जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    राजसंन्यास : कलमकसाईचा फालतू प्रयोग !

    admin by admin
    January 10, 2017
    in नाटक समीक्षण
    0
    राजसंन्यास : कलमकसाईचा फालतू प्रयोग !

    राम गणेश गडकरी यांनी सन १९१६-१७ साली लिहिलेली ‘राजसंन्यास’ या नाट्यकृती बाबत सध्या प्रचंड वादंग सुरु आहे.संभाजी बिग्रेडने गडकरींचा पुतळा हटविल्यानंतर या नाटकाबाबत आणि गडकरींच्या लिखाणाबाबत निषेध नोंदविला. परंतु साधारण १०० वर्षापूर्वी लिहिलेल्या नाटकावर न वाचता भाष्य करणे हे मला काही संयुक्तिक वाटले नाही.त्यामुळे मनात कोणतीही पूर्वग्रह दुषित भूमिका न ठेवता आधी नाटक वाचून काढले.त्यानंतर समीक्षण करण्याचे ठरविले.१९८ पानांच्या या नाटकात अगदी आताच्या एखाद सिनेमाप्रमाणे चढ-उतार आहेत.यात सत्तेसाठी कट-कारस्थान, प्रेमकहाणी,बदला,मादक दृष्य याबरोबर अश्लील संवादांचा भरणा देखील आहे.गडकरींनी लिहिलेल्या ‘वेड्याचा बाजार’ आणि ‘राजसंन्यास’ या दोन नाट्यकृती अपूर्ण असल्याचे सांगण्यात येते.’राजसंन्यास’ या अपूर्ण लिखित नाटकात संभाजी राजे,छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवाराबद्दल आक्षेपार्ह गोष्टी मांडण्यात आल्या आहेत.त्यामुळे हे नाटक म्हणजे कलमकसाईचा फालतू प्रयोग म्हटला तर चुकीचे ठरणार नाही.
    राम गणेश गडकरी यांचा मृत्यु २३ जानेवारी १९१९ साली झाल्यामुळे राजसंन्यास हे नाटक अपूर्ण राहिल्याची मान्यता आहे.गडकरी यांचे साहित्य सध्या http://ramganeshgadkari.com या संकेतस्थळावर वाचण्यासाठी उपलब्ध आहे.या नाटकासंबंधी अनेक संदर्भ देखील या संकेतस्थळावर आढळतात.’महाराष्ट्र शासनाने’ ‘राम गणेश गडकरी समग्र वाड्मय’ प्रकाशित केलेले आहे.त्याचे संपादन प्र.के.अत्रे यांनी केले होते.वरील संकेतस्थळावर तसेच इंटरनेटवर इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या या नाटकाच्या पीडीएफ फाइल नुसार ‘राजसंन्यास’ या नाट्यकृतीचा अंक पहिला (प्रवेश१,२,३)अंक तिसरा (प्रवेश १ ) व अंक पाचवा (प्रवेश १,२,३,४,५)हे उपलब्ध आहेत. म्हणजेच या नाटकातील अंक दुसरा व चौथा कुठेच उपलब्ध नाहीत.खरं म्हणजे कोणताही लेखक आपली कादंबरी किंवा नाटक हे सलग लिहित असतो.परंतु या नाट्यकृतीत एक अंक राखून पुढचा अंक लिहिला गेला आहे.गडकरींनी असे का केले याचे उत्तर त्यांच्याच जवळ असावे.अपूर्ण असतांना देखील गडकरींच्या समग्र वाड्मय’ या संकेतस्थळावर ‘राजसंन्यास’ नाटकाच्या प्रयोगातील काही फोटो उपलब्ध आहेत.त्यामुळे अपूर्ण नाटकाचे सादरीकरण कसे झाले ? अर्थात अपूर्ण नाटक सादर करता येत नाही, असा काही नियम नाही.परंतु नाटकाचे प्रयोग झाले म्हणजे हे नाटक पूर्ण लिहिलेले आहे असे मानण्यास जागा आहे.मग नाटक पूर्ण लिहिलेले असेल तर त्यातील दोन अंक कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित होणे देखील स्वाभाविक आहे.गडकरींच्या संकेतस्थळावर या नाटकाचे उपलब्ध असलेले तीन अंकांमधील काही प्रवेश अपूर्ण आहेत.विशेष म्हणजे याच अंकांमध्ये आक्षेपार्ह संवाद आहेत.त्यामुळे या संकेत स्थळावरून वगळण्यात आलेल्या अंकांप्रमाणे मूळ नाटकाचे दोन अंक देखील मुद्दाम गायब तर करण्यात आलेले नाहीत ना ? अशी शंका निर्माण होते. दुसरीकडे राजसंन्यास हे नाटक काल्पनिक असल्याचे सांगण्यात येते.परंतु या काल्पनिक नाटकात देशाच्या इतिहासातील अजरामर अशा महापुरुषांच्या नावाने पात्र का लिहिण्यात आली?, नाटकातील पात्रांना इतर पात्रांप्रमाणे दुसरी कथित नावे देता नसती आली का ? असे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.दुसरीकडे गडकरींनी नाटक लिहिले त्याकाळात साहित्यिक लिखाण व वाचन हे काही ठराविक लोकांपुरते मर्यादित होते.त्यामुळे गडकरींना या नाट्यकृतीबद्दल फार विरोधाला सामोरे जावे लागले नसेल.परंतु आताचा वाद देखील अनाठायी वाटतो.वास्तविक बघता या पुस्तकावर कायदेशीररित्या बंदीसाठी प्रयत्न होणे गरजेचे होते.परंतु तसे झाले नाही.