एक दिवस अचानक घरातून संतापात निघालो. कुटूंबीयाचा विरोध धुत्कारत सरळ बसस्टॅडचा रस्ता पकडला. हातात पिशवी, त्यात फक्त एक ड्रेस कुठे जाऊ हा एकच विचार; चालताना मनात घोळ घालत होता. मित्राला फोन लावला ,अरे घरातून निघालो आहे कळत नाही ,यार काय करू? तिकडून लागलीच उत्तर आले ,कुठेच जाऊ नको सरळ माझ्याकडे पुण्याला ये, मी म्हटल तू स्वत: होस्टेलमध्ये राहतो. कस शक्य आहे?त्यावर तो म्हणाला,, तु ये तर खरं…लावू आपण काही जुगाड. दुसर्या दिवशी सकाळी पुण्याला पोहचलो. तेथून सरळ होस्टेलच्या रुमवर गेलो, बाकीच्या मुलाना विश्वासात घेत काही दिवस माझ्या मित्राला रेक्टरला न समजु देता होस्टेला राहु द्यायचे आहे म्हणुन त्याने बाकीच्या मुलंाना विनवणी केली. जीवनातल्या सर्वात कठिण प्रसंगात तो माझ्या सोबत उभा राहीला. किंबहुना आज ही सर्वात आधी मदतीला तो धावू येणार असा माझ्या जिवलग मित्र नानू याचा आज वाढदिवस.संगीतात अफलातून इंटरेस असलेला रंगीला रतन !
आमच्या मैत्रीतील अनेक किस्से आजही धरणगाव कॉलेजमध्ये प्राध्यापक लोक अनेकदा चर्चीत असतात.तसे आम्ही उपद्रवी होतोच, माझा वाढदिवस ११ मेला असून देखील अनेक वर्ष आम्ही दोघांनी आमचा वाढदिवस ६ मेलाच साजरा करायचो.वेगळे झाल्यानंतर देखील दर वर्षी त्याला कुरियरने केक पाठवायचो. तारूण्यात अनेक छोट्यामोठ्या चुका आमच्याकडून झाल्या त्यातून आम्ही दोघंानी मार्गही काढला. पण ते दिवस खरच सांगतो, मंतरलेलेच होते ! पुण्यात आम्ही घालवलेल्या दिवसानीच आमच्या मैत्रीला खरा आकार दिला, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पुण्याला गेल्यानंतर दोन तीन दिवस तर होस्टेल मध्येच थांबलो. त्यानंतर जाणवले की खिशातले पैसे जास्त दिवस नाही टिकणार. तसा जॉबच्या शोधात होतोच. स्वारगेटला एका सायबर कॅफेमध्ये बाराशे रुपये महीन्याने लागलो. होस्टेलपासुन स्वारगेटला येण्याजाण्याच्या भाड्यातच निम्मा पगार जाईल म्हणुन विचार करत बसलो. मग अस ठरवल की दुपारचे जेवण करायचे नाही. फक्त सकाळी पोह्यांचा नाश्ता करायचा पण तरीदेखील महिन्याचे गणित काही बसेना. मग , एक दिवस अचानक नानूने रात्रीचे जेवणाचे दोन ऐवजी एकच डबा आणला. मी म्हटले अरे एकच डबा, त्यावर त्याने सांगीतले की, अरे मी दुपारचा अर्धा डबा उरवुन ठेवला आहे. तो आणि आताचा डबा मिळून आपल्या दोघाचे जेवण होऊन जाईल. आपण रोजच असे केले तर तुझा पगार आणि मला घरून येणारे पैसे यात आपला महिना भागुन जाईल. खरं सांगतो, मन खुप गहीवरुन आल होत.कारण मला माहित होत की,तो अस का करतो आहे.या अडचणीच्या काळात त्याला त्याच्या दोस्ताची पुरी साथ द्यायची होती.त्यावेळी तेवढाच भारीपण भरत होतो की, असा सच्चा दोस्त मिळाला म्हणून !
