तसं नेहमी प्रमाणेच कॉलेजला गेलो, तो दिवस इतर सामान्य दिवसाप्रमाणेच काहीच विशेष नाही सोबत नेहमी प्रमाणे मित्रांची चांडाळ चौकडी. एनएसएसच्या कॅम्प संदर्भात मिटिंग होती. प्रथम आणि द्वीतीय वर्षातील सर्व मुल आणि मुली अगदी झाडून हजर होत्या, कारण महाविद्यालयीन जीवनात एनएसएसचा कॅम्प आणि गॅदरिंग या दोन गोष्टीसाठी सर्वच जण वर्षभर आतुर असतात. कॉलेजमध्ये अर्थात आमचा ग्रुप नंबर वन असल्यामुळे उशिरा येवून देखील माझा मित्र नानू आणि मला पहिल्या बेंचवर जागा मिळाली इतर मित्र मागे बसले. सर येण्याआधी बराच वेळ वर्गात सर्वांची टिंगल टवाळी सुरु होती. अचानक एक मित्राने माझ्यावर एक कमेंट पास केली, त्याला उत्तर देण्यासाठी मागे वळलो, बस त्यावेळी जग, वेळ सर्व माझ्यासाठी थांबलं…एकाच कॉलेजला असल्यानंतर देखील मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं, मोठे डोळे, चेहर्यावर अगदी लहान मुलीचे हावभाव, बराच वेळ बघत असतांना माझा मित्र मला म्हणाला कुणाकडे बघतोय रे….माझ्या तोंडातून सहज निघाले ती ब्लॅक ड्रेसवाल्या मुलीकडे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. माझा मित्र थोडा थबकला अन् म्हणाला पागल झाला का? हे काय असे अचानक, कोण आहे…कोण नाही, काही तपास करतो, कि, डायरेक्ट काही पण….मी म्हणालो ते मला माहित नाही, लग्न करेल तर हिच्याशीच! हृदयाचे ठोके वाढले होते, पण मन सांगत होतं, नाही…हि फक्त माझ्यासाठीच आहे. तिच्या डोळ्यामध्ये मला माझं उभं आयुष्य एका क्षणांत दिसलं होत. मित्राला म्हटलं तू जा तपास कर…अर्थात भाऊ बोलण्यात पटाईत असल्यामुळे अवघ्या काही मिनिटात सर्व माहिती घेवून आला. अरे…यार सिम्पल पोरगी आहे…मला नाही वाटत ती अशी असेल…मग त्याला बोललो, साल्या मग मी तुला कोणता तसा दिसतोय…तो हसला…आणि म्हणाला हा ते बरोबर आहे बघू नंतर, मी म्हटलो नंतर नाही आताच मार्गी लाव विषय…मग तो थोडा भनकला आणि म्हणाला, गप बस आता पुरे झाले…बघू सांगितले ना…! पण माझं काही चित्त लागेना…थोड्या वेळात सर आले, मिटिंग सुरु झाली. चालू वर्षात कॅम्पला कोणाला संधी मिळणार त्यांची नावे जाहीर झाली. नशिबाने माझं आणि तीचहि नाव नव्हत..अर्थात मी प्लॅन करून ठेवला होता, नाव आले तरी यावर्षी कॅम्प नाही करायचा म्हणून. साधारण तासभर मिटिंग सुरु होती आणि मी कुठल्या नि कुठल्या कारणाने मागे वळून तिच्याकडे पाहत होतो. कॉलेज सुटले मग काय…गाडी असून मी पायी तिच्यामागे…बसस्थानक कुठे आले काही समजले नाही, थोड्या वेळाने ती बसमध्ये बसली अन निघून गेली. तिला पुन्हा कधी बघायला मिळेल…कधी भेट होईल या विचारातच माझी रात्र गेली. अवघ्या कॉलेजमध्ये कोणत्याही मुलीशी बोलयला न घाबरणारा मी…तिच्या सोबत बोलण्यासाठी घाबरू लागलो. आमच्या ग्रुपमधील मित्र आणि मैत्रिणींनी तिच्यासोबत ओळख केली. आणि