कोणत्या संघटनेने यासाठी काही प्रयत्न केले का ? केले असतील तर त्याचे पुढे काय झाले? असे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.एखाद व्यक्ती चुकला म्हणून संपूर्ण समुदायाला आरोपीच्या कठड्यात उभे करणेही योग्य ठरत नाही.दरम्यान,इतक्या जुन्या नाटकावर आता वाद उभा करणे म्हणजे, पुन्हा एकदा आपल्या महापुरुषांची बदनामीकारक मजकूर इतिहासाच्या गोठयातून बाहेर काढण्यासारखे आहे.ज्यांना माहित नाही त्यांना देखील आज राजसंन्यास अशा नावाचे कोणते नाटक आहे हे माहित पडले.यातील संवाद वा संदर्भ सर्वांना माहित असायला हे काही जग प्रसिद्ध नाटक नाही की,गडकरी हे शेक्सपीअर नाहीत ! त्यामुळे विनाकारण वाद वाढविण्यात काय अर्थ !
                                                                              राजसंन्यास नाटकाचे कथानक
    राजसंन्यास नाटक हे संभाजी महाराजांच्या अवती-भवती गुंफण्यात आले आहे.संभाजी राजांनी आपल्या मातोश्रींचा बळी घेतलेला आहे.संभाजी राजेंचे त्यांच्या सेनासागर प्रमुख दौलतरावच्या पत्नी तुळशी सोबत अनैतिक संबंध कसे प्रस्थापित होतात.तसेच त्यांचे काही सहकारी त्यांचे राज्य कसे उलथावू पाहतात.दौलतरावची पत्नी तुळशी तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला कसा घेते (तुळशीच्या मान्यतेनुसारचा अन्याय) हा या नाटकाचा प्रमुख आशय आहे.
    तुळशी ही संभाजी राजेंच्या विश्वासू हिरोजी फरदंज यांची मुलगी असते.स्वभावाने शिघ्रकोपी,अत्यंत गर्विष्ठ तसेच लोभी असते.ती आपला पती दौलतराव सोबत खुश नसते.कारण दौलतराव हा तुळशीला नेहमी घरात कोंडून ठेवत असतो.इथं बसू नकोस, असे हसू नकोस, तिथे जाऊ नकोस, तसे गाऊ नकोस, इकडे पाहू नकोस, तिकडे राहू नकोस!अशा पद्धतीचा त्रास तिला देत असतो म्हणून तुळशी एकेरात्री मध्यरात्री घर सोडून जाते.परंतु समुद्रातून जात असतांना तिची होडी पलटते.यावेळी दौलतराव तिच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु संभाजीराजे तिला वाचवतात.यानंतर दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडतात.त्यानंतर संभाजीराजे एकेदिवशी तुळशीसोबत बघून महाराणी येसुबाई त्यांची समजूत घालतात.यावेळी संभाजीराजेंना आपली चूक लक्षात येते.ते त्याचवेळी तुळशीचा त्याग करतात.यावेळी तुळशी नको त्या शब्दात संभाजी राजेंच्या चारित्र्याचा उद्धार करते.त्यांनतर तुळशी आपल्या पती दौलतकडे परत जाते.त्याचवेळी दौलतचे वडील म्हणजे संभाजी राजे यांचे निष्ठावान सैनिक साबाजी यांना आपल्या पुत्राने मोगलांच्या सहाय्याने राज्य उलथु घालण्याची शपथ घेतल्याचे माहित पडते.साबाजी दौलतची समजूत काढतात.परंतु माझ्या पत्नीला माझ्यापासून दूर नेणाऱ्यांचा नाश करण्याची शपथ घेतल्याचे तो सांगतो.शेवटी नाईलाजाने साबाजी आपल्या मुलाची म्हणजे दौलतची हत्या करतात.याचवेळी अर्धमेलेल्या दौलतजवळ तुळशी पोहचते आणि त्यांच्या रक्ताने माखलेला एक दगड पदराला बांधत संभाजी राजेंना मोगलांच्या ताब्यात देत मराठयांचे राज्य खालसा करण्याची शपथ मरणशय्येवर असलेल्या दौलतला देते.यानंतर काही दिवसांनी संभाजीराजे गोव्याचे युद्ध जिंकतात.यावेळी त्यांच्यासोबत तह करण्यासाठी आलेला इंग्रजाचा गव्हर्नर त्यांच्या मनोरंजनासाठी एक सुंदर स्त्री देतो.ही स्त्री दुसरी कुणी नव्हे तर,तुळशीच असते.तुळशी पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याच्या बळाने संभाजी राज्यांना भुलविते.यानंतर संभाजीराजे तिला आपल्या सोबत परत नेतात.तुळशी महालावर परत आल्यानंतर मोरे व माने यांच्या मदतीने संभाजी राजेंच्या हत्येचा कट रचते.परंतु जंगलात शिकारी दरम्यान संभाजी राजेंवर झालेला हल्ला हिरोजी फरजंद हा अंगावर झेलतो.कालांतराने संभाजी राजेंच्या निष्ठावानांवर संशय निर्माण होईल असे अनेक षड्यंत्र रचले जातात.अखेर मोरे आणि माने एकेदिवशी संभाजी राजेंना कैद करण्यात यशस्वी होतात.यावेळी तुळशी मोठा आनंदी होते.परंतु तुळशीचे वडील म्हणजे हिरोजी फरजंद यावेळी तुळशीची हत्या करतात.यानंतर संभाजी राजांना कैद केले जाते.काही दिवसांनी साबाजी संभाजी राज्यांना कैदैतून सोडविण्यासाठी येतो.परंतु संभाजी राजे नकार देत म्हणतात…राजा म्हणजे जगाचा उपभोगशून्य स्वामी ! राज्यउपभोग म्हणजे राजसंन्यास! ना विष्णु: पृथिवीपति:! आणि याठिकाणी पडदा पडतो.
