असते. तर तत्पूर्वी १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आलेली असते. बाबरी मशिद विध्वंसांनंतर आपल्या देशात अनेकांनी जीव गमावलेला असतो. तर पार्श्वसंगीतात संत कबीर आपल्या डोह्यातून आपल्याला काही प्रश्न विचारून शरमेने मान खाली घालायला भाग पाडतात.