थोड्या वेळाने माझी पण ओळख करून दिली. ते दिवस जीवनातील सर्वात सुंदर दिवस होते. येणारा प्रत्येक क्षण माझ्यासाठी अंगावर नवीन शहारे आणणारा होता. ती माझ्या बाबतीत काय विचार करत असेल? मी तिला आवडतो कि, नाही? माझ्या मनातले तिला कधी सांगू …? आता सांगितले तर ती माझ्या बाबतीत काय विचार करेल? नंतर सांगितले त्यात उशीर झाला तर? असे अनेक प्रश्न मनात घोळ घालत होते. मित्रांपासून माझी अस्वस्थता लपून राहिली नव्हती…त्यांनी लागलीच कॉलेजमध्ये वातावरण तयार केले. सरांसोबत बोलून पुढील रविवारी पद्मालयला सायकलवर जायचा प्लॅन केला. एनएसएस ग्रुपची सायकल रॅली निघाली..धरणगावपासून थेट पद्मालय पर्यंत मस्त गप्पा…हसत-खेळत कुठे वेळ पुढे सरकत होता काही कळतच नव्हते…एरवी प्रवासाची चीड असणार्या, मला हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं, शेवटी पोहचलो. माझे मित्र पोहचले, गप्पांचा तपशील विचारायला लागले. काही गोष्टी लपवित बाकी सांगितले. सर्वांनी फोर्स केला. रोमांटिक जागा आहे, प्रपोज करून टाक…मोठ्या हिमंतीने जेवणानंतर तिला प्रपोज केले. ती म्हणाली हे अस काय अचानक? नाही माझ्या आयुष्यात अश्या गोष्टीना जागा नाही. मला आई-वडिलांनी शिकण्यासाठी पाठविले आहे. प्लीज नको…! म्हणत ती निघून गेली…तो दिवस आयुष्यातला सर्वात भयंकर वेदनादायी दिवस, काही दिवस कॉलेजमध्ये तसेच गेले…एक दिवशी अचानक कॉलेजमध्ये माझ्या मनीषा नावाच्या मैत्रिणीने विचारले काय झाले? काय टेन्शनमध्ये काही दिवसापासून? काही नाही ग असच…म्हणत तीला टाळण्याचा प्रयत्न केला. तिने डोक्याला लावलेले पिवळ्या रंगाचे गुलाबाचे फुल मला दिले आणि म्हणाली परत एकदा जा…मला विश्वास आहे ती हो म्हणेल. मी पुन्हा बहरलो…फुल घेवून तिच्याकडे निघालो…फुल दिले…ती हसली…तिच्या हसण्यात मी मागील काही दिवसाची वेदना एका क्षणात विसरलो….प्रेमात दिवस जाऊ लागले…अखं कॉलेजला आमचे प्रेम माहित होते. ना तिने कधी लपवण्याचा प्रयत्न केला ना मी…खर सांगतो मंतरलेले दिवस होते यार ते…साधारण दोन वर्षांनी आम्ही लग्न केले…लग्न करून ती..तिच्या घरी मी माझ्या घरी होतो…जॉब सुरु केला. एक महिन्यानंतर घराबाहेर पडत कुटुंबियांना निर्णय कळविला…काही दिवस विरोध झाला अर्थात आंतरजातीय विवाह असल्यामुळे आम्हाला अपेक्षित होता. माझ्या वडिलांनी तर घर डोक्यावर घेतले होते. नंतर त्यांनीच विधीवत लग्न लावून दिले…संसार आनंदाने सुरु आहे…लग्नाच्या १० वर्षांनंतर देखील प्रत्येक दिवस आम्ही सुरुवातीच्या कॉलेजच्या जीवना सारखा जगण्याचा प्रयत्न करतोय…थोडा राग…रुसवा…भांडण पण एकंदरीत मस्त सुरु आहे…जीवन असच तिच्या सोबत प्रेमात जाव…बाकी काही अपेक्षा नाही. मेरे प्यार कि उमर हो इतनी सनम तेरे नाम से शुरू तेरे नाम से खतम….सहज ‘व्हलेन्टाइन डे’च्या निमित्ताने आठवलं म्हणून !