                                                                      नाटकातील महत्वाची पात्रं 
    संभाजी राजे,येसूबाई,तुळशी, साबाजी,हिरोजी,दौलतराव,जिवाजीपंत,देहू,चांदणी,मंजुळा आदि.यातील जिवाजीपंतचे पात्र मोठे कपटी दाखविण्यात आले आहे.थोडक्यात सांगायचे तर कलमकसाई ही उपमा त्याला तंतोतंत लागू पडते.तसेच देहू हा छत्रपती शिवाजी महाराज होण्याचे स्वप्न बघणारा मल्ल तर चांदणी ही देखील काही अंशी लोभी असते आणि यासाठी ती देहू आणि जिवाजीपंतचा उपयोग करते.औरंगजेबचे पात्र देखील काही काळासाठी आपल्या समोर येते.या नाटकातील काही संवाद हे फारच वासनांध आहेत.तर काही संवादांमध्ये शिव्यांचा देखील प्रयोग करण्यात आलेला आहे.या नाटकात एकूण तीन अंक आहेत.नाटकाचे संवाद हे शिवकालीन बोलीभाषेची आठवण करून देतात.
                                                                        नाटकातील आक्षेपार्ह संवाद
    जिवाजीपंत : आम्हा कलमदान्यांच्या घराण्यामध्ये लेखणी करण्यात हा जिवाजी म्हणजे केवळ शिवाजीसारखा शककर्ता पुरुष निपजलेला पाहून माझ्या वाडवडिलांना इतका आनंद झाला असेल की, अखेर वहीवर त्या आनंदाची जमा करताना चित्रगुप्ताच्या कैक लेखण्या बोथट झाल्या असतील!
    संभाजीराजांनी या कलुशाला प्रधान केल्यापासून आमच्या सद्दीचा जोर असा बळावत चालला आहे, की नशिबाच्या रेषा कपाळावर साखळीने आखलेल्या गंधागत नीटस वठलेल्या आहेत असेच वाटते! ही असामी मात्र खरी नागमोडी मनाची आहे! अगदी इरसाल असामी! इतका नीच माणूस इतक्या उंच जागी बसलेला कधी कुणी पाहिला नसेल! कुठून कनोजी उंची अत्तरे विकायला आला काय आणि मराठेशाहीचा प्रधान झाला काय!
    देहू : राजांसारखी केसाळ ऐट साधण्यासाठी हा डोकीभर संजाब ठेवून दिला आहे असा! जिरेटोपाला जोड देण्यासाठी वडिलांच्या पागोटयाच्या दीडशे हातांच्या चाकातून तेवढी कोकीच काढून डोकीवर चढवायची आहे! वाघनखे नाहीत म्हणून तूर्तास मी मांजरीच्या नख्यांवरच भागवून नेत आहे!
    अंगबळाने नाही, तर हत्तीघोडे लागतात का छत्रपती व्हायला? जरा अंगीपिंडी भरला गडी की झाला शिवाजी!
    जिवाजी : आता उघड माप पदरात घालू लागलो तर म्हणशील, की पंत, आडमाप बोलता म्हणून! अरे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती साडेतीन हात उंचीचा, नाकीडोळी नीटस, काळगेल्या रंगाचा, राकटलेल्या अंगाचा, हरहुन्नरी ढंगाचा, लिहिणे पुसणे बेतास बात, गुडघ्यात अंमळ अधू, असा एक इसम होऊन गेला! त्याची काय बरी मातब्बरी सांगतोस एवढी? म्हणजे हिंदुपदपाच्छाई उठवली! काय रे, मोगलाई मोडलीन् मराठेशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटते! शिवाजीच्या राज्यात लिंबोणीला आंबे लागले, का शेळीने आपापली पोर वाघाच्या पेटयाला दिली, का कणसातून माणसे उपजली? अरे, केले काय शिवाजीने असे? मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती ती मराठेशाहीत कवटीवर चढली एवढाच लाभ! शिवाजी नशिबाचा म्हणून नाव झाले इतकेच! त्यातून तुला खरे सांगू? अरे, खरा मोठेपणा अशा आरडाओरडीवर नसतो! शिवाजीची खरी लायकी चारचौघांना पुढे कळणार आहे! त्या माणसात काही जीव नाही रे!
    जिवाजी : सांगू तुला देहू? कलमाच्या मदतीवाचून कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ! अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला; पण खरी करणी त्या रामदासाची आहे! त्याने आपला ‘दासबोध’ ग्रंथ लिहिला नसता, तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना! आणि दासबोध ग्रंथ कशाने लिहिला सांग बघू? शिवाजीच्या भवानी तलवारीने? नाही! तुझ्या आडदांड करेलीने? नाही! नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही; तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळया भानगडीच्या मुळाशी होते! आता तूच सांग बघू भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर?