अनेक दिवस पुण्यात असेच काढले. शेवटी नशीब पालटले नानूचं एमए पुर्ण झालं आणि कॉलसेंटरमध्ये चागल्या पगारवर त्याला नोकरी लागली. थोड्याच दिवसात मलादेखील एका खाजगी कंपनीत नोकरी लागली. मग काय, दोघानं कडेही बर्यापैकी पैसा खेळायला लागला. मग तीच धरणगावची धिंगामस्ती काही दिवस पुण्यात पण केली.कालांतराने तो मुंबईला गेला आणि मी धरणगावला परत आलो. तत्पुर्वी माझ्या जीवनात पुन्हा एकदा कल्लोळ उडाला.माझ्या प्रेम विवाहानंतर नानूला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. आम्हा दोघांना मुंबईला जाणार्या लक्झरीत बसवून तो घरी परतला. त्यानंतर त्याचा फोन नाही की काही निरोप. साधारण दीड महिन्यानंतर मुंबईहून मी ज्यावेळी पुन्हा एकदा धरणगावला परतलो त्यावेळी नानूचा स्वभाव बदललेला होता. त्याने सरळ माझ्याशी बोलणे बंद केले होते. घरी फोन लावायचो तरी गडी फोनवर यायला तयार व्हायचा नाही.काय करू काही कळेना. नेहमीच्या धरणी मधील कट्ट्यावर इतर मित्रासोबत दिवस भर आम्ही सोबत असुनदेखील चकार शब्द एकमेकासोबत बोलायचे नाही. दुसर्या मित्रांनी अनेकदा काय कारण आहे ते जाणून घेण्याचा त्याच्याकडून प्रयत्न केला.पण नानूने कुणालाही काही सांगत नव्हता.त्याच्या अशा वागण्यामुळे मी कमालीचा अस्वस्थ होतो.दुसरीकडे माझी पत्नी आणि कुटुंबीय देखील मनाला खात होती,की नानूच आणि माझे बोलणे बंद होते.साधारण दिड महिना असाच गेला.एक दिवस रात्री जेवणाच्या ताटावर बसेल तोच नानूचा फोन आला. तू आताच मला भेटायला ये,महत्वाचे बोलायचे आहे.धरणगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर आमची भेट झाली. गाडी लावत नाही तोच नानू म्हणाला आता लग्न झाले आहे. जॉब वैगेरे करायचा नाही का ?असाच रिकामा किती दिवस फिरणार आहे.मी म्हटल आधी सांग तू इतके दिवस का बोलत नव्हतास, त्या वर नानू संतापात म्हणाला, तू माझा सर्वात जवळचा मित्र आणि लग्नाची गोष्ट माझ्यापासुन का लपवली? मी त्याला सांगितले, माझ्या प्रेम विवाहामुळे भविष्यात काही मोठा प्रॉब्लेम झाला असता तर तू विनाकारण अडचणीत आला असता.आणि माझा जिवलग मित्र माझ्यामुळे अडचणीत आला असता तर मी स्वत:ला कधीच माफ करु शकला नसतो. म्हणून तूझ्यापासुन लग्नाची गोष्ट लपवली यार ! त्याला माझी ही भावना समजली. आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. बराच वेळ आम्ही दोघजण खुप रडलो ! दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे ज्यावेळी नानू सकाळी मला गाडीवर घरी घ्यायला आला.तेव्हा सर्वांच हायसे झाले. एकाच गाडीवर धरणीच्या कट्ट्यावर गेलो त्यावेळी बाकीची मित्र पण भलतेच खुश झालेत कारण आम्ही दोन्ही दोस्त म्हणजे ग्रुपची जान …एकदम फुल्ल्ल्ल टू धमाल होतो आम्ही..अनेक किस्से आमच्या मैत्रीत घडले.
नानू आज मुंबई राहतो आणि मी जळगावमध्ये. तरीदेखील नियमीतपणे आम्हा दोघांना एकमेकाशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. आमचे पारिवारीक संबंधही आमच्या मैत्री सारखेच आहे. आम्ही एकमेकाच्या आई वडीलाना कधीही काका काकू म्हटले नाही. आम्ही नेहमी आई बाबा नावानेच त्याच्याशी बोलतो. माझ्या पत्नीला तो नेहमी एकेरी नावाने बोलेल. मी देखील त्याच पध्दतीने त्याच्या पत्नीला मित्रासारखी हाक मारणार. कारण आम्हादोघा मित्रांना नात्यांमध्ये नव्हे तर मैत्रीमध्ये विश्वास आहे.तो विश्वास आम्हाला आयुष्यभर टिकवायचा आहे.असो; लिहीण्यासारखे भरपुर आहे, पण आता एवढेच सांगेल मेरा प्यार; मेरा यार !
मैत्रीत विश्वास मोलाचा,
आयुष्यभर जपायचा !