    जिवाजी : बरोबर बोललास! अरे, शिवाजी किस चिडियाका नाम है! शिवबाने जो एवढा ग्रंथ केला त्याची एकूण एक पाने समर्थांनी खरडली होती! अरे, माझा तर असाच होरा वाहतो की, शिवाजीच्या नावात रामदासाइतका काही राम नाही! आता तुला व्हायचे आहे शिवाजी! पण एखाद्या रामदासावाचून तू कसा होणार शिवाजी? बेटा देहू, बच्चा, बोल आता तुझा रामदास कोण ते?
    तुळशी : (संभाजीस प्रतिज्ञेने उद्देशून ) अस्सं काय? पैशाच्चिक विषयांधा,स्त्रीलंपटा! नावाची मी तुळशी आहे!लोखंडाची कांब वाकत नाही,पण वाकली म्हणजे मात्र कायमचीच!(रागाने कायमची निघून जाते)

    संभाजी : गोब्राह्मणप्रतिपालक हिंदुपदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज! नाही, साबाजी, ही माझी किताब नाही! संभाजी हा म्हणजे केवळ रंडीबाज छकटा! काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकवटून छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थाची- श्रीगंगासागराची ज्याने व्याभिचाराच्या दिवाणखान्यातली मोरी बनवली तो हा संभाजी! वैराग्याच्या वेगाने फडफडणार्‍या भगव्या झेंडयाला दारूबाजांचे तोंड पुसण्याचा दस्तरुमाल केला! महाराष्ट्रलक्ष्मीच्या वैभवाचा जरीपटका फाडून त्याची रांडेसाठी काचोळी केली!

    संभाजी : रायगडावर उभा राहून सार्‍या मराठेशाहीला ओरडून सांग, की मराठेशाहीचा मोहरा नामोहरम झाला; रायगडचा रणमर्द मनाचा नामर्द ठरला. मातेला मरण दिले; प्रजा म्हणजे पोटच्या पोरासारखी- कन्येशी व्याभिचार केला. देवीसारख्या पत्नीचा राक्षसाप्रमाणे छळ केला.
    वरील वेगवेगळ्या संवादांमध्ये शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या कर्तुत्वावर शंका आणि चारित्र्यहनन होईल असा मजकूर लिहिलेला आहे.वरील संवादानुसार छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे निव्वळ किरकोळ असे व्यक्तीमत्व होते.तसेच त्यांची शरीरयष्टी वरुन खिल्ली देखील उडविण्यात आली आहे.तसेच महाराजांच्या महान कार्यावर देखील शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.तर शेवटच्या संवादात संभाजी राज्याच्या तोंडून स्वतःबद्दलच खालच्या दर्जाचे शब्दप्रयोग देखील करण्यात आले आहे.या संवादांव्यतिरिक्त आणखी अनेक अक्षेपार्ह संवांद देखील या नाट्यात आहेत.
    ======================

    राजसंन्यास नाटकाच्या प्रयोगातील काही फोटो (सौजन्य http://ramganeshgadkari.com)

    नाटकाची प्रत (ऑनलाईन) सौजन्य : http://marathipustake.org/Books/RAAJSANYAS.pdf

     

    Tags: rajsanyasrajsanyas marathi dramaram ganesh gadkarisambhaji brigadesambhaji maharajshivaji maharajराजसंन्यास नाटक समीक्षणराम गणेश गडकरीविजय वाघमारे पत्रकार जळगावशिवाजी महाराजसंभाजी बिग्रेडसंभाजी महाराज
    Previous Post

    राष्ट्रवादी…’अमंगल’ सावधान !

    Next Post

    शिवसेना-भाजपा आणि ‘आय लव यु’वाला प्यार…!

    Next Post
    शिवसेना-भाजपा आणि ‘आय लव यु’वाला प्यार…!

    शिवसेना-भाजपा आणि 'आय लव यु'वाला प्यार...!

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.